फॅशनचा ‘धुरळा’

२०२० च्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या फॅशन ट्रेण्डचा धुरळा उडणार आहे..

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

गेल्या काही महिन्यांपासून ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करून काही आकर्षक कपडे ग्लोबल फॅशनमध्ये ट्रेण्ड होताना दिसत आहेत. ढगळ किंवा अति बटबटीत कपडय़ांची यंदा फारशी क्रेझ दिसली नाही, कारण या वर्षी अशा अतिरंजित डिझाइन्सच्या कपडय़ांचा फार बोलबाला झाला होता. मात्र प्रत्यक्षात बाजारात काही ते टिकले नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्षी अगदी सुबक आणि रेखीव कपडे पाहायला मिळतील. २०२० च्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या फॅशन ट्रेण्डचा धुरळा उडणार आहे..

फॅशनिस्तांच्या मते, पुढच्या वर्षीची फॅशनही आरामदायी असली तरी ती जास्त लक्झरियस असेल. त्यांचे असेही म्हणणे आहे की, यापुढे येणाऱ्या फॅशनचे स्थान हे प्रामुख्याने जागतिक स्तरावरचेच असेल. ग्लोबल अपील लक्षात घेऊन केलेली फॅशनआणि नव्याने येणारी फॅशनही जास्तीत जास्त प्रमाणात किंबहुना लवकरात लवकर स्टॅण्ड आऊट कशी होईल याबाबत डिझायनर्स डोळ्यात तेल घालून लोकांच्या आवडीनिवडींवर, खरेदीचे चॉइसेस, बदलत्या ब्रॅण्ड्सची आवड इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. त्याप्रमाणे एकंदरीत मार्केटचा अंदाजही त्यांना बांधता येतो आणि आपण निर्माण केलेली फॅशनबाजारात लोकप्रिय कशी होईल, याची गणितंही आखली जातात. सध्या तरी पुढच्या वर्षीच्या स्प्रिंग कलेक्शनकडे लोकांचे लक्ष लागले आहे, कारण यंदा विंटर सीझनला ग्राहकांना कोणताच दिलासा मिळाला नव्हता. काही तरी ‘नवं’ म्हणतात ते ग्राहकांच्या पदरी पडलं नाही. पण म्हणून फक्त स्प्रिंग कलेक्शनवर भर देऊन चालणार नाही. संपूर्ण वर्षभर ट्रेण्ड्सचे हायलाइट्स काय असू शकतात याबद्दल जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फॅशन एक्सपर्ट्सचा मूळ उद्देश आहे तो यंदा ग्राहकांना सीझनल वेअरकडे आकर्षित करणे आणि त्यात वैविध्य आणणे. त्याचप्रमाणे ग्राहक ज्या रीतीने सेलिब्रिटी फॅशनआणि रॅम्पवरील फॅशनकडे आकर्षित होतात तसे कपडे डिझाइन करताना ग्राहकांच्या कम्फर्टचाही विचार केला जाईल. तसंच गेल्या काही वर्षांत ‘प्लस फॅशन’आणि साईज कपडय़ांचा जो प्रसार झाला आहे. त्याची व्याप्ती या वर्षी अधिक वाढवावी, यादृष्टीने प्रयत्न होताना दिसणार आहेत. ‘प्लस फॅशन’ची संकल्पना जेवढी बाजारासाठी महत्वाची ठरली तशीच आणखी एक गोष्ट ग्राहकांसाठी महत्वाची आहे. ते म्हणजे महागडे कपडे किंवा सेलिब्रिटींचे कपडे जे लोकांना आकर्षित करतात ते त्यांना खरेदी करणे सोपे नसते. त्यामुळे तशीच फॅशन ग्राहकांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून देणे हे नव्या वर्षांत डिझायनर्ससमोरचे आव्हान आहे. त्यापद्धतीने फॅशनचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यावर सध्या फॅशन डिझायनर्सचा भर आहे.

क्लोदिंगमध्ये पॅटर्न्‍सचा विचार करायचा झाल्यास कॅज्यूअल वेअरमध्ये पोलका डॉट्स, स्ट्राइप्स, टाय अ‍ॅन्ड डाय, ब्रोकेड, ट्रॉपिकल पॅटर्न, पॅचवर्क पॅटर्न, अर्गायल पॅटर्न, हाउंडस्टूथ, प्रेस्ड फ्लोरल पॅटर्न्‍स, ऑप्टिकल पॅटर्न्‍स असे पॅटर्न्‍स यापुढे दिसतील. तर प्रिंट्समध्ये स्क्रिबल्ड शेप्स, ब्रुश्ड मार्क्‍स, स्पॉट्स, अ‍ॅनिमल प्रिंट्स दिसतील. या प्रिंट्स जास्तकरून अ‍ॅबस्ट्रॅक्टमध्ये येणार आहेत. त्याचसोबत हायपर रिअलिस्ट फ्लोरल्स (यात मुख्यत्वे काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर कलरफुल फ्लोरल्स असतात, जेणेकरून त्याचा इफेक्ट चांगला येतो), बटरफ्लाइज, हार्ट्स, वॉटरकलर मोटिव्हज, पिझले प्रिंट्स (यात स्टायलिंगला खूप वाव आहे कारण यात हवे तेवढे रंग डिझायनर वापरू शकतो), स्लोगन आणि फ्रेझेस (यांची क्रेझ यंदा खूप होती आणि यापुढेही राहील.), गिगनम आणि चेक्स प्रिंट्स (हे ट्रॅडिशनल प्रिंट्स आधुनिक म्हणूनच पाहिले जात असल्याने पुढील दहा वर्षे तरी याला मरण नाही.), लॅण्ड्स्केप आणि कॅमोफ्लाज असे एकाहून एक सरस प्रिंट्स आणि पॅटर्न्‍स पुढच्या वर्षी पाहायला मिळतील. २०२०चे प्रिंट्स आणि पॅटर्न्‍स हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जास्त दिसतील. ज्यात २डी, कॉन्ट्रास्ट, मल्टिलेअर, मल्टिकलर, शिमर, ग्लिटर, ग्लॉसी, जिओमॅट्रिक कॉम्बो असे नानाविध प्रकार यात प्रामुख्याने पीहायला मिळतील.

असाही एक निष्कर्ष काढला जातोय की २०२१ मध्ये ३डी डिझाइन्सही दिसण्याची शक्यता आहे. तसं पाहायला गेलं तर कॅज्यूअल वेअरची गरज आजपर्यंत बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे टूर, पार्टी, लॉन्ग ड्राइव्ह, व्हेकेशन इत्यादी म्हणजे आऊटिंसाठीच्या कपडय़ांमधले वेगवेगळे प्रकार जास्त प्रमाणात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. पण इथे फॅशनची गणितं कुठे तरी चुकल्यासारखी वाटतात. कारण सगळे पॅटर्न्‍स हे लेयरिंगवर (एकावर एक या अर्थाने) भर देणारे आहेत. त्यातही पर्याय फार कमी आहेत. त्याचे कारण एक तर लेयरिंगच्या नावाखाली लॉन्ग साइज कपडे दिले जातात. यात लॉन्ग जॅकेट्स, स्कर्ट्स, कफ्तान इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे कॅज्यूअल वेअरमध्ये लेयरिंग यापुढे असण्याची शक्यता असली तरीसुद्धा तुम्ही त्यांचा वापर इतर आऊटफिट्सवरही करू शकता. त्याचा अजून एक फायदा असा की, अमुक एका कपडय़ांवर तमुक एक स्टायलिंग असं काहीही आणि कोणतंही बंधन तुम्हाला राहणार नाही. तुम्ही हव्या त्या पद्धतीने स्टायलिंग आणि पेअरिंग करू शकता, कारण त्यांचे पॅटर्न्‍स आणि प्रिंट आणताना डिझायनर्सनी हे डिझाइन्स युनिव्हर्सली अपील होतील अशा पद्धतीने तयार केले आहेत. ज्याच्या फायदा प्रामुख्याने ग्राहकांना स्टायलिंगच्या बाबतीत होऊ  शकतो. महत्त्वाचा भाग असा की युनिसेक्स फॅशनही त्यामुळे हळूहळू रुजू पाहते आहे. पुरुषांसाठीचे प्रिंट्स वेगळे आणि स्त्रियांचे वेगळे असे प्रकार न राहता दोघांसाठईही एकाच पद्धतीचे कपडे डिझाइन होत आहेत. त्यातून मेन्सवेअरमध्ये अ‍ॅनिमल प्रिंट, फ्लोरल, सेमी-लेयर्ड, अ‍ॅबस्ट्रॅक्ट, नियॉन, इल्यूझन, मोनोक्रोम, लेदर, मिसमॅच, प्रेपी, परका अशा नानाविध स्टाइल्स याआधीच दिसू लागल्या आहेत. त्यात वाढ होईल.

फुटवेअरमध्ये हिल्स आणि सॅण्डल्स यांना मागणी जोरदार असेल. आता जास्तकरून ग्राहकांमध्ये टूरझिमची क्रेझ असल्याने शूज आणि गमबूटसारखे पर्याय लोकांना जास्त सोयीस्कर असतात. हे बूट्स सिंगल कलरचे पाहायला मिळतील. प्रामुख्याने काळे-पांढरे रंग फूटवेअरमध्ये या वर्षी पाहायला मिळाले होते जे पुढल्या वर्षी अक्षरश: टाळले जातील आणि रंगीत बुटांना महत्त्व दिले जाईल. याचं कारण असं की विंटेज लुक्स पुढल्या वर्षीही गाजणार आहेत, परंतु त्याला साजेसे काहीही फॅशनमध्ये फारसं दिसणार नाही. त्यामुळे बूट्स जे खासकरून विंटेजच्या काळातले असले तरी ते काळ्या-पांढऱ्या रंगात न येता रंगीत असतील. हिल्सवरही सॉक्स घालण्याचा फंडा रुजू पाहतो आहे. यातही खूप डिम रंग आहेत. सॅण्डल्समध्ये लेस-अप सॅण्डल्स आहेत. मुळात यामध्ये खूप प्रयोग केले जाणार आहेत. लेस-अप सॅण्डल्सच्या साईजमध्येसुद्धा बदल पाहायला मिळतील. याची भुरळ ऑनलाइन साइट्सना खरं तर केव्हाच पडली होती त्यामुळे लेस-अप सॅण्डल्सचा ट्रेण्ड इतक्यात काही जाणार नाही आणि तो पुढच्या वर्षीही राहील. काही स्टाइल्समध्ये आपल्याला तोचतोचपणा सहन करावा लागेल, पण लेस-अप सॅण्डल्समध्ये असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अजियो.कॉम, मिन्त्रा आणि कूव्सवर गेलात तर तुम्हाला खूप पर्याय हमखास मिळतील. मुलांसाठीसुद्धा कॅज्युअल शूज असतील. खासकरून स्लिपर्स खूप मोठय़ा ब्रॅण्ड्सकडून येऊ  घातले आहेत. बऱ्याच ब्रॅण्ड्सनी त्यांचे पुढच्या वर्षीचे रंग जाहीर केले आहेत. त्यात लाल रंगाचे स्लिपर्स मेन्सवेअरमध्ये येतील. खरं म्हणजे मुलींप्रमाणे मुलांमध्येदेखील सॅण्डल्स येऊ  घातल्या आहेत. वूड कलरच्या अशा काही आकर्षक सॅण्डल्स मेन्स फूटवेअरमध्ये पुढच्या वर्षी लवकरच बाजारात उपलब्ध होतील. अर्थात हे काही कॅज्युअलमध्ये मोडत नाहीत, पण कॅज्युअल शूजनाही जोरदार मागणी असेल हे नक्की. मुलींसाठी याहून एक असा प्रकार फूटवेअरमध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे मॅक्झिमलिस्ट आणि मिनिमलिस्ट फूटवेअरचा. याबाबतीत चपलांवर एक तर अतिशय डिझायनर लुक किंवा सिम्पल डिझाइन या पद्धतीचा लुक असे दोन लुक उपलब्ध होतील. यातही खूप सारे प्रकार उपलब्ध होणार आहेत.

क्लोदिंग व फूटवेअर जसे महत्त्वाचे आहेत तितकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त त्यावरच्या अ‍ॅक्सेसरीज, बॅग्ज, दागिने, आयवेअर महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि यात वैविध्यच वैविध्य पाहायला मिळणार आहे. ब्रॅण्डेड पर्सेस किंवा बॅग्ज तुम्हाला बकेट बॅग्ज, सॉफ्ट क्लचेस आणि पॅडेड हॅण्डबॅग्ज अशा स्वरूपात मिळतील. यावर कु ठलेही आऊटफिट जाईल इतक्या या सिंपल आणि कॅज्युअल असतील. पण तुम्ही वॉचेसमध्ये पर्याय पाहायला गेलात तर मात्र कॅज्युअल असं तिथे काहीच पाहायला मिळणार नाही. ओव्हरऑल वॉचेस ही लक्झरियस आणि हेवी मटेरिअल्सची असतील. आऊटडेटेड रंगांची घडय़ाळं या वर्षी थोडी दिसली होती, त्यामुळे पुढच्या वर्षीच्या रंगांच्या बाबतीत काही खात्री सध्या तरी नाही. तरी गोल्डन आणि ब्लॅक वॉचेस जास्त वापरले जातील हे तितकेच खरे. सनग्लासेस हे मेन्सवेअरमध्ये अधिक येतील, वूमन्सवेअरमध्ये फार पर्याय दिसणार नाहीत. हॅट्स आणि बेल्ट्स हे त्या त्या आऊटफिटवरच येतील. पुढच्या वर्षी वेगळा असा त्यांचा ट्रेण्ड कमी पाहायला मिळेल. दागिने हे जास्त करून मेटलचे आणि लांब-रुंद असण्याची शक्यता अधिक आहे.

पुढच्या वर्षीच्या टेक्नोसॅव्ही लाइफस्टाइलच्या मार्गावर आपण येऊन पोहोचणार असल्याने तसे फॅशन ट्रेण्ड्स येऊ  घातले आहेत. ग्लोबल सिनेमाही तसा साय-फाय होत असल्याने जीवनशैलीवरही त्याचा परिणाम दिसून येईल. आणि तेच फॅशनमध्येही प्रतिबिंबित होईल, यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Global fashion trend abn

Next Story
सुनिताची अंतराळात दुसरी यशस्वी झेप !
ताज्या बातम्या