favorite foods of celebrities abhijeet khandkekar favorite foods zws 70 | Loksatta

फुडी आत्मा : खा, प्या आणि मस्त रहा – अभिजीत खांडकेकर 

लडाखमध्ये भटकंती करत असताना झनस्कर व्हॅलीसारख्या दुर्गम भागात मी राजमा चावल आणि मॅगी खाल्ली होती.

favorite foods of celebrities
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मितेश जोशी

लज्जतदार, स्वादिष्ट जेवण हा एक परिपूर्ण अनुभव असतो. नाक, डोळे, जिव्हा यांना तृप्त करत त्याचा आस्वाद जेव्हा शरीरभर पसरत मनभर विस्तारतो तो आनंद शब्दातीत! प्रत्येकाच्याच खाण्याच्या निरनिराळय़ा तऱ्हा असतात. कोणाला गोड आवडतं, तर कोणाला झणझणीत आवडतं. काही जण जेवणात जाड मीठ वापरतात, तर काहींना पदार्थावरून मीठ-साखर पेरलेली आवडत नाही. प्रत्येकाचं आपापलं स्वतंत्र पाकशास्त्रच नव्हे तर खाण्याचंही शास्त्र असतं. खाण्यापिण्याच्या या आवडीनिवडी व्यक्तीपरत्वे बदलत असल्या तरी ‘खाणं’ काही थांबत नाही. अशा चटकमटक खाण्याच्या सवयींपासून आपले कलाकारही काही सुटलेले नाहीत. खाण्यावर बोलू तितकं थोडं. म्हणूनच ‘फुडी आत्मा’ हे सदर दर पंधरवडय़ाला कलाकारांच्या खाण्याच्या तऱ्हा जाणून घेत एक वेगळी खाद्यसफर घडवून आणणार आहे.

‘अन्न हे शरीराचे पोषण करतं. अन्नाची चव ही मनाचं पोषण करते, तर त्याचा स्वाद हा आत्म्याला समाधान देतो. हे समाधान प्रत्येकालाच हवंहवंसं असतं. हे समाधान मला वेळोवेळी खाण्यातून मिळतं,’ असं अभिजीत सांगतो. अभिजीत अतिशय फुडी आहे. मला सगळय़ा प्रकारचं आणि सगळय़ा चवीचं खायला आवडतं, असं सांगणारा अभिजीत एकूणच आपल्या खाद्यचर्येचं वर्णनही तितक्याच चवीने करतो. ‘माझी दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने होते. कधी कधी बुलेट कॉफी प्यायलादेखील मला आवडतं. मी चवीचं खाताना वेळ बघत नाही, पण मला वेळेवर खायला आवडतं. सुट्टी नसेल तर सेटवर आणि असेल तर घरी सकाळी ९ ते १०च्या दरम्यान मी मजबूत न्याहारी घेतो. दुपारी १२च्या दरम्यान मी फळं खात खात पुन्हा एकदा कॉफी घेतो. दीडच्या सुमारास आमची सेटवर जेवणासाठी मधली सुट्टी होते. मी सध्या बॉडीसाठी कोणत्याही प्रकारचं टार्गेट ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे मी अगदी चटणी, कोशिंबिरीपासून वरणभातापर्यंत सगळय़ावर ताव मारतोय. दुपारी ४ वाजता एनर्जीसाठी मला चहा-कॉफी ही लागतेच. त्यानंतर मात्र मी स्वत:ला चॅलेंज देतो. सटरफटर खाणं न खाता मी लवकर जेवून रात्री प्रोटीन शेक घेतो. उपाशीपोटी मी झोपत नाही. रात्री साडेदहा ते साडेअकरा ही वेळ माझ्या व्यायामाची असते, असं माझं दिवसभराचं खाण्याचं वेळापत्रक आहे,’ असं तो सांगतो.           

कलाकाराचा बराचसा वेळ हा अर्थातच सेटवर जातो. त्यामुळे सेटवर सहकलाकारांबरोबर एकत्रित जेवण घेणं हाही एक वेगळा अनुभव असतो. सेटवरची खवय्येगिरी हा माझ्यासाठी एक वेगळाच झोन आहे, असं तो म्हणतो. ‘माझी आतापर्यंतच्या प्रवासातली ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या सेटवरची खवय्येगिरी, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या सेटवरची खवय्येगिरी आणि आताची स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या सेटवरची खवय्येगिरी एकूणच जिभेने तृप्त आणि विचारांनी समृद्ध करणाऱ्या होत्या. तिन्ही सेटवर आम्ही सगळे कलाकार एकत्र येऊन जेवायचो. प्रत्येकाच्या घरातले पदार्थ, सेटवरचे पदार्थ, वेगवेगळय़ा ज्ञातींचे हटके पदार्थ एकत्र येऊन खाण्यात मजाच काही और असते आणि याचा सकारात्मक परिणाम निश्चितच कामावर जाणवतो, असं सांगतानाच आपलं खाबूगिरीचं ज्ञान अभिनेता संजय मोने यांच्याबरोबरच्या खवय्येगिरीने समृद्ध झाल्याचंही तो सांगतो. मोनेकाका त्यांच्या शैलीत मला जपानी खाद्यसंस्कृतीची माहिती सांगायचे. राकेश सारंगांनी मला वेस्टर्न साइडची खाबूगिरी समजावून सांगितली. त्यामुळे खाने पे चर्चा अनेक झाल्या आहेत आणि त्या अविस्मरणीय ठरल्या असल्याचंही त्याने सांगितलं.           

‘मला बाहेर जाऊन वेगवेगळय़ा डिश ट्राय करायला खूप आवडतं. निवेदनाच्या निमित्ताने माझ्या अनेकदा परदेशवाऱ्या झाल्या आहेत. त्यानिमित्ताने मी त्या त्या देशातली खाद्यसंस्कृती अनुभवली आहे. जग जवळ आल्यामुळे पदार्थाची सरमिसळ होऊ लागली आहे. मी नेपाळला गेलो होतो तेव्हा तिथे कोरियन खाद्यसंस्कृतीमधील ‘बीबीनबाप’ नावाचा पदार्थ खाल्ला होता. भाज्या उकडून केलेल्या सूपमध्ये ‘बीबीनबाप’ नावाचा सॉस घातला जातो. हे सूप तुम्ही खाऊदेखील शकता किंवा पिऊदेखील शकता. सिंगापूरला गेलो असताना तिथल्या जम्बो हॉटेलमध्ये जाऊन आम्ही मोठय़ा पॅनमध्ये खेकडे खाल्ले होते. जगात कितीही फॅन्सी हॉटेलची संख्या वाढली आणि तिथले कितीही फॅन्सी पदार्थ खाल्ले तरी ‘मॅगी’ या पदार्थाला तोड नाही. लडाखमध्ये भटकंती करत असताना झनस्कर व्हॅलीसारख्या दुर्गम भागात मी राजमा चावल आणि मॅगी खाल्ली होती. मॅगी ही सर्व पदार्थाना पटकन आपलंसं करणारी जननी आहे. म्हणजे ती अंडय़ातही छान लागते. चीज, मेयो, टोमॅटो केचअपलासुद्धा ती पटकन आपलंसं करून चवीची माया जिभेवर पसरवते. अशा या मॅगीचं महत्त्व माझ्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे,’ अशा शब्दांत तो आपल्या देशोदेशीच्या खाबूगिरीचं वर्णन करतो. मात्र ही यादी इथेच संपत नाही. भटकंती करत खाबूगिरी करण्याच्या माझ्या विशलिस्टमध्ये अनेक ठिकाणं आणि तिथले पदार्थ आहेत, असेही तो सांगतो.

‘खाण्यावर प्रत्येकाचंच प्रेम असतं. मीसुद्धा या प्रेमापासून पोरका नाही, पण बऱ्याचदा आम्हा कलाकारांना या प्रेमापासून अलिप्त राहावं लागतं. आमच्या प्रेमाच्या आड डाएट येतं. मी हल्ली पाहतो की, डाएट म्हटलं की बरेच जण जेवढं अन्न खायला हवं त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात खातात. उपासमार करणं म्हणजे डाएट नव्हे. तुमच्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक ज्या पदार्थामधून मिळतात असे योग्य ते पदार्थ पोटभर खाऊन, व्यायाम करून प्रत्येकाने डाएट करायला हवं. मी वर नमूद केलेल्या माझ्या दिवसभराच्या खाण्यात मी कुठेच डाएटच्या नावाखाली स्वत:ची उपासमार केलेली तुम्हाला जाणवणार नाही. ती तुम्हीदेखील करू नका. सकस पोटभर अन्न  खा,’ असा सल्ला तो देतो. मात्र अतिखाणंही चुकीचंच आहे हेही तो सांगतो. ‘मी अशीसुद्धा काही खादाड मंडळी बघितली आहेत, की ते प्रमाणाच्या बाहेर खातात. पाव किलो गोड पदार्थ एका बैठकीत आचरटासारखं खाणं चुकीचं आहे. प्रमाणात खा. माणूस कमावतो कशासाठी? तर पोटासाठी! त्यामुळे खा, प्या आणि मस्त राहा!’

खाणं हे डोळय़ाला नेत्रसुख, पोटाला आधार, तर जिभेला तृप्ती देणारं असतं. प्रत्येक जण ‘फुडी आत्मा’ असतो. प्रत्येकाचा आपापला खाद्यानुभव असतो. या चटकमटक अनुभवांपासून आपले कलाकारही वंचित नाहीत. ‘फुडी आत्मा’ हे खास सदर दर पंधरवडय़ाला कलाकारांच्या खाद्यानुभवाच्या आनंदासाठी!! आणि हा आनंद शेअर करायला पहिला नंबर सर्वाचा लाडका चॉकलेट हिरो अभिजित खांडकेकर याने लावला आहे. मालिकेच्या सेटपासून चित्रीकरणाच्या निमित्ताने होणाऱ्या भटकंतीतून या पूर्णब्रह्माकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला हे त्याच्याचकडून जाणून घेऊयात..

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 04:31 IST
Next Story
ऐकू आनंदे