गायत्री हसबनीस

फॅशन ही एक गरज आहे. पण सध्या जगभरात फॅशन हा एक बाजार झाला आहे. त्यातूनच फॅशनच्या अनेक नकारात्मक बाजू समोर आल्या फॅशनविश्वात नकारात्मक स्थितीच वाढत चालली आहे. सध्याच्या सोशल मीडिया आणि बिझनेसच्या जमान्यात हे नकारात्मक संकेत ठळकपणे जाणवत आहेत. सरत्या वर्षांला निरोप देताना फॅशन इंडस्ट्रीमधल्या काही नकारात्मक बाबींचा विचार करत त्या टाळून अच्छे दिन कसे येऊ शकतील यावर नजर टाकू या..

आजपर्यंत आपण बऱ्याच जणांनी जागतिक पातळीवरील फॅशनआपापल्या नजरेतून पाहिली आहे, किंबहुना आजपर्यंत फॅशनच्या वर्तुळाकडे परिघाबाहेरून डोकावण्याचाच प्रयत्न करत होतो. त्यात नक्की दडलेय काय, याचा फारसा विचार आपण कधीच केला नाही. रोजच्या घटनांमधून बरीवाईट ग्लोबल फॅशन आपल्यापर्यंत पोहोचत होती. फॅशनलाही ग्रे शेड्स आहेत, हेही हळूहळू कळत गेले. त्याहूनही पुढे एक असा पदर या फॅशनला आहे, तो म्हणजे ग्लोबल फॅशनमधील नकारात्मक ट्रेण्ड्स. प्रत्येक फॅशनआपल्याला काही तरी चांगले देतेच असे नाही. या वर्षी फॅशनमार्केट अल्पावधीतच वाढले आहे, अनेक देशोदेशीचे ग्राहक विविध प्रकारचे, रंगढंगांचे कपडे ‘ग्लोबली’ खरेदी करू लागले आहेत, हे आपण पाहिले. कपडय़ांच्या किमतीही अवाढव्य होत्या. जागतिक पातळीवर एक असाही सर्वसामान्य ग्राहक आहे जो एवढे महागडे कपडे खरेदी करू शकतो का? या वर्षीच्या नोंदणीनुसार ‘गूची’, ‘शनेल’, ‘डिओर’, ‘वर्सेस’, ‘पोलो’ असे ब्रॅण्ड्स हे सर्वात महागडे ब्रॅण्डस आहेत. तर दुसरीकडे जास्तीत जास्त प्रमाणात कपडय़ांची नासाडीही होते आहे. म्हणजेच महागडे कपडे विकत घेणारी मंडळी एकदा वापरून झालेले कपडे टाकून देतात आणि त्याच वेळी पुन्हा तसेच महागडे कपडे विकतही घेतात. सतत नवे काही तरी पाहिजे म्हणून होणाऱ्या या खरेदीचे प्रमाण दिवसागणिक वाढतच गेले. दुसरी एक बाजू अशी की, अनेक देशांतील कमावता वर्ग हा स्ट्रेसफुल असल्याचे अनेकविध पाहणीतून निष्पन्न झाले आहे. जागतिक स्तरावरचे अर्थकारण सर्वसामान्यांसाठी तापदायक ठरले असल्याने त्याचा परिणाम लोकांच्या क्रयशक्तीवर झाला असल्याने कपडय़ांपासून अनेक वस्तूंच्या खरेदीचा वेगही मंदावला आहे. या गोष्टी आता विचारात घेऊनच फॅशन उद्योगाची पुढची दिशा ठरवणे गरजेचे आहे.

सध्याचा काळ हा जास्त महागाईचा ठरला असल्याने यंदाचा ख्रिसमस जास्त महागडा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यात कपडे खरेदीचाही समावेश आहे. चीनसारख्या देशात तर कपडे, अ‍ॅक्सेसरीज, फुटवेअर इत्यादी गोष्टी या अत्यंत महागडय़ा असल्याचे म्हटले गेले आहे. तेथील महागाईचे एकमेव कारण होते ते म्हणजे कमी कालावधीत कमी वस्तूंचे उत्पादन करणे आणि त्यातून निर्माण झालेला तुटवडा बऱ्याच ब्रॅण्ड्सना तापदायक ठरला आणि वस्तू महाग झाल्या. आज जगभरात तरुण पिढीला आकर्षित करतील अशा कपडय़ांचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. त्यातून चीनसारख्या देशात तर ईबाजाराचे जाळे अधिक आहे आणि येथे तरुणाईला पसंत पडतील असे कपडे विकले जातात. परंतु या कपडय़ांच्या बाबतीत महागाईने खूप मोठा खो घातला. आजच्या काळात ‘स्ट्रीटफॅशन’ही महागडी ठरली आहे. स्ट्रीटफॅशनचे प्रॉडक्शन आणि मागणी पाहता ती महाग असणार याचा अंदाज येतोच, पण नवखे फॅशनब्रॅण्ड्सदेखील स्वत:ला स्ट्रीटफॅशनमध्येच उतरवत आहेत. त्यातून मार्केटच्या दरानुसार सुरुवातीला त्यांच्या दुकानात मिळणारे कपडे हे अत्यंत महाग असतात. फॉक्स-फर जॅकेट हे १,००० यूएस डॉलरच्या खाली मिळत नाही. दोन ब्रॅण्ड्सचे एकत्रीकरण करून उत्पन्न वाढवले जाते, असे एक निरीक्षण आहे. ‘नाईकी’ आणि ‘सुप्रीम’ या दोन ब्रॅण्ड्सनी एकत्रितपणे केवळ बिझनेस वाढवायचा म्हणून शूज विकायला काढले तर यात त्यांची सुरुवातीची किंमत होती ३०० डॉलर एका जोडीसाठी. त्यानंतर त्यांची किमत रिसेलिंगच्या वेळी ३०० ते ५०० डॉलर्सपर्यंत वाढली आणि जेव्हा कोण्या एका सेलिब्रिटीने कुठल्या तरी मोठय़ा पार्टीला ते शूज घातले आणि त्याची किंमत ८०० डॉलरने वर गेली. महागाईचे गणित हे असे विचित्र आहे.

‘लूईस विटोन’सारखा ब्रॅण्ड घेतला तर त्यांनी ‘लीग ऑफ लेजेन्ड्स’सोबत केलेले एकत्रीकरण ग्राहकांना फारच महाग पडले. यांचे जॉगर्स १,६१० डॉलरचे तर झिपर हुडी २,४२० डॉलर एवढे महाग आणि लेदर बाईकर जॅकेट ५,६५० डॉलर इतक्या चढय़ा किमतीचे आहे. सामान्य माणसांना डोळे मोठे करायला लावणारीच ही संख्या आहे. इथूनच फॅशन उद्योगातील नकारी बाबींची सुरुवात होते. ‘सस्टेनेबल फॅशन’चा जो घाट घातला गेला तोही फार फायदेशीर ठरला नाही. सस्टेनेबल फॅशनची वाढ जशी होणे अपेक्षित होते तशी ती होतही नव्हती. एकीकडे २०४० सालपर्यंत फॅशनअवलियांना कपडय़ांची संख्या १०२ मिलियन एवढी करायची असून त्यातून मिळणारे उत्पन्न ३.३ ट्रिलियन यूएस डॉलरने वाढवायचे आहे. हे कसे शक्य आहे? मुळात हा उद्देश ठेवणारे ‘अदिदास’, ‘नाईकी’, ‘एच अ‍ॅण्ड एम’सारखे बडे ब्रॅण्ड्सच आहेत. एकूणच या ब्रॅण्डचा चढता आलेख पाहता त्यांच्या अजेंडय़ामध्ये सस्टेनेबिलिटीचा उपक्रम कुठेच दिसून येत नाही. फक्त हेच ब्रॅण्ड्स नाहीत तर असे किती तरी ब्रॅण्ड्स आहेत ज्यांनी अजूनही सस्टेनेबल फॅशनपूर्णत: स्वीकारलेली नाही. २०३० पर्यंत तरी पूर्णत: सस्टेनेबल फॅशनघडवण्याकडे असणारा कल खरेच यशस्वी ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरी वाईट बाब म्हणजे सस्टेनेबल फॅशनहीच महागडी फॅशनम्हणून सध्या ओळखली जाते. भारताचे अ‍ॅपरल मार्केट २०२२ पर्यंत ५९.३ बिलियन यूएस डॉलरने वाढवायचे आहे, मात्र हे शक्य करण्यासाठी सस्टेनेबल फॅशनकमी पडते आहे.

‘फेक फॅशन’चे जाळे सगळीकडे वेगाने पसरत चाललेले आहे. किती तरी ऑनलाइन मार्केट्समध्ये ही फेक फॅशनजोर धरू लागली आहे. एका प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ४५० मिलियन डॉलरचा बाजार हा केवळ या फेक फॅशनचाच आहे. लंडनमध्ये असा प्रसंग घडला की एका प्रसिद्ध ब्रॅण्डसारखे हुबेहूब दिसणारे नॉनब्रॅण्डेड कपडे खरेदीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. त्यासंदर्भात अधिक तपास केला असता अशा कपडय़ांच्या १९ हजार फेक क्लोदिंग साइट्स समोर आल्या. ज्या लवकरात लवकर बंद करण्याचा प्रयत्न लंडनमधील पोलीस यंत्रणा करते आहे. जगभरातून चालणाऱ्या या फेक फॅशनच्या उद्योगातून २७.७ बिलियन डॉलरचे उत्पन्न विकसित होते आहे. कपडे तर फेक असतातच, पण त्याहूनही त्या कपडय़ांवरचे लोगोही खोटे असतात. या फॅशनला जगभरात ‘काऊंटरफीट फॅशन’ असे म्हणतात. या वर्षी तर इन्स्टाग्रामही या फेक फॅशनचा एक आधारस्तंभ बनले आहे. इथे त्याची सर्रास खरेदी विक्री होत असते. या फेक फॅशनमुळे सायबर क्राइम वाढतो आहे. हे असेच चालू राहिले तर ही फॅशन उद्योगासाठी ग्लोबलीधोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे या तिसऱ्या नकारात्मक स्थितीचा विचार आता फॅशनइंडस्ट्रीमध्ये व्हायलाच हवा, असा मतप्रवाह जोर धरतो आहे.

लाइफस्टाइल आणि फॅशनट्रेण्ड्स एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जातात, त्यातूनच मग बाजारपेठही विकसित होत जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यापाराची मूल्ये, उद्योगातील चढउतार, प्रदूषण, महागाई आणि ‘टाकाऊ तून टिकाऊ’सारख्या घोषणा पुढल्या वर्षीही होतच राहतील. यापुढे मोठे आव्हान असणार आहे ते कपडय़ांच्या वाढत्या कचऱ्याचे! सगळीकडे सस्टेनेबल फॅशनपुढे आणण्याचाच आग्रह वाढत असल्याने त्याप्रमाणे आवश्यक असणारी आखणीही सकारात्मकतेने बऱ्याच उपक्रमांतून के ली जाते आहे. जास्तीत जास्त फॅशनही ग्राहकांच्या गरजेनुसार निर्मिती करण्याचे, केमिकल्स टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ‘ग्रीन गॅस इमिशन’ रोखण्याचे हे ठोस प्रयत्नच २०२० पासून नवी आव्हाने पेलण्यासाठी लाभदायक ठरतील.

viva@expressindia.com