स्नेह एरंडे
आजचे शब्द आहेत मेन क्वेस्ट ( Main Quest) आणि साईड क्वेस्ट ( Side Quest).

हे दोन्ही शब्द गेमिंगमधून आले आहेत.

गेममध्ये मेन क्वेस्ट म्हणजे मुख्य स्टोरी पुढे नेणारं काम. ते पूर्ण केल्याशिवाय गेमचा मोठा प्रवास पुढे जात नाही. तर साई़़ड क्वेस्ट मात्र थोडी वेगळी असते. ती मेन स्टोरीसाठी नेहमीच आवश्यक नसते, पण ती केल्यावर आपल्याला काहीतरी नवीन मिळतं, नवीन जागा दिसते, एखादं वेगळं स्किल सापडतं किंवा मग स्टोरीचा दुसरा भाग समजतो.

आमच्या जनरेशनसाठी गेम्स हा लहानपणापासूनच आयुष्याचा मोठा आणि अविभाज्य भाग राहिला आहे. माईनक्राफ्ट (Minecraft) सारख्या गेममधूनच आम्हाला वुड, स्टोन, आयर्न, डायमंड असे मटेरिअल्स आणि त्यांच्या वेगवेगळ्या युज केसेस लहान वयापासून समजत गेल्या. काही बनवायचं असेल तर आधी रिसोर्सेस गोळा करायचे, योग्य टुल बनवायचं आणि मग पुढे जायचं. त्यामुळे आयुष्यातल्या गोष्टींकडेही गेमच्या दृष्टिकोनातून बघणं हे आमच्यासाठी खूप स्वाभाविक आहे. आणि म्हणून मेन क्वेस्ट आणि साईड क्वेस्ट हे शब्द आता गेमच्या बाहेर रोजच्या आयुष्यातही वापरले जातात. समजा, एखादा माणूस रोज ९ ते ६ या वेळेत जॉब करतो. त्याचं करीअर, त्याचं रोजचं काम आणि त्यातून पुढे जाणं हा त्याचा मेन क्वेस्ट असू शकतो. पण, त्याच माणसाने वीकेंडला गावाकडे जाऊन शेती सुरू केली. त्याला फार्मिंग आवडत असेल, तर त्यासाठी तो वेगळा वेळ काढतो, नवीन गोष्टी शिकतो आणि कदाचित काही वर्षांनी त्यातून काहीतरी मोठंही तयार होतं. ही काही छोटी हॉबी नाही. ती सिग्निफिकन्ट आहे, मेन रुटपासून थोडी बाजूला आहे, पण तरीही एक प्रॉपर क्वेस्ट आहे. हाच त्याचा साईड क्वेस्ट.साईड क्वेस्ट म्हणजे कमी महत्त्वाची गोष्ट असते असं नाही. काही वेळा या साईड क्वेस्टमधूनच आपल्याला स्वत:बद्दल जास्त कळतं. एखादा इंजिनिअर वीकेंडला म्युझिक बनवत असेल. कुणी कॉलेज करता करता छोटा बिजनेस चालवत असेल. कुणी फुल टाईम जॉब बरोबरच मॅरेथॉनसाठी ट्रेनिंग करत असेल. हे सगळं साईड क्वेस्ट असू शकतं. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे कधी कधी हीच साईड क्वेस्ट इतकी मोठी होते की तीच पुढे जाऊन मेन क्वेस्ट ठरते. म्हणून आयुष्याकडे गेमसारखं बघितलं, तर प्रत्येक गोष्ट एकाच ट्रॅकवर असण्याची गरज नाही, हे लक्षात येईल.
मग तुमचं काय?
तुम्ही सध्या कोणत्या क्वेस्टवर आहात,
मेन की साईड?
viva@expressindia.com