एकेकाळी तरुणाईच्या आयुष्यातला ‘वीकेंड प्लॅन’ म्हणजे मित्रांसोबत पार्टी, भरपूर भटकंती, कॅफे किंवा ट्रिप असं समीकरण जवळपास नक्की होतं. मात्र, आता या समीकरणात पुन्हा बदल होताना दिसतोय. जेन झी आणि मिलेनियल जनरेशनमधल्या तरुणांना इतका वेळ इतक्या कारणांसाठी सतत घराबाहेर राहावं लागतं. त्यामुळे पुन्हा ‘एन्जॉय’ करण्यासाठी बाहेर जाण्यापेक्षा घरात थांबणं, कुटुंबासोबत जेवणं, आई – बाबांशी गप्पा मारणं, भावंडांसोबत वेळ घालवणं किंवा एकत्र फिल्म किंवा सीरिज पाहणं जास्त समाधानकारक वाटू लागलं आहे. आईबाबांना, आजीआजोबांना सुद्धा वेब सीरिजची, ओटीटीची आणि आपल्यासोबत बिंज वॉच करायची जवळजवळ सवयच या तरुणाईने लावली आहे.
२०२६ मधल्या काही सर्वेक्षणांमध्ये तरुणाईत प्रत्यक्ष भेटणं आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवणं याला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे, असं आढळून आलं. काही निरीक्षणांनुसार जेन झीमध्ये त्यांच्याच भाषेत ‘हार्ड सोशलायझिंग’पेक्षा शांत आणि कमी तणाव असलेला सहवास अधिक लोकप्रिय होतो आहे. बाहेर जाऊन इतरांशी बोलण्यात असलेला त्रास, कोणाला काय वाटेल, काय बोलावं किंवा न बोलावं, त्यासाठी करावा लागणारा विचार, घ्यावे लागणारे एफर्ट्स, यापेक्षा घरच्या माणसांसोबत असलेला कम्फर्ट घेत राहणं हे त्यांना जास्त सोईचं वाटतं.
यामध्ये मेंटल हेल्थचा संबंध मात्र अधिक महत्त्वाचा आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या माणूस हा केवळ डिजिटल संपर्कावर जगणारा प्राणी नाही. आपलेपणाची भावना, भावनिक सुरक्षितता आणि ‘कोणीतरी आपल्याला समजून घेतंय’ ही जाणीव मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असते. सततच्या सूचना, सोशल मीडियावर होत असणारी तुलना, कामाचा ताण, भविष्याबद्दलची अनिश्चितता यामुळे मेंदूवर सतत लोड आणि स्ट्रेस राहू शकतो. प्रत्यक्ष अर्थात फिजिकल किंवा ऑफलाइन संवाद, या सततच्या डिजिटल त्रासापासून विश्रांती देऊ शकतो. कुटुंबातल्या नेहमीच्या, कम्फर्टेबल आणि सवयीच्या व्यक्तींशी बोलणं हे इमोशनल रेग्युलेशन/ मॅनेजमेंटसाठी मदत करू शकतं. आपल्या विचारांबद्दल मनमोकळं बोलणं, कोणीही आपल्याला जज न करता ऐकणं आणि ऐकणार्याला आपल्याबद्दल कोणतीही निगेटिव्ह भावना नाहीये याची खात्री असणं, ही सध्या खूप दुर्मिळ झालेली आणि गरजेची असलेली गोष्ट आहे. त्यामुळे ‘कुटुंबासोबत वेळ’ हा केवळ एक पर्याय नाही, तर मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेला रुटीनचा भाग होत चालला आहे.
विशेष म्हणजे आजची तरुणाई मानसिक आरोग्याबद्दल पूर्वीपेक्षा जागरूक आहे. चिंता, ताण, एकटेपणा किंवा भावनिक थकवा याबद्दल बोलण्यात त्यांना काहीच अडचण नाही. कोणापाशी आपण काय बोलू शकतो याचा मात्र पूर्ण विचार करून ही तरुणाई व्यक्त होताना दिसते. यामुळे ‘फॅमिली टाइम’ची व्याख्याही बदलते आहे. पूर्वी कुटुंबासोबतचा वेळ म्हणजे सण, लग्नसमारंभ किंवा कौटुंबिक कार्यक्रम असं साधारण मानलं जायचं. आता मात्र रोजच्या छोट्या गोष्टींना महत्त्व मिळतंय. आई-बाबांसोबत सकाळचा चहा, रविवारी एकत्र स्वयंपाक, आजी-आजोबांशी गप्पा, भावंडांसोबत तासनतास बोलणं किंवा रात्री फोन बाजूला ठेवून एकत्र जेवणं, अशा साध्या गोष्टी ‘वेलनेस’चा भाग बनतायेत. मानसिक आरोग्यासाठी नेहमी महागडे उपचार, सुट्ट्या किंवा वेगळं काही करायला हवंच असंही नाही. यातला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ‘कुटुंब’ या संकल्पनेची बदलती व्याख्या. आजच्या तरुणांसाठी कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचं नातं नव्हे इमोशनल सिक्युरिटी देणारे इतर लोकही असू शकतात. काहींसाठी आईबाबा आणि भावंडं, तर काहींसाठी जवळचे मित्र, जोडीदार किंवा इतर कोणत्याही जवळच्या व्यक्ती हे मानसिक आधाराचं ठिकाण ठरू शकतात. त्यामुळे हा ट्रेंड पारंपरिक कुटुंबाकडे परत जाण्यापेक्षा ‘आपल्याला सुरक्षित आणि कम्फर्टेबल कोणासोबत वाटतं?’ या प्रश्नाकडे वळण्याचा आहे.
सतत धावत असणार्या जगात थोडासा शांतपणा स्क्रीनच्या ऐवजी माणसांमध्ये शोधायची या तरुणाईची गरज कुटुंबांना एकमेकांशी जोडून ठेवणारी आहे. माणसांची सपोर्ट सिस्टम उभी करण्यासाठी आताची ही तरुणाई मनापासून प्रयत्न करते आहे. मित्रमैत्रिणींना होस्ट करण्यापासून ते नातेवाईकांमध्ये मिसळून गप्पाटप्पा करण्यापर्यंत आणि जाणीवपूर्वक फॅमिली टाइम प्लॅन करण्यापर्यंत सगळ्या प्रकारे तरुणाई मेहनत घेते आहे.
viva@expressindia.com
