देशविदेशात वर्षभर होत राहणार्‍या फॅशन शोजइतकंच किंबहुना त्याहूनही अधिक, फॅशन जगताचं लक्ष मेट गाला या अत्यंंत लोकप्रिय अशा इव्हेंटकडे असतं. सोशल मीडियाचा वापर आणि त्यावर ट्रेडिंग होण्याचा वेग पाहता पूर्वी केवळ फॅशन इंडस्ट्री आणि सेलेब्रिटीजपुरतं मर्यादित असलेलं हे विश्व आता सगळ्यांसाठी खुलं झालं आहे.

प्रत्येकाचा हरतर्हेचा लुक जगभरातल्या प्रत्येक स्मार्टफोनवर पोहोचतो. त्यावर कमेन्ट्स, मीम्स, व्हिडिओज, अनॅलिसिस, आऊटफिट ब्रेकडाऊन, लुक रि-क्रिएशन अशा अनेक गोष्टींना अचानक पूर येतो. यावर्षी तर अनेकांनी सोशल मीडियावर आलेले मेट गालाचे लुक्स बघून ए आयच्या मदतीने स्वत:चे मेट गाला लुक्स डिझाईन केले आणि ते अगदी कौतुकाने पोस्टही केले. मात्र, मेट गालासारख्या मोठ्या इव्हेंटच्या मागे थीम, डिझायनिंग त्याचबरोबर कित्येक जणांची आणि कित्येक तासांची मेहनत असते.

यावर्षीची मेट गालाची थीम होती ‘फॅशन इज आर्ट’! स्वत:ला कॅनव्हास समजून फॅशन म्हणजे कलेची प्रचीती असल्यासारखे लुक्स डिझाइन करण्याचं हे खरं तर आव्हान होतं. मग यामध्ये काहींनी स्वत:चं आर्ट स्टेटमेंट दाखवलं तर काहींनी जुन्या क्लासिक आर्ट किंवा पेंटिंग्सवरून इ्स्पिपरेशन घेत आपले लुक्स डिझाईन केले. मात्र, कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच लुकच्या मागे अनेकांची कल्पकता, शेकडो हातांनी घेतलेली शेकडो तासांची मेहनत पणाला लागली होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भारतातल्याही अनेक सेलेब्रिटींनी यावर्षी मेट गालाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. करण जोहर, इशा अंबानी यांच्या लुक्सनी विशेष लक्ष वेधून घेतलं. करण जोहरने मेट गालातील आपल्या पदार्पणासाठी राजा रवी वर्माची चित्रं असलेलं आऊटफिट घातलं होतं. त्याच्या जॅकेटवर एका बाजूला राजा रवी वर्माचं एक पेंटिंग, तर दुसर्‍या बाजूला दुसरं पेंटिंग होतं. इशा अंबानीने साडी प्लस साडीच्या मटेरियलचंच हेड गियर परिधान केलं होतं. खर्‍या फुलांचा लांबलचक गजरा आणि दुसर्‍या हातात चेन्समध्ये अडकवलेली ब्रॉन्झमधली आंब्याची प्रतिकृती घेऊन तिने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. भारतीय संस्कृतीचं योग्य आणि कलात्मक पद्धतीचं सादरीकरण भारतातल्या सेलेब्रिटीजनी केलं.

‘फॅशन इज आर्ट’ या थीमला धरून अनेक सेलेब्रिटीजनी फ्यूचरिस्टिक आर्ट दाखवणारे आऊटफिट्स डिझाइन केले होते. होस्ट असलेल्या बियॉन्सेने सिल्व्हरी आणि शिमर स्केलेटन या थीमचा गाऊन घातला होता आणि तसाच क्राऊनही घातला होता. रिहानाने बेल्जियममधल्या जुन्या आर्किटेक्चरवरून इन्सपायर्ड असलेला गाऊन घातला होता. अनन्या बिर्लाने किचनमधल्या भांड्यांपासून बनवलेला मास्क घालून रेड कार्पेटवर हजेरी लावली. त्या मास्कमध्ये प्रत्यक्ष चमचे, काटे, झारा अशा वस्तू होत्या.

हेली बीबरने घातलेल्या ड्रेसमधला बॉडिस खराखुर्या चोवीस कॅरेट सोन्याने बनवलेला होता. व्हीनस विलियम्स हिने स्वरोवस्कीचा संपूर्ण गाऊन घातला होता. किम कार्डशीयनने मेटलचा आणि लेदरचा स्कर्ट घातला होता. तर लिसाने स्वत:च्याच हातांची थ्रीडी स्कॅन कॉपी घेऊन गाऊनवर व्हेल इफेक्ट तयार केला होता. हे सगळे आऊटफिट्स फॅशनमधून कलेची आणि सर्जनशीलतेची अभिव्यक्ती दाखवणारे होते.

अनेक आऊटफिट्स हे जुन्या स्कल्प्चर, आर्किटेक्चर किंवा पेंटिंग्सवरूनही इन्सपायर्ड होते. जिसूने डिऑरचा गुलाबी आणि सिल्व्हर बेस असलेला फ्लोरल बॉडी-कॉन गाऊन घातला होता, ज्यात तिने गार्डन थीम केंद्रस्थानी ठेवली होती. पालोमा एल्सेसर हिने १९२० ते १९४० या वर्षांमधल्या वेगवेगळ्या देशांतल्या आऊटफिट्सचे फॅब्रिक्स एकत्र करून डिझाईन केलेला पेस्टल गाऊन घातला होता. जयपूरचे महाराजा सवाई पद्मनाभ सिंग आणि राजकुमारी गौरवी कुमारी यांनी त्यांच्याच पूर्वजांचे आऊटफिट्स रि-क्रिएट करून रेड कार्पेटवर प्रवेश केला.

मडोनाचं आऊटफिट तिच्या ड्रमॅटिक व्हेलमुळे चर्चेत राहिलं ज्यावर पायरेटच्या बोटींसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळालं. एमा चेंबरलेन हिने संपूर्ण हँड – पेंटेड रफल्स असलेला बॉडी – कॉन ड्रेस घातला होता जो ‘फॅशन इज आर्ट’ या थीमचं अचूक स्वरूप होतं. ग्वेनडोलिन क्रिस्टी हिने लाल रंगाच्या गाऊनवर फेदर्सचा हेड गियर आणि हातात मास्क घेतला होता.

‘फॅशन इज आर्ट’ ही थीम प्रत्यक्षात उतरवताना अनेकांनी वेगवेगळे प्रयोगही केले. कोणी थेट स्वत:ला पुतळा बनवून घेतलं तर कोणी हालचाल करणारी मशिनरी ड्रेसमध्ये वापरली. या सगळ्या प्रयोगांमागे एकच महत्त्वाचा उद्देश म्हणजे मेट गालाच्या थीमला कुठेही धक्का लागणार नाही, थीमचा आधार आऊटफिटला असेल आणि प्रत्येक एलिमेंट थीमला धरून असेल. या ‘फॅशन इज आर्ट’च्या थीममुळे अनेक वेगवेगळे प्रयोगही पाहायला मिळाले आणि अनेकांनी अत्यंत खुबीने मांडलेली स्वत:ची स्वतंत्र फॅशनही पाहायला मिळाली.

viva@expressindia.com