नोकरी-धंद्याच्या प्रत्येक क्षेत्रात जेन झीचे पाऊल आता मोठ्या संख्येने पडते आहे. १९९६-२०१२च्या काळात जन्मलेली आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाढलेली पिढी आपल्या सोबत एक स्पष्ट विचार, लख्ख प्रकाशासारखा दृष्टिकोन आणि ते सगळं आत्मसात करण्याची जिद्द, ताकद घेऊनच वावरताना दिसते आहे. खासकरून कॉर्पोरेट नोकरीतील पारंपरिक कार्यपद्धतीत ते आमूलाग्र बदल करत आहेत, त्यांच्या सगळ्याच गोष्टी सयुक्तिक आहेत असेही नाही परंतु कामाची पद्धत, संस्थात्मक मूल्ये यामध्ये त्यांच्याकडून बदल केले जात आहेत. आपण जे काम करत आहोत ते फक्त पैसा कमावण्यासाठी नाही, तर त्यामागे काहीतरी मोठा, चांगला उद्देश असायला हवा, हा जेन झींचा दृष्टिकोन आहे. जवळपास ८६ टक्के जेन झी आपल्या कामात समाधान आणि चांगला हेतू महत्त्वाचा मानतात.

अदिती सुराणा या हाय परफॉर्मन्स लीडरशिप कोच, बिहेव्हियरल एक्सपर्ट आहेत. त्या सांगतात, ‘जेन झीच्या आधीच्या पिढीला म्हणजेच मिलेनिअल्सना एकाच पद्धतीने काम करावं लागायचं; म्हणजेच जे सांगितलेलं आहे ते केलंच पाहिजे, आर्थिक जबाबदारी ही खूप मोठी गोष्ट होती त्यामुळे नोकरी करणं, पैसे कमावणं खूप महत्वाचं आहे, हे मनावर बिंबवलेलं असायचं. आत्ताची पिढी ही बर्‍यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या वातावरणात जन्माला आली, वाढली आहे. त्यामुळे सर्व्हायव्हलसाठी नोकरी करण्याची त्यांना फार गरज वाटत नाही, जोपर्यंत त्यांना विशिष्ट नोकरी करण्याचं उद्दिष्ट मिळत नाही, तोपर्यंत ते मनापासून काम करण्याची त्यांची तयारी होत नाही.’

वर्क लाईफ बॅलन्स

जेन झींच्या मते यशस्वी कारकिर्दीसाठी ‘वर्क लाईफ बॅलन्स’ हा एक पर्याय नाही तर ती आमूलाग्र गरज बनली आहे. करोना महामारीमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ची कार्यपध्दत ही या पिढीची ओळख ठरली आहे. सुमारे ७७ टक्के जेन झी काम आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन महत्वाचं मानत आहेत. अदिती याबद्दलही पुढे सांगतात, ‘औद्योगिकीकरणानंतर आपल्यासाठी कार्यक्षमता इतकी महत्त्वाची झाली की हळूहळू आपण मशीन आणि आपल्यातला फरकच विसरून गेलो. आपण मशीन नाही, त्यामुळे नेहमीच इतकं कार्यक्षम राहणं शक्य नाही, हे आपण मान्य करत नाही. याउलट जेन झी हाच मुद्दा उलचून धरतात. आधीच्या पिढीकडे आत्तासारखं तंत्रज्ञान नव्हतं, काम करण्यासाठीचे टूल्स नव्हते, प्रत्येक काम बारकाईने स्वत:चं डोकं लावूनच करावं लागायचं. आता हेच काम ही मुलं अगदी परफेक्टली टूल्स वापरून करतायेत, त्यांच्या पद्धतीने दिलेल्या वेळेत काम पूर्ण करतात, मग तिथे त्यांच्यावर नियम, अटी लादणं, जबरदस्ती करणं थोडं अयोग्य होऊ शकतं.’

लिली पॅडिंग

व्यावसायिक नोकरीच्या अनिश्चिततेमुळे ही नवी पद्धत रुळताना दिसते आहे. याचा अर्थ पहिली नोकरी सोडण्यापूर्वी, दुसर्‍या नोकरीची सगळ्या बाजूंनी तयारी करणे. कामाची पद्धत, नवनवीन स्किल्स, टूल्स अद्ययावत करणं, उच्च शिक्षण घेणं, स्वत:ची व्यावसायिक पात्रता वाढवणं, हे सगळं काळजीपूर्वक करणं म्हणजे लिली पॅडिंग.

आर्थिक बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, प्रत्येक क्षेत्रात वाढती स्पर्धा, नवनवीन तंत्रज्ञानाचा उगम अशा अगणित कारणांमुळे अनेक क्षेत्रात रोजगाराच्या बाबतीत अनिश्चितता आहे. उत्तम कामगिरी करणार्‍या तरुणांनाही नोकरीवरून काढून टाकले जाणे (लेऑफ), पुनर्रचना आणि एआयमुळे नोकरीतील जलद बदल अनुभवावे लागत आहेत. म्हणूनच अनेक जेन झी कर्मचारी एकाच कंपनीत अनेक वर्षे राहण्यापेक्षा पहिल्या नोकरीचा उपयोग महत्त्वाची कौशल्यं, प्रमाणपत्रं, प्रोजेक्ट्स आणि उद्योगक्षेत्रातील अनुभव मिळवण्यासाठी करतात. पहिली नोकरी ही अंतिम मुक्काम न मानता, पुढील चांगल्या संधीसाठीची एक पायरी म्हणून ते पाहतात. जेव्हा पहिल्या कंपनीत शिकण्याचा वेग कमी होतो, काम थोडे आवडेनासे वाटू लागते, नवीन काहीतरी करण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा वाटते, तेव्हा पुढील संधीच्या शोधात कंपनी बदलणे हा त्यांना योग्य पर्याय वाटू लागतो.

पुण्यातल्या आयटी कंपनीत काम करणारी श्रेया वानखेडे सांगते, ‘आमच्याबाबतीत पहिल्याच नोकरीत करिअरची दिशा कळेल किंवा तिथेच करिअर होईल असं नाही. पहिल्या नोकरीत मी तरी माझ्या कामातली नवनवीन कौशल्यं शिकण्याचा प्रयत्न करते आहे. सध्या आयटीमधले वातावरण एआयमुळे खूप बदलले आहे. एक अख्खा कोड लिहिण्याचे काम टूल्समधून अगदी १-२ तासांत होऊ शकते. आम्हालाही वेगवेगळे टूल्स शिकणं बंधनकारक झालं आहे. कोड टूल्समधून बनवणं म्हणजे कॉपी-पेस्ट नाही तर त्यातही आपली कौशल्यं दाखवणं गरजेचं असतं, नाहीतर तुमच्या नोकरीची कंपनीला काय गरज? टेक्निकल स्किल्स जेवढ्या शिकू तेवढ्या कमी आहेत आणि सध्या प्रत्येक कंपनीत एकाच कामासाठी वेगवेगळ्या पद्धती असल्याने ऑल राउंडर असणेही फार गरजेचं झालं आहे.’

बेअर मिनिमम मंडे

या संकल्पेनुसार कर्मचारी सोमवारी आठवड्याची सुरुवात जास्तीत जास्त काम आणि ताण घेऊन न करता, केवळ अत्यावश्यक आणि सहजपणे हाताळता येतील, अशा कामांपासून करतात. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी थकवा येईपर्यंत काम केलं, तर उर्वरित आठवडा त्यातून सावरण्यात जातो. त्यामुळे आठवड्याची सुरुवात वेळ देऊन करणं आणि हळूहळू कामाचा वेग वाढवण्यावर ते भर देतात.

कॉफी बॅजिंग

काम करण्याची हायब्रीड पद्धत सुरु झाल्यापासून हा प्रकार जेन झींमध्ये प्रचलित होऊ लागला. याचा सोपा अर्थ हणजे संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम न करता, फक्त महत्त्वाच्या कामासाठी ऑफिसमध्ये येणं, मीटिंग, प्रेझेन्टेशन, इतर सहकार्‍यांसोबत थोडा वेळ घालवणं आणि उर्वरित काम रिमोट पद्धतीने म्हणजेच घरी येऊन करणं. करोना संपल्यानंतर ९० टक्के कंपन्यांनी ‘रिटर्न टु ऑफिस’ धोरण स्वीकारलं आहे. काही कर्मचार्‍यांनी वर्क फ्रॉम होमसारख्या रिमोट किंवा हायब्रिड पद्धतीच्या कामाशी अधिक सहज जुळवून घेतलं असल्याने त्यांना पुन्हा पूर्णवेळ ऑफिसमध्ये जाऊन काम करणं फारसं फायदेशीर वाटत नाही. अशा परिस्थितीत कॉफी बॅजिंग हा कंपनीच्या अपेक्षा आणि कर्मचार्‍यांना हवी असलेली लवचिकता यांच्यातील एक प्रकारे जुळवून घेणारा मार्ग ठरतो. मात्र, जिथे हायब्रिड पद्धत अजूनही आहे तिथे त्याच पध्दतीने करावे लागते, त्याचा गैरफायदा घेणार्‍यांवर कंपन्यांकडून कारवाईही केली जाते आहे.

जॉब क्राफ्टिंग

जॉब क्राफ्टिंग म्हणजे आपल्याला दिलेलं काम कसं करायचं याची पध्दत आपल्या आवडीनुसार ठरवायची. ‘माझ्यासाठी हे काम अधिक चांगलं आणि अर्थपूर्ण कसं होऊ शकतं?’ आपल्या नोकरीच्या स्वरूपात स्वत:च्या आवडी, कौशल्यं आणि क्षमतांनुसार छोटे-मोठे बदल घडवून आणणं म्हणजे जॉब क्राफ्टिंग जेन झी मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. जेन झींमध्ये अशा पद्धतीने काम करण्याची वृत्ती वाढताना दिसते, याचं कारण त्यांच्यासाठी कामातून मिळणारं समाधान, वैयक्तिक मूल्यांशी असलेलं नातं आणि कामामागचा उद्देश त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आपल्या आवडी आणि मूल्यांशी पूर्णपणे विसंगत असलेल्या भूमिकेत दीर्घकाळ काम करण्याची त्यांची फारशी तयारी नसते. आत्ताचे तरुण स्वत:ला केवळ एका जॉब प्रोफाइलपुरतं मर्यादित ठेवू इच्छित नाहीत.

बंगलोरच्या ॲड एजन्सीमध्ये काम करणारी गायत्री सणस सांगते, ‘मी सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. माझ्या जॉब प्रोफाइलमध्ये सोशल मीडिया पोस्ट बनवणं, कॅलेंडर बनवणं, कमेंट्सला रिप्लाय करणं ही कामं असतात. पण, मला माझ्या कामाचा ट्रेंड बघता, व्हिडिओ एडिटिंगमध्येही तितकाच रस आहे. मग मी एडिटर्ससोबत बसून व्हिडिओ पोस्ट, शॉर्ट्स, रील्स हे शिकून सोशल मीडिया पोस्ट तयार करते. याने माझ्या स्किल्स अपडेट होतात आणि मला माझं काम जास्त आवडतं.’

हे सगळे ट्रेंड्स कामाच्या आणि कंपनीच्या स्वरुपानुसार बदलतात. क्रिएटिव्ह कामांमध्ये जिथे हायब्रीड वर्क कल्चर आहे, तिथे हे ट्रेंड्स जास्त पाहायला मिळू शकतात. कॉर्पोरेट क्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात, कंपनीच्या कल्चरनुसार हे ट्रेंड्स असतात. जेन झीच्या या बदलत्या वर्क ट्रेंड्सकडे केवळ कामचुकारपणा, अस्थिरता किंवा पारंपरिक कार्यसंस्कृतीला नकार म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही, असं अदिती सांगतात.

‘आपल्या कामाची, चुकांची जबाबदारी घेणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या मुलांनी आत्मसात करायला हवा ही रास्त अपेक्षा आहे. हे जर झालं नाही किंवा जिथे होत नसेल तिथे या मुलांच्या अटिट्युडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्यांना योग्य ते ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात काम करताना वेगवेगळ्या माणसांमध्ये राहून, काम करून तिथे आपलं वागणंबोलणं कसं असायला हवं हा अनुभव आपण घेतो. तेच या नव्या पिढीलाही लागू होतं. अनेकदा हे पण आम्ही शिकवायचं का?, असा प्रश्न मिलेनिअल्स पिढीतील वरिष्ठांकडून येतो. तर हो मॅनेजर किंवा वरिष्ठ स्तरावरील व्यक्तींना आपली ट्रेनिंग देण्याची पद्धत थोडीशी बदलायची गरज आहे. नव्या पिढीला कनेक्शन फार महत्त्वाचं वाटतं, रिस्पेक्ट ही त्यांच्यासाठी गिव्ह अँड टेकची भावना आहे, हे मिलेनिअल्सनीही समजून घ्यायला हवं. याचं कारण आपल्या घरातल्या मुलांना आपणच प्रश्न विचारायला शिकवलंय, आपण जे नाही करू शकलो ते करायला शिकवलंय, मग कंपनीत काम करणारी ही मुलं सुद्धा त्याच पिढीची आहेत. या मुलांमध्ये कामाचा ध्यास आहे, हे त्यांना फक्त दाखवणं गरजेचं आहे. तो त्यांना एकदा सापडला की ते अतिशय सुंदर पद्धतीने काम करतात.’

प्रत्येक पिढीची स्वत:ची एक गोष्ट असते. त्यात कोणी चूक किंवा बरोबर हा मुद्दा नसतो; महत्त्वाचे असते ते त्या पिढीने जगाला काय दिले. आजी-आजोबांच्या पिढीने संस्कार, संस्कृती, शिस्त, मेहनत आणि सामाजिक बांधिलकी दिली; आई-वडिलांच्या पिढीने कुटुंब, उज्ज्वल भविष्याची स्वप्नं, स्वबळावर उभं राहण्याची ताकद आणि नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची जिद्द दिली. आता जेन झी व्यक्तिस्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि नव्याची कास घेऊन पुढे येत आहेत; मात्र ते जुन्याची साथही सोडत नाहीत. मग हा नवा विचार रुजू द्यायला हरकत काय आहे? त्यांच्यासाठी नोकरी ही केवळ उत्पन्नाचे साधन नसून स्वत:ची ओळख, कौशल्यं, मूल्यं आणि जीवनशैली यांच्याशी जोडलेला अनुभव आहे. त्यामुळे ‘कंपनीसाठी योग्य कर्मचारी’ होण्याबरोबरच ‘माझ्यासाठी योग्य करिअर’ शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास हीच पिढी नव्या चौकटी घडवत सक्षमपणे काम करू शकते.
viva@expressindia.com