पूर्वीच्या पिढ्यांना एन्जॉय करणं म्हणजे सटीसामाशी एकदा कधीतरी आपल्या नेहमीच्या दिनचर्येपेक्षा वेगळं काहीतरी करायचं, एवढंच माहीत होतं. मात्र, मधल्या काही पिढ्या एन्जॉयमेंट करताना वेळकाळाचं भान विसरून मनापासून जगायला लागल्या. मी कोणत्या वेळी काय करायचं हे इतर कोणी का ठरवावं, या धर्तीवर झालेला हा बदल होता. त्यातूनच डे – क्लबिंग, नाइट – आऊट्स यांचं प्रमाण वाढायला लागलं. नाइट – लाइफ ट्रेण्डमध्ये येण्यामागे याच कारणाचा हात होता. दिवसभर ऑफिसमध्ये मरमर करून थकलेले सगळे, रात्रीचा वेळ आराम करण्याऐवजी मजा करण्यात घालवायला लागले आणि त्यातूनच क्लब – हॉपिंग, बार- हॉपिंग या गोष्टींचा ट्रेण्ड वाढला.

अर्थात, मधल्या पिढ्यांचा हा पॅटर्न मिलेनियल्स आणि जेन झी पिढीने जसाच्या तसा फॉलो केला नाही. काही वेळ अशी लाइफस्टाइल आजमावून बघितल्यावर कदाचित त्यांना त्याचे साइड इफेक्ट्स लक्षात आले असतील. वेळीअवेळी खाणं-पिणं, हिंडणं-फिरणं या सगळ्याचा मेंदूवर हळूहळू निगेटिव्ह परिणाम व्हायला लागतो हे त्यांनी वेळीच ओळखलं. त्यामुळे या जनरेशन्समधली तरुणाई ही नुसती एन्जॉयमेंटच्या मागे न धावता सेन्सिबल मजा करण्याकडे जास्त लक्ष देते आहे. मिलेनियल्स आणि जेन झीने या पद्धतीची मॅडनेस असलेली एन्जॉयमेंट करून पाहिली आणि ते या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचले आहेत की हा मॅडनेस तब्येतीला, मेंदूला आणि एकंदरीतच जगण्यासाठी महागात पडणारा आहे. त्यामुळे या पिढीतले अनेक जण स्वत:च्या आयुष्याला ‘रुटीनाइज’ करण्याच्या प्रयत्नात आहेत.

लहानपणी प्रत्येकाच्याच आजी-आजोबांनी ‘लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य- संपत्ती लाभे’ हा कानमंत्र दिलेला आहे. त्याच्या अनुसार पहिल्या दिवसापासून कोणीच वागलं नाही, मात्र जसजसे आधीच्या पिढ्यांना त्यांच्या उलटसुलट वेळांचे दुष्परिणाम जाणवायला लागले तशा पुढच्यास ठेच मागचा शहाणा, अशा पद्धतीने आताच्या तरुणाईने यातून धडा घेतला आहे. फिटनेस इन्स्ट्रक्टर, नेहमीचे डॉक्टर, डाएटिशियन, काऊन्सेलर्स असे सगळेच ही गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित करायला लागले.

‘बॉडी क्लॉक’ ही संकल्पना अचानक नव्याने प्रकाशझोतात आली. त्यामुळे या पिढ्यांना हे नक्की समजलं की शरीराला आणि पर्यायाने मेंदूला फिट ठेवायचं असेल तर आपल्या मनाप्रमाणे शरीर चालवणे योग्य नव्हे, तर शरीराला योग्य त्या दृष्टीने आपल्या कृती असायला हव्यात. आपलं जेवणखाण, व्यायाम, अभ्यास, काम, मनोरंजन या सगळ्याच्या काही ठरावीक वेळा आणि त्याचा ठरावीक कालावधी असायला हवा. त्यापलीकडे शरीराला त्रास देऊन कोणतीच गोष्ट करणं फायद्याचं नाही, अगदी काम किंवा व्यायामसुद्धा! या बॉडी क्लॉकप्रमाणेच अजून एक टर्म चर्चेत आली ती म्हणजे ‘सर्केडियन रिदम’. सूर्य-चंद्र, दिवस-रात्र यांच्याप्रमाणे चालणारा शरीराचासुद्धा एक ठरावीक रिदम असतो, एक निश्चित लय असते. त्या लयीच्या बाहेर शरीराला ताण देत राहण्याचे परिणाम त्याक्षणी नव्हे तर काही वर्षांनी दिसून येतात.

 या सगळ्याचे वाईट परिणाम केवळ शरीर नव्हे तर मेंदूवर होतात, हे या पिढीच्या लक्षात आलं आहे. मेंदूला एका ठरावीक वेळेला काम करायची, नेमक्या वेळेला बुद्धी चालवायची, योग्य वेळी झोपायची सवय लागली की त्या त्या वेळेत मेंदू आपल्या संपूर्ण क्षमतेने काम करतो. मेंदूला पुरेसा आराम मिळाला की मेंदू कामाच्या वेळी प्रॉडक्टिव्ह राहतो, मात्र त्यासाठी मेंदूला ‘शट-ऑफ’ आणि ‘पॉवर-ऑन’ ची सवय करून द्यावी लागते. दिवसाच्या प्रत्येक वेळी काय काम करायचं आहे, यासाठी मेंदूला ट्रेन केलं की मेंदू त्याबरहुकूम काम करतो.

अपुरी झोप, वेळीअवेळी काम, वेळीअवेळी खाणं यामुळे मेंदूला दिवसाचा नक्की कोणता पार्ट सुरू आहे आणि आपण नक्की काय करायचं आहे यात सतत कन्फ्युजन होत राहतं. त्यामुळे तो सततच ‘अलर्ट मोड’वर राहतो. कधीही कोणतंही काम येईल आणि आपल्याला ते करावं लागेल, अशा पद्धतीच्या बॅटल मोडमध्ये मेंदू चोवीस तास राहिल्याने तो प्रचंड थकतो. आणि मग ज्या क्षणी त्याच्या कामाची सर्वाधिक गरज असते त्या क्षणी तो ब्लँक होतो, त्याला काही सुचत नाही आणि आपल्याला हवं तसं काम होत नाही. या सगळ्यावरचा सोपा उपाय म्हणजे मेंदूला शिस्त लावणं आणि त्यासाठी संपूर्ण शरीराला शिस्त लावणं.

प्रत्येकाने आपल्या झोपेच्या, आरामाच्या, कामाच्या आणि अभ्यासाच्या गरजेनुसार आपल्या दिवसाला एक रुटीन लावून घ्यायला हवं हे आताच्या तरुण पिढीला पुन्हा नव्याने समजलं आहे. त्यामुळेच हेल्थ आणि मेंटल हेल्थवर आवर्जून लक्ष देणारी ही पिढी आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वत:ला जुन्या पद्धतीनेच शिस्त लावून घ्यायचे सकारात्मक प्रयत्न करताना दिसते आहे.

viva@expressindia.com