गरबा या शब्दाची व्युत्पत्ती ‘गर्भ’ या संस्कृत शब्दावरून झाली आहे. ‘गर्भदीप’ म्हणजेच मातीच्या भांडय़ांचा दिवा जो गरबा खेळताना मध्यभागी ठेवला जातो, त्यालाच गरबो किंवा गरबा असं म्हणतात. कालांतराने, ‘गर्भदीप’ या शब्दातील ‘दीप’ हा शब्द हरवला, ‘गर्भ’ हा शब्द राहिला आणि त्यातूनच पुढे ‘गरबो’ हा शब्द अस्तित्वात आला.
‘गर्भदीप’ म्हणून ठेवल्या जाणाऱ्या या मातीच्या मडक्याला छिद्र असतात व हे मडके मनुष्याच्या शरीराचे प्रतीक मानले जाते, तर त्यात तेवत असलेला दिवा हे आत्म्याचे प्रतीक म्हणून जपले जाते. आत्मरूपी ज्योत तशीच तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो, अशी ही प्रार्थना या दिव्याच्या रुपाने नवरात्रीत आदिशक्ती दुर्गामातेकडे केली जाते. नवरात्रीच्या काळात असा गरबा डोक्यावर घेऊन किंवा मध्यभागी उभे राहून ‘कुंडलो’ गाण्याची परंपरा आहे. अशीही एक आख्यायिका सांगितली जाते की, श्रीकृष्णाची नात, बाणसुराची कन्या उषा हिने सौराष्ट्रातील गोपिकांना लास्य नृत्य शिकवले. ती स्वतः पार्वतीकडून हा नृत्यप्रकार शिकली होती. आज जरी या नृत्याला आधुनिक नृत्यात स्थान मिळाले असले तरी, त्याचे मूळ स्वरूप लोकनृत्याचे आहे. पूर्वीच्या काळचा गरबा किंवा गरबोचे पारंपरिक स्वरूप पाहिले तर असे लक्षात येते की, केवळ स्त्रिया अंगणात किंवा मोकळ्या मैदानात मध्यभागी गरबा-दीप ठेवून त्याभोवती गोलाकार आकारात फेर धरून गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत नृत्य करीत असत. तर ‘गरबी’ या प्रकारात केवळ पुरुष भरपूर ऊर्जेने जोशपूर्ण नृत्य सादर करत असत. मूळ गरबा प्रकारात नर्तक तीन टाळ्या वाजतात. या तीन टाळ्या म्हणजे त्रिदेवाला नमन करणे होय. पहिली टाळी ब्रम्हदेवाला, दुसरी टाळी भगवान विष्णूला आणि तिसरी टाळी महादेवाचं प्रतिक असल्याचं मानलं जातं. गरबा नृत्यामुळे निर्माण होणाऱ्या आवाजामुळे आई अंबा जागृत होते, असंही म्हटलं जातं.
हातात दांडिया घेऊन खेळल्या जाणाऱ्या नृत्याला ‘दांडिया किंवा दांडिया रास’ असं म्हटलं जातं. गरब्याची गाणी प्रामुख्याने लोकसंगीताचा वापर करून बनवली जातात, ज्यामध्ये देवीचं वर्णन किंवा प्रार्थना केली जाते. तसंच, दांडिया रासमध्ये कृष्णभक्तीवर आधारित शब्दरचना आढळून येते. दांडिया रास हा प्रकार श्रीकृष्णाच्या ‘रासलीले’तून उदयास आला असावा, असे मानले जाते. ‘रस’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘चव’ अथवा ‘भावना’ (नवरस) असा होतो, तर ‘लीला’ म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या नटखट लीला किंवा क्रिया, यावरूनच ‘रासलीला’ हा शब्द तयार झाला. रास म्हणजे ‘समूह नृत्य’ जे कृष्णभक्त आपल्या आराध्य दैवतासाठी, कृष्णासाठी, त्याच्या कथा, लीला यांचा प्रसार करण्यासाठी नृत्यनाटय़ाचा आधार घेऊन करत असत. दांडिया राससाठी समसंख्येत नर्तक किंवा नर्तिका असतात, तर गरब्यामध्ये असं संख्येचं बंधन नसतं. दांडियाप्रमाणेच टिपणी, ओढनी, मंजिरा, झांज हातात घेऊनही रासनृत्य केलं जातं.
कोंबडी आधी की अंडं आधी ? याच वादाप्रमाणे दांडिया आधी की गरबा आधी ? याबद्दल कुणाचंही एकमत नाही. ‘रास’चा श्रीकृष्णाशी संबंध आहे. ‘हरिवंश’ तसंच महाकवी भासाच्या ग्रंथात त्याचा उल्लेख असल्याने, ते याचं सर्वात जुनं रूप म्हणता येईल. ‘रास’ हा शब्द गुजराती असला तरी तो गुजरातपुरता मर्यादित नाही. कृष्णभक्ती ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, तर विराट प्रकृतीला पुराण काळापासून स्वीकारलं गेलं आहे. अशाप्रकारे कृष्ण भक्ती आणि आद्यशक्ती उपासना हे रास आणि गरब्याचे जवळपास समानार्थी शब्द आहेत.
आजकाल गरब्याचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व या पारंपरिक लोकनृत्याला व्यावसायिक, ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झालं आहे. देशभरात सर्वत्र नवरात्रीच्या आधी गरबा शिकवण्याचे वर्ग घेतले जातात व लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सगळेच जण या वर्गाचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेताना दिसतात. याविषयीची माहिती देताना पुण्याचा झुंबा व नृत्य प्रशिक्षक अमित दळवी सांगतो, ‘मंगल कार्यालयं, मोकळे भूखंड, जिममध्ये तसंच काही वेळेला इतर बंदिस्त जागांमध्ये गरबा कार्यशाळा पितृपक्षातच सुरू होतात. ज्यांनी कधीच गरबा खेळला नाही, त्यांना अगदी सुरुवातीपासून प्रशिक्षण देऊन नवरात्रीच्या नऊ दिवसांत आत्मविश्वासाने गरब्याच्या फेरात उतरण्यासाठी या कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरत आहेत. सकाळी तसंच संध्याकाळी ‘पंखिडा तू उडी जाजे पावागढ’, ‘केसरियो रंग तने लाग्यो’, ‘सानेडो’ आदी गाण्यांवर गरब्याचा ठेका धरला जातो. गरब्यासाठी दोन टाळी, तीन टाळी, हिंच, पोपटियो आणि दोढिया यांसारख्या पारंपरिक गुजराती तालांबरोबरच सध्या लोकप्रिय असलेल्या बॉलीवूड-फ्यूजन प्रकारावरही भर देण्यात येतो. या कार्यशाळेत तालानुसार पाय आणि हातांच्या अचूक हालचाली कशा करायच्या, यावर विशेष लक्ष देण्यात येतं. तसंच, गरबा खेळताना ऊर्जा टिकून राहावी याकरिता शरीर प्रकृती कशी फिट राहिल, कोणते कपडे घालायचे याविषयीही मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात येतं’.
गरबा प्रशिक्षण आणि त्याच्या तयारीविषयी अधिक माहिती देताना, समाजमाध्यमांवर नवरात्रौत्सवाच्या काही दिवस आधीपासून गरबा कसा खेळला जातो, त्याची पद्धत काय याचे प्रशिक्षण देणारे व्हिडीओ प्रसारित होतात. हे व्हिडिओ पाहून अनेकजण गरबा खेळण्याचा सराव करतात. परंतु, अनेकांना व्हिडीओ पाहूनही गरबा खेळण्याची कला अवगत होत नाही. त्यामुळेच गरबा कार्यशाळेचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असं अमितने सांगितलं. मोठ्या गृहसंकुलांमध्येही गरब्याचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या वर्गाला स्थानिक रहिवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. आणि प्रशिक्षकालाही एकाच ठिकाणी ४० ते ५० विद्यार्थी मिळतात, असं अमितने सांगितलं.
गुजराती समाजापुरता गरबा मर्यादित राहिला नसून बहुभाषिक व विदेशी लोकसुद्धा उत्साहाने या सोहळ्यात सामील होताना दिसतात. समाजातील एकजुटीसाठी लोकसंस्कृती कशी पोषक ठरते, याचा हा जणू दाखलाच आहे. मोठय़ा पटांगणावर होणाऱ्या ‘गरबा डीजे’चं प्रमाण झपाटय़ाने वाढू लागलं आहे. काही ठिकाणी तर प्रति दिवशी रु. ५००० ते १०,००० भरूनही गरबा खेळायला जाणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडते आहे. एलईडी फ्लोअर्स, प्रोजेक्शन मॅपिंग आणि सिंक्रोनाइझ लाइटिंग असे आधुनिक प्रकार गरबा आणि दांडियाच्या सादरीकरणात प्रचलित झाले आहेत. गरबा पंडालना लाइव्ह कॉन्सर्टचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटींचा सहभाग वाढल्याने तरुणाईच्या उत्साहाला चार चांद लागतात. नृत्य, गाणं, सेलिब्रिटी हे सगळंच या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे गरब्याचे पासधारक इव्हेंट्स अधिक होतात, अशा गरबा इव्हेंट्समध्ये तुम्ही विशेष सादरीकरण करू शकता, ज्यात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्ससुद्धा होतात. फाल्गुनी पाठक आणि इतर गुजराती विशेष गायकांचे अनेक कॉन्सर्ट्सही होतात, ज्यामध्ये तरुणाई मोठया संख्येने सहभाग घेते.
गरब्याच्या पारंपरिक गाण्यांबरोबर बॉलीवूड गाणीही गरब्यात वापरली जाऊ लागली आहेत. गरब्याची गाणीदेखील बॉलीवूडमध्ये हिट झाली आहेत, ‘ढोली तारो ढोल बाजे’, ‘नगाडा संग ढोल बाजे’ इत्यादी बॉलीवूडमधील गरब्याची आधुनिक गाणीसुद्धा खूप लोकप्रिय आहेत. पारंपरिक व नवीन गुजराती गाण्यांबरोबर काही ठिकाणी मराठी गाण्यांवर ‘मराठी गरबा’ खेळला जातो. काही ठिकाणी डीजे असतो तर काही ठिकाणी लाइव्ह गाणी सादर केली जातात. नवरात्रीचे नऊ दिवस जोशात रात्री, मध्यरात्रीपर्यंत खेळला जाणारा गरबा नक्कीच ऊर्जेचं, उत्साहाचं आणि नवचैतन्याचं प्रतीक आहे. तरुणाईचा तर हा ‘फेवरेट’ उत्सव आहे.
अबालबृध्दांमध्ये लोकप्रिय असलेल्या या गरब्याचं थोडं वेगळं स्वरूप अहमदाबादमधील ‘साडू माता नी पोल’ येथे पाहायला मिळतं. दरवर्षी नवरात्रात ‘साडूमा ना गरबा’ हा अत्यंत अनोखा आणि ऐतिहासिक परंपरा असलेला गरबा येथे खेळला जातो. या परंपरेनुसार, बारोट समाजातील पुरुष नवरात्रातील अष्टमीच्या रात्री महिलांसारखी साडी किंवा चनिया-चोली नेसतात. आणि साडू माता मंदिरासमोर गरबा खेळतात. ही परंपरा एका शापातून सुरू झाल्याचं सांगितलं जातं. २०० वर्षांपूर्वी ‘साडू माता’कडून शाप मिळाल्यानंतर बारोट समाजाचे पुरुष प्रायश्चित म्हणून ही परंपरा जोपासत आहेत. भारतात मुघलांचा शेवटचा काळ असताना साडूबेन नावाच्या एका महिलेवर मुघल सरदाराची वाईट नजर पडली. साडूबेननं स्वतःच्या रक्षणासाठी बारोट समाजाकडून मदत मागितली. पण, साडूबेनचं रक्षण करण्यात त्याकाळी समाजातील लोकांना अपयश आलं. या घटनेत साडूबेनच्या बाळाचं निधन झालं. यानंतर साडूबेननं संपूर्ण समाजातील पुरुषांना शाप दिला व तिने आत्मदहन केलं. काळाच्या ओघात बारोट समाजाने आपल्या पूर्वजांच्या चुकीची क्षमा मागण्यासाठी साडू मातेचं मंदिर उभारलं. दरवर्षी पुरुष साडी नेसून, अत्यंत नम्रतेने गरबा खेळून त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी, घरात सुख-समृद्धी यावी, नवस पूर्ण व्हावा म्हणूनही पुरुष या परंपरेत मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.
माता आणि कृष्णाच्या भक्तीने प्रेरित गरबा मध्ययुगीन रचनांपैकी एक आहेत. काठियावाडच्या काही भागांत विशेषतः सौराष्ट्र भागात नवरात्रात गरब्याप्रमाणेच ‘अथंगो’ खेळला जातो. ज्याला ‘अठींगो रास’ किंवा ‘गोफ गुंफन’ असंही म्हणतात. यात एका खांबाला आठ रंगीत दोऱ्या किंवा कापडी पट्ट्या बांधून, नृत्य करत-करत त्यांची वेणी विणली जाते आणि पुन्हा नृत्याद्वारे ती सोडवली जाते. अथंगो रास खेळताना एकाग्रता आणि योग्य ताळमेळ आवश्यक असतो. जर एखाद्याही खेळाडूने आपली स्टेप चुकवली किंवा चुकीच्या दिशेने वळण घेतले, तर दोऱ्यांची वेणी चुकीची गुंफली जाते किंवा अडकून बसते. त्यामुळे हा प्रकार खूप कौशल्याचा मानला जातो.
यावर्षी समाजमाध्यमांवर गरबा पॅकेजेसच्या विविध जाहिराती जोरदार व्हायरल होत आहेत. ज्याचा मुख्य विषय आहे,‘रेन्ट अ गरबा पार्टनर’. याची खरी सुरुवात गुजरातमध्ये क्रिश मिस्त्री या तरुणाने केली. पुढे ही संकल्पना मुंबई, दिल्ली सारख्या उच्चभ्रू शहरांमध्ये इतर तरुणांनी उचलून धरली. पहिल्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये एक ते दोन हजारांचे ‘सिल्व्हर’, ‘गोल्ड’ आणि ‘प्लॅटिनम’ असे पर्याय आहेत. यामध्ये दोन ते चार तास गरबा खेळणं, गरब्याचे मूलभूत धडे देणं, पारंपरिक मॅचिंग पोशाख पुरवणं, तसंच फोटो आणि सोशल मीडियासाठी ‘रील्स’ तयार करून देणं अशा सेवांचा समावेश आहे.तर दुसऱ्या जाहिरातीमध्ये ‘एनआरआय गरबा पार्टनर’ ही नवी संकल्पना मांडण्यात आली आहे. दीड ते पाच हजार रुपयांच्या या पॅकेजमध्ये चार तास गरबा खेळण्यासोबतच काल्पनिक पार्श्वभूमी (फेक बॅकस्टोरी) रचणं, मित्रांना ‘भाई-भाभी’ म्हणून चिडवणं आणि मुलीला सुखरूप घरी सोडणं, अशा गोष्टी समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, यात ‘फोरहेड किस’ आणि ‘मिस्ट्री फेवर’ यांसारख्या अत्यंत वैयक्तिक सेवांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
परदेशातही गरबा नाईट्सला प्रचंड गर्दी असते. वेगवेगळ्या देशातील अनेक प्रतिष्ठित इनडोअर स्टेडियम्स नऊ रात्रींसाठी बुक केले जातात. परदेशातील गरब्यांमध्ये केवळ भारतीयच नव्हे, तर स्थानिक परदेशी नागरिक देखील अत्यंत आवडीने सहभागी होतात. भारतातील प्रसिद्ध गरबा गायक फाल्गुनी पाठक, कीर्तिदान गढवी, गीता रबारी नवरात्रीच्या आधी व नंतर परदेशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी जातात. आज भारताबाहेर गरबा हे केवळ एक धार्मिक नृत्य राहिलं नसून, तो भारताची संस्कृती आणि सलोखा जगासमोर मांडणारा एक वैश्विक उत्सव बनला आहे. त्यामुळेच डिसेंबर २०२३ मध्ये, युनेस्कोने गरब्याला जगाच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत मान्यता दिली. गरबा हा आता गुजरात राज्य अथवा गुजराती समाजापुरता मर्यादित राहिलेला नसून बहुभाषिक, विदेशी लोकसुद्धा उत्साहाने यात सामील होताना दिसत आहेत. त्यामुळे गरबा हे ‘ग्लोबलनृत्य’ बनलं आहे.
