– स्नेह एरंडे
आजचे शब्द आहेत ड्रिप (Drip), सॉस (Sauce) आणि ॲम्प्ड (Amped). पहिल्यांदा ऐकल्यावर ड्रिप म्हणजे पाण्याचा थेंब, सॉस म्हणजे खाण्याचा पदार्थ आणि ॲम्प्ड हा एखाद्या यंत्राशी जोडलेला शब्द वाटू शकतो. पण, प्रत्यक्षात या तिन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. सुरुवात करूया ड्रिप या शब्दापासून…
ड्रिप म्हणजे एखाद्या व्यक्तीचा कपडे घालण्याचा खास ढंग. त्या व्यक्तीचे कपडे, बूट, दागिने, घड्याळ, चष्मा आणि या सगळ्या गोष्टी आत्मविश्वासाने मिरवण्याची पद्धत म्हणजे त्याची किंवा तिची ड्रिप. फक्त अंगावर महाग कपडे चढवल्यामुळे कुणाची ड्रिप चांगली होत नाही. साधा पांढरा शर्ट, नीट बसणारी पँट आणि योग्य बूट या माध्यमातूनही भारी ड्रिप तयार होऊ शकते. मुख्य गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने ते कपडे किती सहजपणे आणि आत्मविश्वासाने घातले आहेत. उदाहरणार्थ, तुमचा मित्र कॉलेजमध्ये अगदी साध्या कपड्यांत येतो. पण, त्याने निवडलेले रंग, घड्याळ, बूट आणि त्याचा आत्मविश्वास इतका योग्य असतो की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच जातं. तेव्हा तुम्ही त्याला म्हणू शकता, ‘आज तुझी ड्रिप भारी आहे.’
आता येतो सॉस. सॉस हा शब्दही ड्रिपसारखा वाटू शकतो, पण तो फक्त दिसण्यापुरता मर्यादित नाही. सॉस म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्वत:ची खास पद्धत, आत्मविश्वास, आकर्षण आणि एखादी गोष्ट वेगळ्या प्रकारे करण्याची कला. दोन व्यक्तींनी सारखे कपडे घातले असतील, तरी त्यातील एक व्यक्ती जास्त उठून दिसू शकते. त्या व्यक्तीकडे काहीतरी वेगळं असतं, पण ते नेमकं काय आहे हे सांगता येत नाही. तो वेगळेपणा म्हणजेच त्याचा किंवा तिचा सॉस. एखाद्या गायकाचा वेगळा आवाज, खेळाडूची खास चाल, लेखकाची लगेच ओळखू येणारी भाषाशैली किंवा मित्राची योग्य वेळी विनोद करण्याची कला, हे सगळं सॉस असू शकतं. कधी एखाद्या फोटो किंवा व्हिडिओ खाली कुणी ‘सॉस?’ असं विचारतं. तेव्हा त्याचा अर्थ त्या फोटो किंवा व्हिडिओचा मूळ स्रोत काय आहे, असाही होतो. त्यामुळे तो शब्द कुठे वापरला आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
तिसरा शब्द आहे ॲम्प्ड.
ॲम्प्ड म्हणजे खूप एक्सायटेड असणं आणि एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे तयार असणं. उद्या सहल आहे आणि तुम्ही आजपासूनच बॅग भरून तयार बसला आहात, तर तुम्ही ॲम्प्ड आहात. एखाद्या खेळाच्या सामन्याआधी संपूर्ण टीम मोठ्याने गाणी लावून स्वत:ला तयार करत असेल, तर ती टीम ॲम्प्ड आहे. आवडत्या कलाकाराचा कॉन्सर्ट, नवीन मुव्हीचा फर्स्ट शो किंवा अनेक दिवसांनी होणारी मित्रांची भेट यासाठीसुद्धा तुम्ही ॲम्प्ड असू शकता. समजा, एखादी व्यक्ती पार्टीत जबरदस्त कपडे घालून आली असेल, तर तिचा लुक म्हणजे ड्रिप. ती आत्मविश्वासाने सगळ्यांशी बोलली आणि स्वत:ची छाप सोडली, तर तो तिचा सॉस. पार्टी सुरू होण्याआधी ती उत्साहाने भरलेली होती, म्हणजे ती ॲम्प्ड होती.
ड्रिप दिसते, सॉस जाणवतो आणि ॲम्प्ड उत्साह दाखवतो. तुम्हाला कुणाची ड्रिप सर्वांत जास्त आवडते?
viva@expressindia.com
