स्नेह एरंडे
आजचे शब्द आहेत बेस्टी (Bestie), ब्रो (Bro) आणि फॅम (Fam). समजा तुमच्या मित्राने अचानक तुमच्यासाठी तुमचं आवडतं स्नॅक आणलं. तर तुम्ही म्हणता, ‘‘बेस्टी, तुला कसं कळलं मला हेच हवं होतं?’’ किंवा एखाद्या मित्राने फारच विचित्र डिसिजन घेतला. तर लगेच आपल्याकडून प्रश्न येतो, ‘‘ब्रो, तू हे का केलंस?’’ आणि वीकेंडचा प्लॅन ठरवताना ग्रुपमध्ये अचानक मेसेज आला,
‘‘फॅम, संध्याकाळी भेटतोय ना?’’ या तिन्ही ठिकाणी आपण समोरच्या व्यक्तीला नावाने हाक मारत नाही. तिच्यासोबत आपलं नातं काय आहे, त्यावरून एक वेगळाच शब्द वापरतो आहोत.
बेस्टी (Bestie) हा अर्थातच बेस्ट फ्रेंड या शब्दापासून आलेला शब्द आहे. पण तो नेहमीच आपल्या आयुष्यातल्या एकमेव सर्वात जवळच्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी वापरला जातो असं नाही. कधी एखाद्या जवळच्या मित्राला, मैत्रिणीला किंवा अगदी प्लेफुल पद्धतीने नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीलाही ‘बेस्टी’ म्हणता येतं. ब्रो हा ब्रदर या शब्दापासून आला. पण आता तो फक्त सख्ख्या भावासाठी राहिलेला नाही. मित्राला, ओळखीच्या व्यक्तीला किंवा कधी एखाद्या सिच्युएशनवर रिॲक्शन देतानाही ब्रो हा शब्द वापरला जातो. मराठीत याच्या खूप जवळचा शब्द म्हणजे ‘भावा’. ‘‘भावा, काय केलंस तू?’’, असं आपण किती सहजपणे बोलतो.
ब्र (Bruh) हाही ब्रोच्याच जवळ जाणारा शब्द आहे, पण त्याचा वापर अनेकदा रिॲक्शन म्हणून होतो. काही तरी अचानक किंवा अपेक्षेबाहेरचं घडलं की सरप्राईज किंवा डिसबिलिफ म्हणून आपल्या तोंडातून सहज ‘ब्र…’ निघतं. त्याच वेळी तो ब्रोसारखाच एखाद्याला हाक मारण्यासाठीही वापरला जाऊ शकतो.
फॅम हा फॅमिली या शब्दाचा छोटा फॉर्म आहे, पण इथंही खर्या कुटुंबाबद्दलच बोललं जातं असं नाही. आपला खूप जवळचा ग्रुप, आपली माणसं, आपलं सर्कल यांना फॅम म्हणता येतं. मला यातली मजा अशी वाटते की जेन झी सतत लोकांना हाक मारण्याचे नवे मार्ग तयार करत असते. मराठीत आपल्याकडे आधीपासूनच भावा, दादा, मित्रा, यार असे शब्द प्रचलित आहेत. आता त्यांच्यासोबत ब्रो, बेस्टी, फॅम असे शब्दही अगदी सहज रूढ झाले आहेत.
शब्द वेगळे आहेत, पण भावना फार जुनी आहे. समोरचा फक्त ओळखीचा नाही, तर तो ‘आपला’ आहे, हे एका छोट्या हाकेत सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
viva@expressindia.com
