हवामान बदल, वाढते तापमान, नष्ट होत चाललेल्या नद्या, कमी होणारी जैवविविधता आणि वाढती विकासकामे यामुळे पर्यावरण संवर्धन हा केवळ चर्चेचा विषय राहिलेला नाही, तर ती काळाची गरज बनली आहे. अशा वेळी भारतातील दोन महिलांनी जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘व्हिटली अवॉर्ड २०२६’ मध्ये भारतीय पर्यावरण संवर्धक  बरखा सुब्बा आणि परवीन शेख यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्यातून महाराष्ट्रातील तरुणांनाही निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळू शकते.

दार्जिलिंग परिसरातील दुर्मीळ हिमालयीन ‘सॅलमँडर’ (सरड्यासारखा दिसणारा प्राणी) या उभयचर प्राण्याच्या संरक्षणासाठी बरखा सुब्बा हिने मोठे काम हाती घेतले आहे. पर्यटन, शहरीकरण आणि नष्ट होत चाललेल्या पाणथळीमुळे संकटात आलेल्या या प्रजातीच्या संवर्धनासाठी तिने स्थानिक नागरिक, महिला आणि आदिवासी समुदायांना सोबत घेतले. जैवविविधता जपताना स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो, हे तिने सर्वांसमोर आणले. दुसरीकडे परवीन शेख चंबळ नदीतील संकटग्रस्त ‘इंडियन स्किमर’ (पाणचिरा) पक्ष्याच्या संरक्षणासाठी काम करते आहे. नदीपात्रातील वाळू उपसा, प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असताना परवीनने स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि तरुणांना संवर्धन मोहिमेशी जोडले. ‘गार्डियन्स ऑफ द स्किमर’ या उपक्रमातून तिने नागरिक सहभागावर आधारित संवर्धनाची नवी दिशा दाखवली. या दोघींच्या कामाचे महत्त्व एवढेच नाही की त्यांनी जागतिक पुरस्कार मिळवला, तर त्यांनी तरुणांना पर्यावरणासाठी कृती करण्याचा मार्ग दाखवला. आज महाराष्ट्रातही अशाच संवर्धनाची मोठी गरज आहे. कोकणातील कातळसडे, सह्याद्रीतील जैवविविधता, मुंबई आणि नवी मुंबईतील कांदळवन , गावांमधील पारंपरिक जलस्रोत आणि नद्या अनेक संकटांना सामोरे जात आहेत. अनेक ठिकाणी तरुणच पुढे येऊन संवर्धनाचे काम करत असल्याचे चित्र दिसत असले, तरी ही चळवळ अधिक व्यापक होण्याची गरज आहे.

पर्यावरण संवर्धन म्हणजे फक्त झाडे लावणे नाही, तर निसर्गाशी असलेले आपले नाते जपणे होय. आपल्या परिसरातील जैवविविधता समजून घेणे, स्थानिक पर्यावरणीय प्रश्नांबद्दल जागरूक राहणे आणि कृती करणे हे आज अधिक आवश्यक झाले आहे. बरखा सुब्बा आणि परवीन शेख या दोघींनी दाखवून दिले की, मोठा बदल घडवण्यासाठी मोठ्या पदाची गरज नसते; गरज असते ती संवेदनशीलतेची आणि सातत्याची. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत तापमानवाढ स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मार्च-एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये काँक्रीटीकरण वाढल्याने ‘हीट आयलंड इफेक्ट’ गंभीर होत आहे. झाडांची संख्या कमी होणे, मोकळ्या जागा नष्ट होणे आणि वाढते प्रदूषण यामुळे शहरांतील पर्यावरणीय समतोल ढासळत चालला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर डोंगरकपात, रस्ते प्रकल्प आणि अनियंत्रित पर्यटनामुळे नैसर्गिक अधिवासांवर परिणाम होत आहे. कातळसडे, जैवविविधतेने समृद्ध पठारे आणि स्थानिक वनस्पती यांच्यावर विकासकामांचा दबाव वाढतो आहे. काही ठिकाणी स्थानिक तरुण पुढे येऊन कातळसड्यांचे दस्तऐवजीकरण, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती करत आहेत. ही चळवळ अजून व्यापक होण्याची गरज आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील कांदळवनांवरही अतिक्रमण आणि कचर्‍याचा ताण वाढतो आहे. कांदळवन हे केवळ झाडांचे जंगल नाही, तर किनारपट्टीचे संरक्षण करणारी नैसर्गिक भिंत आहे. पूरस्थिती कमी करण्यापासून ते जैवविविधता टिकवण्यापर्यंत त्यांची महत्त्वाची भूमिका असते. तरीही अनेक ठिकाणी कांदळवनांमध्ये प्लास्टिक कचरा आणि बांधकामे केलेली दिसून येतात. राज्यातील नद्यांची स्थितीही चिंताजनक आहे. औद्योगिक सांडपाणी, रासायनिक प्रदूषण आणि प्लास्टिकमुळे अनेक नद्या प्रदूषित होत आहेत. काही गावांमध्ये पारंपरिक जलस्रोत आणि तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई अशी दुहेरी समस्या निर्माण होते आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसतो आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरते. आज अनेक तरुण ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून निसर्गाशी जोडले जात आहेत. हीच ऊर्जा संवर्धनाकडे वळू शकते. पक्षी गणना, नदी स्वच्छता अभियान, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, कांदळवन संवर्धन, स्थानिक जलस्रोतांचे जतन, प्लास्टिकमुक्त मोहिमा अशा अनेक उपक्रमांमध्ये तरुण सहज सहभागी होऊ शकतात. ‘सिटिझन सायन्स’च्या माध्यमातून सामान्य नागरिकही संशोधन आणि संवर्धनाचा भाग बनू शकतात. ‘सिटिझन सायन्स’ ही संकल्पना आता वेगाने पुढे येत आहे.  मोबाइल फोटोग्राफी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मीळ पक्षी, वनस्पती किंवा पर्यावरणीय बदलांची नोंद ठेवता येते. अनेक स्वयंसेवी संस्था तरुणांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत आहेत.

आज महाराष्ट्रातील अनेक तरुण पर्यावरणाच्या प्रश्नांबद्दल जागरूक होत आहेत. ही जागरूकता कृतीत उतरली, तर भविष्यात महाराष्ट्रातूनही अनेक ‘ग्रीन हिरोज’ घडू शकतात. निसर्ग वाचवण्याची ही लढाई आता केवळ पर्यावरणतज्ज्ञांची राहिलेली नाही; ती तरुणांचा सहभाग असलेली नवी सामाजिक चळवळ बनते आहे.

viva@expressindia.com