मितेश रतिश जोशी
गणेशोत्सवात अत्यंत कल्पकतेने केलेली सुंदर सजावट पाहणे म्हणजे खराखुरा आनंदानुभव असतो. चातुर्मास सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते आणि भाद्रपदातील गणेश चतुर्थी हा त्याचा कळसाध्याय ठरतो. संपूर्ण परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने दुमदुमून जातो. घरगुती आणि सार्वजनिक मंडळातील अत्यंत मनमोहक स्वरूपातील गणेशमूर्तीप्रमाणेच त्यांच्यासाठी खास सजावट करणे हेसुद्धा सिद्धहस्त कलाकारांसाठी एक आव्हान असते.
ऐतिहासिक व पारंपरिक वारसा जपणार्या पुरातन वस्तूंच्या माध्यमातून सजावट करणे हा एक नवा ट्रेंड सध्या पाहायला मिळतो आहे. पुण्यातील ईशान क्षीरसागर हा तरुण याच कल्पक सजावटीसाठी ओळखला जातो. ईशान हा त्याच्या ‘मोहर’ या ब्रँडच्या माध्यमातून जुन्या वाड्यांचे मौल्यवान लाकडी अवशेष गोळा करून त्याला नवी झळाळी देऊन भारताचे दुर्मीळ वैभव नव्या रूपाने प्रकाशझोतात सर्वांसमोर आणतो आहे. ईशान सांगतो, ‘आजकाल गणेशोत्सवाच्या सजावटीत सर्वांनाच विविधता हवी असते.
माझ्या गणपतीची सजावट ही दुसर्यासारखी नसावी हा बर्याच तरुणांचा हट्ट असतो. अशांसाठी अँटिक वस्तू हा उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारच्या सजावटीमुळे घराला एक राजेशाही, क्लासिक आणि नॉस्टॅल्जिक लुक मिळतो.’ त्याच्याकडे तुम्हाला सजावटीसाठी अनेक पर्याय बघायला मिळतील. गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी जुने नक्षीदार लाकडी चौरंग व पारंपरिक पाट, घरातील जुनी नक्षीदार तांब्या-पितळेची भांडी उदा. लोटा, कलश, घंगाळे हे पाटाच्या अवतीभोवती ठेवून त्यात फुलांची सजावट केल्याने सजावटीला नैसर्गिकपणा येतो.
फुलदाणीला एक वेगळा पर्याय म्हणूनही तुम्ही हा पर्याय निवडू शकता. झगमगीत लायटिंगला पर्याय म्हणून जुन्या काळातील समया लावू शकतो किंवा काचेच्या हंड्या ज्यात पिवळ्या रंगाचे छोटे एलईडी बल्ब किंवा मेणबत्त्या ठेवून मखराच्या बाजूला लटकवता येऊ शकतात. किंवा जुने लामणदिवेही गतकाळाचा भास देतात. दिव्यांच्या प्रकाशाने पूर्ण मखर उजळून निघते. घरात जुन्या काळातील नक्षीकाम केलेली खिडकीची चौकट किंवा लाकडी झरोका मध्यभागी ठेवून त्यामध्ये मंगलमूर्तीची स्थापना केल्यामुळे जुन्या वाड्यासारखा फील येतो. फॅशनच्या नावाखाली खोट्या अँटिक वस्तू विकत घेण्याऐवजी खर्याखुर्या परंपरागत ठेव्याचं जतन गणेशोत्सवाच्या सजावटीच्या माध्यमातून झालं तर पुढच्या पिढीला या सर्व वस्तूंची ओळख होईल आणि त्यांच्याकडून या वारशाचं जतन केलं जाईल.
गणेशोत्सवाच्या सजावटीत आपली वेगळीच छाप सोडणार्या पैठणीची कक्षा अधिक विस्तृत करण्याची धडपड पुण्यातील धनश्री पाठक करते आहे. ‘धनाज पैठणी पर्स हाऊस’ या तिच्या ब्रँडच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी लागणार्या सजावटीच्या हटके पैठणी वस्तूंची निर्मिती ती करते. घरगुती गौरी-गणपतीच्या सजावटीमध्ये पैठणीची नक्षी हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचा नवा ट्रेंड आहे.
या ट्रेंडची निर्मिती धनश्रीने ‘पैठणी रांगोळी’च्या माध्यमातून केली. त्याचबरोबर आकर्षक नक्षीकाम केलेले आणि वेगवेगळ्या रंगांचे रेडीमेड पैठणी बॅकड्रॉप पडदे, श्रीमहालक्ष्मी बॅकड्रॉप, पैठणी तोरण, चौरंगासन असे अनेक पर्याय तिच्याकडे पाहायला मिळतात. तिने तयार केलेले हे कापडी संच घडी करून ठेवता येत असल्याने दरवर्षी पुन्हा वापरता येतात. आणि यामुळे गणरायाचा दरबार अगदी राजासारखा भव्य दिसतो.
गणेशोत्सवात पैठणी थीमवर आधारित सजावट ही एक अत्यंत पारंपरिक, भव्य आणि मराठमोळा लुक देते. पैठणीचे सुंदर काठ, आकर्षक मोर आणि पोपटाची नक्षी गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करतात. तुम्ही रेडीमेड पैठणी मखर वापरून किंवा घरातील पैठणी साड्यांचा वापर करून अगदी काही मिनिटांत अशी सुंदर सजावट करू शकता. साडीच्या पेहरावात आजवर काहीशी सीमित राहिलेली पैठणी फॅशनच्या बदलत्या दुनियेत युवती व युवकांना आकर्षित करण्यासाठी वेगळ्या रूपात दाखल झाली आहे.
बांबूपासून तयार केलेली आरास ही सजावटीतील एक आकर्षक विषय आहे. बांबूच्या चटईला रंग देऊन त्यावर नक्षीकाम करून पानाफुलांनी सजवून, मातीचे दिवे जोडून त्या चटईला मंदिराचा आकार देत केलेली गणपतीची ही आरास अधिक देखणी आणि आकर्षक वाटते. तर बांबूपासून केलेले आणखी काही सजावटीचे प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत. छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी तयार केलेल्या या आराशीदेखील तरुणांच्या पसंतीस पडतील अशा आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात सजावटीच्या बाबतीत अनेक नवे ट्रेंड्स आणि वैविध्य बाजारपेठेत पाहायला मिळते आहे. पर्यावरणपूरक आणि नावीन्यपूर्ण मखर आणि अब्दागिरींना मोठी मागणी आहे. विशेषत: थर्माकोलला उत्तम पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांपासून ‘पीव्हीसी फोम’मधील स्वस्तिक, कलश, श्रीफळ, विड्याचे पान, मूषक, केदारनाथ, जेजुरी, तुळजाभवानी अशा मंदिरांची प्रतिकृती पाहायला मिळत आहेत. तर सरस्वती बैठक, मॅक्रम आर्ट कलर, बुद्धीदंत बैठक, शाही बैठक अशा अनेक सुबक आणि देखण्या आराशी यात उपलब्ध आहेत. आणि विविध देव-देवतांच्या आकर्षक चित्रांनाही तरुणाईकडून पसंती मिळते आहे. यंदा मखर आणि देवघरांच्या डिझाईन्समध्ये वैविध्य दिसत असून, गजकेसरी, ‘हनुमान’ आणि ‘सूर्य’ या संकल्पनांवर आधारित मखरांना बाजारात सर्वाधिक मागणी असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
गणेशोत्सवात सगळीकडे नवनवीन संकल्पना, विविध रंगांची सजावट आणि भक्तिभावाने सजलेले घरगुती तसेच सार्वजनिक मंडप हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गणरायाला खूश करण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या संकल्पना साकारत असतात.
सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक कलावंत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत कल्पक देखावे, चलचित्र साकारून सामाजिक संदेश देत असतात. देखाव्यांच्या सजावटीची हीच सर्जनशीलता अनेक घरगुती गणपतींभोवतीही पाहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक हस्तकलाकार आपल्या घरातली गणपतीच्या देखाव्यांमध्ये अनेक नावीन्यपूर्ण, कल्पक आणि सामाजिक आशय असणारे प्रयोगशील देखावे साकारत आहेत. कला ही समाजाचा कणा असते आणि हाच कणा बळकट ठेवण्याचे काम हे कलाकार गणेशोत्सवाच्या माध्यमातून करत आहेत.
