प्रियांका वाघुले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले दोन वर्ष करोनाचं सावट असल्याने मनात गणरायाच्या सेवेची कितीही ओढ असली तरी अनेक तरुण कारागीर आणि कलाकारांना फारसं काही करता आलं नाही. दरवर्षी गणेशोत्सवाआधी गणपतीची मूर्ती घडवण्यापासून ते मूर्तीला अलंकारांचा साज चढवणं असो, त्याच्या हातातील आयुधं असोत वा त्याला फेटे बांधणं असो, कित्येक कामांत तरुणाई मग्न असायची. काहींसाठी ही आवड होती, तर काहींनी आवडीला व्यवसायाचं रूप दिलं होतं. यंदा पुन्हा एकदा आपली कला सादर करायची संधी तरुणाईला मिळाली आणि त्यांनीही शंभर टक्के प्रयत्न करत या संधीचं सोनं केलं आहे..

घरोघरी सध्या गणराय विराजमान झाले आहेत. काहींकडे दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जनही झाले आहे, तरीही पहिल्यांदा जेव्हा कारखान्यांमधून गणेशमूर्ती बाहेर पडल्या तेव्हा ती मूर्ती घडवणारे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाहीत. गेल्या दोन वर्षांत प्रत्येकाच्या मनात दाटून आलेला गणरायाच्या सेवेचा, गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्याचा उत्साह हा मनातच साचून राहिला होता. यंदा मात्र करोनाचा जोर ओसरला आहे, निर्बंध पुरते दूर झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार हे लक्षात घेऊन मूर्ती घडवण्यापासून नानाविध लहानमोठय़ा कामांमध्ये सक्रिय असलेली तरुणाई आधीच कंबर कसून कामाला लागली होती. करोनाकाळात अगदी लहानमोठय़ा व्यवसायांवर वाईट परिणाम झाला होता; पण आता मात्र लोक हळूहळू पुन्हा जम बसवत आहेत. परंतु मूर्तिकारांचा व्यवसाय हा बारमाही नाही, तो सीझनल असल्याने त्यांच्यासाठी तर ही मोठी कसरतच असते.  गणेशोत्सवाच्या साधारण चार महिने आधीपासून गणपतीची तयारी सुरू केली जाते. ऑर्डर घेणं, दाखवण्यासाठी काही मूर्ती तयार करणं, कच्चा माल घेणं अशी अनेक कामं वेगात सुरू होतात. या वर्षी मात्र सगळंच नव्याने उभं करू पाहत असताना, अगदी दरवर्षीचे कारागीरसुद्धा कामाला नाहीत याची मात्र खंत कित्येक मूर्तिकारांनी व्यक्त केली. करोनाच्या काळात कित्येक जण आपापल्या गावी जाऊन शेती किंवा अन्य काही व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे ते पुन्हा शहराकडे यायलाच तयार होत नाहीत. मग नवीन कारागीर, त्यांची कामाची पद्धत, आपली कामाची पद्धत यातलं अंतर सांभाळत अनेकांनी यंदा मूर्ती घडवण्याचं काम पूर्ण केलं. तरीही दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मूर्ती बनवण्याचा उत्साह तितकाच दांडगा होता, असं मूर्तिकार केतन दवणे सांगतात. अर्थात काही व्यावहारिक आणि सरकारी अडचणींचा सामना करावा लागल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. ‘सरकारने पीओपीवरची बंदी काढण्याचा जो निर्णय घेतला. तो जर लवकर जाहीर केला असता तर बरं झालं असतं,’ असं त्यांनी सांगितलं. आधीच्या नियमांनुसार काम करून अनेक मूर्ती तयार घडवण्यात आल्या. त्यामुळे काही ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं.                      

गणपतीची मूर्ती म्हटलं की त्यात अगणित लहान-मोठय़ा इतर गोष्टी असतात. ज्यासाठी आम्हाला वेगळे कारागीर, वेगळी मेहनत, वेगळे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे एक मूर्ती म्हणून न पाहता, वैविध्यपूर्ण कल्पना-विचारांतून घडवलेली ती कलाकृती असते, असं मूर्तिकार प्रशांत उगळे यांनी सांगितलं. करोनानंतर या वर्षी लोक खरंच उत्साहाने गणेशोत्सव साजरा करू पाहत आहेत. त्यांचा मूर्ती ऑर्डर करण्यासाठीचा उत्साह, त्यांच्या मागण्या, आवडीनिवडी खूप बदलल्या असल्याचं यंदा जाणवलं, मात्र त्यांच्या मागणीनुसार मूर्ती घडवण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा याबाबतीतही लोकांनी यापुढे विचार करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मूर्ती साकारताना लागणारी मेहनत कमी नसते. या वर्षी तर अनेक कारखान्यांमध्ये डे-नाइट काम सुरू होतं. लोकांचा उत्सव साजरा करण्याचा उत्साह वाढला असल्याने नव्या जोमाने काम करावं लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या वर्षी अगदी कमीत कमी म्हणजे आठ दिवस आधी ऑर्डर घेऊनही मूर्ती घडवली असल्याचं त्यांनी सांगितलं. मूर्तीच्या बाबतीत यंदा तरुण मूर्तिकारांना आणखीही काही गोष्टींवर भर द्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. या वर्षी अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती, त्यामुळे त्यांना कमीत कमी खर्चात पण चांगली मूर्ती, गणपतीसाठीची आरास, दागिने अशा नानाविध गोष्टी हव्या होत्या. त्यासाठी त्यांच्या आर्थिक नियोजनाचा विचार करून मूर्तिकारांनी त्यानुसार पर्याय देत मागणी पूर्ण केल्याचं प्रशांत यांनी सांगितलं.

गणेशमूर्ती घडवताना अनेक गोष्टींची गरज लागते. सगळय़ा गोष्टी एकच व्यक्ती करू शकत नाही. मूळ मूर्ती, दागिने, वस्त्र, शस्त्रं अशा अनेक गोष्टी तयार कराव्या लागतात. अनेकदा मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्यांनाही या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे मूर्तीची किंमतही वाढत जाते. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशमूर्तीसाठी तयार केले जाणारे फेटे. महाराष्ट्रात गणपतीसाठी खास अठरा प्रकारचे फेटे तयार केले जातात.  या वर्षी मात्र फेटय़ाचा ट्रेंड जरा कमी होता, अशी माहिती सर्वेश किर यांनी दिली. करोनाकाळात अनेकांच्या घरी पाळणा हलला, असं गमतीने म्हटलं जातं. मात्र यात तथ्य असल्याचं बाल गणेशमूर्तीना असलेली वाढती मागणी आणि त्याअनुषंगाने सजावटीसाठीही झालेली विचारणा पाहता लक्षात आल्याचं सर्वेश यांनी सांगितलं. गणेशमूर्तीसाठी फेटे असोत वा त्यांच्या हातातील शस्त्रांची निर्मिती असो.. अशी अनेक कामं तरुणाई आत्तापर्यंत आवड म्हणून करत होती. यंदा मात्र अनेकांनी व्यवसाय म्हणून याकडे पाहिलं आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

सर्वेश स्वत: गणपतीच्या हातात असलेली विविध शस्त्रं घडवतात. गणपतीच्या हातातील शस्त्रं छोटी दिसत असली तरी त्याशिवाय गणरायाच्या मूर्तीला पूर्णत्व नाही, असं ते म्हणतात. अगदी लहान लहान त्रिशूलपासून वीणा, डफली अशा अनेक प्रकारची आयुधं, वाद्यंनिर्मितीत त्यांचा हातखंडा आहे. या शस्त्रांच्या निर्मितीसाठी तीन ते चार महिने आधीपासूनच ते सुरुवात करीत असल्याचं सांगतात. काही विशेष शस्त्रं ही घडवावीच लागतात. त्यामुळे त्यांची ऑर्डर येण्याची वाट पाहत बसावी लागत नाही. बाकी वीणा, पंख अशा गोष्टी ऑर्डरनुसार बनवून देत असल्याचं त्यांनी सांगितलं. साधारण १०० रुपयांपासून चार हजारांपर्यंत वस्तूंनुसार भाव होतो. नेहमीच्या मूर्तिकारांचा भाव आणि इतरांसाठीच्या भावात फरक असल्याचं मात्र ते सांगतात. कधी कधी वेळ नसतानाही रात्रंदिवस जागून या वस्तू कराव्या लागतात, असं त्यांनी सांगितलं. या वस्तू दिसत छोटय़ा असल्या तरी त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा कागद, कार्डबोर्ड, फेविक्विक आदी गोष्टी अवाच्या सवा भावाने विकल्या जात आहेत. त्यामुळे या वस्तूंना योग्य दर मिळावा यासाठी मूर्तिकारांसोबत करावी लागलेली घासाघीसही नकोशी वाटते, असं त्यांनी सांगितलं; पण यातही एक वेगळा आनंद आहे, कारण काही का होईना पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे. लोक आनंदाने उत्सव साजरा करत आहेत. 

दोन वर्ष उत्सवच नसल्याने अनेकांच्या घरी प्लॅस्टिकची वा खोटी फुलं, तोरणं आदी गोष्टी पडून होत्या. मात्र या वस्तूंना निरोप देत यंदा खऱ्या फुलांकडे ग्राहकांचा ओढा दिसून येतो आहे, अशी माहिती सचिन वाघुले यांनी दिली. गेली कित्येक वर्ष खऱ्या फुलांना मागणी कमी झाली होती, असं सांगणाऱ्या सचिन यांचा पिढीजात फुलविक्रीचा व्यवसाय आहे. ते आपलं महाविद्यालयीन शिक्षण सांभाळून हा व्यवसाय करतात. या वर्षी लोकांनी मार्केटमध्ये येऊन हारांच्या, तोरणांच्या ऑर्डर मोठय़ा प्रमाणात दिल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.  दोन वर्ष धूळ खात पडलेल्या वस्तू न वापरता फ्रेश डेकोरेशन करण्याकडे त्यांचा जास्त कल असल्याचं ते सांगतात. त्यामुळे या वर्षी वेगवेगळय़ा प्रकारचे हार, तोरणं, फुलांच्या रांगोळय़ा यांच्या ऑर्डर आधीच आल्याचं त्यांनी सांगितलं.  या वर्षी सरकारी स्तरावरही निर्बंधमुक्त सण साजरा करण्याचं आश्वासन मिळालं आणि तरुणांच्या हाताला पुन्हा मूर्ती घडवण्याची संधी मिळाली. अनेकांची गाडी रुळावर येऊ लागली. अनेकांचे व्यवसाय पुन्हा जम धरू लागले आहेत. करोनाचे दुष्टचक्र पूर्णपणे दूर होऊ दे, अशी प्रार्थना करत उत्साहाने आपल्या छंदाला आकार देण्यात रमलेली तरुणाई आपल्या कलेतूनही लोकांचा उत्साह वाढवते आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav opportunity for youth to present their art zws
First published on: 02-09-2022 at 00:20 IST