विनय जोशी

२०२६ या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! नवीन वर्षाची सुरुवात ही स्वतःमध्ये बदल घडवण्याची एक नवी संधी असते आणि म्हणूनच अनेकजण नव्या वर्षासाठी नवे संकल्प ठरवतात. रोज जॉगिंगला जाणं, डाएट काटेकोर फॉलो करणं यांच्यापासून तर नवीन स्किल्स शिकणं किंवा या वर्षात आपलं एखादं स्वप्न पूर्ण करणं, अशा छोट्या-मोठ्या संकल्पांच्या निमित्ताने आयुष्यात सकारात्मक बदल घडत असतो. YouGov या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन सर्वेक्षण संस्थेने २०२५ या वर्षासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार २०२५ मध्ये जगभर फिटनेस राखणं, आर्थिक स्तर उंचावणं आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणं हे सर्वाधिक केले गेलेले संकल्प होते.

गेल्या काही वर्षांत या यादीत आणखी एक महत्त्वाचा संकल्प ठळकपणे दिसू लागला आहे तो म्हणजे डिजिटल संतुलन राखणं. मोबाइलचा अतिवापर, सोशल मीडियाचं व्यसन, तंत्रज्ञानावरचं अति अवलंबन या सगळ्याचे नकारात्मक परिणाम मानसिक आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य आणि सामाजिक नातेसंबंध अशा पातळ्यांवर दिसू लागले आहेत. परिणामी या समस्यांबद्दल जागरूकता वाढत डिजिटल वापरात संतुलन ठेवण्याकडे अधिक गांभीर्याने पाहणं सुरू झालं असून अनेकांच्या नवीन वर्षाच्या संकल्पात याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं.

मोबाइलचं व्यसन कमी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते, पण बऱ्याचदा असे संकल्प वर्षभर पाळले जात नाहीत. सुरुवातीचा उत्साह काही दिवसांत ओसरतो आणि संकल्प कागदावरच राहून जातात. अवास्तव ध्येय, आळस, अंतःप्रेरणेचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि अधीरता ही संकल्प अयशस्वी होण्याची प्रमुख कारणं म्हणता येतील. डिजिटल संतुलनच्या बाबतीत कार्य करणाऱ्या ‘ऑफलाइन.नाऊ’ या चळवळीचे संस्थापक आणि ‘ऑफलाइन.नाऊ : अ प्रॅक्टिकल गाइड टू हेल्दी डिजिटल बॅलन्स’ या पुस्तकाचे लेखक एली सिंगर म्हणतात, नवीन वर्षाचे पारंपरिक डिजिटल डिटॉक्स संकल्प अनेकदा आळस किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडत नाहीत.

आत्मविश्वासाची कमतरता आणि डिजिटल सवयींमध्ये बदल घडवण्यासाठी व्यवहार्य, वास्तववादी योजनेचा अभाव हे यामागचं मुख्य कारण आहे. बहुतांश लोकांना खरंच स्क्रीन टाइम कमी करायचा असतो, पण नेमकं काय करावं आणि कुठून सुरुवात करावी हेच उमगत नाही. समजा डिजिटल डिटॉक्सची सुरुवात केली, तरीही ३० दिवसांचं सोशल मीडिया फास्टिंग किंवा तडकाफडकी ॲप डिलीट करणं अशा पारंपरिक पद्धती अपयशी होण्याची दाट शक्यता असते. कारण यात इच्छाशक्ती हा एकमेव प्रेरक घटक असतो, जो १५ दिवसांत कमी होत होत ढेपाळतो, असंही ते म्हणतात.

२०२६ या नव्या वर्षासाठी डिजिटल संतुलन राखण्याची मनापासून इच्छा असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करून हा संकल्प वर्षभर टिकवता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला डिजिटल संतुलनाचा संकल्पही ‘SMART’ असायला हवा. SMART म्हणजे Specific – नेमका आणि स्पष्ट, Measurable – मोजता येण्याजोगा, Achievable – साध्य करता येण्याजोगा, Realistic – वास्तववादी, Time-bound – ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्याजोगा.

‘मोबाइलचा किंवा सोशल मीडियाचा वापर कमी करेन’ अशा मोघम, मोठ्या संकल्पाऐवजी त्याला लहान भागात विभागून त्याप्रमाणे नियोजन केलं तर यशस्वितेची शक्यता वाढू शकते. त्यासाठी आपल्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करणाऱ्या डिजिटल सवयींची एक छोटी यादी बनवता येईल. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर मोबाइल पाहत बसल्यामुळे वेळ वाया जाणं आणि नंतर कामांची घाई होणं, कामाच्या वेळी वारंवार नोटिफिकेशन्स तपासल्यामुळे एकाग्रता भंग होणं, सोशल मीडियावरील इतरांच्या स्टोरीज पाहताना FOMOची भावना येत अस्वस्थ वाटणं, जेवत असताना किंवा चालतानाही फोन हातातून न सोडल्यामुळे शरीर-मनाला विश्रांती न मिळणं, रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने झोपेचा दर्जा बिघडणं, तसंच भावनिक ताण आल्यावर त्याचा सामना करण्याऐवजी स्क्रोलिंगकडे पळ काढणं अशा सवयी नकळत आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. ही यादी लिहून काढली की, आपल्याला कोणत्या सवयींवर प्रथम काम करायचं आहे, हे अधिक स्पष्टपणे समजायला मदत होते.

यादी तयार झाल्यावर सगळ्या सवयींवर एकदम काम न करता, एका वेळी फक्त एकच सवय निवडणं योग्य ठरतं. जास्त त्रासदायक किंवा जी बदलल्यावर बाकी गोष्टीही सुधारतील अशी सवय निवडावी. त्या सवयीसाठी एक छोटा, सोपा स्मार्ट संकल्प ठरवावा आणि निर्धारित दिवस तोच सातत्याने पाळावा. ही छोटी सुरुवातच पुढील बदलांची पायरी ठरते. ‘मी पुढील सात दिवस, सकाळी उठल्यावर पहिली २० मिनिटं मोबाइल पाहणार नाही,’ हा झाला स्मार्ट संकल्प. जेव्हा हा संकल्प एक आठवडा पूर्ण होईल, तेव्हा पुढच्या आठवड्यासाठी त्यात झोपण्यापूर्वी २० मिनिटं मोबाइल न बघणं अशी भर घालता येईल. पुढे जेवताना मोबाइल न बघणं, ऑफिसमध्ये एक तास मोबाइल न बघता काम करणं, अशा प्रकारे भर घालता येईल. सवयींमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने बदल केले, तर संकल्प यशस्वी होण्याची शक्यता निश्चितच जास्त असते.

बऱ्याचदा अशा संकल्पांसोबतच त्यांची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काही सोपे नियम बनवले तर ते अधिक परिणामकारक ठरतात. उदाहरणार्थ, ‘रात्री झोपण्यापूर्वी २० मिनिटं मोबाइल पाहणार नाही’ असा संकल्प असेल, तर त्यासाठी जेव्हा मी बेडवर जाईन, तेव्हा मोबाइल बाजूच्या टेबलवर ठेवून देईन, असा नियम ठरवता येईल. डायनिंग टेबलला ‘नो फोन झोन’ घोषित करता येईल. ‘जेव्हा मला एखादी गोष्ट गूगल करावीशी वाटेल, तेव्हा आधी ती वहीत लिहून ठेवीन आणि दिवसात ठरावीक वेळीच शोधून काढीन’ असे हे नियम पाळताना मध्ये खंड पडला, तर निराश न होता त्यामागचं कारण शोधावं. कदाचित मोबाइल हातात येण्यामागे नोटिफिकेशनचा व्यत्यय असेल, तर त्यानुसार बदल करता येऊ शकतो. म्हणजे बेडरूममध्ये जाण्यापूर्वीच फोन सायलेंट मोडवर किंवा नेट बंद करून ठेवता येईल. अशा लहान सुधारणा केल्यामुळे सवयींमध्ये बदल हळूहळू आणि टिकाऊ पद्धतीने घडतो.

अनेकदा आपलं तंत्रज्ञानावरचं अवलंबनच संकल्पाच्या आड येतं. सकाळी उठल्यावर मोबाइल न बघण्याच्या संकल्पात मोबाइल अलार्मने उठायची सवय, ऑफिसमध्ये काम करताना मेल चेक करण्याच्या बहाण्याने फोन वारंवार हातात येणं, प्रवासात साधं वेळ बघण्यासाठी मोबाइल स्क्रीन पाहिली जाते आणि हळूच स्क्रोलिंग सुरू होतं त्यामुळे संकल्पासोबत सभोवतालच्या परिस्थितीत काही बदल करायला हवेत. उठायला गजराचं घड्याळ वापरणं, ऑफिसमध्ये मोबाइलऐवजी लॅपटॉपवर मेल चेक करणं, अशा काही सवयी लावता येतील.

डिजिटल संतुलनासाठी संकल्प, उपाय आणि नियम जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच त्याऐवजी जाणीवपूर्वक पर्याय तयार करणंही आवश्यक आहे. आपण वारंवार मोबाइल का पाहतो, यामागे आपल्या मेंदूची कार्यप्रणाली कारणीभूत असते. एखादी नवी, आनंददायी गोष्ट केली की मेंदूत डोपामिन नावाचं चेतारसायन स्रवून सुखद अनुभूती मिळते. ही आनंदाची भावना वारंवार अनुभवण्यासाठी पुन:पुन्हा ती कृती करण्याची तीव्र इच्छा होत असते. स्मार्टफोन वापरताना ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडियावरील नोटिफिकेशन्स, मेसेजेस, पोस्टवरील लाइक्स, गेमिंगची लेव्हल पार करणं या सर्वातूनही डोपामिनचा असा छोटा ‘रिवॉर्ड’ मिळतो. एखादं पुस्तक वाचून पूर्ण झालं, एखादं ध्येय साध्य झालं, व्यायाम झाला, अशा काही घटनांमध्येही डोपामिन स्रवून आनंद मिळतो. पण त्या तुलनेत मोबाइल पाहणं सहज साध्य असल्याने आपले हात सारखे मोबाइलकडे जातात. आपल्या मेंदूला अशा विनासायास डोपामिन मिळायची सवय लागल्याने डिजिटल संतुलनाचा संकल्प पाळणं कठीण होतं. यावर उपाय म्हणून तितक्याच आनंददायी पण आरोग्यदायी पर्यायांची निर्मिती करणं हा महत्त्वाचा टप्पा ठरतो.

सकाळी उठल्याबरोबर मोबाइल बघण्याऐवजी गॅलरीत जाऊन निसर्ग अनुभवणं, व्यायाम करणं, प्रवासात हलकंसं संगीत/पॉडकास्ट ऐकणं किंवा छोट्या वहीत नोंदी किंवा स्केचेस काढणं, झोपायच्या आधी थोडं पुस्तक वाचन, डायरी लिहिणं, ऑनलाइन गेमिंगऐवजी मैदानी खेळ किंवा बोर्डगेम खेळणं, कंटाळा आल्यावर लगेच फोन उघडण्याऐवजी सुडोकू, शब्दकोडं सोडवणं, डुडलिंग करणं असे काही पर्याय शोधून अमलात आणावे लागतील. ऑफिसमध्ये मधल्या मोकळ्या वेळात फेरफटका मारणं, मित्रांशी संवाद साधणं, जेवताना कुटुंबाशी गप्पा मारणं हे आनंद आणि समाधान देणारे पर्याय आहेत.

अशा काही सवयी फक्त पर्यायी वेळेपुरत्या मर्यादित नाही, कारण मेंदूला अति-उत्तेजने शिवाय डोपामिन मिळवायची सवय पुन्हा लावणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी वाचन, संगीत, व्यायाम, कला-छंद अशा शांत, समाधान देणाऱ्या क्रियांकडे जाणीवपूर्वक वळावं लागेल. रोज व्यायाम, चित्रकला, लेखन, हस्तकला अशा अर्थपूर्ण गोष्टींसाठी वेळ काढावा लागेल. म्हणूनच डिजिटल संतुलनाच्या संकल्पांच्या जोडीला अशा आरोग्यदायी सवयींचे छोटे-छोटे संकल्प जोडणंही तितकंच गरजेचं आहे. हे पूरक संकल्प देखील SMART असायलाच हवेत. ‘मी पुढील सात दिवस, सकाळी उठल्यावर पहिली २० मिनिटं मोबाइल न पाहता १२ सूर्यनमस्कार आणि १० मिनिटं प्राणायाम करेन किंवा रोज रात्री झोपण्यापूर्वी पुस्तकाची किमान तीन पानं वाचेन’ ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. जेव्हा अशा छोट्या-छोट्या बदलांची सवय लागते, डिजिटल संतुलनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो, तेव्हा पुढच्या टप्प्यात थोडे मोठे निर्णय घेणंही शक्य होतं. अशा वेळी आठवड्यातून एक दिवस पूर्ण डिजिटल उपवास पाळणं, आठवडाभर सोशल मीडिया न वापरणं किंवा महिन्यातून एक दिवस मोबाइल न घेता घराबाहेर वेळ घालवणं, असे संकल्पही आत्मविश्वासाने करता येतील.

अशा उपायांमुळे डिजिटल माध्यमांचा मर्यादित वापर करण्यास मदत होईल, पण आपण किती वेळ मोबाइल वापरतो याइतकंच आपण त्या वेळेत काय पाहतो, काय वाचतो आणि कोणत्या प्रकारची माहिती घेतो हेही आपल्या मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच, स्क्रीनटाइमचं केवळ प्रमाण नव्हे तर त्याची गुणवत्तादेखील आपल्या डिजिटल संतुलनासाठी परिणामकारक ठरते. म्हणूनच डिजिटल माध्यमांचा वापर कमी करण्याबरोबरच काही चांगल्या सवयी अंगी बाळगायला हव्यात. डिजिटल शिष्टाचार म्हणजे नेटिकेट्स कसोशीने पाळणं, अर्थपूर्ण आणि उपयुक्त कंटेंटला प्राधान्य देणं, नकारात्मक किंवा अनावश्यक माहितीपासून दूर राहणं यातून डूमस्क्रोलिंग, ट्रोलिंग, सायबर बुलिंग अशा अनेक समस्यांना आळा बसू शकतो.

दर ठरावीक कालावधीनंतर आपल्या डिजिटल वापराचं पुनरावलोकन करणं आणि गरज पडल्यास डिजिटल डीक्लटरिंग करणं ही सवय लावणंही महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, दर आठवड्याला मोबाइलमधले अनावश्यक स्क्रीनशॉट्स, डुप्लिकेट फोटो आणि नको असणाऱ्या फाइल्स डिलीट करणं; दर महिन्याला वापरात नसलेले ॲप्स, जुने चॅट्स, निष्क्रिय ग्रुप्स काढून टाकणं; आणि दर तीन महिन्यांनी ई-मेल्स, सबस्क्रिप्शन्स, सोशल मीडिया फॉलोइंग, स्टोरेज यांची एक मोठी साफसफाई करणं, अशा टप्प्याटप्प्याने केलेल्या डीक्लटरिंगमुळे डिव्हाइस आणि आपलं मन दोघांतला पसारा आवरला जातो.

या आणि अशा उपायांमधून डिजिटल संतुलन हळूहळू साधलं जाऊ शकतं. याचे परिणामही जाणवू लागतील. मन शांत होईल, एकाग्रता वाढेल, स्मरणशक्तीत सुधारणा जाणवेल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विनाकारण वाया जाणारा वेळ वाचेल. हा साठवलेला वेळ आणि मानसिक ऊर्जा पुढे आपल्या आयुष्यातील मोठे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने बळ देऊ शकतील. गरज आहे डिजिटल संतुलनाच्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकण्याची! शुभस्य शीघ्रम!