आज मेंटल हेल्थबद्दल चर्चा वाढत असताना तरुणांमध्ये एक जुनी सवय नव्या रूपात परतताना दिसते, ती म्हणजे पुस्तकवाचन. काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया, यूट्यूब, ओटीटी हे सगळे प्रकार नवीन असताना पुस्तकांकडे काही काळ पाठ फिरवली गेली होती. मात्र, आता जेन झी आणि मिलेनियल्समध्ये पुस्तकांकडे पुन्हा वळण्याचा ट्रेण्ड पाहायला मिळतो आहे. या बाबतीत मात्र मिलेनियल रीडर्सनी जेन झीना आदर्श घालून दिलाय असं म्हणायला हरकत नाही. मिलेनियल्समधल्या हाडाच्या रीडर्सनी त्यांचं वाचन कधीच सोडलं नाही. वाचनाच्या प्रभावामुळे मिलेनियल्सना लवकर पुस्तकांची वाट पुन्हा सापडली. हे पुस्तक वाचन मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि स्वत:साठी वेळ, स्वत:ची स्पेस यासाठी आहे. आसपासचं जग वेगाने पुढे जात असताना पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढणं हे अनेक तरुणांसाठी सेल्फ केअरचा एक भाग बनला आहे.
आजची तरुणाई सतत माहितीच्या भडिमारात वावरते. कामासाठी का असेना, पण सतत हातात मोबाइल, सोशल मीडियाचं सतत काही ना काही अपडेट, सतत बदलणारे विषय आणि प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन पाहण्याची सवय यामुळे मनाला विश्रांती घ्यायला वेळच मिळत नाही. अशा वेळी पुस्तक वाचणे ही अनेकांसाठी मानसिक विश्रांतीची जागा बनते. पुस्तक हातात घेतल्यावर वाचक एका वेगळ्या जगात प्रवेश करतो. काही काळासाठी तरी बाहेरचा गोंधळ, तुलना, कामाचा ताण आणि डिजिटल जगाचा आवाज मागे पडतो. त्यामुळे वाचन ही केवळ बौद्धिक कृती न राहता मनाला शांत करण्याची प्रक्रियाही बनली आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर वाचनामुळे मन एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकतं. सोशल मीडियावरच्या वेगवान आणि तुकड्या-तुकड्यांनी मिळणार्या माहितीच्या तुलनेत पुस्तक वाचण्यासाठी संयम, शांतपणा आणि मेंदूचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. त्यामुळे मनाची भटकंती कमी व्हायला मदत होते. अनेकांना हे जाणवतं की अगदी काही मिनिटंसुद्धा पुस्तक वाचल्यानंतर मनातली अस्वस्थता कमी होते आणि विचार स्पष्ट व्हायला लागतात. म्हणूनच वाचनाला मानसिक आरोग्य जपण्याच्या साध्या पण प्रभावी सवयींपैकी एक मानलं जातं.
या पुस्तकांचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ते कल्पनाशक्तीला सतत चालना देत राहतात. एखादी मालिका, चित्रपट किंवा व्हिडीओ पाहताना दृश्य, व्यक्तिरेखा, घर, रस्ते आणि प्रसंग हे सर्व आपल्यासमोर तयार स्वरूपात येतात. प्रेक्षक म्हणून आपण ते फक्त पाहतो आणि स्वीकारतो, पण पुस्तक वाचताना असं होत नाही. लेखक शब्द देतो, वर्णन करतो; मात्र त्या शब्दांना रूप देण्याचं काम वाचकाच्या मनाला करावं लागतं. कथेतला नायक कसा दिसत असेल, एखादं गाव कसं असेल, जंगल किती दाट असेल किंवा एखाद्या प्रसंगातलं वातावरण नेमकं कसं असेल याचं कल्पनात्मक चित्रण प्रत्येक वाचक स्वत:च्या मनात करतो. त्यामुळे वाचन ही केवळ माहिती घेण्याची प्रक्रिया नसून कल्पनाशक्ती वापरण्याची प्रक्रिया ठरते. सतत तयार दृश्य पाहण्याच्या सवयीमुळे नि्क्रिरय होणार्या मनाला पुस्तक पुन्हा सर्जनशीलपणे विचार करायला भाग पाडतं. म्हणूनच अनेक लेखक, शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ पुस्तकवाचनाची तुलना मेंटल हेल्थ एक्झरसाइजशी करतात.
हा पुस्तकांचा चॉइस केवळ प्रेरणादायी किंवा सेल्फ हेल्प पुस्तकांपुरता मर्यादित नाही. कादंबर्या, प्रवासवर्णनं, कविता, चरित्र, फिक्शन आणि अगदी हलक्या-फुलक्या कथा यांनाही मोठी पसंती मिळते. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. अशी पुस्तकं नेहमीच वाचकाला स्वत:च्या आयुष्याबाहेरच्या अनुभवांशी जोडत असतात. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, त्यांचे संघर्ष, त्यांचे आनंद-दु:ख आणि त्यांचे प्रवास वाचताना वाचकाला स्वत:च्या भावनांकडेही नव्या दृष्टीने पाहता येतं. त्यामुळे वाचनातून केवळ मनोरंजनच नाही, तर भावनिक समज आणि सहानुभूतीही विकसित होते. वाचन आणि मानसिक आरोग्य यांच्यातला आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे एकांताचा सकारात्मक अनुभव. आज अनेक तरुणांना एकटं राहणं म्हणजे एकाकीपणा असं वाटत नाही. उलट, स्वत:सोबत काही वेळ घालवणं ही एक गरज आणि म्हणून जाणीवपूर्वक निवड बनते आहे. एखाद्या शांत कोपर्यात बसून पुस्तक वाचणं, कॅफेमध्ये निवांत वेळ घालवणं किंवा झोपण्यापूर्वी काही पाने वाचणं या सवयींमुळे स्वत:शी संवाद साधण्याची संधी मिळते. सतत इतरांशी बोलत राहण्याच्या काळात हा एकांत अनेकांसाठी मेंटल रीलॅक्सेशनचा स्रोत ठरतोय.
याच कारणामुळे बुक क्लब, रीडिंग ग्रुप्स आणि पुस्तकांचे पॉडकास्ट यांचाही नव्याने ट्रेण्ड सुरू होतोय. पूर्वी पुस्तकवाचन ही वैयक्तिक सवय होती; आता ती सोशल एक्सपिरियन्स ठरतेय. समान आवडीच्या लोकांशी संवाद, पुस्तकांवर चर्चा आणि नवीन दृष्टिकोन यामुळे लोकांशी इमोशनली जोडता येतं. दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर नियमित वाचनाची सवय मनाला स्थैर्य देते. लक्ष केंद्रित करण्याची
क्षमता वाढते, विचार अधिक सखोल होतात, इमोशनल बॅलन्स साधायला मदत होते.
अर्थात, पुस्तकवाचन हे मानसिक आरोग्याच्या सगळ्या समस्यांवरचा काही एकमेव उपाय नाही. पण, दैनंदिन जीवनात मनाला थोडा विराम देणारी, विचारांना दिशा देणारी आणि भावनिक समृद्धी वाढवणारी ही एक प्रभावी सवय
नक्कीच आहे.
कदाचित म्हणूनच डिजिटल युगातली तरुणाई पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळताना दिसते आहे. कधी कधी मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठीच पावलं उचलली पाहिजेत असं नव्हे; तर दिवसातून काही मिनिटं पुस्तकाच्या सहवासात घालवली तरी चालू शकतात. याच विचारांनी आजची तरुण पिढी पुन्हा एकदा नियमित वाचनाकडे वळते आहे.
