क्षण एक पुरे! : ब्लॉगिष्ट

फूड ब्लॉगिंगच्या माध्यमातून तरुणाईत प्रसिद्ध झालेला अमरावतीचा श्रेणिक उपाध्ये गर्दीतही वेगळा ठरतो.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

गेल्या काही वर्षांत नोकरीची रुळलेली वाट सोडून आपली आवड, छंद काय आहे हे लक्षात घेत, ते जोपासणाऱ्या तरुणाईचं प्रमाण वाढतं आहे. काही जण आपल्या आवडीला व्यवसायाचं रूप देतात, तर काही जण आपली करिअर सांभाळून आवडही जपतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत नवनवीन क्षेत्रे धुंडाळू पाहणारी ही तरुणाई केवळ शहरांपुरती मर्यादित नाही. तर गावखेडय़ांतूनही अनेक जण या तंत्रज्ञानाचा वापर करत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. फूड ब्लॉगिंगच्या माध्यमातून तरुणाईत प्रसिद्ध झालेला अमरावतीचा श्रेणिक उपाध्ये गर्दीतही वेगळा ठरतो.

शैक्षणिकदृष्टय़ा त्याने इंजिनीअरिंग केलं आहे. मास्टर्ससाठी त्याची तयारीही सुरू आहे. इंजिनीयरिंग करतानाच त्याने फूड ब्लॉगिंग सुरू केलं आणि त्यात त्याने अत्यंत मनापासून लक्ष देऊन मेहनत घ्यायला सुरुवात केली. इन्स्टाग्रामवर त्याच्या पेजला कोणत्याही बिझनेस टूल्सशिवाय तीन हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले. अमरावतीचा असलेला श्रेणिक उपाध्ये हा अमरावतीमधला पहिलाच फूड ब्लॉगर ठरला. तो केवळ फूड ब्लॉगिंग करत नाही तर ‘स्विगी’ या प्रसिद्ध अ‍ॅपसाठी फूड फोटोग्राफीही करतो. ‘गीलावडा’ या नावाने असणारं  त्याचं इन्स्टाग्राम पेज तरुणाईमध्ये फेमस आहे. अमरावतीची खासियत असणाऱ्या या पदार्थाला आपल्यामुळे प्रसिद्धी मिळावी यासाठी त्याने जाणीवपूर्वक हे नाव निवडलं आहे.

तरुण मुलांची ऑर्डर ही पोटात जाण्याआधी फोटोत जाते याची आजकाल सगळ्या कॅफे आणि हॉटेल्समधल्या स्टाफला सवय झाली आहे. मात्र हे खूळ जितकं सहजपणे मेट्रो सिटीजमध्ये दिसून येतं तितकं बाकीच्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये दिसत नाही, असं खुद्द अमरावतीचा असलेला श्रेणिक सांगतो. त्याच्या सुरुवातीच्या अनुभवाबद्दल तो सांगतो, ‘इथल्या लोकांना या गोष्टीची सवय कधीच नव्हती की समोर प्लेट ठेवली रे ठेवली आणि माणूस फोटोच काढत बसला आहे. वेटर सव्‍‌र्ह करायची वाट बघत उभा असतो आणि आपण वेगवेगळ्या अँगलने फोटो काढत राहतो. सगळ्या कुटुंबासोबत बाहेर जेवायला गेलं की लोक तर चक्क वेडय़ातच काढायचे. सोबतचे सगळे लोक जेवायला सुरुवात करायचे आणि मी फोटो काढत टेबलभोवती फिरत असायचो. या सगळ्या गोष्टी आमच्या भागात जितक्या प्रकर्षांने जाणवतात तितक्या मोठय़ा शहरांत जाणवत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे फूड ब्लॉगिंग वगैरे करणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी आहे’.

फूड ब्लॉगिंग ते ‘स्विगी’पर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला हेही तो सांगतो. ‘स्विगी’मध्ये काम करतो म्हटल्यावर साहजिकच कोणालाही पटकन डिलिव्हरी एक्झिक्युटिवची आठवण होते. तिथे इतर कोणत्या प्रकारचं काम असू शकतं आणि ते करण्याची कल्पना कोणाला सुचू शकते हे सहजपणे कोणाच्या लक्षात येत नाही. श्रेणिकने ज्यावेळी ‘स्विगी’मध्ये काम सुरू केलं त्यावेळी त्यालाही सुरुवातीला अशा गैरसमजांना उत्तरं द्यावी लागली. तो म्हणतो, ‘मी स्वत:हून जाणूनबुजून स्विगीमध्ये प्रयत्न केले नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मी स्विगीपर्यंत पोहोचलो. मी प्रोफेशनल फूड फोटोग्राफी करायला लागलो होतो त्यावेळी माझ्या इन्स्टाग्रामवरून सहज एका चॅलेंजसाठी मी फोटो पाठवले. त्यावरून मला जो रिप्लाय आला तेव्हा कळलं की एकूण नव्वद रेस्टॉरंट्ससाठी फोटोशूट करायचं आहे आणि हे काम स्विगीसाठी करायचं आहे. त्यावेळी मला माझ्या कामाची व्हॅल्यू कळली. ते काम सुरू केलं तेव्हा घरच्यांनाही लक्षात आलं की मी काहीतरी उपयोगी काम करतो आहे. आईबाबा हे इन्स्टाग्रामवर नसल्यामुळे आणि इतर सोशल मीडियावरही फार कमी अ‍ॅक्टिव्ह असल्यामुळे त्यांना माझी आवड समजावण्यासाठी मला या स्विगीच्या कामाची खूप मदत झाली. केवळ टाइमपास म्हणून मी काहीतरी करत नाहीये हे पटवून देणं मला सोपं गेलं’, असं सांगतानाच ‘स्विगी’मुळे अनेक पद्धतींची फोटोग्राफीही शिकता आली आणि माझ्या ब्लॉगिंगसाठी उपयोगी पडतील अशा ट्रिक्सही कळत गेल्या, असेही त्याने स्पष्ट केले.

श्रेणिकने फूड ब्लॉगिंग सुरू केलं तेव्हा ते अमरावतीसाठी नवीन होतं. त्याच्या फोटोग्राफीच्या पद्धतीमुळे आणि न थांबता केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे त्याचे फॉलोअर्स वाढत राहिले. त्याच्या आजूबाजूला आणि ओळखीतही असे अनेक इन्स्टाग्रामर्स होते जे फूड ब्लॉगिंगसाठी प्रयत्न करत होते. यावर त्याने एक इंटरेस्टिंग अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली. श्रेणिक सांगतो, ‘ब्लॉगर्स मीटसारखा प्रकार आम्ही सुरू केला. एकमेकांच्या कल्पना समजावून घेणं आणि एकमेकांना मदत करण्यासाठी आम्ही भेटायला सुरुवात केली. कोणत्या पद्धतीने फोटो काढावेत, कॅप्शन कशा असाव्यात, कोणकोणत्या ठिकाणी फिरता येऊ  शकतं अशा सगळ्या गोष्टींत एकमेकांना मदत करू लागलो. आमच्यासारख्या भागात या पद्धतीचे ब्लॉगर्स मीट वगैरे होत नाहीत. त्यामुळे ही आमच्यासाठी नवीन गोष्ट होती, शिकण्याची गोष्ट होती. आणि ही गोष्ट अमरावतीमध्ये मी सुरू केली याचा मला खूपच आनंद झाला’.

इन्स्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनण्याची इच्छा असलेल्या आणि त्यासाठी खरोखरच गांभीर्याने प्रयत्न करणाऱ्या तरुणांना घरच्यांकडून पाठिंबा मिळणं तसं अवघडच! पैसे कमवून सेटल होण्याचं हे करिअर नाही असं सगळ्यांचंच ठाम मत असतं. श्रेणिक म्हणतो, ‘मोठमोठय़ा तथाकथित शहरांतही अशा गोष्टीला कोणी सपोर्ट करत नाही. अमरावतीसारख्या ठिकाणी तर अजून या सोशल मीडियाच्या गोष्टी तितक्या प्रमाणात पोहोचल्याच नाहीयेत. मला वैयक्तिकरित्या मात्र इंजिनीयरिंगही तितकंच आवडत असल्यामुळे मी ब्लॉगिंग, फोटोग्राफी आणि अभ्यास या तिन्हीकडे तितकंच मनापासून लक्ष देतो. पुढे मी या तिन्ही गोष्टी कशा मॅनेज करू शकेन हे मला आत्ता माहीत नाही, मात्र माझी आवड मी आत्ताही जपतो आहे आणि पुढेही जपणार आहे’. पुढे करिअरबरोबर हे कसं सांभाळणार, याविषयी बोलताना, मला खायला आवडतं आणि म्हणून मी हा उद्योग सुरू केला आहे. खायची आवड तर कायम राहील, त्यामुळे ब्लॉगिंगही चालू राहील यात शंका नाही, असं तो ठामपणे सांगतो.

सोशल मीडिया हे माध्यम जितकं मेट्रो सिटीजमध्ये प्रचंड पसरलेलं आहे तितकं इतर ठिकाणी नाही, असं श्रेणिकचं मत आहे. त्यामुळे त्याच्या भागात त्याने पहिल्यांदा सोशल मीडियाचा इतका मनापासून वापर केला आणि इतरांनाही त्याची सवय लागावी यासाठी त्याने जे प्रयत्न के ले त्याबाबत तो समाधानी आहे.

 

दुसरा मुद्दा म्हणजे करिअरसोबत आवड जपण्याचा.. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची खरंच मनापासून आवड असेल तर आपण त्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढतो. त्यामुळे उद्या मी नोकरी करायला लागलो तरी फावल्या वेळात लोक जसा टाइमपास करतात त्याऐवजी मी माझा टाइमपास माझ्या आवडीतच शोधेन.’

-श्रेणिक उपाध्ये

जेवणाच्या पदार्थाचे फोटो काढत फिरतो म्हणून वेडय़ात काढण्याचं प्रमाण आमच्या भागात खूप आहे. त्यामुळे जितकं हे ऐकायला सोपं वाटतं तितकं ते अनुभवायला प्रत्येक वेळी सोपं नसतं. लोकांच्या बडबडीला कंटाळून आपली आवड सोडून देणं हा पर्याय नसतो. त्यामुळे मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला आवडतंय ते तरी करावं म्हणजे आपल्याकडे समाधान तरी शिल्लक राहतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Food blogger shrenik upadhye abn

Next Story
तो ती आणि पाऊस
ताज्या बातम्या