– स्नेह एरंडे
आजच्या लेखात मी जेन झींच्या तोंडी रुळलेल्या रिॲक्शन्सबद्दल बोलणार आहे. आपल्या दैनंदिन बोलण्यात नेहमीच्या काही सहज रिॲक्शन्स येत असतात, जशा ‘अरे बाप रे!’, ‘आई गं!’, ‘आई शप्पथ!’ वगैरे… पण, आमच्या जनरेशन्समध्ये काही नवीनच रिॲक्शन्स तयार झाल्या आहेत. या रिॲक्शन्सचा उगम बहुतेक वेळा इंटरनेट, मीम कल्चर, गेमिंग किंवा पॉप कल्चरमधून होत असतो.
ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन, हे शब्द आता इतके सहज वापरले जातात की कधी कधी ते साध्या शब्दांपेक्षा जास्त एक्स्प्रेसिव्ह वाटतात. अशाच काही रिॲक्शन्स मी बऱ्याच लोकांकडून ऐकल्या आहेत. त्यातला पहिला शब्द आहे ‘Fah’(फा). Fah ही एक नवीन रिॲक्शन आहे, जी सहसा एखादी गोष्ट इनकव्हिनियन्ट, केओटिक किंवा थोडी रिग्रेटेबल वाटली की वापरली जाते. यात फार मोठा ड्रामा नसतो, पण एक छोटंसं फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्याची रीत नक्कीच असते. उदाहरणच घ्यायचं झालं तर “अरे, उद्याची असाइनमेंट आज रात्रीच सबमिट करायची आहे. Fah…आता बसावंच लागणार.” किंवा “बस सुटली… Fah, आता अर्धा तास थांबावं लागेल.” ही रिॲक्शन साधारणपणे ‘अरे यार’ किंवा ‘काय रे हे’ या शब्दांसारखी वाटते.
दुसरा शब्द म्हणजे ‘Bruh’(ब्र…). Bruh हा शब्द खरं तर ‘bro’ पासून आलेला आहे, पण रिॲक्शन म्हणून वापरला की त्याचा टोन वेगळाच असतो. एखादी विचित्र, लाजिरवाणी किंवा विश्वास बसणार नाही अशी गोष्ट घडली की हा “bruh” आपोआप तोंडात येतो. “मी अलार्म लावला होता ६ चा, पण स्नूझ करत करत ९ वाजले…Bruh.” किंवा “तो एक्झामसाठी कॅल्क्युलेटरच आणायला विसरला”, “Bruh, मग काय केलं त्याने?”एका शब्दात आश्चर्य किंवा अविश्वास व्यक्त करण्याची ही एक सोपी पद्धत आहे. तिसरी मजेशीर रिॲक्शन आहे ‘I am dead’ (आय ॲम डेड). हे वाक्य अजिबात लिटरली घ्यायचं नाही. इथे कोणी खरंच ‘dead’ नसतं, पण एखादी गोष्ट इतकी फनी वाटते की आपण म्हणतो, “I am dead.” म्हणजे मी इतका हसतोय की बस्स…
वानगीदाखल सांगायचं तर… माझ्या मित्राने आमच्या ओळखीच्या लोकांची इतकी हुबेहूब नक्कल केली की मी हसून हसून “I am dead” म्हणालो. ही रिॲक्शन हसण्याची तीव्रता थोडी अतिशयोक्त पद्धतीने व्यक्त करते.
आणखी रिॲक्शनच्या यादीत नेहमी येणारा एक शब्द म्हणजे ‘Yoo’ (यो). Yoo हा ग्रीटिंग आणि सरप्राइज दोन्ही अर्थाने वापरला जातो. मित्र भेटला की ‘yoo!’ किंवा एखादी अनएक्स्पेक्टेड गोष्ट दिसली तरी ‘yoo’.म्हणजे, “Yoo, तू इथे कसा?” किंवा “Yoo, हे गाणं किती भारी आहे!”खरं म्हणजे लँग्वेज सतत बदलत असते. जसं आधीच्या जनरेशन्सकडे त्यांच्या रिॲक्शन्स होत्या, तसं आमच्या जनरेशनकडे आमच्या आहेत. काही रिॲक्शन्स इंटरनेटवर जन्म घेतात, काही मीम्समधून पसरतात, तर काही हळूहळू रोजच्या बोलण्यातून प्रचलित होतात. तुमच्या रोजच्या रिॲक्शन डिक्शनरीमध्ये ‘fah’, ‘bruh’, ‘I am dead’, ‘yoo’ असे काही शब्द वापरले जातात का? यापैकी कोणता शब्द बोलताना जास्त वापरला जातो? किंवा यापेक्षा अजून एखादी नवीनच जेन झी रिॲक्शन आहे का जी तुमच्याकडून सहजपणे वापरली जाते?
