वेदवती चिपळूणकर

चित्रपट पाहणं हा निव्वळ मनोरंजनाचा भाग नाही, त्याचा आस्वाद घेता यायला हवा, याची जाणीव एके काळी तरुण पिढीला वेगवेगळय़ा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स, फिल्म सोसायटी यांच्या माध्यमातून करून देण्यात आली. एक पिढीच्या पिढी कधी जागतिक चित्रपटाचा अभ्यास तर कधी त्यात कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने या फेस्टिव्हल्सकडे आणि पर्यायाने चित्रपटांकडे आकर्षित झाली. आज मोबाइलवर ओटीटीच्या माध्यमातून जगभरचा सिनेमा, वेबमालिका असं सगळं नजरेसमोर आहे आणि तरीही तरुण सिनेमाप्रेमी आजच्या भाषेत सांगायचं तर सिनेफाइल्स या फिल्म फेस्टिव्हल्सना गर्दी करताना दिसतात..

Facial Exercise For Glowing Skin Yoga for anti-ageing
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ‘हे’ दोन योगा करा; नेहमीच दिसाल तरुण
Ali Fajal News
अली फजलचं वक्तव्य, “मिर्झापूरमधल्या गुड्डूच्या भूमिकेसाठी मी पहिली निवड नव्हतो, कारण…”
kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…
The team of the film amhi Jarange garajvant marathyacha Ladha at the office of Loksatta
आरक्षणामागच्या समाजभावनेची गोष्ट; ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपटाची टीम ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Documentary For preservation of extinct aspects
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : नामशेष पैलूंच्या जतनासाठी…
Information given by Chandrakant Patil to prevent drug consumption Pune
अमली पदार्थ सेवन रोखण्यासाठी आता मोठा निर्णय… चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती…
Ian Smith's reaction to Rishabh Pant
T20 WC 2024 : पंतची गिलख्रिस्टशी तुलना करण्यावर माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याच्यासारखा बनण्यासाठी पंतला अजून…’
Savitribai Khanolkar Marathi name for designing the Param Vir Chakra award
सावित्रीबाई खानोलकर… परमवीर चक्र पुरस्काराचं डिझाईन करणारं मराठमोळं नाव

चित्रपट, लघुपट, माहितीपट अशा सर्वाबद्दल प्रेम असलेले, ड्रामा, रिअ‍ॅलिटी, आर्ट, हॉरर अशा सगळय़ा शैलींबद्दल आपुलकी असलेले अनेक सिनेमाप्रेमी वेगवेगळय़ा फिल्म फेस्टिव्हल्सना हजेरी लावत असतात. त्यात काही केवळ प्रेक्षक असतात, तर काही आशावादी मेकर्स.. काही अभ्यासक असतात, तर काही समीक्षक. काही वर्षांनुवर्षांचे अनुभवी, तर काही विद्यार्थी. चित्रपटाचा भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळ एकाच ठिकाणी एकाच वेळी एकवटण्याचं निमित्त असतात फिल्म फेस्टिव्हल्स. दिवसभर चित्रपट पाहणं, त्यावरच्या चर्चा ऐकणं, दिग्गजांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकणं या सगळय़ा अनुभवासाठी आतुरलेल्या जुन्याजाणत्या चित्रपटप्रेमींप्रमाणेच तरुण तुर्कही फिल्म फेस्टिव्हल्सची वाट पाहत असतात. याची प्रचीती करोनानंतरच्या मोठय़ा खंडानंतर देशभरात झालेल्या फिल्म फेस्टिव्हल्सच्या तरुण गर्दीने आणून दिली.

‘१९५२ साली पहिला फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला गेला. त्या वेळी केवळ चित्रपटनिर्मितीमध्ये सहभागी असलेले लोक आणि समाजातल्या ‘एलिट’ वर्गासाठी समजली जाणारी ‘फिल्म फेस्टिव्हल’ ही संकल्पना आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. एलिट वर्गापासून तरुणाईपर्यंतचा प्रवास फिल्म फेस्टिव्हल्सनी आतापर्यंत केलेला आहे. पूर्वीच्या काळी मास्टर क्लासना समोर कोणी प्रेक्षक नाही म्हणून एक्स्पर्ट्स निघून गेल्याचे अनुभव गाठीशी आहेत. आता मात्र तरुण डेलिगेट्स मास्टर क्लासला इतक्या संख्येने गर्दी करून बसलेले असतात, उभे राहून ऐकत असतात. एखादा चित्रपट पाहण्यापेक्षा त्याबद्दलची साधकबाधक चर्चा तरुण प्रेक्षकांना महत्त्वाची वाटते,’ असा अनुभव चित्रपट अभ्यासक-समीक्षक संतोष पाठारे यांनी सांगितला, तर चित्रपट अभ्यासक-समीक्षक-लेखक गणेश मतकरी यांच्या मते, ‘फिल्म फेस्टिव्हल्समध्ये तरुणांचा कायमच सहभाग राहिला आहे, आता उलट तो वाढला असण्याची अधिक शक्यता आहे. खरं तर पूर्वी तरुण प्रेक्षकाला फिल्म फेस्टिव्हलला जाऊन सहज पाहायला न मिळणारे चित्रपट पाहण्यात रस होता. आज त्याला पाहायला मिळतच नाही असं क्वचित काही उरलं आहे आणि तरीही ते फेस्टिव्हल्सला हजेरी लावतात, कारण आज सिनेमाकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलला आहे.’

तरुण वर्ग कोणत्याही कलाकृतीकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता प्रत्येक चित्रपटाचा, त्यातल्या प्रत्येक बारकाव्याचा गांभीर्याने विचार करतो हेच सध्या दिसून येतं. प्रत्येक चित्रपटाला, संहितेला, दिग्दर्शनातील छोटय़ा छोटय़ा जागांना काही तरी अर्थ असतो, त्यामागे मेकरचा काही तरी विचार असतो हे लक्षात घेऊन तरुणाई आता चित्रपट या माध्यमाकडे पाहू लागली आहे. ‘तरुणाईला केवळ नवीन चित्रपटांचा आस्वाद घेणं इतकंच महत्त्वाचं वाटत नाही, तर त्यांना काही तरी करून दाखवण्यातही रस आहे. तांत्रिकदृष्टय़ा ते आता बरंच सुलभ झालेलं आहे. त्याबद्दलही ते गांभीर्याने विचार करतात. त्यामुळे चर्चा, मार्गदर्शन, मास्टर क्लास अशा गोष्टींना ते अधिक महत्त्व देतात,’ असं मतकरींनी स्पष्ट केलं.

करोनाच्या आधीची फेस्टिव्हल्स आणि नंतरची फेस्टिव्हल्स याचा अभ्यास केला असता आता फिल्म फेस्टिव्हल्सना लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा अधिक आहे हे नक्की. मात्र ओटीटीच्या जमान्यात फिल्म फेस्टिव्हल्ससारख्या इव्हेंट्सना प्रत्यक्ष कोण जाणार? या प्रश्नाचं उत्तर फेस्टिव्हल आयोजनाचा अनुभव गाठीशी असलेल्या प्रसाद खातू यांनी दिलं आहे. ते म्हणतात, ‘प्रत्यक्ष जाऊन मोठय़ा पडद्यावर चित्रपट बघण्याची गरज आणि आवड कधीच कमी झालेली नाही. इतक्या लोकांनी एकाच वेळी थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्यात वेगळा अनुभव असतो. ओटीटीमुळे उलट प्रेक्षकांना थोडय़ाफार प्रमाणात बाहेरच्या चित्रपटांची पूर्वीपेक्षा अधिक माहिती मिळू लागली आहे. सध्या ‘मुबी’सारखा एकच ओटीटी प्लॅटफॉर्म अनेक अपरिचित चित्रपट दाखवतो. बाकी कोणत्याही ओटीटीवर फिल्म फेस्टिव्हलचे चित्रपट सर्रास पाहायला मिळत नाहीत. उलट ओटीटीमुळे प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची दृष्टी थोडी रुंदावली असेल आणि ते चांगलंच आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा प्रकारचे चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची मानसिकता तयार होईल.’ प्रसादने मांडलेल्या मुद्दय़ाला पाठारे यांनीही दुजोरा दिला. ‘ज्या अर्थी ओटीटीवर इतके सारे चित्रपट येतात त्या अर्थी त्यांना यातून नफा नक्कीच होतो. त्यामुळे ओटीटीच्या अस्तित्वामुळे झाला तर फायदाच होईल. तो असा की, आतापर्यंत फारसा न पोहोचलेला कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. त्याचसोबत तरुण मेकर्सनासुद्धा त्या माध्यमाच्या ठरावीक गरजांनुसार नवीन दृष्टिकोन शिकता येईल,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

फिल्म फेस्टिव्हल्सच्या बदलत्या चित्राबद्दल तरुण चित्रपटप्रेमींचंही मत लक्षात घेण्याजोगं आहे. एमआयटी इथून फिल्म मेकिंगचं शिक्षण घेत असलेला जयशंकर रामू म्हणतो, ‘करोनाच्या आधीची फेस्टिव्हल्स आणि नंतरची फेस्टिव्हल्स यात काहीही फरक पडलेला नाही. उलट जर काही बदल झाला असेल तर तो सकारात्मकच आहे. लॉकडाऊननंतर जास्त संख्येने तरुण डेलिगेट्स फिल्म फेस्टिव्हल्सना यायला लागले आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन फेस्टिव्हल्समुळेही लोकांचा इंटरेस्ट वाढला आणि आता तेही प्रत्यक्ष फेस्टिव्हल्सना येऊ लागले आहेत.’ ओटीटीच्या असण्याने फिल्म फेस्टिव्हलला मिळणाऱ्या प्रतिसादात काहीही फरक पडणार नाही, असं तो म्हणतो. प्रत्यक्ष मोठय़ा स्क्रीनवर भरपूर लोकांसोबत चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जातात तसंच लोक फिल्म फेस्टिव्हल्सनासुद्धा जात राहणार. तिथला माहौल, तिथल्या चर्चा, समविचारी लोकांच्या भेटी हे सगळे अनुभव ओटीटीवर घरबसल्या घेता येत नाहीत, याकडेही जयशंकरने लक्ष वेधलं.

चित्रपटांकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्याचा रसास्वाद घेण्यासाठी आसुसलेली, त्याकडे अधिक गांभीर्याने पाहणारी आताची तरुणाई आहे. त्याचाच परिपाक हा फिल्म फेस्टिव्हल्सना वाढलेला प्रतिसाद आहे. इतकंच नाही तर त्यामुळे काही ठरावीक शहरांपुरती मर्यादित असलेल्या फिल्म फेस्टिव्हल्सनी आता देशभर व्याप वाढवला आहे. फिल्म फेस्टिव्हल हे एका वेगळय़ा अर्थाने ज्ञानाची, विचारांची देवाणघेवाण करणारे माध्यम बनले आहे. या माध्यमातून तरुण पुन्हा एकदा जगभरच्या संस्कृतीशी, विचारांशी, तऱ्हे-तऱ्हेच्या माणसांशी जोडले जात आहेत हेही नसे थोडके!     

viva@expressindia.com