fashion Winter days their favorite especially fashion lovers Collections jackets quotes ysh 95 | Loksatta

फॅशनची गुलाबी हवा

थंडीचे दिवस म्हणजे फॅशनप्रेमींसाठी त्यांचे आवडते, खास थंडीसाठी कपाटात जपून ठेवलेले काही वेगळे कलेक्शन्स बाहेर काढण्याची संधी.

फॅशनची गुलाबी हवा
फॅशनची गुलाबी हवा

रसिका शिंदे

थंडीचे दिवस म्हणजे फॅशनप्रेमींसाठी त्यांचे आवडते, खास थंडीसाठी कपाटात जपून ठेवलेले काही वेगळे कलेक्शन्स बाहेर काढण्याची संधी.. जॅकेट्स, कोट्स वा पूलओव्हर्स असे बरेचसे फॅशनेबल कपडे आपल्याकडे थंडीचे दोन ते तीन महिने वगळता कपाटातच जागा अडवून बसलेले असतात. अजूनही नोव्हेंबर अर्धा उलटूनही आपल्याकडे हवा तसा गारवा जाणवत नसला तरी नोव्हेंबरपासूनच थंडीच्या कपडय़ांचे वेध आपल्याला लागतात हेही तितकंच खरं आहे..

सध्या ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष दुकानातही थंडीपासून आपले बचाव करणारे आणि तितकेच फॅशनेबल असे कपडे दिसू लागले आहेत. मुळात नोव्हेंबरपासूनच बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले जातात, हवेत गारवा असो वा नसो.. बॅग पॅक करून मित्रमंडळींबरोबर वा घरच्यांबरोबर भटकायचं हे ठरलेलंच असतं. मग अशा वेळी बॅगेत आपलं कपडय़ांचं कलेक्शन कोणतं असेल?, हा पहिला प्रश्न मनात पिंगा घालायला लागतो. अर्थात, थंडीचे कपडे बाहेर काढण्यासाठी भटकंती हे एकच कारण असायला हवं असं काही नाही. कॉलेज, कामाच्या ठिकाणी वा अगदी पार्टी किंवा लग्नसमारंभातही काही हटके मिस मॅच कलेक्शन्स आपल्या आपणच पेअर करता येतात. अगदी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कपडय़ांमध्ये मिस मॅच करून वेगळा लूक साधणं शक्य आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर डार्क रंगाच्या जीन्सवर पेस्टल रंगाचे कोणतेही टी-शर्ट घालून त्यावर मॅचिंग असे लोकरीचे पूलओव्हर घालू शकता. किंवा लोकरीचे व्ही नेक किंवा यु नेकचे पूलओव्हर घालून गळय़ात मोत्याची माळ किंवा नाजूकसा नेकलेसदेखील परिधान करून तुम्ही तुमच्या लूकला उठाव देऊ शकता.

हिवाळय़ात बऱ्याचदा लगीनसराई असते. लग्न कार्यात पारंपरिक वेश हवाच.. पण इथेही थंडीचा बचाव करत पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा मिलाफ साधणं शक्य आहे. लग्नात बॅकलेस आणि स्लीव्हलेस ब्लाऊजऐवजी लोकरीचे क्रॉप टॉप घालून त्यावर मॅचिंग अशी साडी नेसता येते. थोडक्यात काय थंडी जाईपर्यंत तुमच्या रोजच्या ब्लाऊजऐवजी वूलन क्रॉप टॉप आणि त्यावर कधी साडी किंवा भरजरी लेहेंगा पेअर करता येईल. त्याला साजेसे कानातले, बांगडय़ा, नेकलेस घालून तुमचा लूक अधिक सुंदर करता येईल. जंक नेकलेस आणि क्रॉप टॉपसह नेसलेल्या साडय़ांमुळे तुमच्या पारंपरिक लूकला वेगळाच स्वॅग नक्की येईल. बऱ्याचदा असं होतं की काही मुलींना जीन्स – टॉपपेक्षा कुर्ता आणि लेगिंग घालणं जास्त आवडतं. अशावेळी तुम्ही कुर्त्यांवर डेनिम किंवा लेदर, वुलन जॅकेट्स पेअर करू शकता. तसंच, वुलन टॉप आणि साध्या कॉटनच्या लेगिंगबरोबर पायात उंच बुट घालून तुम्ही तुमचा लूक स्टायलिश बनवू शकता.

क्रॉप टॉप आणि ट्रेंच कोट हे गेल्या काही वर्षांत आपल्याकडेही लोकप्रिय झालेले प्रकार. वेगवेगळय़ा प्रकारचे कोट्स, जॅकेट्स आणि त्याबरोबरीने प्लेन टॉप किंवा टी-शर्ट पेअर करता येतात. प्लेन टॉपवर विविध डिझाइन्स असलेले जॅकेट किंवा त्याउलट फ्लोरल पिंट्र अथवा विविध रंगांच्या मिश्रणाचे टी-शर्ट घातले असेल तर त्यावर डार्क रंगाचे जॅकेट पेअर करता येईल. कुर्ता घालणं अधिक आवडत असेल तर त्यावरही क्रॉप केलेले डेनिम जॅकेट पेअर करत इंडो फ्युजन लूक साधता येईल. बदलत्या ऋतूंप्रमाणे फॅशनेबल कपडय़ांची निवड आणि त्याच्या जोडीला रंगीबेरंगी मफलर, मोत्यांची लांब माळ, ब्रेसलेट आदी ट्राय करून ‘डिफरंट लूक’ देता येईल. त्यामुळे या थंडीत बाहेरगावी फिरायला जाताना, डेलीवेअरसाठी अथवा  डेस्टिनेशन वेडिंगसाठीही थंडीचे कपाटात जपून ठेवलेले कपडे थोडय़ाशा ट्रेण्डी पद्धतीने पेअर करत फॅशनेबल लूक मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा.

मिस मॅचचा ट्रेण्ड

अलीकडच्या काळात मिस मॅचचा ट्रेण्ड तरुणाईच्या पसंतीस उतरतो आहे. मिस मॅच म्हणजे काय तर टी-शर्ट अथवा टॉप वेगळय़ा रंगाचा आणि त्याखाली पॅन्ट वेगळय़ा रंगाची. अर्थात दोन गोष्टी पेअर करत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. स्ट्रेट, फ्लेअर, प्लीटेड अशा प्रकारच्या पॅन्ट त्यातही लाल, हिरवा, शेवाळी किंवा पांढऱ्या रंगाची पॅन्ट असेल तर त्याच्या जोडीला तुम्ही थोडे ब्राईट कलर्सचे फुल हॅण्डसचे लुज टी-शर्ट किंवा वुलन टी-शर्ट पेअर करता येतात. याच्या जोडीला टॉप्सचे कानातले आणि जर बंद गळय़ाचं फुल हॅण्डसचं टी-शर्ट असेल तर गळय़ात मोत्याचं पेन्डण्ट असलेला नेकलेस घातला तरी तुमचा लूक स्टायलिश आणि क्लासी दिसू शकतो. क्रॉप टॉप झाले, मिस मॅच यापैकी काहीही नको असेल आणि अगदी साधासोपा तरीही ट्रेण्डी लूक साधायचा असेल तर वनपीस हा उत्तम पर्याय आहे. कोणताही ऋतु असो मुली वनपीस घालण्याची संधी सोडत नाहीत. तर थंडीतही ज्यांना वनपीस घालायचे आहेत त्यांना गुडघ्यापर्यंतच्या वनपीसवर ट्रेंच कोट, टक्सिडो किंवा लॉन्ग लेन्ग्थचे श्रग्स पेअर करू शकता. अगदी गुडघ्याच्यावर वनपीस असेल तर लॉन्ग बूटने हा लूक पूर्ण करता येईल. वुलन शाल दोन्ही खांद्यांच्याभोवती गुंडाळून घेत मधोमध तिला गाठ मारून एक वेगळाच लूकही साधता येईल.

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 14:42 IST
Next Story
मन:स्पंदने : लहानपण दे गा देवा?