फाइन डाइनमध्ये हल्ली पौर्वात्य पदार्थानाही महत्त्व आलं आहे. चायनीज-जॅपनीज पदार्थ चॉपस्टिक्सने खायची पद्धत आहे. या चॉपस्टिक्स कशा वापरायच्या ते मागच्या भागात पाहिल्यानंतर आता या वापरतानाचे काही नियम..

मागच्या भागात आपण चॉपस्टिक्स कशा हाताळतात ते पाहिलं. कटलरीने खाताना जसे काही नियम पाश्चिमात्य पद्धतीत असतात, तसे काही नियम चॉपस्टिक्सने खातानापण लागू असतात. त्यातले काही अगदी ‘नो-नो’ म्हणजे –

  • चॉपस्टिक्स हातात असताना हातवारे करणं. चुकून शेजारी बसलेल्याच्या डोळ्यात गेलं तर किती महागात पडू शकतं याची कल्पनापण करवत नाही.
  • पदार्थ निवडताना चॉपस्टिक्स अन्नावर फिरवू नये.
  • एकदा चॉपस्टिक्सने पदार्थ उचलून आपल्या प्लेट/बोलमध्ये घेतला, की तो बदलू नये.
  • सूपमध्ये असलेले पदार्थ चॉपस्टिक्सने निवडू नये.
  • बॅड मॅनर्सचाचा कहर म्हणजे चॉपस्टिक्स फोर्कसारख्या वापरून, अन्नाला टोचून तो पदार्थ उचलणं.
  • चॉपस्टिक्स एकत्र ठेवून चमच्यासारख्या त्यांचा वापर करू नये.
  • चॉपस्टिक्सची टोकं चोखू नयेत.
  • पदार्थाची डिश आपल्याकडे ओढण्यासाठी तर चोपस्टिक्सचा उपयोग बिलकूल करू नये.

काही चायनीज सूप खायला, चिनी मातीचा चमचा वापरला जातो. चिनी पद्धतीमध्ये बरेच पदार्थ प्लेटमधून न खाता बोलमधून खाल्ले जातात. ज्या काही भाज्यांचे अथवा मांसाहारी पदार्थ खायचे असतील ते भातावर किंवा नूडल्सवर घेऊन बोलमधून खातात. अशा वेळी बोल आपल्या तोंडापाशी आणून ते अन्न खावे.

लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी

  • तुटक्या, विजोड चॉपस्टिक्सने खाऊ नये.
  • चॉपस्टिक्स उदबत्तीसारख्या भातात खोचू नये. असं करणं अशुभ मानलं जातं.
  • जेवायच्या वेळी उत्साहाच्या भरात चॉपस्टिक्सने ‘दांडिया’ खेळू नये. चॉपस्टिक्सने आवाज करू नये.
  • आपल्या चॉपस्टिक्सने दुसऱ्याच्या चॉपस्टिक्सवर अन्न ट्रान्सफर करणं शिष्ठचारात बसत नाही.
  • चिनी पद्धतीचं जेवण भारतीय पद्धतीप्रमाणे शेअर केलं जातं, त्यामुळे आपण स्वत:ला सव्‍‌र्ह करत असताना इतरांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे, मेन डिशमधला पदार्थ चॉपस्टिक्सने उचलून थेट तोंडात घालू नये.
  • पाहिजे तो पदार्थ उचलून आपल्या बोलमध्ये घ्यावा आणि मग खायला सुरुवात करावी.
  • खाऊन झाल्यावर चॉपस्टिक्स पुन्हा ‘रेस्ट’वर ठेवाव्या.