गौरी-गणपतीच्या आगमनाने घराघरांत उत्सवाचे रंग आहेतच. सगळीकडे आता गौराईचे आगमन, पूजन झाले असेल. प्रत्येक समुदायात गौर बसणे हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. कुठे उभ्याच्या गौरी असतात, कुठे मुखवटे, चित्रगौर असते, कुठे खड्याच्या गौर असतात तर कुठे तेरड्याच्या पानांनी आखीव-रेखीव गौर बसवली जाते. सगळ्याच पद्धतीत गौरींची सजावट, साजशृंगार अगदी पारंपारिक, साग्रसंगीत रित्या केला जातो. या साजशृंगारातील दागिने म्हणजे केवळ अलंकार नसतात; त्यांच्याशी जोडलेल्या असतात घरच्या परंपरा, पिढ्यान्पिढ्या जपलेल्या आठवणी आणि सौंदर्याची आपली खास मराठी दृष्टी. कधी पारंपरिक ठुशी, राणीहार आणि मोत्यांच्या माळांनी, मोहन माळेने नटलेली गौरी, तर कधी आधुनिक दागिन्यांच्या साजात खुललेले तिचे रूप. काळ बदलला, तरी या अलंकारांमागची श्रद्धा आणि आपलेपणा तितकाच कायम आहे. यंदाच्या गौरी-गणपतीच्या सणात दागिन्यांचा हा पारंपरिक साज नेमका कसा बदलतोय, कोणते दागिने पुन्हा लोकप्रिय होत आहेत आणि या अलंकारांना आधुनिकतेची जोड कशी मिळतेय, याचा घेतलेला हा वेध.
गणपतीच्या दागिन्यांचा हल्ली अगदी सोनारापासून ते इमिटेशनच्या दुकानांमध्ये सेटच मिळतो. यात छोटा मुकुट, जास्वदींच्या फुलांचा हार, दुर्वांचा हार, जास्वंदं फुल, किरीट, कमळ, त्रिशूळ, परशू, शमी पान, पान-सुपारी, दुर्वा, केवडा, मोदक, मूषकबरोबर शुद्ध चांदीतील पूजा सामग्री जसे की निरांजन, ताम्हण, कलश, पळी-पंचपात्री, पंचारती हे प्रकार येतात. हे सगळं आलं की इतर कुठल्या वेगळ्या दागिन्यांची फार गरजच लागत नाही. गौरींसाठी आपल्याला हवे ते कस्टमाइज्ड दागिने करून घेण्याचा ट्रेंड वाढला आहे.
उभ्याच्या गौरींसाठी दागिन्यांची सजावट करायला बऱ्यापैकी वाव मिळतो, पण हल्ली सगळ्याच प्रकारच्या गौरींना अगदी सुरेख, सुबक पद्धतीने दागिन्यांची सजावट केली जाते. सोने, चांदी, मोती, कुंदन, रंगीतमणी, आपल्याला हव्या त्या पद्धतीत अगदी साध्या छोट्या दुकानांपासून ते मोठ्या शो-रूम पर्यंत सगळीकडे गौरीच्या दागिन्यांची चलती आहे. सोन्याचे पारंपरिक दागिने म्हणजे ठुशी, बोरमाळ, मोहनमाळ, लक्ष्मीहार, चपलाहार, पोहेहार, राणीहार, कोल्हापुरी साज, वाकी, बाजूबंद, तोडे आणि पारंपरिक नथ अशा दागिन्यांचा वापर गौरीच्या सजावटीत केला जातो. काही घरांमध्ये तर पिढ्यान्पिढ्या जपलेले दागिने हा गौरीच्या सजावटीचा खास भाग असतो.
या दागिन्यांचे वैशिष्ट्य केवळ त्यांचे सोन्याचे मूल्य नसून त्यांच्याशी जोडलेल्या कौटुंबिक आठवणी आणि परंपरा हे आहे. आईने वापरलेला हार मुलीच्या गौरीसाठी वापरणे किंवा आजीच्या काळातील दागिना पुन्हा सजावटीत आणणे, यामुळे या उत्सवाला भावनिक परिमाण मिळते. आजच्या काळात ‘हेरिटेज’ आणि ‘व्हिंटेज’ दागिन्यांविषयी वाढलेले आकर्षण गौरीच्या सजावटीतही दिसते. जुन्या पद्धतीचे कोरीव काम, लक्ष्मी किंवा कमळाच्या आकृत्या, मोत्यांची जोड, मीनाकारी आणि पारंपरिक महाराष्ट्रीय नक्षी असलेले दागिने पुन्हा लोकप्रिय होत आहेत. विशेष म्हणजे, हे दागिने केवळ गौरीच्या सजावटीपुरते मर्यादित न राहता सणासुदीच्या काळात महिलांच्या वैयक्तिक दागिन्यांमध्येही स्थान मिळवत आहेत. म्हणजेच गौरीसाठी वापरला जाणारा पारंपरिक दागिना आणि स्वतःसाठी घातला जाणारा दागिना यांच्यातील सीमारेषा काही प्रमाणात पुसली जात आहे.
चांदीचे दागिने – गौरीच्या सजावटीत सोन्याला पारंपरिक मानाचे स्थान असले, तरी सणासुदीच्या दागिन्यांच्या ट्रेंडमध्ये चांदीनेही आपली स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. विशेषतः पारंपरिक आणि बोहो शैलीचा मिलाफ असणाऱ्या चांदीच्या दागिन्यांकडे नव्या पिढीचा कल वाढताना दिसतो. चांदीच्या दागिन्यांमध्ये ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर हा प्रकार सध्या विशेष लक्ष वेधून घेतो. काळसर पोत, भरगच्च नक्षीकाम आणि जुन्या दागिन्यांची आठवण करून देणारी रचना यामुळे या दागिन्यांना अगदी आंतरराष्ट्रीय रॅम्प-वॉकवर सुद्धा स्थान मिळाले आहे.
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरमधील नक्षीदार हार, मोठे झुमके, बांगड्या, बाजूबंद, कमरपट्टे, पैंजण आणि मोत्यांसह चांदीचे दागिने यंदाच्या वर्षात पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या दागिन्यांच्या परंपरेचा विचार केला तर कोल्हापूरजवळील हुपरी हे चांदीच्या दागिन्यांचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. कोल्हापुरी साजाच्या पारंपरिक रचनेपासून ग्रामीण आणि आदिवासी दागिन्यांतील जाडसर बांगड्या, नाण्यांच्या माळा, पैंजण आणि नक्षीकामापर्यंत अनेक प्रादेशिक शैली आजच्या चांदीच्या दागिन्यांना प्रेरणा देत आहेत. विशेषतः हँडक्राफ्टेड, रस्टिक आणि ऑक्सिडाइज्ड फिनिश असलेल्या दागिन्यांमुळे पारंपरिकतेला बोहो आणि समकालीन रूप मिळते. त्यामुळे गौरीच्या सजावटीत चांदीचा वापर हा केवळ सोन्याला पर्याय म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक दागिनेकला, लोकपरंपरा आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर संगम म्हणून पाहता येतो.
मणी-मोत्यांचे दागिने भारतातील प्राचीन बीड मेकिंग आणि हस्तकलेच्या परंपरेशी जोडलेले असून आज त्यांना आधुनिक फॅशन आणि उत्सवी सजावटीची जोड मिळाली आहे. गौरीच्या साडीच्या रंगाशी मिळत्याजुळत्या रंगाच्या मोत्यांच्या माळा, मणीहार, झुमके, बांगड्या आणि कमरपट्टे निवडले जातात, गेल्या काही वर्षांत तरुणाईत पेस्टल रंगांचा ट्रेंड प्रचलित झाला आहे. तोच ट्रेंड गौरींच्या राजवटीतही दिसतो आहे. पांढऱ्या मोत्यांबरोबर गुलाबी, पीच, लॅव्हेंडर, मिंट ग्रीन आणि बेबी ब्ल्यूसारख्या पेस्टल शेड्सचा वापर सजावटीत अधिक असतो. यासोबत ग्लास बीड्स, सीड बीड्स, रंगीत मणी आणि गोल्ड-प्लेटेड मण्यांच्या जोड्यांचा वापर करून पारंपरिक हारांना नवे रूप दिले जाते आहे. एकाच हाराऐवजी वेगवेगळ्या आकारांच्या मण्यांच्या माळांचे लेअरिंग करणे हा देखील गौरीच्या साजातील आकर्षक ट्रेंड ठरत आहे. गौरीचा मुकुट, गळ्यातील हार, कानातले आणि हातातील बांगड्यांमध्ये रंगसंगती साधणारे मणी-मोती वापरण्याकडे कल अधिक आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या पारंपरिक दागिन्यांसोबत मणी-मोत्यांचे अलंकार गौरीच्या साजात मोठ्या प्रमाणात यंदा तरुण मंडळी वापरताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील गौरीच्या दागिन्यांचे प्रादेशिक ट्रेंड
१. कोल्हापूर – साज, ठुशी आणि लक्ष्मीहाराचा भरजरी थाट
कोल्हापूर म्हटले की कोल्हापुरी साज, ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, चपलाहार, पोहेहार आणि पुतळीहार हे दागिने विशेषत्वाने समोर येतात. गौरीच्या सजावटीतही या दागिन्यांची प्रतिकृती किंवा हलक्या वजनातील आवृत्ती वापरून पारंपरिक कोल्हापुरी लूक तयार केला जातो. साजाच्या पारंपरिक रचनेत २१ घटकांचा समावेश असतो आणि त्यात विविध पानं, देवतांच्या प्रतिमा व मंगलचिन्हांची प्रतीकात्मक मांडणी आढळते. आज मात्र पूर्ण २१ घटकांच्या साजाबरोबरच कमी घटक असलेले, हलके आणि सजावटीसाठी सोपे साजही वापरले जातात.
२. पश्चिम महाराष्ट्र – ठुशी, मोहनमाळ आणि पुतळीहार
सातारा, सांगली, सोलापूर आणि आसपासच्या पश्चिम महाराष्ट्रात पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांच्या शैलीचा प्रभाव गौरीच्या साजात दिसतो. विशेषतः ठुशीसारखे गळ्याला घट्ट बसणारे हार, मोहनमाळेच्या मण्यांच्या रचना, पुतळीहार किंवा लक्ष्मीहाराच्या प्रतिकृती गौरीच्या गळ्यात वापरल्या जातात. सोन्याचे दागिने महाग असल्याने सणाच्या सजावटीसाठी गोल्ड-प्लेटेड, मेटल किंवा हलक्या मण्यांच्या आवृत्त्यांचाही वापर केला जातो. महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांच्या यादीत मोहनमाळ, पुतळीहार, गाठला, चंद्रहार, गोफ आणि तोडे यांसारख्या शैलींचा उल्लेख आढळतो.
३. पुणे आणि नगर परिसर – पेशवाई प्रभावाचा साज
पुणे आणि नगर परिसरात गौरीच्या सजावटीत पेशवाई शैलीचा भरजरी पण शिस्तबद्ध लूक पाहायला मिळतो. नथ, ठुशी, चंद्रहार, तनमणी, बोरमाळ, मोहनमाळ आणि मोत्यांच्या माळांचा एकत्रित वापर करून राजेशाही साज केला जातो. विशेषतः पैठणी किंवा शालूसोबत मोत्यांच्या माळा आणि पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांची मांडणी केली जाते. तनमणीसारख्या दागिन्यांमध्ये मोत्यांच्या माळांसोबत मध्यवर्ती पदक असल्यामुळे गौरीच्या गळ्यात तो तुलनेने नाजूक, पण उठावदार दिसतो.
४. मराठवाडा – मोती, मणी आणि रंगीत अलंकारांचा वापर
मराठवाड्यातील पारंपरिक पोशाख आणि लोककलांचा प्रभाव गौरीच्या सजावटीतही जाणवतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबर मोत्यांच्या माळा, रंगीत मणी, काचेचे मणी आणि विविध रंगांच्या अलंकारांचा वापर करून अधिक रंगीत साज केला जातो. गौरीच्या साडीच्या रंगाशी जुळणारे मणी निवडणे हा सजावटीतील महत्त्वाचा भाग ठरतो. पेस्टल रंगांचे मोती आणि रंगीत बीड्स वापरल्याने पारंपरिक सजावटीला हलका आणि आधुनिक स्पर्श मिळतो.
५. विदर्भ – साधेपणा, मोती आणि पारंपरिक माळांची जोड
विदर्भात गौरीच्या सजावटीत अत्यंत जड दागिन्यांपेक्षा माळा, मोती, मणी आणि पारंपरिक पेंडंट्स वापरून सजावट करण्याकडे कल दिसतो. विशेषतः एकाच मोठ्या हाराऐवजी दोन-तीन वेगवेगळ्या लांबीच्या माळा वापरून गळ्यात लेअरिंग केले जाते. त्यात मोती, रंगीत मणी किंवा गोल्ड-प्लेटेड घटक मिसळल्याने सजावट समृद्ध दिसते.
६. कोकण – नथ, मोत्यांच्या माळा आणि स्थानिक साधेपणा
कोकणातील गौरीच्या सजावटीत पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांबरोबरच मोत्यांचा आणि मण्यांचा नाजूक वापर विशेष खुलतो. नथ, लहान हार, मोत्यांच्या माळा, बांगड्या आणि केसांतील अलंकार यांची सांगड साडीच्या पारंपरिक लूकशी घातली जाते. कोकणातील घरगुती गौरी सजावटीत उपलब्ध स्थानिक साहित्याचा वापर करण्याची परंपराही महत्त्वाची आहे. म्हणून सजावटीत कृत्रिम दागिन्यांबरोबरच घरात जपून ठेवलेले जुने दागिनेही वापरले जातात.
७. खानदेश – चांदी आणि ग्रामीण दागिन्यांचा प्रभाव
खानदेशातील ग्रामीण आणि आदिवासी दागिन्यांच्या शैलीत चांदीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे गौरीच्या सजावटीत चांदीचे जाडसर हार, बांगड्या, पैंजण, नाण्यांसारख्या घटकांची माळ किंवा नक्षीदार अलंकार वापरल्यास वेगळा ग्रामीण-लोककलेचा लूक तयार होतो. महाराष्ट्रातील चांदीच्या दागिन्यांच्या परंपरेत हुपरी हे प्रमुख केंद्र असून तेथे हार, कानातले, बाजूबंद, केसांच्या पिना, कंबरपट्टे आणि अंगठ्या तयार होतात.
८. आदिवासी पट्टा – मोठे मणी, चांदी आणि लोककलेचा ठसा
नंदुरबार, धुळे, नाशिकच्या काही आदिवासी भागांपासून विदर्भातील आदिवासी पट्ट्यापर्यंत दागिन्यांमध्ये मोठे मणी, धातूचे घटक, नाण्यांच्या आकाराचे अलंकार आणि चांदी वापरण्याची परंपरा आहे. गौरीच्या सजावटीत या शैलींची थेट नक्कल करण्यापेक्षा त्यापासून प्रेरणा घेऊन मोठ्या मण्यांच्या माळा, ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर आणि लोककलेच्या नक्षीचे दागिने वापरण्याचा आधुनिक ट्रेंड दिसतो.
आजचा सर्वात मोठा बदल
प्रादेशिक शैली कायम असल्या तरी आज गौरीच्या दागिन्यांमध्ये ‘एकाच प्रदेशाचा संपूर्ण साज’ करण्यापेक्षा मिक्स अँड मॅच करण्याचा ट्रेंड अधिक दिसतो. उदाहरणार्थ, कोल्हापुरी ठुशीसोबत मोत्यांची माळ, साजासोबत चांदीचे झुमके किंवा पारंपरिक पुतळीहारासोबत रंगीत मण्यांच्या माळा अशा जोड्या केल्या जातात. त्यामुळे कोल्हापूरचा साज, पुण्याचा पेशवाई ठसा, पश्चिम महाराष्ट्रातील ठुशी-मोहनमाळ, कोकणातील मोत्यांची नाजूकता आणि खानदेश-आदिवासी पट्ट्यातील चांदी व मण्यांची लोकशैली… अशा सगळ्या परंपरा आजच्या गौरीच्या सजावटीत नव्या पद्धतीने एकत्र येताना दिसतात. आता या सजावटीमध्ये, तरुण मंडळींचा सक्रिय सहभाग असतो. बऱ्याच जणांचे स्वतःचेही दागिन्यांचे ब्रॅण्ड्स असतात, तसेच उभ्याच्या गौरी ज्यांच्याकडे असतात तिथल्या तरुण मुली अगदी साडी नेसवण्यापासून ते दागिने, नेवेद्य, सजावट सगळ्यांसाठीच उत्साह दाखवतात. गौराईचे आगमन हा मुख्यतः माहेरवाशिणींचा सण मानला जातो, विविध प्रदेशामध्ये तेवढ्यासाठी तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे अगदी आनंदी उत्सव साजरे करतात. महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये स्थानिक नाव आणि स्वतंत्र शैली असलेले अनेक अलंकार आहेत; त्यामुळे गौरीचा साज हा प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या प्रादेशिक दागिनेकलेचे एक छोटेखानी दर्शनच ठरते.
