फेस्टिवल फीवर

डिसेंबर महिना उजाडतो तोच कॉलेज फेस्टचे वारे घेऊन. कला-गुणांना वाव देणारे कला-सांस्कृतिक उत्सव त्याबरोबरच मुलांचं टेक्नो टॅलेंट जोखणारे टेक फेस्ट हे या डिसेंबर-जानेवारीच्या फेस्ट्सचं वैशिष्टय़.

डिसेंबर महिना उजाडतो तोच कॉलेज फेस्टचे वारे घेऊन.  कला-गुणांना वाव देणारे कला-सांस्कृतिक उत्सव त्याबरोबरच मुलांचं टेक्नो टॅलेंट जोखणारे टेक फेस्ट हे या डिसेंबर-जानेवारीच्या फेस्ट्सचं वैशिष्टय़.
कॉलेज म्हटलं की अभ्यासाच्या बरोबरीनेच येते ती मस्ती, धमाल; गप्पांचा कट्टा, पाटर्य़ा, भटकणं; आणि अर्थातच कॉलेज फेस्टिव्हल्स! डिसेंबर-जानेवारी महिन्यात असे बरेच फेस्टिव्हल्स पार पडतात. हजारो विद्यार्थी विविध प्रकारे या कॉलेज फेस्टिव्हल्सशी जोडलेले असतात. कार्यकारिणी निवडणं, कामं वाटून घेणं, जाहिराती देणं, कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी जागोजागी फोटो, तक्ते लावणं, प्रसिद्धीसाठी नवीन कल्पना शोधणं- ही आणि यांसारखी कितीतरी कामं विद्यार्थ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच गुंतवून टाकतात.
यावर्षीही असे अनेक महाविद्यालयीन उत्सव येऊ घातले आहेत. मूळ उद्देश साधारण समान असला तरी प्रत्येक उत्सवाने सादरीकरणाची पद्धत आणि विषय मात्र वेगळे निवडलेले दिसतात.
मुंबईच्या रुईया महाविद्यालयात आयोजित केले जाणारे विविध प्रकारचे असे उत्सव म्हणजे उत्तम उदाहरण आहेत. अनुभूती हा एन.एस.एस.च्या अंतर्गत असलेला उत्सव रुईया महाविद्यालयाने प्रथम सुरू केला. यामध्ये सांस्कृतिक नव्हे तर वादविवाद स्पर्धा, पथनाटय़ हे आणि असे इतर सामाजिक कार्यक्रम प्रस्तुत होतात. यंदा अनुभूती १० आणि ११ जानेवारी रोजी पार पडणार आहे. याशिवाय ‘आरोहण’ हा सांस्कृतिक उत्सवही आयोजित केला जातो. खेळाडूंना चालना देणारे क्रीडा महोत्सवही आयोजित होतात. २२ डिसेंबर रोजी रुईयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा अशातलीच एक आहे. या व्यतिरिक्त २१ आणि २३ डिसेंबरलाही आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा आहेत. रुईयाप्रमाणेच सेंट झेवियर्स महाविद्यालयात ही फेस्टिव्हल्सची रेलचेल आहे.  ‘इथाका’ हा इंग्रजी विभागाने आयोजलेला इंग्रजी एकांकिकांचा उत्सव असो; ‘जनफेस्ट’ हा जानेवारी महिन्यात येणारा ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ प्रस्तुत शास्त्रीय संगीताचा महोत्सव असो किंवा िहदी एकांकिका, कवी संमेलन, गाण्यांचा वाद्यवृंद असे अनोखे कार्यक्रम घेऊन येणारा िहदी विभागाचा ‘अंतस’ असो! सगळ्याच फेस्टिव्हल्समध्ये झेवियराइट्स बुडून गेलेले दिसतात. ‘झाइटगाइस्ट’ हा झेवियर्सच्या बी.एम.एम. विभागाचा फेस्टिव्हल अशा पद्धतीचा एकमेव आहे! यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे, तर मीडिया कॉन्फरन्स आयोजित केली जाते. मीडिया क्षेत्रातले विविध तज्ज आणि दिग्गज विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.  
महाराष्ट्रात अनेक मराठी महोत्सवदेखील अर्थातच आयोजले जातात. पर्णिका संस्था आयोजित ‘महाराष्ट्र उत्सव’ हा त्यांपकी सगळ्यात व्यापक आहे हे नक्की. ‘तरुण मनाने मिळून केला संस्कृतीचा आर्जव, सळसळती तरुणाई करते मातीचा गौरव’ असं म्हणत अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्र उत्सव २७, २८ आणि २९ जानेवारी रोजी येणार आहे.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने आयोजिलेला ‘आमोद’ हा वार्षकि महोत्सव यंदा प्रथमच इतक्या मोठय़ा स्तरावर लोकांसमोर येणार आहे. पथनाटय़, लोकसंगीत, लोकनृत्य, वक्तृत्व, चित्रकला यांसारख्या अनेक मराठी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा या वेळी आमोदला व्यापक स्वरूप देणार आहेत.
याशिवाय फेस्टिव्हल्समधलं सगळ्यात मोठं आकर्षण असणारा, आशिया खंडातला सर्वात मोठय़ा प्रमाणावर प्रस्तुत होणारा असा आय.आय.टी., मुंबईने आयोजलेला ‘मूड इंडिगो’ दरवर्षीप्रमाणे डिसेंबरमध्ये येऊ घातला आहे. यंदा हा फेस्टिव्हलदेखील २१, २२ आणि २३ डिसेंबर रोजी पार पडेल. आयआयटीचा टेक फेस्ट येतोच आहे. टेक्नो-सॅव्ही विद्यार्थ्यांना चॅलेंज देणारा हा महोत्सव दरवर्षी नवनवी इनोव्हेशन्स दाखवतो. टेक टॅलेंटला वाव देतो. ‘व्हीजेआयटी’चा टेक्नोव्हेंझाही याच कॅटॅगरीतला. २८, २९ आणि ३० डिसेंबरला हा टेक्नोव्हेंझा आयोजित करण्यात आला आहे. रोबोवॉर्स, फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस, ड्राईव्ह थ्रू हे यातले काही लोकप्रिय इव्हेंट्स.
अशा या निरनिराळ्या फेस्टिव्हल्समधून केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्याचं उद्दिष्ट साध्य होत नाही; तर फेस्टिव्हल्ससाठी काम करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव पुढेही त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतात. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी ओळखी झाल्यामुळे विद्यार्थ्यांकरिता संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याबरोबरच नवीन मित्र मत्रिणी भेटतात, वेगळ्या नात्यांची सुरुवात होते आणि मग हे दिवस संपले की, चुकल्यासारखं झाल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच तरुणाईच्या दृष्टीने फेस्टिव्हल्सची महती ही केवळ मजा, मस्ती आणि टाइमपास यापेक्षा कितीतरी जास्त आहे. यामुळे फेस्टिव्हल संपला की, विद्यार्थ्यांचे डोळे ओलावल्याशिवाय राहात नाहीत, हेही नक्कीच!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Festival feaver

ताज्या बातम्या