प्रसिद्ध इटालियन फॅशन डिझायनर आणि उद्योजक जॉर्जो अरमानी यांच्या निधनानंतर या वर्षी पहिल्यांदाच ऑट कोट्युअर वीक त्यांच्या अनुपस्थितीत पार पडला. फॅशन उद्योग आणि ऑट कोट्युअर वीकचं घट्ट नातं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच होणाऱ्या या फॅशन वीकमध्ये त्या त्या वर्षभरातील प्रचलित होऊ पाहणाऱ्या फॅशनची झलक दिसून येते…

असे काही फॅशन इव्हेंट असतात, जे जगभरातल्या फॅशनवर कुठे ना कुठे परिणाम करतच असतात. ‘द डेव्हिल वेअर्स प्रादा’ या अमेरिकन चित्रपटात अभिनेत्री मेरील स्ट्रीप अगदी बारकाईने या अख्ख्या साखळीचं वर्णन करते. प्रत्येकाला कितीही वाटत असलं की आपण फॅशनपासून लांब आहोत, आपल्याला त्यातलं काही कळत नाही, आपल्याला त्यात काही इंटरेस्ट नाही, आपला या सगळ्या फॅशनच्या गुंत्याशी काही संबंध नाही, तरी जगभरात प्रत्येक जण कपडे वापरतात. कपडे घेताना आपण सिलेक्शन करतो, आवड-निवड ठरवतो, रंग निवडतो आणि या सगळ्यामध्ये संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीचा ॲक्टिव्ह वाटा असतो. प्रत्येक वर्षी मार्केटमध्ये कोणता रंग, कोणता पॅटर्न, कोणतं फॅब्रिक जास्त चालणार हे संपूर्ण इंडस्ट्री आपल्यासाठी ठरवत असते.

ग्लोबल फॅशनला लीड करणारा इव्हेंट म्हणजे पॅरिसला होणारा (Haute) ऑट कोट्युअर वीक. यामध्ये मोठमोठी ग्लोबल लेबल्स त्यांच्या इयर थीमनुसार डिझाइन्स सादर करतात. प्रत्येकाच्या डिझाइनमध्ये व्हरायटी नक्कीच असते, मात्र त्या सगळ्यातून काही कॉमन ट्रेंडस आपोआप तयार होतात. यामध्ये शब्दशः जगभरातून डिझायनर लेबल्स एकत्र येतात आणि आपापली क्रिएशन्स दाखवतात. यातल्या डिझाइन्समध्ये पुढे वर्षभरात फॅशन मार्केटमध्ये येणारे ट्रेंडस ठरवण्याची ताकद असते.

या वर्षी प्रसिद्ध इटालियन फॅशन डिझायनर आणि उद्योजक जॉर्जो अरमानी यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच रॅम्पवर अरमानीचं कलेक्शन आलं होतं. त्यात पेस्टल कलर्समध्ये शिमर आणि ग्लिटरचा प्रभाव अधिक दिसून आला. ऑर्गन्जा फॅब्रिकचा सगळ्यात जास्त वापर अरमानीच्या डिझाइन्समध्ये पाहायला मिळाला. डिओरच्या कलेक्शनमध्ये लेयरिंगचा समावेश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तर शीअर आणि वेल्वेट फॅब्रिक्सचं ड्रेपिंग आणि त्यावर निसर्गाशी जोडून घेणारी पानं, फुलं, पक्षी, प्राणी दाखवणारे मोटिफ्स पाहायला मिळाले. यंदा शनेलच्या कलेक्शनमध्येसुद्धा पेस्टल कलर्स, ट्रान्सपरंट किंवा सी-थ्रू फॅब्रिक यांची कॉम्बिनेशन्स प्रामुख्याने दिसून आली.

गेल्या काही वर्षांत फॅशन ही फक्त रॅम्पवर मिरवण्यापुरती नसावी, ती वेअरेबल असावी यावर सगळ्याच लेबल्सचा भर दिसून येतो आहे. त्यामुळे बाजारपेठही फॅशनही सहजतेने जोडली गेली आहे. या समीकरणाचा प्रभाव नव्या वर्षाच्या फॅशनची सुरुवातच करून देणाऱ्या ऑट कोट्युअरमध्ये जाणवला नसता तर नवल. त्यामुळे यावेळच्या एकंदरीत डिझाइन्सचा रोख हा केवळ फॅशन रॅम्प हा न राहता त्यांचं लक्ष त्या फॅशनला वेअरेबल करण्याकडे अधिक असल्याचं दिसून आलं. आतापर्यंत असणारे एक्स्ट्रावेगंट गाऊन्स, कॅरी करायला अवघड अशा फ्रिल्स आणि स्लीव्हज्, स्किन-फिट डिझाइन्स या सगळ्याला मागे टाकत या वेळी ऑट कोट्युअर वीकमध्ये बहुतेक डिझाइन्स ही कम्फर्टकडे जास्त झुकतं माप देणारी पाहायला मिळाली. जगभरातल्या फॅशन ॲनालिस्टनीसुद्धा फॅशन अधिक प्रॅक्टिकल झाल्याची टिप्पणी केली.

केवळ रॅम्पवरच नव्हे तर स्ट्रीटवरसुद्धा वापरता येईल, अशी ही फॅशन असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. बॉडीकॉन फिटिंगच्या ऐवजी लूज फिट्स किंवा एक्स्ट्रा ओव्हर साइज फिट्स असे कपडे या वेळी सगळ्याच कलेक्शन्समध्ये होते. डोळ्याला त्रास देणारी नाही तर डोळ्याला छान आणि शांत वाटणारी फॅशन हा सगळ्या डिझाइन्सच्या थीममागचा उद्देश असावा, ज्याच्यामुळे फ्लोइ डिझाइन्सवर अधिक भर दिला गेला होता. जियॉमेट्रिक पॅटर्न्स अगदी कमी प्रमाणात दिसून आले, त्याउलट निसर्गाच्या जवळ जाणारे प्राणी-पक्षी आणि फुलं-पानं यांनीच अनेक कलेक्शन्स भरून गेली होती.

काहींच्या डिझाइन्समध्ये एम्ब्रॉयडरीत हे पॅटर्न्स दिसून आले तर काहींच्या डिझाइन्समध्ये फॅब्रिकने क्रिएट केलेले नेचर-फ्रेंडली पॅटर्न्स होते. बऱ्याचशा कलेक्शन्समध्ये गाऊन्स आणि लॉन्ग लेन्थ हा कॉमन फॅक्टर पाहायला मिळाला. ईझी- टू- ब्रीद फॅब्रिक वापरून बहुतेक सगळी डिझाइन्स तयार झाली होती. हाच पॅटर्न मेकअपमध्येही सांभाळला गेला. स्किन – फर्स्ट या दृष्टिकोनातून मेकअपकडे बघितलं गेलं. बघणाऱ्याच्या डोळ्याला आणि मेकअप करणाऱ्याच्या त्वचेला कोणताही त्रास होणार नाही याची शक्य तितकी काळजी घेतली गेली. मेकअपमध्येही एक्स्ट्रा-ऑर्डिनरी स्टाइल्स न वापरता स्किन फ्रेंडली मेकअप केला गेला. यामुळे सटल असलेली आऊटफिटची डिझाइन्स उठून दिसायला आपोआपच मदत झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या ऑट कोट्युअर वीकमुळे वर्षभराच्या डिझाइन्सचा सटल, पेस्टल तरीही दिसायला अगदी फ्रेश आणि फ्लोइ वाटणारा पॅटर्न तयार व्हायला सुरुवात झाली आहे.