• वैष्णवी वैद्य मराठे

‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती…’ ही संपूर्ण कविता खरंतर वेगळ्या मतितार्थाची आहे. पण, आत्ताच्या काळात या ओळींचा अर्थ तरुण पिढीच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. घर हा प्रत्येकासाठीच मोठा जिव्हाळ्याचा विषय. नवीन शहरात आल्यावर पहिली खोली, स्वतःचं घर, भाड्याचं घर अशी सगळ्यांचीच एक स्वतंत्र गोष्ट असते, घर मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीच्या आठवणी असतात. एकेकाळी इटालियन संगमरवर, क्रिस्टल झुंबरं आणि सुशोभित फर्निचरने सजवलेला एक प्रशस्त दिवाणखाना असलेलं घर म्हणजेच सुंदर घर मानलं जात असे. घराबद्दलची ओढ, प्रेम या गोष्टी कायम असल्या तरी घर सजवण्याबद्दलचे तरुण पिढीचे विचार कमालीचे बदलले आहेत.

हल्ली अनेक तरुण-तरुणी मूळ घरापासून मुंबई, पुणे, बंगलोर, हैद्राबाद अशा शहरांमध्ये स्थयिक होताना दिसतात. मग ज्या नव्या शहरात आपण घर वसवतो आहे ते सगळ्यात सुंदर, देखणं कसं दिसेल? आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख घराच्या सजावटीतूनही जाणवेल, असा तरुणाईचा प्रयत्न असतो. घरातील फर्निचरच्या निवडीपासून ते रंगसंगती, साहित्य आणि खरेदीच्या सवयींपर्यंत प्रत्येक गोष्टी अत्यंत काटेकोरपणे निवडल्या जातात.

‘पिंटरेस्ट’वरचं घर…

आजची तरुणाई घर सजवण्यासाठी इंटिरिअर कॅटलॉगपेक्षा पिंटरेस्ट, इंस्टाग्राम आणि यूट्युबवर जास्त वेळ घालवते. पण, गंमत अशी की त्यांना कोणाच्याही घराच्या सजावटीची तंतोतंत कॉपी करायची नसते. त्यांना त्यामागची भावना आवडते. घर सजावटीतही आता स्टोरीटेलिंग म्हणजेच एखादी थीम महत्त्वाची ठरते. घराचा प्रत्येक कोपरा तुमच्याबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काहीतरी सांगतो, ही भावना तरुण पिढीला कमालीची वाटते. उदाहरणार्थ, जर कोणाला प्रवास, भटकंती आवडत असेल तर घराचा एक कोपरा, एक भिंत ट्रॅव्हल फोटो, मॅप, सोवेनिअर, प्रवासातल्या आठवणींनी भरलेली असते.

पूर्वीच्या घरांसारखं आता तरुण पिढीही नैसर्गिक गोष्टींमध्ये रस घेते आहे. घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश यावा, झाडांनी भरलेली बाल्कनी असावी, हाताने विणलेल्या, बनवलेल्या, भेट मिळालेल्या वस्तू घरात असाव्यात. जुन्या पुस्तकांचा कोपरा, कॉफी पिण्यासाठी छोटी जागा, सुगंधी मेणबत्त्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी घराला घरपण देतात, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे आता घराची किंमतही तिथल्या उंची सामानापेक्षा तिथे राहणाऱ्यांच्या जीवनशैलीवर ठरू लागली आहे.

‘शो-ऑफ’पेक्षा ‘कम्फर्ट’

करोनानंतर घराकडे पाहण्याचा तरुण पिढीचा दृष्टिकोन अधिक बदलला. ऑफिस, कॅफे, जिम, थिएटर… सगळंच काही काळ घरात आलं. त्यानंतर घर फक्त झोपण्याची जागा राहिलं नाही; ते काम करण्याचं, वाचनाचं, विश्रांतीचं आणि मानसिक शांतता मिळवण्याचं ठिकाण बनलं. म्हणूनच आज अनेक तरुण महागड्या सेंटर टेबलपेक्षा आरामदायी खुर्ची, सोफा, बेड, गादी या सगळ्यावर खर्च करतात. हल्ली घरातही रिक्लायनर सोफा आणि खुर्च्या असतात. मोठ्या टीव्ही युनिटपेक्षा वर्क-फ्रॉम-होम स्पेस सध्या जास्त महत्त्वाची आहे. झुंबराऐवजी घराचा छोटा कोपरा सजवणारे लॅम्प्स, पूर्वीच्या कौलारू घरात असायचे तसे भिंतीतले कोनाडे, कंदीलही नव्याने प्रचलित झाले आहेत. या वस्तू दिखाव्यापुरती राहिलेल्या नाहीत, तर त्यातून एक समाधान मिळवता येतं आहे.

माय चॉईस…

हल्ली तरुण मुलं-मुली भाड्याने घर घेऊन राहत असले तर तिथेही आपल्या आवडीप्रमाणे पडदे, शो-पीस, छोटं-छोटं फर्निचर हे आपल्या चॉईसने खरेदी करतात. अगदी घराच्या दरवाजापासून भिंतीवरचं घड्याळ, लाईट्स, नेमप्लेट सगळं बारकाईने निवडलं जातं. हल्ली एकूणच घराचा एरिया आधीच्या घरांपेक्षा कमी असल्याने, एकच टेबल किंवा घराचा एकच कोपरा कसा विविध पद्धतीने वापरता येईल, कमीत कमी जागेत विविध पध्दतीने वस्तूंचा वापर कसा होईल, अशा स्मार्ट सजावटीवर जास्त भर दिला जातो.

जुनं ते सोनं

जुनी तांब्या-पितळेची भांडी, लाकडी फर्निचर, मातीची भांडी, आरसे, पेंटिंग्स याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. ऑनलाइन खरेदीमुळे एकसारख्या वस्तूंचा भरणा वाढत असताना, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तरुण मंडळी व्हिंटेज वस्तूंना पसंती देत आहेत. त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याच्या दृष्टीने जुन्या वस्तूंना नवजीवन देण्याचा, त्यांचा पुनर्वापर करण्याकडे कल वाढतो आहे. आधुनिक मिनिमलिस्ट इंटिरिअरमध्येही जुने लाकडी फर्निचर, वारली चित्रं, पितळी सजावटीच्या वस्तू किंवा पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तू सहजपणे मिसळताना दिसतात.

डोंबिवलीची गायत्री धर्माधिकारी सांगते, ‘फोटोग्राफी, सोलो ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग हे माझे छंद आहेत. घराचं काम करताना मी येल्लो, ग्रे आणि व्हाईट अशी थीम ठेवली, जेणेकरून ते मिनिमलिस्ट, प्लेफुल आणि क्लासी दिसेल. एका भिंतीवर माझे बेस्ट फोटोग्राफ फ्रेम करून लावले आहेत, बुकशेल्फ आणि कपाटांवर जिथे फिरायला गेले तिथून आणलेलं एक एक शो पीस ठेवलं आहे. अँटिक कॅमेरा आणि डेकोर पीससुद्धा शेल्फवर ठेवलेले आहेत. मला वाटतं, तरुण पिढी चैनीपेक्षा वैयक्तिक पसंतीला प्राधान्य देते आहे, कारण त्यांना त्या वस्तूंबरोबर आपलेपणाची भावना त्यांना जपायची आहे. म्हणूनच अशा DIY सजावटी, फ्रिज मॅग्नेटस, फोटो कोलाज जास्त लोकप्रिय होत आहेत.”

हस्तकलेला पसंती

क्रोशे म्हणजेच लोकरीपासून बनवलेल्या वस्तू, एमडीएफचे शो-पीस, कॉटन आणि जर कापडापासून बनविलेल्या वस्तू, पेंटिंग्सच्या फ्रेम्स, जे जे काही हस्तकलेतून निर्माण होईल ते ते आज जेनझींच्या घर सजावटीचा भाग आहे. सिरॅमिक शो-पीस, भांडी, कप यांचाही यात समावेश आहे. यामागचा उद्देश सुद्धा डोळ्यांना सुखावणारं, सुंदर दिसणारं, आपल्याला घर म्हणता येईल अशी आपली जागा बनवणं. सजावटीच्या या वस्तूंमध्ये नव्वद टक्के वस्तू या आपल्या माणसांनी भेट स्वरूपात दिलेल्या असतात, म्हणूनच त्या लावताना आणि रोज बघताना जास्त जिव्हाळ्याच्या वाटतात.

इंटिरिअर डिझायनर्सच्या मते, येत्या काही वर्षांत स्मार्ट होम्स, एआयवर आधारित उपकरणं, डिझायनिंगसाठी एआयची मदत, ऊर्जा बचत करणारी व्यवस्था आणि पर्यावरणपूरक साहित्य यांचा वापर वाढणार आहे. पण, तंत्रज्ञान कितीही बदललं, तरी जुन्याची ओढ संपणार नाही. पूर्वी घरांमध्ये असलेली भारतीय बैठक, झाडांचा वापर, जुन्या पद्धतीचे कंदील, दिवे, निसर्गाच्या जवळ नेणारं इंटेरिअर, तांब्या-पितळेची भांडी, झोपाळे हे सगळे प्रकार नवीन घरांमध्येही पाहायला मिळतायेत.

घर हे इतरांना प्रभावित करण्यासाठी नसतं; ते स्वतःला शांत वाटण्यासाठी असतं अशी आता तरुण पिढीची धारणा झाली आहे. आणि कदाचित म्हणूनच आजची पिढी ‘ड्रीम होम’ची व्याख्या नव्याने लिहिते आहे… महागड्या वस्तूंनी नव्हे, तर आपल्या आवडी, आठवणी, छंद आणि जगण्याची पद्धत जपणारं घर त्यांना अधिक खुणावतं आहे.