स्नेह एरंडे
‘मेन कॅरेक्टर’ (Main character) हा शब्द मूळत: चित्रपट आणि सीरिजच्या भाषेत, कथेतला केंद्रस्थानी असलेल्या नायकाला उद्देशून वापरला जातो. हा कथानायक म्हणजे मेन कॅरेक्टर. जेन झीसाठी मात्र या शब्दाचा अर्थ हा या कथानायकाभोवती फिरत नाही. त्यांच्या मते मेन कॅरेक्टर म्हणजे एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने चालते, स्वत:ची उपस्थिती जाणवून देते, गर्दीमध्येही उठून दिसते, स्टेजवर बोलताना सगळ्यांचं लक्ष वेधून घेते किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी असा काही बोल्ड निर्णय घेते की बाकीचे फक्त तोंड आवासून पाहात राहतात. तेव्हा आम्ही त्याला पाहून म्हणतो, ‘मेन कॅरेक्टर एनर्जी आहे’. याचाच अर्थ त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स आहे, त्याचं व्यक्तिमत्त्व पुरेसं बोलकं आहे, थोडासा ड्रामा आहे आणि स्वत:च्या आयुष्याला महत्त्व देण्याची सवयही त्याच्यात आहे. अशी सर्वगुणसंपन्न व्यक्ती म्हणजे आमच्या लेखी मेन कॅरेक्टर.
मेन कॅरेक्टर असण्याची ही कल्पना मात्र नेहमीच पॉझिटिव्ह असते असं नाही. काही वेळा ‘मेन कॅरेक्टर’ म्हणताना त्यात कौतुकापेक्षा टोमणाच जास्त असतो. त्याचं कारण काही लोक स्वत:ला सेंटर समजताना बाकीच्यांना मात्र साइडला ढकलतात. प्रत्येक कॉन्व्हर्सेशन पुन:पुन्हा स्वत:वर आणणं, प्रत्येक गोष्टीत अटेन्शन हवं असणं आणि सतत स्वत:चंच नरेटिव्ह सुरू ठेवणं… या गोष्टींमुळे अनेकदा ही मेन कॅरेक्टर एनर्जी थोडी अतिरेकी वाटू लागते.
आणि इथूनच जन्माला येतो दुसरा शब्द तो म्हणजे ‘यॅपर’ (Yapper). यॅपर म्हणजे फक्त बोलका माणूस नाही, तर असा माणूस जो थांबतच नाही. शाळेतला एखादा मित्र, ऑफिसमधला कोणी कलीग, अनेकदा ग्रुप प्रोजेक्टमध्ये काम कमी, पण कॉमेंट्री जास्त करणारा असा तो एक. त्या व्यक्तीला नेहमी असं वाटतं की तो त्या रूममधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे, पण बाकीच्यांच्या नजरेत मात्र तो फक्त नॉनस्टॉप ऑडिओ मोडमध्ये असणारा माणूस या पलीकडे काही नसतो. काही यॅप्पर्स मजेशीर असतात, काही माहितीपूर्णही असतात, पण काही वेळा हा शब्द थोडा रोस्ट म्हणून वापरला जातो हेही तितकंच खरं आहे.
याच यादीच्या जवळपास जाणारा तिसरा शब्द आहे तो म्हणजे ‘एनपीसी’ (NPC – Non Playable Character). एनपीसी हा तसा गेमिंगमधून आलेला शब्द आहे. गेममध्ये एनपीसी म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये असणारी पात्रं, ज्यांच्याशी इंटरॲक्शन होत असतं, पण ते स्वत: कुठलीही ॲक्शन करत नाहीत किंवा कुठलं मिशनही अंगावर घेत नाही, ते फक्त तिथे असतात.
आता असा काहीसा अर्थ असलेला हा एनपीसी शब्द सोशल मीडियावर विशिष्ट लोकांसाठी वापरला जातो, अशा व्यक्ती जे ठरलेली वाक्यं, ठरलेली मतं, ठरलेलं रुटीन घेऊन जगताना दिसतात. नॉट अ ट्रु एनपीसी… पण मेन क्वेस्ट न करणारा, लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न न करणारा, काही मोठं साध्य करायची धडपड न दाखवणारा हा एक प्रकार. अशा वेळी माझ्या डोळ्यांसमोर एकच व्यक्ती येते ती म्हणजे पुलंचा अंतू बर्वा. आपल्या पडवीत, गंजीफाचा डाव मांडून बसणारा, मतांवर ठाम, थोडासा बेफिकीर अंतू हा एनपीसीचं एक भन्नाट उदाहरण म्हणता येईल.
खरं म्हणजे हे शब्द काही कायमस्वरूपी डकवलेले लेबल नाहीत, तर लोकांचं व्हाइब्स व्यक्त करायचं ते माध्यम आहे. प्रेझेंटेशनच्या दिवशी आपण नेहमी मेन कॅरेक्टर असतो, मित्र-मैत्रिणींसोबतच्या गप्पांमध्ये यॅपर होतो आणि सोमवारी सकाळी सकाळी सुरू झालेल्या प्रवासात आपण अगदी एनपीसी मोडमध्ये जातो. मग तुमचं काय ठरलं आहे? तुम्ही आज मेन कॅरेक्टर एनर्जीमध्ये आहात, यॅपर मोडमध्ये आहात की थोडं एनपीसीसारखं ऑटो पायलटवर?
viva@expressindia.com

