हाय, मी सध्या दहावीला आहे. वय १६ वर्षे आहे. लवकरच आता आमचा सेंड ऑफचा कार्यक्रम आहे. मी त्या दिवशी ब्लॅक कलरची साडी नेसायचं ठरवलंय. माझा रंग गोरा आहे. या काळ्या साडीवर कुठल्या अ‍ॅक्सेसरीज घालाव्या कळत नाहीय. कुठल्या अ‍ॅक्सेसरीज साध्या तरीही छान दिसतील?
काजल पराडकर

हाय काजल,
खरं सांगायचं तर काळा हा असा रंग आहे, ज्यावर कुठल्याही प्रकारची ज्वेलरी उठून दिसते. आता तुझ्या साडीचं फॅब्रिक कोणतं आहे, कसं आहे त्यानुसार तुला दागिने ठरवायला हवेत. तू ट्रॅडिशनल काठा-पदराची साडी नेसणार असशील आणि त्या साडीचा काठ सोनेरी असेल तर सोन्याचा दागिना आयडियल अ‍ॅक्सेसरी आहे.
आता साडी जर शिफॉन, जॉर्जेट, नेटसारख्या कापडाची झिरझिरीत आणि लाईट ट्रान्सपरंट असेल तर त्या साडीच्या बॉर्डरच्या रंगाला मॅच होणाऱ्या किंवा साडीवरच्या वर्कशी मिळत्याजुळत्या अ‍ॅक्सेसरीज घालायला हव्यात. साडीवर जर्दोसी वर्क केलेलं असेल तर तू सिल्व्हर ज्वेलरी घालू शकतेस. साडीचे काठ गोल्डन असतील तर सोन्याचा हलकासा दागिना घालायला हरकत नाही. पण सेण्ड ऑफसारखं ऑकेजन आहे हे ध्यानात घेऊन दागिना, त्याचा साईझ ठरव. त्यामुळे पुष्कळ दागिने अंगावर मिरवणं नकोच. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कानातले आणि ब्रेसलेट. या अ‍ॅक्सेसरीज उठून दिसतात आणि कधीच ‘टू मच’ वाटत नाहीत.
साडीसोबत वागवायच्या इतर महत्त्वाच्या अ‍ॅक्सेसरीज म्हणजे बॅग आणि फूटवेअर. याकडे नेहमी दुर्लक्ष होतं. फारशी हिल नसलेली, सिंगल स्ट्रॅपची एलिगंट चप्पल साडीवर जनरली सूट होते. तुझ्या ज्वेलरीच्या रंगाशी चपलेच्या पट्टय़ांचा रंग मिळताजुळता असायला हरकत नाही. हातात मोठी पर्स घेण्याऐवजी साधासा क्लच घेणं चांगलं. साडीवर क्लच छान दिसतो. तुला काही गोष्टीही सोबत न्यायच्या असतील तर मात्र क्लच पुरणार नाही. एखादी मॅचिंग पर्स त्याऐवजी वापरता येईल.

पेअर शेपच्या बांध्यासाठी…
माझे वय २८ वष्रे आहे, माझी उंची ५.२ फूट असून माझा वर्ण गहूवर्णी आहे. चेहऱ्याचा आकार लंबगोल आहे. माझा बांधा पेअर शेपचा असल्याने मला कोणते ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न कपडे खुलून दिसतील? आणि मला कोणते रंग सूट होतील?
मुग्धा, ऐरोली.

तुझ्या वर्णनानुसार तुझा बांधा लहान आहे; पण कंबरेचा घेर आणि नितंबाचा भाग रुंद आहे. भारतीय लोकांच्या शरीर ठेवणीचं हे वैशिष्टय़ आहे. तुझ्या खांद्याची आणि हिपलाइनची रुंदी सारखी असेल तेव्हा तुझ्या शरीराची ठेवण प्रमाणबद्ध दिसेल. वेस्टर्न ड्रेस घालताना तुझा बांधा रुंद दिसण्यासाठी तू एकतर बोट नेक असलेले ड्रेस किंवा पॅडेड शोल्डरचे ड्रेस (जे ब्लेझरमध्ये वापरले जातात) वापरू शकतेस. कंबरेचा घेर लपवण्यासाठी तुला कफ्टान पॅटर्नसुद्धा वापरता येईल. सध्या रॅग्लन पॅटर्नचाही ट्रेण्ड इन आहे. त्यामुळे तुझ्या खांद्याची रुंदी मोठी दिसण्यासाठी आणि कंबरेचा घेर कमी दिसण्यासाठी मदत होईल. कॅज्युअल वेअरसाठी तू स्ट्रेट कट असलेली जीन्स आणि कुर्ती वापरू शकतेस, ज्यामुळे तुझी हिपलाइन झाकली जाईल. जीन्सऐवजी लेगिंग्जसुद्धा तू वापरू शकतेस. त्याचप्रमाणे पटियालाचासुद्धा तू तुझी हिपलाइन आणि वेस्टलाइन लपवण्यासाठी वापर करू शकतेस. टिपिकल भारतीय पद्धतीच्या पोशाखासाठी अ‍ॅपल कटचा वापर होऊ शकतो तर समारंभासाठी अनारकली पॅटर्न तू वापरू शकतेस; पण कोणत्याही ड्रेसिंग स्टाइलमध्ये शोल्डरलाइन रुंद असेल हे लक्षात ठेव. पोशाखांच्या रंगांसाठी न्यूट्रल रेंज म्हणजेच काळा, चॉकलेटी, ऑलिव्ह, रस्ट, मेडर, इंग्लिश ग्रीन, क्रीम, राखाडी आणि इतर फ्रेश कलर्स म्हणजेच कोबाल्ट ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू, रोझ िपक, एमराल्ड ग्रीन, वरमीलिअन रेड, लाइट ऑरेंज, पिच, इंडिगो, ऑफ व्हाइट इत्यादी रंग तू वापरू शकतेस.