गणेशोत्सवात हिरव्यागार केळीच्या पानावर रचलेले वेगवेगळे पदार्थ इतके सुंदर रंगसंगती साधतात की पाहातच राहावं! देवाला ‘निवेदनीय’ असे जे द्रव्य अर्पण केले जाते त्याला नैवेद्य असे म्हणतात. ‘तंत्रसार’ या ग्रंथात नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा असा उल्लेख आढळतो. ‘भोज्य’ म्हणजे हलके चावून खाण्यासारखे पदार्थ – भात, खिचडी, पुरी, शिजविलेल्या भाज्या इत्यादी. ‘भक्ष्य’ म्हणजे कडक व आधी छोटे तुकडे करून मग चावून खाण्यासारखे पदार्थ – लाडू, जिलबी, सुकामेवा. ‘लेह्य’ म्हणजे चाटून खाण्याजोगे पदार्थ – पंचामृत, श्रीखंड. ‘चोष्य’ म्हणजे चोखण्यासारखे पदार्थ – आंबा, शेवगा शेंगा आणि ‘पेय’ म्हणजे पिण्यास योग्य पदार्थ – बासुंदी, खीर, सार, आमटी, अशा पाच प्रकारचे पदार्थ नैवेद्यात असावेत.
गणेशोत्सवात चांद्यापासून बांद्यापर्यंत नैवेद्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात पंचामृत हे प्रत्येक पूजेत घरोघरी बनवले जाते. दही, दूध, तूप, मध आणि साखर घालून केलेलं पंचामृत चवीला चांगलं लागतंच, शिवाय पौष्टिकही असतं. त्यात केळं कुस्करून घालणं हा पंचामृताचा आणखी एक प्रकार. काही जणांकडे हे पंचामृत रोजच्या रोज नैवेद्यात दाखवलं जातं. पंचामृतानंतर येतो फळांचा मानपान. गणपतीच्या पूजेच्या वेळी सर्वप्रथम नारळ व त्याचबरोबर केळी, पेरू, डाळिंब, सफरचंद, पेर, पपनस अशा फळांनी भरलेलं ताट नैवेद्य म्हणून समोर ठेवलं जातं. दीड दिवसांपेक्षा, गौरी गणपतीच्या सात दिवसांत घरी फळांची रेलचेल जास्त असते. हल्ली सगळीकडेच माव्याच्या मिठायांपेक्षा प्रसादासाठी फळेच आणणं पसंत केलं जातं.
गणपती आला म्हणजे मोदक आलेच. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जशी गणपतीच्या पूजेने होते, तशीच गणपतीच्या नैवेद्याच्या पदार्थांची ओळखही मोदकापासूनच होते. तांदळाच्या पिठाची उकड घेऊन त्याची कणीक मळून त्याच्या हातावर गोलाकार पाऱ्या करून त्यामध्ये भरलेलं ओल्या नारळाचं गोड सारण म्हणजे मोदक. नैवेद्याच्या ताटातला हा ‘हिरोच’! सगळ्या पदार्थांच्या बरोबरीने ऐटीत बसलेला हा मोदक अस्सल मराठमोळ्या खाद्य संस्कृतीचा राजदूत आहे. महाराष्ट्रात अर्ध्या घरांमध्ये उकडीचा तर अर्ध्या घरांमध्ये तळणीचा मोदक करण्याची पद्धत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत घराघरांमध्ये असे मोदक बनवले जातातच. पण, मराठवाडा व विदर्भात मात्र सुक्या खोबऱ्याच्या सारणाचे तळलेले मोदक बनवले जातात. सुकं खोबरं व गुळाच्या जोडीला काजू, बदाम, केशर, जायफळ, वेलची, बेदाणे, चारोळी याची मस्त चव या मोदकांमध्ये आपल्याला चाखायला मिळते.
गोव्यातील कुटुंब हे चौकोनी कुटुंब नाही. एक घर एक गणपती अशी परंपरा जपल्यामुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेली व्यक्ती गणपतीसाठी आपल्या मूळ घरी येते आणि म्हणून या दिवसात कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे जण जेवायला असतात. ‘चवथ’ हा गोमंतकीयांचा सर्वात मोठा सण. दिवाळीलादेखील एवढं महत्त्व नाही तेवढं चवथीच्या सणाला मोठं महत्त्व. गोवा आकाराने लहान असला तरी या एवढ्याशा गोव्यात असंख्य प्रकारच्या चालीरीती आहेत आणि स्वयंपाकाच्या बाबत बोलायचं तर नुसत्या गणपतीत गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. दक्षिण आणि उत्तर गोव्यात गणपतीसाठी केल्या जाणाऱ्या स्वयंपाकात थोडंसं वेगळेपण दिसून येतं. आश्चर्याचा भाग म्हणजे गोव्यातल्या गणपतीला मोदकाचा नव्हे तर ‘नेवऱ्याचा’ नैवेद्य म्हणजे करंजीचा नैवेद्य दाखवला जातो.
गोमंतकीय महिला ओल्या पुरणाच्या, किसलेल्या नारळापासून केलेल्या पंचखाद्याच्या, रव्याच्या पिठाच्या, तिखट पिठीच्या अशा विविध नेवऱ्या बनवतात. नेवऱ्यांप्रमाणेच पुरण घातलेले चित्रविचित्र आकाराचे पदार्थही बनविले जातात. ‘मुगांगाठी’ म्हणजे सोललेल्या मुगाची रसभरीत उसळ. गणपतीच्या दिवसांत एकदा तरी गोव्यात मुगांगाठी केलं जातं. वरण भात आणि त्याच्या जोडीला टोमॅटोचं सार हे हवंच. ज्याप्रमाणे वरण भात, तूप हे त्रिकूट महाराष्ट्रात पाहायला मिळतं, तसंच गोव्यात नैवेद्याच्या पानात वरण भात आणि सार हे त्रिकूट पाहायला मिळतं.
गोवा तसंच तळकोकणात ‘खतखते’ हा पदार्थ प्रसिद्ध आहे. गोव्यातील विविध समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं खतखते बनवलं जातं. गणपतीच्या काळात तर हे मुद्दाम बनवलं जातं. गणपतीसाठी म्हणून यात २१ प्रकारच्या भाज्या आणि कंदमुळं घालतात, पण एरवी पाच भाज्या घालूनदेखील खतखते बनवलं जातं. पाच खाजीशिवाय गणपतीच्या नैवेद्याला अर्थ नाही. शिंपले, नेवरी, चक्र, केळं, सूर्य, स्वस्तिक, मोदक या प्रत्येकाचं पुरण भरून पाच प्रकार बनवलेच पाहिजेत. या पाच खाजीचा नैवेद्य गणपतीला विशेष दाखवला जातो.
गोव्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी ‘हिट आणि रोस’चा नैवेद्य असतो. दक्षिण गोव्यातील अनेक घरांमध्ये विशेषतः मडगावमधील कोंब भागातील गौड सारस्वतांच्या घरी नैवेद्याला हा आगळावेगळा पदार्थ केला जातो. हिट हे उडदाची डाळ आणि तांदळाचा रवा यांच्यापासून बनवलं जातं. आदल्या दिवशी दुपारी उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवून रात्री हे दोन्ही जिन्नस एकत्र वाटून ठेवतात. त्यामुळे सकाळी हे पीठ छान फुगतं. दुसऱ्या दिवशी उकड काढताना तळाशी केळीचं पान घालून त्यावर टम्म फुगलेल हिटचं पीठ घालून त्याची उकड काढली जाते. नारळाच्या रसात गूळ – वेलची पूड घालून या हिट आणि रोसचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो.
सात कप्प्याचे घावणे हा कोकण आणि मालवण भागातील एक प्रसिद्ध पारंपरिक गोड पदार्थ आहे. याला ‘सात कापे घावण’ असंही म्हणतात. प्रामुख्याने गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी हा गोड पदार्थ बनवला जातो. पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या हिरव्या आणि पांढऱ्या सालीच्या दुधीभोपळ्याच्या आकाराच्या काकड्या भरपूर प्रमाणात आणि स्वस्त मिळतात. याच काकडीपासून गौरींकरिता एक चविष्ट गोड पदार्थ बनवला जातो, ज्याला काकडीचं सांदण असं म्हणतात. पंचखाद्य हाही खिरापतीचाच एक प्रकार असतो. फक्त ओल्या खोबऱ्याऐवजी त्यात सुकं खोबरं वापरतात. गौरी पूजनाच्या वेळी नैवेद्यासाठी बनवला जाणारा एक अतिशय पारंपरिक आणि दुर्मीळ गोड पदार्थ म्हणजे ‘भिरडी’. हा पदार्थ चवीला गोड, किंचित कुरकुरीत आणि आतून मऊ असतो. भिरडी हा पदार्थ दिसायला हाताच्या जोडलेल्या पंजासारखा किंवा एकावर एक घड्या घातलेल्या पापडीसारखा असतो. काही भागात याला ‘हात-जोडे’ असंही म्हणतात.
‘उंदरावळ’ किंवा दाक्षिणात्य भाषेत ‘उंड्राळू’ हा गणेश चतुर्थीला गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवला जाणारा एक अतिशय पारंपरिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी याला ‘तांदळाचे उकडीचे गोळे’ किंवा ‘उकडीचे मुटके’ म्हणूनही ओळखले जाते. हा पदार्थ प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही सीमारेषेवरील भागांत गणपतीचा आवडता प्रसाद म्हणून बनवला जातो. ऋषी पंचमीच्या दिवशी करण्यात येणारी ऋषीची भाजी ही आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्यं आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत म्हणून फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरण्याची परंपरा आहे. या भाजीत फळभाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळे अशा प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. यात तेल-तूप, मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत. तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. कमी उष्मांक असलेली ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचं कारण म्हणजे सेंद्रिय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा केलेला वापर व तेल आणि मसाल्यांचा अभाव. ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ला जाणारा भात आणि भाकरी यासाठी जे तांदूळ मिळतात तेसुद्धा बैलाचे कष्ट न घेता पिकवलेले असतात. त्या तांदळाला ‘पायनु’ असं म्हणतात. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणारी फळं, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एक प्रकारे ऋषींच्या सात्त्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक अनुभवायला मिळते.
महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य तर काही ठिकाणी घावन-घाटल्याचा नैवेद्य असतो. गौरी पूजनाच्या दिवशी सगळीकडे पुरणावरणाचा स्वयंपाक असतो. गौरी विसर्जनाच्या दिवशी ओल्या नारळाच्या मुरडीच्या करंज्या केल्या जातात. पुढच्या वर्षी गौरी मुरडून परत यावी यासाठी या करंज्या नैवेद्याच्या पानात अर्पण केल्या जातात. खान्देशात गौराईला जास्त महत्त्व असतं. गौराईला दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांचा फुलोरा बनवला जातो. त्याचबरोबर एक दिवस भंडारा केला जातो, ज्यामध्ये दाल बाटी बेत प्रामुख्याने असतो. विदर्भात या नैवेद्यात समावेश असतो, तो ज्वारीपासून तयार करण्यात आलेल्या आंबिलीचा. १६ भाज्या, १६ चटण्या, १६ कोशिंबिरी असा माहेरवाशिणीचा थाट असतो.
गणपतीचे वाहन म्हणजे उंदीर. या उंदीर मामांचासुद्धा मानपान केला जातो. कोकणात ऋषी पंचमीच्या दिवशी उंदरबीज असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. गोव्यातही गणपती – गौरी आणि महादेव यांच्या बरोबरीने उंदरालादेखील नैवैद्य दाखवला जातो. त्याच्यासाठी स्वतंत्र नैवेद्याचं पान केलं जातं. तांदळाचं पीठ मळून त्याचा उंदीर बनवून त्याला नैवेद्य दाखवला जातो. पश्चिम महाराष्ट्रात कडधान्यांच्या घुगऱ्या केल्या जातात. महाराष्ट्रात काही ठिकाणी उंदीर मामांना तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
महाराष्ट्रात नैवेद्याच्या ताटात नानाविध पक्वान्नं अर्पण केली जातात. सरतेशेवटी संस्कृतीच्या एका विकसित टप्प्यावर आल्यावर नैवेद्याला काय आहे, यापेक्षा त्यातला भक्तिभाव महत्त्वाचा असतो!
