‘तुला आयुष्यात नक्की काय हवंय?’ हा प्रश्न विचारला की साधारणतः त्याचं उत्तर बहुतेक वेळा शिक्षण, चांगली नोकरी, स्वतःचं घर, लग्न, कुटुंब आणि स्थिर आयुष्य या चौकटीत पूर्वी मिळायचं. आजची जेन झी मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधताना थोडं थांबते आणि त्याआधी एक वेगळाच प्रश्न स्वतःला विचारते तो म्हणजे ‘मला हे खरंच हवंय का?’ करिअर, पैसा, रिलेशनशिप, सोशल लाइफ, लाईफस्टाइल किंवा स्वतःची स्वप्नं असोत, या पिढीला केवळ समाजाने ठरवलेल्या यशाच्या व्याख्येत बसायचं नाही. त्याचबरोबर ‘माझी मेंटल हेल्थ कशी आहे?’, ‘मला कोणत्या गोष्टींमुळे स्ट्रेस येतो?’, ‘मी सतत थकल्यासारखा का वाटतोय?’, ‘या नात्यात किंवा या कामात मला खरंच बरं वाटतंय का?’ असे प्रश्नही त्यांच्या आयुष्याचा भाग झाले आहेत. त्यामुळेच आज मानसिक आरोग्याची जाणीव आणि भविष्यातली ध्येय यांचा संबंध अधिक स्पष्टपणे दिसतो. स्वतःला समजून घेणं आणि मग आयुष्याची दिशा ठरवणं, हा या पिढीच्या विचार करण्याचा एक महत्त्वाचा बदल म्हणता येईल.

या बदलामागे मानसिक आरोग्याबद्दलची वाढलेली जागरूकता महत्त्वाची आहे. पूर्वी ‘स्ट्रेस आहे’, ‘माझं खूप ओव्हरथिंकिंग होतंय’, ‘माझा कॉन्फिडन्स कमी झालाय’ किंवा ‘मला काउन्सेलिंगची गरज वाटतेय’ असं बोलणं काहीसं ऑकवर्ड मानलं जायचं. आजच्या तरुणांमध्ये मात्र अशा गोष्टींबद्दल बोलण्याची तयारी तुलनेने अधिक दिसते. अर्थात, जागरूकता वाढली म्हणजे सगळेच तरुण सहज मदत मागतात असं नाही; अजूनही जजमेंटची भीती, कुटुंबाची प्रतिक्रिया, खर्च किंवा स्वतःच्याच भावना व्यक्त करण्याची अडचण असू शकते. तरीही ‘माझ्या मनात काय चाललंय?’ हा प्रश्न विचारण्याची सुरुवात होणं हा मोठा बदल आहे. २०२५ मधील अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणातही तरुण प्रौढांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याबाबत काही संकोच कायम असल्याचं दिसतं, पण त्याच वेळी स्वतःच्या पद्धतीने आणि कधी कधी अनामिकपणे मदत किंवा संवाद शोधण्याची त्यांची तयारीही दिसते.

याचा थेट परिणाम त्यांच्या ‘गोल्स’वरही होतो. एखादं करिअर फक्त चांगला पगार देतं म्हणून निवडण्यापेक्षा ते काम आपल्याला आवडतं का, त्यात आपल्याला ग्रोथची संधी आहे का आणि त्या कामामुळे आपलं पर्सनल लाइफ पूर्णपणे बाजूला पडणार तर नाही ना, याचा विचार आता केला जातो. तसंच, रिलेशनशिपमध्येही ‘नातं आहे म्हणून टिकवायचं’ यापेक्षा ‘या नात्यात मला रिस्पेक्ट, सेफ्टी आणि कम्फर्ट मिळतोय का?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. पैशाबाबतही फक्त कमाईपेक्षा फायनान्शियल इंडिपेंडन्स, स्वतःच्या गरजा आणि भविष्यातील सिक्युरिटी यांचा विचार वाढतो. म्हणजेच गोल्स आता फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. चांगली नोकरी, स्वतःचं घर किंवा आर्थिक स्थैर्य यांच्यासोबत मेंटल पीस, हेल्थ, चांगली नाती, स्वतःसाठी वेळ आणि आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी स्पेस यांनाही महत्त्व मिळतं आहे. २०२५ च्या एपीए सर्वेक्षणात आर्थिक स्थैर्य आणि आरोग्याबरोबर कुटुंब-मित्रांसोबत वेळ घालवणं, सोशल कनेक्शन्स टिकवणं, सेल्फ-अवेअरनेस आणि माइंडफुलनेस यांचाही भविष्यातील ध्येयांमध्ये समावेश असल्याचं दिसतं.

सेल्फ-अवेअरनेस हा या पिढीच्या जीवनशैलीतला महत्त्वाचा भाग बनतोय. ‘मला काय आवडतं?’ एवढंच नव्हे, तर ‘मला काय अजिबात नको आहे?’, ‘कशामुळे माझी एनर्जी ड्रेन होते?’, ‘कोणत्या लोकांसोबत मला कम्फर्टेबल वाटतं?’, ‘माझ्यासाठी सक्सेस म्हणजे नेमकं काय?’ असे प्रश्न विचारले जात आहेत. सोशल मीडियामुळे मेंटल हेल्थ, बर्नआउट, बाउंडरीज, सेल्फ केअर आणि थेरपी याबद्दलच्या चर्चा वाढल्यामुळे ‘दुसऱ्यांचं आयुष्य माझं गोल असायलाच हवं असं नाही’ ही जाणीवही काही तरुणांमध्ये तयार होत आहे. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची दिशा इतरांशी तुलना करून नव्हे, तर स्वतःच्या गरजा आणि मूल्यांनुसार ठरवण्याचा प्रयत्न दिसतो. याचा अर्थ जेन झीला स्ट्रेस नाही किंवा त्यांनी आयुष्याची सगळी उत्तरं शोधून काढली आहेत, असा अजिबात नाही. उलट अनेक वेळा जास्त सेल्फ-अवेअर असणंही कठीण ठरू शकतं. सतत स्वतःच्या भावनांचं विश्लेषण करणं, आपल्या प्रत्येक निर्णयामागचं कारण शोधणं किंवा ‘मी खरंच योग्य आयुष्य जगतोय का?’ हा प्रश्न वारंवार विचारणं यामुळे ओव्हरथिंकिंग वाढू शकतं. ‘परफेक्ट मेंटल हेल्थ’, ‘परफेक्ट करिअर’ किंवा ‘परफेक्ट लाइफ’ मिळवण्याचा प्रयत्नही एक नवीन प्रकारचं प्रेशर निर्माण करू शकओ. त्यामुळे सेल्फ-अवेअरनेस म्हणजे प्रत्येक भावनेचं विश्लेषण करणं नव्हे; तर स्वतःच्या गरजा, मर्यादा, क्षमता आणि प्राधान्यं समजून घेऊन त्यानुसार छोटे-छोटे निर्णय घेणं आहे. स्वतःला समजून घेणं ही एक प्रक्रिया आहे, एकदाच मिळणारी अंतिम उत्तरपत्रिका नाही.

या सगळ्यामुळेच ‘सक्सेस’ची व्याख्याही हळूहळू बदलते आहे. मोठं पद, चांगला पगार किंवा सोशल मीडियावर दिसणारं ग्लॅमरस आयुष्य यापलीकडे जाऊन ‘मी माझ्या आयुष्याबद्दल समाधानी आहे का?’, ‘माझ्याकडे माझ्या लोकांसाठी वेळ आहे का?’, ‘माझं शरीर आणि मन ठीक आहे का?’, ‘मला माझ्या कामात काही अर्थ वाटतो का?’ असे प्रश्नही महत्त्वाचे होत आहेत. कदाचित हीच जेन झीची खरी जमेची बाजू आहे. त्यांना फक्त आयुष्य घडवायचं नाही, तर ते आयुष्य स्वतःसाठी योग्य आहे का, हेही तपासायचं आहे. अर्थात प्रत्येक तरुण सारखाच विचार करतो असं नाही आणि या पिढीतील प्रत्येक निवड योग्यच असेल असंही नाही. पण स्वतःच्या मानसिक आरोग्याला आणि स्वतःच्या ध्येयांना एकाच चर्चेचा भाग बनवणं हा नक्कीच महत्त्वाचा बदल आहे. कारण शेवटी ‘आयुष्यात काय मिळवलं?’ या प्रश्नाइतकाच ‘ते मिळवताना मी स्वतःला किती जपलं?’ हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.