‘आपल्या माणसांपासून दूर जाणं’ ही गोष्ट पूर्वी सहज स्वीकारली जायची नाही. नातं आहे, म्हणजे ते टिकवण्यासाठी कितीही तडजोड करायची, गैरसमज झाले तरी निभावून न्यायचं आणि मनाला त्रास झाला तरी ‘आपली माणसं आहेत’ म्हणून गप्प बसायचं, अशीच एक समजूत आधीच्या सगळ्या पिढ्यांनी पाळली. मात्र जेन झी आणि मिलेनियल्सच्या पिढीत नात्यांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन हळूहळू बदलताना दिसतो आहे. आता नातं केवळ आहे म्हणून ते कोणत्याही परिस्थितीत टिकवायचंच, यापेक्षा त्या नात्यात आपल्याला कसं वाटतं, आपल्याला मानसिक शांतता मिळते का, आपण स्वत:सारखे राहू शकतो का, याला अधिक महत्त्व दिलं जातं आहे. त्यामुळेच ‘टॉक्सिक’ व्यक्ती, सतत नकारात्मक वातावरण आणि भावनिक थकवा देणार्या नात्यांपासून अंतर ठेवण्याचा ट्रेंड वाढताना दिसतो आहे.
या पिढीच्या रोजच्या आयुष्यात ‘मेंटल पीस’ हा शब्द खूप महत्त्वाचा झाला आहे. सतत कोणाला तरी स्पष्टीकरण देत राहणं, आपल्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारले जाणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून अपराधी वाटून घेणं किंवा एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर प्रत्येक वेळी मनावर ओझं आल्यासारखं वाटणं, या गोष्टींकडे आता दुर्लक्ष केलं जात नाही. ‘या नात्यामुळे मला स्वत:बद्दल कसं वाटतं?’ हा प्रश्न स्वत:ला अशा प्रसंगी विचारला जातो. त्यामुळे काहीजण मित्रमैत्रिणींचा छोटा ग्रुप करतात, काही नात्यांमध्ये स्पष्ट बाउंडरीज ठेवतात, तर काही जण संवाद कमी करण्याचा किंवा पूर्णपणे अंतर ठेवण्याचा निर्णयसुद्धा घेतात.
मानसिक आरोग्याबद्दल वाढलेली जागरूकता हे यामागचं मुख्य कारण आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सततचा ताण, टीका, भीती किंवा भावनिक अस्थिरता यामुळे शरीराची स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीम वारंवार सक्रिय राहू शकते. अशा वातावरणात व्यक्ती सतत अलर्ट मोडमध्ये राहते. परिणामी चिडचिड, ओव्हरथिंकिंग, अस्वस्थता, थकवा किंवा आत्मविश्वास कमी होण्यासारखे अनुभव येऊ शकतात. याउलट सुरक्षित आणि विश्वासार्ह नात्यांमध्ये व्यक्तीला आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करता येतात. त्यामुळे चांगली नाती ही केवळ सोबत देत नाहीत, तर भावनिक स्थैर्यालाही हातभार लावतात.
म्हणूनच नात्याला प्रश्न विचारणं, नात्याबद्दल स्वत:ला प्रश्न विचारणं आणि वेळ आलीच तर इतरांनाही प्रश्न विचारणं आता महत्त्वाचं झालं आहे.
या बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘बाउंडरीज’. पूर्वी स्वत:साठी मर्यादा आखणं म्हणजे स्वार्थीपणा किंवा नातं तोडण्याची सुरुवात मानली जायची. आता मात्र ‘नाही’ म्हणण्याची क्षमता ही स्वत:ची काळजी घेण्याचा भाग मानली जाते. प्रत्येक फोनला लगेच उत्तर देणं, प्रत्येक वेळी उपलब्ध राहणं, समोरच्याच्या प्रत्येक अडचणीची जबाबदारी घेणं किंवा आपल्याला न पटणार्या गोष्टीही केवळ नातं टिकवण्यासाठी स्वीकारणं, हे जुने ट्रेंड्स आता आवश्यक नाहीत, ही जाणीव तरुणांमध्ये वाढताना दिसते. सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्यावरच्या चर्चांमुळे ‘इमोशनल बाउंडरीज’, ‘सेल्फ केअर’ आणि ‘डिटॅचमेंट’ यांसारख्या संकल्पना सामान्य चर्चेचा भाग झाल्या आहेत.
मात्र, याचा अर्थ जेन झी प्रत्येक मतभेदाला ‘टॉक्सिक’ म्हणते असा होत नाही. प्रत्येक नात्यात गैरसमज होतात, भांडणं होतात, कधी समोरच्याचं मत आपल्याला पटत नाही. त्याचा अर्थ ते नातं लगेच विषारी आहे असं होत नाही. टॉक्सिक वागणं आणि नुसता वाद किंवा मतभेद यांच्यात फरक करणं महत्त्वाचं आहे. या गोष्टीचीसुद्धा जेन झी आणि मिलेनियल्सना पूर्णपणे जाणीव आहे. सतत अपमान करणं, नियंत्रण ठेवणं, भावनिक दबाव आणणं, सतत अपराधी वाटायला लावणं किंवा आपल्या बाउंडरीजचा आदर न करणं हे टॉक्सिक वागणं आहे.
आजच्या तरुणांसाठी नात्यांची संख्या कमी असली तरी त्यांची गुणवत्ता महत्त्वाची ठरते आहे. मोठं फ्रेंड सर्कल असण्यापेक्षा दोन-चार अशी माणसं असावीत ज्यांच्यासमोर स्वत:ला सतत सिद्ध करण्याची गरज भासू नये, अशी अपेक्षा वाढली आहे. ‘व्हाइब मॅच होते का?’, ‘या व्यक्तीसोबत मी कम्फर्टेबल आहे का?’, ‘या नात्यानंतर मला हलकं वाटतं की जड?’ असे प्रश्न आता सहज विचारले जातात. हे प्रश्न केवळ नात्यांपुरते मर्यादित नसून कामाचं ठिकाण, सोशल मीडिया, कुटुंबातील संवाद आणि रोजच्या भावनिक वातावरणालाही लागू होतात.
नात्यांमध्ये अंतर ठेवणं म्हणजे नाती नाकारणं नाही. उलट, स्वत:च्या मानसिक शांततेची जाणीव ठेवून कोणाला किती जवळ ठेवायचं, कुठे सीमा आखायची आणि कुठे मनापासून जोडून राहायचं, हे समजून घेणं आहे. ‘सगळ्यांना खूश ठेवणं’ यापेक्षा ‘स्वत:शी प्रामाणिक राहणं’ महत्त्वाचं वाटू लागलं आहे, हा कदाचित या पिढीच्या नात्यांबद्दलच्या दृष्टिकोनातला सर्वात मोठा बदल आहे. कारण, आयुष्यात माणसं भरपूर असणं महत्त्वाचं असलं, तरी त्या माणसांच्या गर्दीत आपलं मन हरवून जाऊ नये, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
viva@expressindia.com
