फॅशनच्या ‘कान’गोष्टी

दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, कलाकार-दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना गौरवण्यासाठी ‘कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ फ्रान्समध्ये भरवला जातो.

दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, कलाकार-दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना गौरवण्यासाठी ‘कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ फ्रान्समध्ये भरवला जातो. मात्र गेली अनेक वर्षे हा फेस्टिव्हल येताना आणि जाताना एकच चर्चा असते ती या फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर कोणी, कशी आणि किती फॅशन केली? या फेस्टिव्हलमध्ये कोणत्या देशाच्या चित्रपटाने बेस्ट फिल्म पुरस्कार मिळवला यापेक्षा रेड कार्पेटवर कोणाची फॅशन बेस्ट होती, हे महत्त्वाचं ठरतं. कान म्हणजे फॅशनची पंढरी हे समीकरण सगळय़ांनीच मान्य केलं आहे याची प्रचीती यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ठळकपणे जाणवली. कारण यंदा केवळ मॉडेल्स, कलाकारच नाही तर चक्क फॅशन इन्फ्लूएन्सर्सनीही ग्लॅमरस अवतारात रेड कार्पेटवर हजेरी लावली. अर्थात, यंदाचा कान भारतीय तारे-तारकांनी अधिकच झळाळून उठला हे विशेष..परदेशात होणारे फेस्टिव्हल्स, गाला इव्हेंट्स हे वेगवेगळय़ा फॅशनप्रकारांसाठी ओळखले जातात. ‘कान’चे रेड कार्पेट हे फक्त ग्लॅमरस फॅशनसाठी ओळखले जाते.

इथे चित्रविचित्र फॅशन करणाऱ्यांना रेड कार्पेटवर आणि त्या त्या कलाकाराच्या मायदेशीही तिखट बोल ऐकावे लागतात. त्यामुळे इथे फॅशन करताना भली भली मंडळी सावध असतात. ऐश्वर्या राय ते दीपिका पदुकोणपर्यंत भारतीय अभिनेत्रींनी इथल्या फॅशनप्रयोगातून चांगलेच धडे घेतले आहेत. त्यामुळे या वेळी या दोघी अभिनेत्री वेगवेगळय़ा कारणांनी रेड कार्पेटवर उतरल्या आणि त्यांच्या फॅशनने रसिकांची मनं जिंकून घेतली. दीपिका पदुकोण यंदाच्या कान फॅशनचं आकर्षणकेंद्र होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दीपिका या वेळी कान फेस्टिव्हलमध्ये खास ज्युरीच्या भूमिकेतून उपस्थित होती. त्यामुळे फ्रान्समध्ये एअरपोर्टवर उतरल्यापासून तिने काय कपडे घातले आहेत, यावर फॅशनप्रेमींची करडी नजर होती. त्यात दीपिका नव्यानेच लुई विटॉन या जगप्रसिद्ध ब्रॅण्डची ॲलम्बेसेडर झाली असल्याने त्याचाही प्रभाव तिच्या फॅशनवर असेल, याची उत्सूकता होती. मात्र कान फेस्टिव्हलसाठी दीपिकाने पसंती दिली ती भारतीय फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या खास कलेक्शनला..

पहिल्याच दिवशी तिने सब्यसाचीच्या कलेक्शनमधून फ्लोरल पिंट्र असलेल् शर्ट आणि ऑलिव्ह रंगाच्या पॅन्टची निवड केली. हेडबँड आणि गळय़ात लखनौ रोज नेकलेस या दोनच अॅंक्सेसरीजची जोड देत तिने आपला लुक पूर्ण केला. दीपिकाचा हा लुक रिफ्रेशिंग असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. कानच्या रेड कार्पेटवर पहिल्या दिवशी तिने ग्लॅमरस साडी लुक परिधान करत पुन्हा एकदा सगळय़ांना आश्चर्याचा धक्का दिला. सब्यसाचीच्या खास कलेक्शनमधली ब्लॅक आणि गोल्डन रंगाची सिक्विन साडी तिने परिधान केली होती. त्याला लांबलचक झुंबरासारखे आकर्षक इअरिरग्ज आणि हेअरबॅन्डची जोड तिने दिली होती. बंगाली वाघासारखे पट्टे असलेल्या पिंट्रच्या साडीमुळे दीपिका ग्लॅमरस दिसली खरी.. मात्र हा लुक सगळय़ांनाच आवडला असं नाही. खरं तर भारतीय अभिनेत्रींनी इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये साडी नेसावी हा अलिखित नियम आहे.

तसा आग्रह त्यांच्याकडून कायम धरला जातो. याआधी विद्या बालन, नंदिता दास या अभिनेत्रींनी भारतीय पारंपरिक साडी नेसून कानच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. दीपिकानेही हा रिवाज कायम ठेवला. तिने कान फेस्टिव्हलच्या ओपिनग आणि क्लोजिंग दोन्ही इव्हेंटला साडीचीच निवड केली. क्लोजिंगला फॅशन डिझायनर अबू जानी – संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधील सफेद रंगाची रफल साडी आणि मोत्यांची कॉलर असा तिचा लुक होता. रेड कार्पेटवर प्रत्येक वेळी चोखंदळ लुकची निवड करणाऱ्या दीपिकाने लाँग टेल असलेला गाऊन मात्र तिची फसगत करणारा ठरला. दरवेळी फोटोसाठी पोज देताना तिला किंवा तिच्याबरोबरच्यांना खास गाऊनचं ते शेपूट उचलून मगच पुढची क्रिया करावी लागत होती. सांभाळता येत नाहीत तर असले गाऊन्स घालायचे कशाला, अशी टीकाही तिच्यावर झाली. मात्र हा एक प्रसंग वगळता तिच्या रेड कार्पेटवरील लुक्सनी पसंती मिळवली. खासकरून लुई विटॉनच्या रेड गाऊनमधील तिच्या हॉट लुकला सगळय़ात जास्त पसंती मिळाली.

दीपिकापाठोपाठ ऐश्वर्या राय नेहमीप्रमाणे कानच्या रेड कार्पेटवर उठून दिसली. यंदा तिच्या कानवारीला वीस वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे तिच्यासाठी डिझायनर गौरव गुप्ताने खास ड्रेस डिझाईन केला होता. याशिवाय, डॉल्चे ए गबाना या प्रसिद्ध फॅशन ब्रॅण्डचा ब्लॅक रंगाचा गाऊन ऐश्वर्याने परिधान केला होता. कानचे रेड कार्पेट हे आपले फॅशन् आणि स्टाईल स्टेटमेंट जगभरात पोहोचवण्यासाठी योग्य माध्यम आहे हे भारतीय अभिनेत्रींच्या लक्षात आले आहे. त्यामुळे यंदा तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, हीना खान आणि आदिती राव हैदरीसारख्या अनेक अभिनेत्री खास डिझायनर गाऊन्स आणि ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उपस्थित होत्या. दीपिकाप्रमाणे साडीला पसंती न देता या अभिनेत्रींनी वेगवेगळय़ा कुटूर ड्रेसेस आणि गाऊन्सची निवड केली होती. वेगवेगळय़ा चित्रपटांच्या प्रीमिअरसाठी या अभिनेत्रींनी कान फेस्टिव्हलला हजेरी लावली होती.

केवळ भारतीय अभिनेत्रीच नव्हे तर भारतीय फॅशन डिझायनर्सची रेड कार्पेटवरची कामगिरीही दखल घ्यायला लावणारी होती. सब्यसाची मुखर्जी, गौरव गुप्ता, अबू जानी-संदीप खोसला यांचे डिझाईन्स कानच्या रेड कार्पेटवर प्राधान्याने दिसले. ऐश्वर्याबरोबरच इटालियन अभिनेत्री कॅटरिनल मर्लो आणि अमेरिकन अभिनेत्री लिझा कोशी या गौरव गुप्ताने डिझाईन केलेले ड्रेस घालून रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. एकूणच यंदाच्या कान फेस्टिव्हलमध्ये भारतीय तारे-तारकांच्या फॅशन स्टेटमेंटने रेड कार्पेट झळाळून उठले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fashion best film cast director technician cannes international film festival in france amy

Next Story
‘जग’नोंदी: विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा मेळ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी