जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाने पारंपरिक आंदोलनाची परिभाषा बदलली. जेनझी पिढीतील आंदोलक त्यांच्या पद्धतीने बेधडक व्यक्त झाले. मग समाज माध्यमांवर जेनझींच्या भाषेवर चर्चा रंगली आणि यात अगदी राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यत सर्वांनीच सहभाग घेतला. काहींना ही भाषा पटली तर काहींना त्यातील शिव्यांची अभिव्यक्ती अतिरेकी वाटली. अगदी लोकसभा सदस्यांनी लोकसभेत भाषण करताना उपरोधिकपणे तर काहींनी त्यातील गांभीर्य अधोरेखित करत जेनझींच्या काही शब्दांचा वापर केला. काही तरुणांनी समाज माध्यमांवर व्यक्त होताना आपल्या देशातील बेरोजगार युवकांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी झुरळ म्हणण्याचे समर्थन तुम्ही करणार का असे विचारत काही राजकारण्यांनी वापरलेल्या शब्दांचा समाचार घेतला. नेहमीप्रमाणे उलटसुलट चर्चा यावर अजूनही सुरु आहेत. ट्रेनपासून बसपर्यत आणि गल्लीपासून ते संसदेपर्यत सर्वत्र चर्चा असे गेल्या महिन्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद उमटले. त्याच्या काही पैलूंचा आढावा घेणारा हा लेख…
संपूर्ण जुलै महिना गाजला तो दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नीट पेपर फुटी प्रकरण आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लाखो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. पुढे या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्या दरम्यान हे आंदोलन केवळ दिल्ली पुरते मर्यादित राहिले नव्हते. तर देशातील प्रमुख शहरातही विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. समाज माध्यमे तर या आंदोलनाच्या केवळ केंद्रस्थानी नव्हती तर त्याचा प्रभावी वापर केला जात होता. सर्व विद्यार्थ्यी नव्या पिढीचे. त्यामुळे आंदोलनाची सगळीच अभिव्यक्ती एकंदरीतच तरुण. या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती ‘जेनझी’ पिढीच्या भाषेची. एरव्ही ‘कोड लँग्वेज’ वगैरे वापरणाऱ्या या पिढीने आपल्या भाषेचा वापर या आंदोलनात केलेला दिसून आला. मग ते पारंपरिक एकसुरी फलकांना बगल देत केलेले ‘मिम्स’आणि ‘सार्केझम’ मांडणारे पोस्टर्स प्रत्येकाच्या हातात दिसत होते. अनेकांनी आंदोलनाविषयी किंवा अगदी राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे फलक घरी बनवून आणले होते. यात त्यांची ‘क्रिएटिव्हिटी’ दिसत होती असे अनेकांचे निरीक्षण होते.
या सगळ्या अभिव्यक्तीमध्ये मुख्य बिंदू होता तो भाषेचा. मग ते फलक असो की घोषणा… सर्वत्र जेनझींच्या भाषेचे विविध पैलू दिसत होते. मग एकंदरीतच या पिढीची भाषा, कोड लँग्वेज आणि अभिव्यक्ती यावर चर्चा झाल्या. ऑफिसमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये आणि अगदी नातेवाईकांमध्येही यावरून भरभरून वाद झाले. अनेकांनी या दरम्यान ‘अनफॉलो’ हा पर्याय स्वीकारला तर काहींनी मात्र मतभेद सहज पचवले. छत्रपती संभाजीनगर येथे राहणारा आनंद म्हणतो, ‘मला असे वाटते की भाषेची मर्यादा राखणे आवश्यक आहेच, पण शेवटी रोष व्यक्त करताना त्या त्या काळातील माध्यमे उपयोगी पडतात आणि विरोध हा त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या निर्णयांना असतो. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी होत्या तेव्हादेखील ज्याला आपण खालच्या स्तरातील भाषा म्हणतो अशा भाषेचा वापर झाला होताच. कवी बाबा नागार्जुन यांनी आपल्या कवितेद्वारे, ‘इंदू जी, क्या हुआ आपको? सत्ता की मस्ती में भूल गई बाप को?’ असे म्हणत त्यांना सुनावले होते. भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे असे मला वाटते. आंदोलनात जी भाषा होती, तीच भाषा मला ऑफिसमध्ये, रेल्वे स्थनाकात आणि सार्वजनिक ठिकाणी ऐकायला मिळते. आज ज्या भाषेला विरोध होतो आहे तीच भाषा या पिढीच्या तोंडी नेहमी असते. आंदोलनात एका विशिष्ट व्यक्तीसाठी त्या भाषेचा वापर झाला म्हणून भाषेची ही गोष्ट प्रकाशझोतात आली, अन्यथा त्याकडे दुर्लक्ष झाले असते’. उद्या हीच पिढी देशाचे भविष्य असणार आहे. मग सर्वत्रच नियम आणि मर्यादा आखाव्या लागतील. त्या त्या पिढीने त्यांच्या भाषेतूनच व्यक्त होणे गरजेचे आहे असे मतही आनंदने व्यक्त केले.
भाषा ही अभिव्यक्ती असली तरीही त्याची पातळी घसरता कामा नये, असे काहींचे मत आहे. याबाबत बोलताना मुंबईत खासगी कंपनीत नोकरी करणारी ऋतुजा म्हणते, ‘आंदोलन करण्याचा आणि सरकारवर टीका करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. मुद्दे ठामपणे मांडले गेले पाहिजेत, पण एखादी व्यक्ती जेव्हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असते अशावेळी कितीही मतभेद असले तरी त्या पदाचा सन्मान राखणारी भाषा वापरली जाणे ही देखील लोकशाहीचीच संस्कृती आहे. लढा हा विचारांचा असावा, व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी नसावा असे मला वाटते. त्यामुळे विरोध असावा, प्रश्नही विचारावेत मात्र, या सगळ्यात भाषेची पातळी घसरता कामा नये. कोणत्याही व्यक्तीपेक्षा त्या पदाचा सन्मान मोठा असतो, आणि तो जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळाला, मात्र यात त्यांच्या चुकीच्या गोष्टींचेही तितकेच समर्थन करण्यात आले. यात अर्वाच्य भाषा, अश्लील घोषणाबाजी, वाद, मत मांडताना शब्दांची मर्यादा ओलांडली याला देखील अनेकांनी दुजोरा दिला. मात्र, आवाज उठवताना सामाजिक भान जपणे गरजेचे आहे. शिवाय, सगळ्याच गोष्टी आक्रमकतेने केल्या पाहिजेत असेही नाही, असेही तिने सांगितले.
विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिव्यांचा वापर केला आणि त्याला अनेकांनी आक्षेप घेतला. मग त्यात अगदी मुले आणि मुली असेही भेद झाले. सध्या नोकरीनिमित्त गुजरामध्ये असणारी कश्मिरा म्हणते, ‘शिव्या देणे हा कधीपासून सांस्कृतिक धक्का झाला? अन् त्यात कधीपासून लिंगभेदाचा विषय आला? भारतात किंवा जगात सगळ्याच वयाचे लोक शिव्या देतात मग आत्ताच त्याला विरोध करण्याचे कारण नसावे. शिव्या का दिल्या जातात यापेक्षा त्या कोणत्या कारणामुळे दिल्या जातात यावर चर्चा व्हायला हवी. आंदोलनकर्त्यांकडून शिव्यांचा वापर केला गेला म्हणजे एकंदरीतच शिक्षण व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात राग आहे. अर्थात, म्हणून मी शिव्या देण्याचे समर्थन करणार नाही. पण, त्या कोणत्याही एका पिढीपर्यंत मर्यादित असू नये तशाच त्या लिंग निरपेक्ष असाव्यात. मला भाषा विषयाची विद्यार्थी म्हणून शिव्या या भाषेचा एक भाग वाटतात. शिव्या देणे, त्यावर बोलणे किंवा विनोद करणे ही गोष्ट आतापर्यंत सर्वच पिढ्यांमध्ये सामान्य गोष्ट आहे. केवळ आंदोलनात शिव्यांचा वापर केला गेल्याने काहींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’.
अनेक साहित्यिक आणि कलाकारही भाषेवरून सुरु असणाऱ्या या वादात व्यक्त झाले. काहींनी अशी भाषा वापरणे चूक असल्याचे मत मांडले तर काहींनी त्याचे समर्थन करत विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. अभिनेता, कवी आणि दास्तानगो असणारा अक्षय शिंपी याबाबत म्हणतो, ‘जेनझींच्या भाषेवर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सुसंस्कृत या मूल्याचे एक अघोषित नेतृत्व आपल्याकडे आहे असे मानणाऱ्या लोकांकडून येत आहेत. दर पिढ्या गणिक भाषा बदलत असते, शब्दांकडे बघण्याचे दृष्टीकोन बदलत असतात. मुख्य म्हणजे आधीच्या पिढीला ज्या शिव्या वाटत होत्या त्या नंतर इतक्या रूळल्या जातात की नंतरच्या पिढीकडून त्या शिव्या म्हणून बघितल्या जात नाहीत. व्यवस्थेचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या चुकांमुळे जर समाज मोठ्या प्रमाणात दुखावला जात असेल आणि तो समाज जर आपली प्रतिक्रिया तीव्रपणे आपल्या शब्दातून व्यक्त करत असेल तर त्याच्या शब्दांना आपण आक्रमक ठरवू शकत नाहीत’. आत्ताचे सत्ताधारी ज्या दिशेला जात आहेत किंवा कुठली पद्धती या देशात ते पुन्हा एकदा रुजवू पाहतात ते कुणाही जागरूक नागरिकाला मान्य होणारे नाही आहे. त्यामुळे नव्या पिढीने आपला राग तीव्र शब्दातून व्यक्त केला त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही, असेही त्याने सांगितले. ही तरुण पिढीच्या उद्गाराची भाषा आहे. ते ज्या वर्गातून येतात तिथे त्याला शिव्यांचे मोल नाही तर ते शब्द आहेत. नामदेव ढसाळ ज्या वर्गातून आले होते, तिथे सहजपणे जे शब्द वापरले जायचे, त्या शिव्या नव्हत्या तर नैसर्गिकपणे बोलली जाणारी भाषा होती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भाषेला शिव्या समजण्याची चूक करू नये आणि जेनझींच्या भाषेकडे शिव्या म्हणून बघू नये. तो त्यांनी व्यक्त केलेला ‘रागाचा उद्गार’ म्हणून पाहायला हवा तो योग्य आहे आणि तो नक्की समजून घेण्याजोगा आहे, असेही अक्षयने सांगितले.
