वेदवती चिपळूणकर परांजपे
सण आले की घरात सगळ्याच गोष्टींची लगबग सुरू होते आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न डोक्यात पिंगा घालू लागतो. ‘या सणाला कुठले कपडे घालायचे?’ कपाट उघडून साड्या, कुर्ते, लेहंगा, दागिने सगळं बाहेर येतं; पण तरीही आपल्याला काही तरी नवीन लुक हवा असतो. तेच तेच जुने कपडे, ॲक्सेसरीज आपल्या समोर असतात. यातून नवीन काय करायचं? हा प्रश्न कायमच असतो. मात्र, सध्याच्या ट्रेण्डनुसार प्रत्येक गोष्ट नवीनच घेण्याची गरज पडणार नाही. यंदाची फेस्टिव्ह फॅशन खूप ‘हेवी’ दिसण्यापेक्षा स्टायलिश, कम्फर्टेबल आणि पर्सनल दिसण्यावर भर देणारी आहे. ट्रॅडिशनल कपडे आहेतच, पण त्यांचं स्टायलिंग मात्र मॉडर्न झालं आहे. त्यामुळे आपल्या जुन्याच वॉर्डरोबला ‘मिक्स अँड मॅच’ करत करत अनेक नवीन लुक्स तयार करता येतील.
साडी नेसणार्यांसाठी यंदा साडीचा ड्रेप बदलण्यापासून सुरुवात करता येईल. पारंपरिक पद्धतीने साडी नेसायची. आणि त्यावर वेगळ्या कटचा ब्लाउज, बेल्ट किंवा मोठे झुमके वापरले की पूर्ण लुक बदलतो. आता तर टिपिकल डावीकडे पदर घेण्याऐवजी ‘मिरर ड्रेप’ या नव्या प्रकाराची सुद्धा चर्चा आहे. ज्यांना साडी किंवा लेहंगा फार ‘हेवी’ वाटतो, त्यांच्यासाठी शरारा सेट, कुर्ता-पँट, को-ऑर्ड सेट किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिट्स हे पर्याय उपलब्ध आहेतच. आताचं स्टायलिंग सणांसाठी हेवी ड्रेसची मागणी करत नाही. त्यामुळेच फेस्टिव्ह कपडे तेवढ्यापुरते वापरायचे आणि मग वर्षभर कपाटात घडी करून ठेवायचे, पुढच्या वर्षी परत तेच कपडे तर घालता येत नाहीत, अशी वेळ आता आपल्यावर येणार नाही. सस्टेनेबल फॅशनच्या विचारामुळे तेच कपडे वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करून पुन्हा वापरता येतील, हा विचारही आताच्या ट्रेण्ड्समध्ये महत्त्वाचा ठरतो आहे. कपड्यांच्या रंगांमध्ये यंदा फक्त एकच मूड नाही आहे, तर कलरफुल दिसण्यावर पुन्हा जास्त भर दिला जातो आहे. क्रीम, आयव्हरी, ऑफ-व्हाइट, सँड आणि सॉफ्ट पिंकसारखे शांत रंग एका बाजूला आहेत, तर डीप रेड, बर्गंडी, प्लम, जेड ग्रीन, टील आणि ऑरेंजसारखे बोल्ड रंग दुसर्या बाजूला. विशेष म्हणजे या रंगांचं कॉम्बिनेशन करण्याची पद्धतही बदलते आहे. जसं की, आयव्हरी साडीबरोबर जेड ग्रीन ब्लाउज किंवा प्लम कुत्र्याबरोबर गोल्ड दागिने. पूर्ण कपडे ब्राइट ठेवून फ्लॅश लाइटसारखं दिसण्याऐवजी एका रंगाला सेंट्रल पीस बनवणं हा सोपा स्टायलिंग फॉम्र्युला आहे. या वर्षीच्या कलर आणि प्रिंट ट्रेण्ड्समध्ये निसर्गाच्या जवळ जाणारे रंग, बोल्ड शेड्स आणि त्याच थीमच्या पण वेगळ्या प्रट्िंसनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
अर्थात, या सगळ्याला कॉ्प्लिलमेंट करणारी महत्त्वाची गोष्ट बाकीच आहे, ती म्हणजे मेकअप! यंदा चेहर्यावर मेकअपचा जाड थर देऊन सगळं काही ‘परफेक्ट’ करण्यापेक्षा त्वचा नैसर्गिक ठेवण्याचा, अर्थात नॅचरल किंवा न्यूड मेकअप लुक्सचा ट्रेण्ड आहे. सॉफ्ट ग्लो, हलका ब्लश, ब्लर्ड लिप्स आणि थोडासा स्मज्ड आयलाइनर यामुळे चेहरा जास्त फ्रेश आणि नॅचरल दिसतो. ‘व्होग’च्या मेकअप ट्रेण्डनुसार ब्लशला या वेळी विशेष महत्त्व मिळतं आहे. शार्प कंटूरिंगपेक्षा सॉफ्ट आणि नैसर्गिक लुककडे कल वाढतो आहे. मात्र, फेस्टिव्ह मेकअपमध्ये थोडी तरी चमक हवीच! गोल्डन आयशॅडो, काजळ, विंग्ड आयलाइनर, लाल किंवा लालच्या शेड्स असलेल्या लिपस्टिक आणि चंद्रकोर असा क्लासिक महाराष्ट्रीयन लुक या वेळीसुद्धा आउटडेटेड होणारा नाही. पण याच लुकला नवीन टच द्यायचा असेल तर बेस हलका ठेवा, गालांवर रोझी ब्लश द्या आणि लिपस्टिकऐवजी सॉफ्ट पिंक किंवा ग्लॉसी लिपग्लॉस वापरून पाहा. लिपस्टिकची शेड ठरवायची नसेल, तर पीएच स्टिक हासुद्धा अत्यंत उत्तम पर्याय ठरेल. पीएच स्टिक आपल्या ओठांच्या त्या त्या वेळच्या रंग, टेक्स्चर आणि कोरडेपणाप्रमाणे आपल्या ओठांना रंग देते. दिवसाच्या कार्यक्रमांसाठी हा लुक फ्रेश दिसेल. रात्रीच्या फेस्टिव्ह पार्टीसाठी मात्र थोडे वेगळे प्रयत्न करता येतील. सिल्व्हर किंवा फ्रॉस्टेड आयशॅडो, कूल पिंक, मॉव्ह किंवा अगदी हलका ब्लू आय मेकअप सध्याच्या ग्लोबल मेकअप ट्रेण्डनुसार योग्य ठरेल. पण एक छोटा नियम मात्र महत्त्वाचा! डोळे बोल्ड असतील तर लिप्स सॉफ्ट ठेवा आणि लिप्स बोल्ड असतील तर डोळ्यांचा मेकअप थोडा कमी ठेवा. सगळं एकाच वेळी हायलाइट करण्यापेक्षा एका फीचरला स्टार बनवणं जास्त स्टायलिश दिसतं.
स्टायलिंगमध्येही आता ‘जास्त म्हणजे चांगलं’ हा नियम उरलेला नाही. साधी सिल्क साडी असेल तर मोठे झुमके पुरेसे असतात. प्लेन कुर्ता असेल तर एक सुंदर नेकलेस किंवा बांगड्यांचा सेट लुक बदलू शकतो. लेहंग्यासोबत जड दागिने घालण्याऐवजी एखादा स्टेटमेंट इयरपीस किंवा छोटीशी पर्स वापरता येईल. केसांसाठी गजरा, स्लीक बन किंवा सॉफ्ट वेव्ह्ज आणि कपाळावर छोटीशी बिंदी. एवढ्याशा मिनिमल गोष्टींमध्येही लुक ‘कंप्लीट’ वाटू शकतो. येणार्या गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत सणाला तर स्टायलिंगचे असंख्य पर्याय शोधता येतील. सिल्क साडी, चंदेरी फॅब्रिक, कफ्तान, शायनी को-ऑर्ड सेट किंवा सुंदर इंडो-वेस्टर्न ड्रेस, आपापल्या स्टाइलनुसार काहीही निवडता येईल. दिवसाच्या कार्यक्रमासाठी हलके रंग आणि कमी दागिने, तर रात्रीसाठी मेटॅलिक टच, शायनी फॅब्रिक किंवा गडद रंग निवडला तर त्याच कपड्याला वेगळा मूड देता येईल. आताची फेस्टिव्ह फॅशन ही खरं तर ‘काय ट्रेण्डमध्ये आहे?’ यापेक्षा ‘मला काय छान दिसतं?’ या प्रश्नावर अवलंबून आहे. ट्रॅडिशनल साडी असो किंवा मॉडर्न को-ऑर्ड सेट, लाल लिपस्टिक असो किंवा ब्लर्ड पिंक लिप, गजरा असो किंवा स्लीक हेअरस्टाइल, प्रत्येक गोष्टीत स्वत:ची स्टाइल दिसणं महत्त्वाचं आहे. कारण यंदा फेस्टिव्ह फॅशनचा खरा ट्रेण्ड कपड्यांमध्ये नाही, तर त्यांना प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्टाइल करण्यात आहे.
दागिन्यांतला चोखंदळपणा…
सणवार आणि लगीनघाई दोन्हीकडे मिरवण्यासाठी बहुतांशी सोन्याच्या दागिन्यांना अधिक पसंती दिली जाते. सोन्याचे पारंपरिक दागिने असतातच, मात्र आधी केवळ सणासमारंभापुरते वापरायचे म्हणून मोठमोठे दागिने केले जायचे. सध्या तो प्रकार मागे पडला असून अगदी छोट्या-मोठ्या कार्यक्रमात किंवा कॉर्पोरेटमध्ये दररोज वावरतानाही वेस्टर्न कपड्यावर सहज पेअर करता येतील अशा प्रकारच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर अधिक भर दिला जातो आहे. त्यामुळे पीएनजी, वामन हरी पेठे यांच्यासारख्या मोठमोठ्या ज्वेलरी ब्रँडपासून ते जीवासारख्या ई कॉमर्स साइट्सवर लोकप्रिय असेलल्या ब्रँडपर्यंत अनेकांनी गोल्ड प्लेटेड दागिने, १८ किंवा २२ कॅरेट गोल्डचे किंवा चांदीच्या दागिन्यांचे वेगळे कलेक्शन्स सादर करायला सुरुवात केली आहे.
सणासमारंभांमध्ये आजही टेम्पल ज्वेलरीला अधिक पसंती मिळते. लक्ष्मी, मोर किंवा देवीदेवतांचे मोटीफ वापरून घडवलेले हे दागिने सुरुवातीला थोडे मोठे आणि जड असायचे. आता केवळ लग्न किंवा सणांपुरते मर्यादित न राहता ड्रेस किंवा इंडो वेस्टर्न फ्युजन कपड्यांवरही परिधान करता येईल, अशा स्वरूपाची नाजूक डिझाईन्स असलेली टेम्पल ज्वेलरीही उपलब्ध झाली आहे. सिल्क साडीवर असा टेम्पल नेकलेस किंवा एकच एक मोठं इअररिंग, झुमके परिधान केले की तुमचा लुक पूर्ण होतो. त्यामुळे टेम्पल ज्वेलरीची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. मिनिमल ज्वेलरी हा प्रकार सध्या कॉलेजमध्ये जाणार्या तरुणींपासून कॉर्पोरेट जॉब करणार्या ्त्रिरयांपर्यंत सगळ्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. सोन्या-चांदीचे किंवा प्लॅटिनमचे हलकेफुलके लेअरिंग असलेले नेकलेस, ब्रेसलेट्स, रिंग्ज सध्या ट्रेंडी आहेत. हे दोन-तीन लेयर असलेले नेकलेस शर्ट-पँटवरही पेअर करता येतात, वन पीस, स्कर्ट किंवा को – ऑर्ड सेट्सवरही ते शोभून दिसतात. त्यामुळे सणांच्या दिवशी थोडा वेगळा लुक करण्यासाठीही ही मिनिमल ज्वेलरी उपयुक्त ठरू शकते आणि कामाच्या ठिकाणीही तुम्ही ही फॅशन स्टेटमेंट म्हणून वापरू शकता. याशिवाय, मोत्याचे दागिनेही सध्या ट्रेंडी असून त्याचेही वेगवेगळे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
viva@expressindia.com
