स्नेह एरंडे
आजचा शब्द आहे ‘एट’ (ate). पहिल्यांदा हा शब्द ऐकल्यावर याचा संबंध खाण्याशी आहे असंच वाटतं, कारण इंग्रजीत एट या शब्दाचा अर्थ ‘खाल्लं’ असा होतो. पण, जेन झीच्या स्लँगमध्ये कुणी ‘‘शी एट’’ किंवा ‘‘यू एट दॅट’’ असं म्हणतं, तेव्हा त्याचा अर्थ त्या व्यक्तीने काही खाल्लं आहे असा होत नाही. इथे ताट, चमचा किंवा जेवणाचा काहीही संबंध नाही.
अ: कालचं तिचं सादरीकरण पाहिलंस का?
ब: हो! तिने तर पूर्ण एट केलं.
अ: म्हणजे तिने सादरीकरण खाल्लं?
ब: अरे नाही! तिने ते इतकं छान केलं की सगळेच प्रभावित झाले.
जेन झीच्या भाषेत एट म्हणजे एखादी गोष्ट अत्यंत उत्तम प्रकारे करणं, पूर्णपणे बाजी मारणं किंवा इतकं प्रभावी दिसणं की बाकीच्यांकडे कौतुक करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. एखाद्या व्यक्तीने जबरदस्त नृत्य केलं, भाषण आत्मविश्वासाने दिलं, योग्य वेळी भन्नाट उत्तर दिलं किंवा एखादा पेहराव इतक्या आत्मविश्वासाने मिरवला की सगळ्यांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं, तर आपण म्हणतो, ‘‘त्या व्यक्तीने एट केलं.’’ उदाहरणार्थ, तुमची मैत्रीण स्पर्धेसाठी रंगमंचावर उभी राहते. सुरुवातीला ती थोडी घाबरलेली असते, पण संगीत सुरू होताच तिचा आत्मविश्वास खुलतो. तिची प्रत्येक हालचाल अचूक असते, चेहर्यावर योग्य भाव असतात आणि शेवटी संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमतं. अशा वेळी ‘‘छान केलंस’’ म्हणणं बरोबर आहेच, पण ‘‘यू एट दॅट’’ म्हटलं की कौतुकाच्या शब्दांतून अजून थोडी ऊर्जा जाणवते. मराठीतही अनेकदा तरुणाई ‘खाऊन टाकलंस भावा…’ म्हणत आपल्या मित्र-मैत्रिणींना चीअर करताना दिसते.
हा शब्द फक्त दिसण्यासाठी किंवा रंगमंचावरच्या सादरीकरणासाठी वापरला जात नाही. कुणी परीक्षेत अवघड प्रश्नाचं अचूक उत्तर लिहिलं, बैठकीत सगळ्यांना पटेल असा मुद्दा मांडला किंवा वादात शांतपणे योग्य उत्तर दिलं, तरी ती व्यक्ती एट करू शकते. म्हणजे एखादा परिणाम पाहून मनातून सरळ ‘‘वा!’’ बाहेर पडलं, तर हा शब्द तिथे अगदी योग्य बसतो.
या शब्दाबरोबर आणखी एक वाक्य ऐकायला मिळतं, ‘‘ Ate and left no crumbs’’ याचा शब्दश: अर्थ एकही कण उरला नाही असा होतो, पण स्लँगमध्ये या शब्दाचा अर्थ, त्या व्यक्तीने गोष्ट इतकी उत्तम केली की सुधारण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी काही शिल्लकच उरलं नाही. कुक्ड (Cooked), कुकिंग (cooking) आणि एट (ate) यांच्यातला फरकही मजेशीर आहे. ‘कुक्ड’ म्हणजे आपण अडकलो आहोत. ‘कुकिंग’ म्हणजे काहीतरी चांगलं घडतं आहे. आणि ‘एट’ म्हणजे काम पूर्ण झालं, परिणाम समोर आला आणि आपण बाजी मारली.
मग तुमचं काय?
अलीकडे कुणाला पाहून तुम्हाला वाटलं, ‘‘हो, या व्यक्तीने खरंच एट केलं’’?
