vv27नवं नवं कॉलेज सुरू झाल्यामुळे नव्या मित्र-मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये जाण्याचे बेत सुरू असतील. फ्रेशर्स पार्टी किंवा नव्या ओळखींसाठी तर आऊटिंग होणारच. पण हेदेखील तुम्हाला माहिती असेल की, आपलं शरीर पावसाळ्यात आरोग्याच्या कुरबुरींना बळी पडतं. कारण हवेत असलेल्या अधिक दमटपणामुळे शरीराची पचनशक्ती खालावते. मान्सून शरीराची रोगप्रतिकारकशक्ती घटवते. आपल्या शरीरावर अ‍ॅलर्जी, संसर्ग, अपचन या समस्यांचा मारा सुरू असतो, त्यामुळे आपला उद्देश नेहमीच शरीराला अशा समस्यांपासून दूर ठेवण्याचा असला पाहिजे.
दमट आणि ओलसर परिस्थिती अनेक जिवाणू-विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारखे पोटाचे विकार, अतिसार आणि जुलाब असे आजार होऊ  शकतात.
एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, तुम्ही तेलकट पदार्थ, रस्त्यावरचे अन्न किंवा मोठय़ा प्रमाणात तयार करण्यात येणाऱ्या अन्नाचे सेवन करू नका.
मान्सूनमध्ये आरोग्य टिकवण्यासाठी ही आहेत काही मार्गदर्शक तत्त्वे :

अन्न आणि आहाराची काळजी :
गरम पेयं प्या आणि पाण्याची पातळी योग्य ठेवा :
* अ‍ॅण्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असलेल्या हर्बल टीचे सेवन करा. यात आलं, मिरपूड, मध, पुदीना, तुळशीची पाने यांचा चहा प्या.
* कॉफी आणि चहा यांच्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना टाळलेलेच बरे.
* उकळलेले आणि गाळलेलेच पाणी प्या, तसेच उकळलेले पाणी २४ तासांत प्याल याची काळजी घ्या.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवा :
* रोजच्या आहारात आलं, लसूण, हिंग, मिरीची पूड, जिरपूड, कोथिंबीर, मेथीचे दाणे, हळद यांचा समावेश करा. त्यांच्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती आणि पचनशक्ती वाढते.
* अ‍ॅण्टीऑक्सिडन्ट्सने भरपूर असलेले भोपळा, कोहळा, ढोबळी मिरची इत्यादींचा समावेश आहारात करा.
* पावसाळ्यादरम्यान पिकणाऱ्या फळांचे सेवन करा, कारण मोसम नसलेल्या फळांना मान्सूनमध्ये कीड लागण्याची शक्यता असते. डाळिंब, लिची, सफरचंद, पेअर, केळी खाणं कधीही चांगलं. गाजर, फ्लॉवर आणि कोबी यांसारख्या जमिनीनजीक उगणाऱ्या भाज्या किंवा फळं चांगली धुऊन आणि उकडून खा. पावसाळ्यात कच्च्या भाज्यांचे सॅलड खाण्यापेक्षा ते उकडून खा, कारण कच्च्या भाज्यांमध्ये जिवंत जिवाणू-विषाणू असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जैविक किंवा विषाणू संसर्ग होऊ  शकतो.
* सहज पचणाऱ्या अन्नाचे सेवन करा :- ब्राऊन राइस, ओट, सातू, लापशी यांसारखे पदार्थ मान्सूनमध्ये सेवन करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
* बाहेर खाणे टाळा :- बाहेरचे कच्चे, न शिजवलेले पदार्थ खाणे टाळा. चाट, पाणीपुरी, सॅलड, फळे/भाज्यांचे रस यांपासून दूर राहा. त्यापेक्षा नारळपाणी किंवा घरी तयार केलेल्या फळांचे रस प्या.
समुद्रातील मासे खाणे टाळा :- पावसाळ्यात मासे, कोळंबी, खेकडे इत्यादी ताजे नसल्यास खाणे टाळा. हा ऋतू सागरी पाण्यातील जीवांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे त्यांचे सेवन केल्यास पोटात संसर्ग किंवा विषबाधा होण्याचीही शक्यता असते. पावसाळ्यात शाकाहार कधीही चांगला.
तेलकट पदार्थ टाळा :- पावसाळ्यात मानवी पचन संस्थेचे काम मंदावते, त्यामुळेच या काळात मसालेदार आणि तेलकट पदार्थाचे सेवन करू नये.
दुधापेक्षा दह्य़ाला पसंती द्या :- पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थाना रोगजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे या पदार्थाचे सेवन मर्यादित करा. दुधाऐवजी दह्य़ाचे सेवन करा. पनीर, कोशिंबीर आणि मिठाई असे दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करू  नका, खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांकडून घेतलेले.
आरोग्य हीच संपत्ती आहे आणि या मान्सूनमध्ये ही संपत्ती घालवू नका, थोडी काळजी आणि जीवनशैलीत थोडे बदल तुमचे आरोग्य राखेल तसेच तुम्हाला या ऋतूची मजा लुटू देईल. हा मान्सून आरोग्यदायी राहो!
(लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.)
viva.loksatta@gmail.com

रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे अन्न
पुढील कोष्टकात काही नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे पदार्थ आहेत :
लसूण, हळद, दालचिनी, लवंग,
ओट, बदाम, रताळे, ग्रीन टी, स्ट्रॉबेरी, जवस (फ्लाक्स सीड),  तुळस, आंबवलेले पदार्थ, दही, गव्हाचे दाणे, मध.