गणराय आले म्हणता म्हणता आज विसर्जनाचा दिवस उजाडला. वर्षभर ज्याची वाट पाहत, त्याची सजावट, लाड, कोड-कौतुक केले, आज तो पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन चालला आहे. गणेशाला निरोप देण्यासाठी निघणार्या विसर्जनाच्या मिरवणुकांमधून समुद्रकिनार्यांवर भक्ती, उत्साह आणि भावनांचा महासागर उसळतो. समुद्रावर पोहोचताच ढोल-ताशांचा गजर थांबतो, गणरायाला निरोप दिला जातो आणि गर्दी हळूहळू ओसरते. मात्र, त्यानंतर समुद्रकिनार्यावर उरतो तो निर्माल्याचा ढीग, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे अवशेष, सजावटीचे साहित्य आणि असंख्य भाविकांनी मागे ठेवलेला कचरा. उत्सव संपतो, पण समुद्राची स्वच्छता आणि पर्यावरणाची जबाबदारी तिथेच सुरू होते.
गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारा हा कचरा स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी काही तरुणांचे ग्रुप्स, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक समूह उत्सवानंतरही आपली सेवा सुरू ठेवतात. हातात झाडू, कचर्याच्या पिशव्या आणि मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव घेऊन हे स्वयंसेवक समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी पुढे येतात. त्यांच्यासाठी ही केवळ स्वच्छता मोहीम नसून, भक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न असतो. पर्यावरण संवर्धनाची ही भावना तरुणाईमध्ये मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतच नव्हे, तर गावोगावीही पाहायला मिळते आहे.
कोकणात हर्णै येथे हर्णै ग्रामपंचायत, हर्णै हायस्कूल आणि हर्णै किनारी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याबरोबर प्रातिनिधिक स्वरूपात हर्णै बंदर आणि समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळकरी मुलांबरोबरच अनेक मान्यवर, शाश्वत पर्यावरणाचे अभ्यासक, स्वयंसेवक आणि इतर कार्यकर्त्यांनी हर्णै समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवली.
फक्त विसर्जन आणि गणेशोत्सवापुरतंच नाही, तर एरव्हीही समुद्रकिनारे स्वच्छ राहिले पाहिजेत, असा तिथल्या लोकांचा आग्रह आहे. यासाठी मुलांना आणि त्यांच्या पालकांना समाविष्ट करून घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात; अशा कामामुळेच जागरूकता निर्माण होईल. सण साजरे करणं ही जशी आपली सांस्कृतिक जबाबदारी आपण मानतो, तशीच आपली नैसर्गिक संसाधने, परिसर, रस्ते, धार्मिक
ठिकाणे स्वच्छ राहायला हवीत हे सामाजिक भानही प्रत्येकाने बाळगलं पाहिजे. ते जितक्या लवकर आपण पुढच्या पिढीमध्ये रुजवू शकू, तेवढे आपले भविष्य सुरक्षित राहील, असा दावा तिथल्या स्थानिक लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी केला.
मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू, दादर आणि इतर समुद्रकिनार्यांवर विसर्जनानंतर स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या जातात. महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरी करणारी तरुण मंडळी यामध्ये सक्रिय असतात. महाविद्यालयाचे एनसीसी युनिट्स, काही शासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अशा मोहीम होतात. विद्यार्थी, तरुण, कचर्याचे विविध प्रकार वेगवेगळ्या गटांमध्ये संकलित करतात. त्यामध्ये प्लास्टिक, ओला कचरा आणि इतर कचर्याचे वर्गीकरण केले जाते. या प्रक्रियेमुळे कचर्याचे विघटन आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया करणे सोपे होते.
विसर्जनानंतर समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी एका दिवसाचा प्रयत्न पुरेसा नसतो, तर वर्षभर हे काम जबाबदारीने करायला हवे, असे ते आग्रहाने सांगतात. यातून तरुणांचा सहभाग हा केवळ श्रमदानापुरता मर्यादित न राहता पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे माध्यम ठरते आहे, हे ठळकपणे लक्षात येते.
या दिवसांत सगळ्यात मोठ्या प्रमाणातील कचरा म्हणजे निर्माल्य. निर्माल्य नुसतेच ओल्या मातीत किंवा झाडात टाकून त्याचे खत होत नाही. ते फक्त कुजते, त्याचे योग्यरीत्या विघटन होत नाही. दापोली तालुक्यातील जालगांवमध्ये निवेदिता प्रतिष्ठानचे आणि शाश्वत पर्यावरण विकासकाचे अभ्यासक डॉ. प्रशांत परांजपे सांगतात, ‘गणपतीच्या दिवसामंध्ये विविध विसर्जनाच्या केंद्रांमधले निर्माल्य, तसेच दर रविवारी मंदिर, मठ, सार्वजनिक पूजा या ठिकाणचे निर्माल्य आपल्याकडे दरवर्षी आपण घेतो. त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने, अतिशय आदरपूर्वक, कोठेही पायदळी न तुडवता आपण त्याचे विघटन करतो म्हणजेच खत तयार करतो’. गेल्या काही वर्षांपासून शाश्वत पर्यटनातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाडूमातीच्या गणेश मूर्ती.
केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई उच्च न्यायालय यांच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न घेता शाडू मातीच्या गणेश मूर्ती बसवाव्यात, असे आवाहन दरवर्षी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ‘eCoexist’ फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि संस्थांचा एक गट ‘पुनरावर्तन’ मोहिमेद्वारे या समस्येवर शाश्वत उपाय शोधत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना नैसर्गिक शाडू मातीच्या मूर्ती वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते, त्यापुढे जात विसर्जनानंतर माती गोळा करून ती माती मूर्तिकारांना व वास्तुविशारदांना नैसर्गिक बांधकामात पुन्हा वापरण्यासाठी दिली जाते. त्यामुळे जल प्रदूषण रोखणे, मातीचे कमी उत्खनन आणि पारंपरिक मूर्तिकारांना ही माती मोफत दिली जात असल्याने त्यांना साहाय्य करणे अशी तीन प्रमुख उद्दिष्टे साध्य होतात, असेही त्यांनी सांगितले.
२०२५ मध्ये ही मोहीम पुणे, पिंपरी -चिंचवड, ठाणे, महाड आणि मुंबई या शहरांमध्ये राबवण्यात आली होती. या वर्षी वसई-विरार आणि सातारा येथेही ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. या वर्षी अनेक सामाजिक व पर्यावरणपूरक संस्था या मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत. फर्ग्युसन कॉलेज, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, एम. एम. सी. ओ. ए. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई ग्राहक पंचायत, मेन्स एन्व्हायर्नमेंट एक्सक्लुसिव्ह, ठाणे अशा अनेक तरुणांचा सहभाग असलेल्या संस्थांचाही या मोहिमेत सहभाग आहे.
समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेणं ही सुरुवात आहे; पण ही जबाबदारी पुढेही टिकवणं अधिक महत्त्वाचं आहे. गणेशोत्सव, विसर्जन किंवा एखाद्या विशेष मोहिमेपुरती स्वच्छता मर्यादित न राहता ती आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली, तरच या उपक्रमांना खर्या अर्थाने यश मिळेल. निर्माल्य समुद्रात न सोडणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचर्याचे योग्य वर्गीकरण करणे, शक्यतो शाडू मातीच्या मूर्ती वापरणे आणि त्याही घरच्या घरी विसर्जित करणे आणि आपल्या परिसराची काळजी घेणे या छोट्या कृती आहेत; मात्र त्यातून मोठा बदल घडू शकतो.
समुद्रकिनारी असलेला कचरा आणि त्याचे विघटन
समुद्रकिनार्यावर एरव्हीही प्लॅस्टिक, काच, कागद, अगदी सॅनिटरी कचरा जमा झालेला असतो. वैयक्तिक स्वच्छता साधनांमधून निर्माण होणारा कचरा, आजूबाजूच्या हॉटेल, चौपाट्यांचा ओला कचरासुद्धा यात असतो. तो सगळाच एकत्रित केला तर त्याचे विघटन कुठल्याही पद्धतीने होत नाही. विघटनाची एक प्रक्रिया असते. समुद्रकिनार्यावरील कचर्यात मोठ्या प्रमाणात ओली वाळू असते, जी आधी मोठाल्या वॉशर्सने किंवा झटक मशीनसारख्या यंत्राचा वापर करून धुवावी लागते. कचर्याने विघटन हा एक अतिशय मोठा आणि तांत्रिक अभ्यासाचा विषय आहे, ज्याची माहिती करून घेणे हे आज गरजेचे झाले आहे.
निर्माल्य म्हणजे काय?
पूजा आणि धार्मिक विधींमध्ये देवाला अर्पण केलेली फुले, हार, पाने, दुर्वा, तुळस, नारळाच्या शेंड्या तसेच, इतर पूजासाहित्य पूजेनंतर ‘निर्माल्य’ म्हणून ओळखले जाते. निर्माल्याचे योग्य पद्धतीने संकलन आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. गणेशोत्सवातील निर्माल्य गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तीला अर्पण केलेली फुले, हार, दुर्वा, पत्री आणि इतर पूजासाहित्य विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात जमा होते. हे निर्माल्य नदी, तलाव किंवा समुद्रात टाकल्यास जलप्रदूषण होऊ शकते. त्यामुळे अनेक महापालिका आणि स्वयंसेवी संस्था निर्माल्य संकलन, वर्गीकरण आणि कंपोस्टनिर्मिती यांसारखे उपक्रम राबवतात.
निर्माल्यामध्ये काय येत नाही?
* प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकचे आवरण.
* थर्माकोल, प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तू.
* पूजासाहित्याचे पॅकेजिंग, रिबिनी आणि सिंथेटिक सजावट.
* काच, धातू किंवा इतर गैर-जैवविघटनशील वस्तू.
* खाद्यपदार्थांचे प्लास्टिक किंवा कागदी वेष्टन.
निर्माल्य आणि इतर कचरा यांची सरसकट एकत्रित विल्हेवाट लावण्याऐवजी त्यांचे योग्य वर्गीकरण करणे आवश्यक आहे. निर्माल्याचे कंपोस्ट किंवा इतर पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करता येते; मात्र प्लास्टिक, थर्माकोल आणि इतर साहित्याची स्वतंत्र कचरा व्यवस्थापन प्रक्रिया आवश्यक असते. viva@expressindia.com
