वेदवती चिपळूणकर परांजपे
पूर्वी घराघरात एक तरी प्राणी असायचा, किंबहुना जास्तच! गोठ्यात गुरं, दारात एखादा कुत्रा, घरात मांजर अशा प्राण्यांचा वावर प्रत्येकाच्या आयुष्यात होता. काळाच्या ओघात गोठा गायब झाला, पण प्राणी आणि माणसाची जवळीक तशीच राहिली. आताच्या काळात कुत्रा किंवा मांजर घरात आणणं ही फक्त हौस राहिलेली नाही. आताची तरुणाई त्यांना घरातला मेंबर, मित्र आणि अगदी कुटुंबाचा भाग मानतात. जेन झी आणि मिलेनियल्समध्ये ‘पेट पेरेंटिंग’ ही संकल्पना लोकप्रिय होते आहे. सोशल मीडियावरही पाळीव प्राण्यांसोबतचे फोटो, त्यांचे वाढदिवस, छोट्या ट्रिप्स, खेळ आणि रोजच्या गमतीजमती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या सगळ्यामागे फक्त त्यांचा गोंडसपणा नाही, तर त्यांच्यासोबत राहिल्यामुळे मिळणारा भावनिक आधार मोलाचा असतो. वेगवान, धावपळीच्या आणि सतत बाहेरच्या जगाशी कनेक्टेड राहण्याच्या दिवसांत एखादा जीव आपल्या आयुष्याचा कायमचा सोबती आहे, ही भावना अनेक तरुणांना जवळची वाटते आहे.
आजचं जीवन खूप वेगवान आहे. कॉलेज, नोकरी, कामाचा ताण, प्रवास, स्क्रीनसमोरचा वाढता वेळ आणि सतत काहीतरी करत राहण्याची सवय यामुळे दिवस कधी संपतो हेच कळत नाही. अशा वेळी घरी परतल्यावर कुणीतरी आपली वाट पाहत आहे, ही भावना खूप वेगळी असते. कुत्रा दारात उभा राहून शेपूट हलवत स्वागत करतो, मांजर जवळ येऊन शांतपणे बसते किंवा आपण दिवसभर काय केलं याची काहीही चौकशी न करता, कोणतेही सल्ले न देता किंवा भांडण न करता आपल्यासोबत राहते. हे क्षण मनाला सहजपणे हलकं करतात. पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवताना आपण कसे दिसतो, किती यशस्वी आहोत किंवा दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, या आणि अशा अनेक प्रश्नांना काही काळ बाजूला ठेवता येतं. त्यांच्या सहवासात कोणताही दिखावा करावा लागत नाही. कदाचित म्हणूनच त्यांच्यासोबतचा वेळ इतका मनमोकळा, कम्फर्टेबल आणि हवाहवासा वाटतो.
मेंटल हेल्थच्या दृष्टीने पाहिलं तर या अनुभवामागे काही शारीरिक आणि मेंदूशी संबंधित प्रक्रिया देखील असतात. आपल्या आवडत्या पाळीव प्राण्याला जवळ घेणं, त्याच्यावरून हात फिरवणं किंवा त्याच्याशी प्रेमाने संवाद साधणं यामुळे शरीरातील ऑक्सिटोसिन या हार्मोनच्या पातळीत वाढ होऊ शकते. हे हार्मोन आपलेपणा, माणसांमधले संबंध आणि सुरक्षिततेच्या भावनेशी संबंधित आहे. त्याच वेळी काही अभ्यासांमध्ये अशा सहवासानंतर कॉर्टिसॉलची लेव्हल कमी झाल्याचंही दिसून आलं, जे खरं तर तणावाशी संबंधित हार्मोन आहे. वाढलेल्या हार्टबिट्स कमी होणं किंवा तणावाच्या इतर शारीरिक लक्षणांमध्ये कमी होण्याची चिन्हं दिसली आहेत. म्हणजेच, ‘पाळीव प्राण्यासोबत बसल्यावर मला बरं वाटतं’… या बरं वाटण्याचा प्रत्यक्ष शरीर आणि मेंदूवरही सकारात्मक परिणाम होतो. याचा मानसशास्त्राशी संबंध आणखी एका पातळीवर आहे. ताण आला की आपलं शरीर अलर्ट मोडमध्ये जातं. अशा वेळी एखाद्या विश्वासू पाळीव प्राण्याची शांत उपस्थिती ही मनाला एक प्रकारची ‘सेफ फीलिंग’ देऊ शकते. प्राण्याला कुरवाळणं, त्याच्यासोबत बसणं किंवा खेळणं यामुळे लक्ष काही काळासाठी आपल्या चिंतांपासून दूर जाऊ शकतं. मानसशास्त्रात याला सोशल सपोर्ट आणि इमोशनल रेग्युलेशन किंवा मॅनेजमेंटच्या दृष्टीने पाहता येतं.
पाळीव प्राण्यांसोबतचं नातं खास असतं, कारण त्यात मोठमोठ्या शब्दांची गरज नसते. आपण उदास असलो, चिडलेलो असलो किंवा एखाद्या गोष्टीने मन खट्टू झालं असेल, तरी त्यांच्यासोबत काही वेळ बसल्याने वातावरण बदलतं. म्हणूनच अनेकजण पाळीव प्राण्यांबद्दल ‘तो माझा मित्र आहे’, ‘ती माझं ऐकते’ किंवा ‘घरी आल्यावर माझा मूड बदलतो’ असं सांगताना दिसतात.
हे नातं केवळ प्रेम देत नाही, तर रोजच्या आयुष्यात एक भावनिक आधारही तयार करतं. विशेषत: एकट्याने राहणार्या तरुणाईसाठी ही सोबत महत्त्वाची ठरू शकते. सोशल मीडियावर शेकडो लोकांशी जोडलेले असूनही प्रत्यक्ष जीवनात एकटेपणा जाणवू शकतो, अशा वेळी घरातील पाळीव प्राणी न कंटाळणारी सोबत देतो. माणसांसारख्या मागण्या न करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपला पेट आपल्यासोबत फक्त ‘असतो’ आणि तेवढा आधारसुद्धा खूप मोठी शक्ती देऊन जातो.
या पेट पेरेंटिंगमध्ये ‘रुटीन’ हाही एक महत्त्वाचा भाग आहे. घरात पेट असलं की आपल्याला काही गोष्टी नियमित कराव्याच लागतात. सकाळी उठून त्याला फिरायला नेणं, वेळेवर खाऊ देणं, त्याच्यासोबत खेळणं, त्याची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणं! या सगळ्यामुळे दिवसाला एक लय मिळते, रुटीन मिळतं आणि अनेकांना जगण्याचा परपज मिळतो. आजच्या अनियमित जीवनशैलीत या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. ‘आज काहीच करण्याची इच्छा नाही’ असं वाटत असलं तरी तुमचा कुत्रा फिरायला जाण्यासाठी तयार असतोच. त्यामुळे आपण घराबाहेर पडतो, थोडं चालतो, हवेत फिरतो आणि दिवसात हालचाल येते. म्हणजेच आपला पेट आपल्याला नकळत काही नियमित सवयी लावतो.
मात्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळीव प्राणी हा मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार नाही. डिप्रेशन, स्ट्रेस किंवा इतर मानसिक अडचणी असल्यास तज्ज्ञांची मदत आवश्यकच असते. पण, रोजच्या आयुष्यात मनाला आधार देणारी संगत आणि निरपेक्ष आपलेपणाची भावना देणारा सोबती म्हणून पेट्सची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरते. कदाचित म्हणूनच आजच्या जेन झीला परिपूर्ण आयुष्य म्हणजे ‘आपलं कुणीतरी आहे’ ही भावना महत्त्वाची वाटते. स्क्रीनच्या पलीकडे जाऊन एखाद्या जिवंत प्राण्याशी जोडलं जाणं, त्याची काळजी घेणं आणि बदल्यात नि:स्वार्थ प्रेम मिळणं, ही गोष्ट आजच्या धावपळीच्या जीवनात खरोखरच मौल्यवान ठरते. म्हणूनच पेट हा आता केवळ घरातला ‘एक प्राणी’ राहिलेला नाही; तो तरुणाईसाठी मित्र, रोजचा सोबती आणि मनाला हलकं करणारा नवा आधार बनला आहे.
viva@expressindia.com
