‘अरे, इअरफोनची वायर पुन्हा गुंतली!’, ‘फोटो धुऊन आले की सांग हं!’, ‘आज संध्याकाळी सगळे मिळून कॅरम खेळू या!’… काही वर्षांपूर्वी ही वाक्यं आपल्या रोजच्या आयुष्याचा अगदी सहज भाग होती. गाणी ऐकण्यासाठी कानात वायरचे इअरफोन असायचे, सहलीतले फोटो डिजिटल कॅमेर्‍यात टिपले जायचे आणि ते कसे आले असतील याची उत्सुकता अनेक दिवस मनात असायची. घरातल्या कपाटात फोटो अल्बमची रांग असायची, वाढदिवस किंवा सुट्टीच्या दिवशी कॅरम, लूडो, बुद्धिबळ किंवा पत्त्यांचे डाव रंगायचे. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी डायरीची पानं असायची, तर संगीताची आवड जपण्यासाठी सीडी किंवा कॅसेट्सचा संग्रह. आयुष्य थोडं संथ होतं, पण त्यात माणसांशी जोडणारा एक वेगळाच उबदारपणा होता.

मग तंत्रज्ञानाने झपाट्याने वेग घेतला. स्मार्टफोन हातात आले, वायरलेस गॅझेट्सनी वायर्सची जागा घेतली, सोशल मीडियाने फोटो अल्बमची आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी सीडी-कॅसेट्सची जागा घेतली. मैफिलींची जागा व्हिडीओ कॉल्सनी घेतली, बोर्ड गेम्सची जागा मोबाइल गेम्सनी घेतली आणि डायरीची जागा सोशल मीडिया पोस्ट्सनी. ‘जुनं’ म्हणजे कालबाह्य आणि ‘नवं’ म्हणजे प्रगती, अशीच जणू व्याख्या तयार झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत एक वेगळंच चित्र दिसू लागलं आहे. डिजिटल जगात जन्मलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढलेली जेन झी पिढी पुन्हा एकदा याच जुन्या वस्तू, सवयी आणि छंदांकडे आकर्षित होते आहे.  2‘ हा प्रकार जेनझीमध्ये प्रचलित झाला आहे, याचा अर्थ २००० साली जे जे काही स्टाइल, ट्रेंड्स होते ते त्यांना पुन्हा आवडायला लागले आहेत आणि त्या वस्तूंचं पुनरागमन, वापर पुन्हा तरुण पिढीकडून होताना दिसत आहे. 

‘स्मार्ट’ जगात ‘रेट्रो’ची क्रेझ

वायरलेसच्या युगात पुन्हा वायरचे इअरफोन

काही वर्षांपूर्वी वायरलेस इअरबड्स हे आधुनिकतेचे प्रतीक मानले जात होते. त्यामुळे वायरचे इअरफोन कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये कायमचे पडून राहिले. मात्र, आता अनेक तरुण पुन्हा वायरचे इअरफोन वापरताना दिसतात. यामागे फक्त  2ङ फॅशनचा प्रभाव नाही, तर त्यांची उपयुक्तताही आहे. चार्जिंगची चिंता नाही, बॅटरी संपण्याचा प्रश्न नाही आणि हरवण्याची भीतीही कमी. त्याचबरोबर, हे इअरफोन आजच्या फॅशनचा भाग बनले आहेत. जेनझीच्या फॅशन ट्रेंडसोबत हे इअरफोन्स अगदी ट्रेंडी होताना दिसत आहेत.

पुन्हा डिजिटल कॅमेर्‍यांकडे

प्रिंटेड फोटोची आवड पुन्हा निर्माण झाल्यामुळे अर्थातच डिजिटल कॅमेरा दिसू लागला आहे. स्मार्टफोनमध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे असतानाही पॉइंट-अँड-शूट कॅमेरे आणि फिल्म कॅमेरे पुन्हा लोकप्रिय होत आहेत. त्यातून मिळणारे किंचित धूसर, फ्लॅश असलेले आणि अनफिल्टर्ड फोटो अधिक नैसर्गिक वाटतात. प्रत्येक फोटो परफेक्ट असण्यापेक्षा तो खरी आठवण जपणारा असावा, अशी भावना या ट्रेंडमागे आहे. लहान मुलांकडेसुद्धा हल्ली ते इन्स्टंट फोटो देणारा कॅमेरा दिसायला लागला आहे. 

डम्ब फोनचा वापर

पूर्वी फोन करण्यासाठी साधा छोटासा फोन असायचा, त्यातली एक फॅशन म्हणजे फ्लिपचा फोन. आता तसेच फोन पुन्हा दिसू लागले आहेत. सततचा स्क्रीनटाइम आणि सोशल मीडियाचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होऊ लागला आहे. डिजिटल डिटॉक्स हा प्रकार त्यामुळे प्रचलित होऊ लागला आहे. स्वत:ची चॉइस म्हणूनसुद्धा तरुण मुलांकडे आता साधा फोन दिसतो आहे.

वीकेंड, सुट्ट्या किंवा प्रवासादरम्यान हे तरुण स्मार्टफोनऐवजी फक्त कॉल आणि मेसेजसाठी वापरता येणारे साधे फोन वापरणे पसंत करतात. इंटरनेट, सोशल मीडिया ॲप्स किंवा सतत येणार्‍या नोटिफिकेशन्सपासून काही काळ दूर राहण्याचा हा प्रयत्न असतो. त्यामुळे स्क्रीन टाइम कमी होतो, सतत मोबाइल तपासण्याची सवय कमी होते आणि समोरच्या व्यक्तीशी किंवा आजूबाजूच्या वातावरणाशी अधिक चांगल्या प्रकारे आपण जोडले जातो.

विशेष म्हणजे, हा ट्रेंड तंत्रज्ञानाला नाकारण्याचा नाही. उलट, तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कशासाठी करायचा, यावर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. ‘डिजिटल डिटॉक्स’, ‘स्लो लिव्हिंग’ आणि ‘माइंडफुलनेस’ यांसारख्या संकल्पनांशी हा बदल जोडला जातो. सतत ऑनलाइन राहण्याऐवजी काही वेळ स्वत:साठी, नातेसंबंधांसाठी आणि प्रत्यक्ष अनुभवांसाठी राखून ठेवण्याची मानसिकता या ट्रेंडमधून दिसून येते.

फॅशन आणि ब्युटीतही साधेपणा

‘बेअर नेल्स’चा ट्रेंड

मधल्या काळात पाश्चिमात्य संस्कृतीमुळे नेल आर्ट, नेल एक्स्टेंशनचा मोठा ट्रेंड होता. आता पुन्हा एकदा नैसर्गिक, स्वच्छ आणि निरोगी नखांचा ट्रेंड वाढतो आहे. सौंदर्याच्या बाबतीत ह्य्छी२२ ्र२ टः१ीह्ण ही संकल्पना पुन्हा लोकप्रिय होते आहे. कमी मेकअप, नैसर्गिक त्वचा आणि मिनिमल लुक यालाही प्राधान्य दिले जाते आहे.

2ङ फॅशनचे पुनरागमन

बॅगी जीन्स, कार्गो पँट्स, बेबी टीज, डेनिम ऑन डेनिम, रंगीत सनग्लासेस, स्लिंग बॅग्स आणि रेट्रो स्नीकर्स यांसारखे १९९० आणि २००० च्या दशकातील फॅशन ट्रेंड्स पुन्हा एकदा तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. अनेक ब्रँड्सही या ट्रेंड्सना नव्या स्वरूपात बाजारात आणत आहेत.

व्हिंटेज ॲक्सेसरीजचे आकर्षण

मोठ्या फ्रेमचे सनग्लासेस, बीडेड ज्वेलरी, स्क्रंचीज, क्लॉ क्लिप्स आणि जुने घड्याळांचे डिझाईन्स पुन्हा फॅशनमध्ये आले आहेत. अनेक जण थ्रिफ्ट स्टोअर्स आणि प्री-लव्ह्ड फॅशनकडेही वळत आहेत.

रेट्रो लाइफस्टाइल

बोर्ड गेम्सची पुन्हा रंगतेय मैफल

मोबाइल गेम्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या गर्दीत एके काळी विस्मरणात गेलेले कॅरम, लूडो, स्क्रॅबल, बुद्धिबळ, पत्ते यांसारखे बोर्ड गेम्स पुन्हा लोकप्रिय होत आहेत. अनेक कॅफे बोर्ड गेम्सची संकल्पना घेऊन सुरू झाले आहेत. मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत प्रत्यक्ष बसून खेळण्याचा आनंद स्क्रीनवर मिळत नाही, ही जाणीव तरुणांना पुन्हा या खेळांकडे घेऊन येत आहे. गेट टुगेदर, सुट्टीतली भटकंती यानिमित्ताने एकत्र जमल्यावर विविध खेळ खेळण्याची पद्धत पुन्हा एकदा दिसायला लागली आहे.

डायरी, पुस्तके आणि हस्ताक्षर

डिजिटल नोट्स, ई-बुक्स आणि सोशल मीडिया पोस्ट्सच्या युगात हाताने डायरी लिहिणे, पुस्तके वाचणे आणि हस्ताक्षरात नोट्स तयार करणे या सवयी पुन्हा वाढत आहेत. अनेक तरुण जर्नलिंगला मानसिक आरोग्य सुधारण्याचे साधन मानतात. ग्रॅटिट्यूड जर्नल, ट्रॅव्हल जर्नल असे वेगवेगळे प्रयोग तरुण पिढी जर्नलिंगमध्ये करताना दिसतेय. पुस्तकांच्या दुकानांमध्ये होणारे बुक क्लब्स, वाचनाचे कार्यक्रम आणि लेखकांशी संवाद या उपक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हल्ली असे बरेच कॅफे आणि वर्किंग स्पेस झाल्यात जिथे तुम्ही वाचन, लेखन, आपापली कामे करू शकता, अशा ठिकाणी तरुण पिढी जास्त दिसू लागली आहे. पुस्तके आणि डायरी या केवळ जुन्या सवयी राहिलेल्या नाहीत, तर अधिक संथ, एकाग्र आणि अर्थपूर्ण जीवनशैलीची ओळख बनू लागली आहेत.

हस्तकला आणि  ऊक छंद

एक काळ असा होता की क्रोशे, विणकाम, भरतकाम, पॉटरी, मेणबत्त्या बनवणे किंवा हस्तचित्रकला यांसारख्या कलांना मुख्यत: आजी-आईंचे छंद म्हणून पाहिले जायचे. आधुनिक जीवनशैली, व्यग्र दिनक्रम आणि डिजिटल मनोरंजनामुळे हे छंद हळूहळू मागे पडले. मात्र, आज परिस्थिती बदलताना दिसते आहे. जेन झी आणि तरुण व्यावसायिक पुन्हा या पारंपरिक हस्तकलांकडे नव्या दृष्टीने पाहू लागले आहेत.

आज शहरांमध्ये पॉटरी स्टुडिओ, क्राफ्टिंग वर्कशॉप्स, कँडल मेकिंग, टेरॅकोटा आर्ट, क्रोशे आणि भरतकाम शिकवणार्‍या कार्यशाळांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. वीकेंडला मॉल किंवा सिनेमागृहात जाण्यापेक्षा अनेक तरुण आता अशा क्रिएटिव्ह वर्कशॉप्समध्ये सहभागी होण्याला प्राधान्य देतात. काही जण स्वत:च्या घराच्या सजावटीसाठी वस्तू तयार करतात, तर काही या छंदाचे रूपांतर छोट्या व्यवसायातही करत आहेत.

या सर्व ट्रेंड्सच्या मुळाशी एक समान धागा आहे तो म्हणजे ‘डिजिटल थकवा’ आणि धावती, न थांबणारी जीवनशैली. सतत स्क्रीनसमोर राहणे, सोशल मीडियावरील परिपूर्णतेची स्पर्धा आणि सतत उपलब्ध राहण्याचा ताण यामुळे अनेक तरुण आता अधिक संथ, साधे आणि वास्तवाशी जोडलेले आयुष्य शोधत आहेत.

फॅशन विश्वात आणि इतर सगळ्याच बाबतीत पाश्चिमात्य संस्कृतीत जे दिसायचे ते प्रचलित व्हायचे. आताच्या काळात जेनझी पिढी जगात ट्रेंड कोणताही असला तरी स्वत:ला जे आवडते तेच करते, थोडाफार त्याचा प्रभाव पाश्चिमात्य असेलही, पण आता मन:शांती, स्वत:ची आवड, मानसिक आरोग्य याला जे साजेसं आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न अधिक दिसतो. हे ट्रेंड्स सोडून पूर्वीसारखे हेल्दी लाइफसायकल, हेल्दी डाएटमध्ये जे जे काही असते; उदाहरणार्थ, व्यायाम, वेळेवर झोप, जेवणातले विशिष्ट पदार्थ, योगासने या सगळ्यावर तरुण पिढीचा अधिक भर आहे.  

आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारतानाच, जीवनात काही गोष्टी अनफिल्टर्ड, अनप्लग्ड असाव्यात ज्या खर्‍या वाटतील, ही भावना वाढीस लागली आहे. कदाचित, म्हणूनच जुन्या वस्तू आणि सवयी आज पुन्हा नव्या पिढीच्या आयुष्याचा भाग बनत आहेत.