पुराणात असे म्हटले जाते की चैत्र शुक्ल प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे चैत्र महिना हा केवळ मराठी नववर्षाचा आरंभ नसून सृष्टीच्या प्रारंभाचेही प्रतीक मानला जातो. वैदिक परंपरेत चैत्राला ‘मधुमास’ असेही संबोधले जाते. वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्ग नव्या उमेदीने बहरतो. झाडांना पालवी फुटते, फुलांच्या सुगंधाने वातावरण दरवळते आणि पृथ्वी जणू एखाद्या शृंगार केलेल्या स्त्रीप्रमाणे सजलेली भासते. या ऋतूतील ही नवचैतन्याची अनुभूती आपल्या शरीराला आणि मनालाही ताजेतवाने करणारी ठरते.याच नव्या सुरुवातीच्या, उत्साहाच्या आणि विजयाच्या भावनेचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात प्रत्येक घरासमोर उभारली जाणारी गुढी ही समृद्धी, मंगलता आणि विजयाचे प्रतीक मानली जाते. काठीवर बांधलेले रेशमी वस्त्र, त्यावर ठेवलेले तांब्याचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाच्या पानांचा व आंब्याच्या डहाळ्यांचा साज… या सगळ्या तयारीनिशी नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढी उभारणे म्हणजे केवळ परंपरा जपणे नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्प आणि सकारात्मकतेचा स्वीकार करणे होय. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा आरंभ नसून सांस्कृतिक अस्मिता, ऐतिहासिक अभिमान आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. विशेषतः पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये निघणाऱ्या भव्य गुढीपाडवा शोभायात्रांनी या सणाला सार्वजनिक आणि सांस्कृतिक आयाम दिला आहे. गेल्या दोन दशकांत या शोभायात्रांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग विशेषत्वाने लक्षात येतो. पारंपरिकतेचा आधुनिकतेशी संवाद घडवून आणत, तरुणाई या उत्सवाला नव्या ऊर्जेने आणि नव्या अभिव्यक्तीने समृद्ध करते आहे.महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाते. पारंपरिक पोशाख परिधान केलेले स्त्री-पुरुष, ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुका, लेझीम पथके, सांस्कृतिक देखावे आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडवणारे चित्ररथ या सगळ्यांमुळे वातावरण उत्साहाने भारून जाते. ही शोभायात्रा केवळ एक मिरवणूक नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाची, एकात्मतेची आणि परंपरेच्या जतनाची जिवंत अभिव्यक्ती ठरते.

अशा प्रकारे सृष्टीच्या निर्मितीची पौराणिक संकल्पना, वसंत ऋतूतील निसर्गाचे पुनरुज्जीवन आणि समाजाच्या सामूहिक उत्सवभावनेचा सुंदर संगम गुढीपाडवा आणि त्याच्या शोभायात्रांमधून अनुभवायला मिळतो. नववर्षाच्या स्वागताबरोबरच हा सण आपल्याला परंपरेशी जोडून ठेवत नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देतो.शोभायात्रेची सुरुवात सहसा सकाळी गुढी उभारणीच्या विधीनंतर होते. भगव्या पताका, पारंपरिक तोरणे आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजलेल्या रस्त्यांवरून मिरवणूक पुढे सरकते. मिरवणुकीच्या अग्रभागी सुशोभित गुढी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा किंवा ऐतिहासिक देखावे असलेले चित्ररथ असतात. मराठी संस्कृती, परंपरा आणि इतिहास याबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही त्यामुळे, प्रत्येक शोभायात्रेत एक तरी चित्ररथ हा महाराजांचा असतोच.

या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ढोल-ताशा पथके. ही पथके गुढीपाडव्याच्या काही महिने आधीपासून सराव करतात. तालबद्ध आणि शक्तिशाली ठेक्यांनी वातावरण भारावून टाकणारे हे सादरीकरण केवळ मनोरंजन नसून शिस्त, एकजूट आणि सांस्कृतिक अभिमान यांचे प्रतीक बनते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अलीकडील काळात मुलींचा ढोल-ताशा पथकांमधील सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. लेझीम पथके, लाठी-काठीचे सादरीकरण, पारंपरिक लोकनृत्ये यांमधून महाराष्ट्राच्या लोककलांचा रंगतदार आविष्कार शोभायात्रेत पाहायला मिळतो. तरुण मंडळे या सादरीकरणांसाठी विशेष तयारी करतात. काही ठिकाणी ऐतिहासिक प्रसंगांचे किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांचे चित्ररथ (झांकी) देखील सादर केले जातात. या शोभायात्रांमध्ये पारंपरिक वेशभूषेचाही मोठा वाटा असतो. तरुणी नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर बिंदी आणि पारंपरिक दागिने परिधान करून सहभागी होतात; तर तरुण फेटा, कुर्ता किंवा धोतर परिधान करून मिरवणुकीत सामील होतात. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे या पारंपरिक वेशभूषेला तरुणांमध्ये नवे आकर्षण प्राप्त झाले आहे. इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या माध्यमांवर या उत्सवाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात, ज्यामुळे गुढीपाडव्याचा उत्साह अधिक व्यापक पातळीवर पोहोचतो.हल्ली तरुण मुलींची नऊवारी आणि पारंपरिक वेशातली बुलेटवरची एंट्री, शाळेतल्या मुलींचे झांज पथक, ज्या ज्या पद्धतीने मराठी संस्कृतीचे सौंदर्य दाखवता येईल, ते सगळे प्रकार शोभायात्रेत पाहायला मिळतात. अलीकडील काळात काही शोभायात्रांमध्ये स्ट्रीट शो सादर करून पर्यावरणसंवर्धन, जलसंधारण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण किंवा शिक्षणाचे महत्त्व यांसारख्या विषयांवर आधारित झांकी किंवा फलकांद्वारे जनजागृती केली जाते. ज्यामध्ये, सामाजिक संदेश नाट्यस्वरूपातून दिला जातो, हे प्रकार शोभायात्रेत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सादर होतात आणि यात तरुणाईचा सहभाग मोठा असतो.तरुण मंडळे पर्यावरणपूरक गुढीपाडवा साजरा करण्यावर भर देत आहेत. प्लास्टिकऐवजी नैसर्गिक सजावट, कागद किंवा कापडी पताका, तसेच पुनर्वापर करता येतील अशा साहित्याचा वापर करून सजावट केली जाते. काही ठिकाणी झाडे लावण्याचे किंवा स्वच्छता अभियानाचे उपक्रमही शोभायात्रेशी जोडले जातात. शोभायात्रेचे आयोजन हे फक्त परंपरा जपण्यासाठी नव्हे तर त्यातूनही काही शिकण्याचा आपला प्रयत्न असतो, असं तरुण आयोजक सांगतात. शोभायात्रेच्या आयोजनात नेहमी पुढे असणारी सायली पाटील सांगते, ‘शोभायात्रेच्या आयोजनात सहभागी होताना आम्हाला खूप काही शिकायला मिळते. नियोजन, टीमवर्क आणि लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य विकसित होते. त्याचबरोबर आपल्या सण-परंपरांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधीही मिळते’.

सोशल मीडियाचा वापर हा तरुणांचा आणखी एक महत्त्वाचा नवोन्मेष आहे. इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा फेसबुकच्या माध्यमातून शोभायात्रेचे लाइव्ह कव्हरेज, माहितीपर व्हिडीओ आणि सांस्कृतिक संदेश प्रसारित केले जातात. यामुळे गुढीपाडवा आणि त्यामागील परंपरेची माहिती नव्या पिढीपर्यंत आणि जागतिक स्तरावर पोहोचते. अनेक शोभायात्रांमध्ये महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली दाखवणारे देखावे असतात. पारंपरिक शेतीपद्धती, ग्रामीण सण-उत्सव, वऱ्हाडी किंवा कोकणी संस्कृती यांचे दर्शन घडवले जाते. यामुळे शहरांतील लोकांनाही ग्रामीण सांस्कृतिक वारशाची ओळख होते. शोभायात्रा आणि त्यातील उत्स्फूर्त सहभागाबद्दल काही युवा कलाकारांशी संवाद साधताना ते आपल्या सणांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आग्रही आहेत असे जाणवले. दादरचा अमेय जोशी सांगतो, ‘गुढीपाडव्याची शोभायात्रा ही केवळ उत्सवाची मिरवणूक नाही; ती आपल्या सांस्कृतिक स्मृतींचे सार्वजनिक रूप आहे. या माध्यमातून इतिहास, परंपरा आणि सामूहिक अभिमान एकाच वेळी अनुभवता येतो. विशेषतः तरुणांसाठी हा आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडून घेण्याचा महत्त्वाचा क्षण असतो. आम्ही अगदी उत्साहाने यात सहभागी होतो आणि हेच तर आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचे आहे, असेसुद्धा मनापासून वाटते.’मुंबईतील गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली, बदलापूर या भागांमध्ये अगदी जल्लोषात शोभायात्रेचे आयोजन केले जाते. बदलापूर पूर्व मध्ये गांधी चौक, शिवाजी चौक, श्री हनुमान मंदिर देवस्थान अशा भागांमधून शोभायात्रा फिरते. डोंबिवलीतल्या गणपती मंदिर आणि फडके रोड भागात खूप दिमाखात शोभायात्रा आयोजित होते. हल्ली बऱ्याच शोभायात्रेत मराठी सेलिब्रिटींची हजेरी असते. संपूर्ण रस्ता आणि चौकांमध्ये रांगोळ्या काढल्या जातात, त्यामुळे एकंदरीतच गुढीपाडव्याचे अतिशय मंगलमय असे वातावरण पाहणाऱ्याला भारावून टाकते. युवा कलाकार प्राजक्ता कदम गेल्या काही वर्षांपासून शोभायात्रेत नृत्य सादरीकरण आणि वेशभूषा करते. ती सांगते, ‘शोभायात्रा म्हणजे परंपरेचा स्थिर स्वरूपातील वारसा नव्हे, तर तो सतत बदलणारा आणि नव्या पिढीने नव्याने घडवलेला सांस्कृतिक संवाद आहे. आज तरुण मंडळी लोककलेत नवे प्रयोग करत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेतून मोठ्या उत्साहात लोककला सादर केल्या जातात, त्यामुळे हा उत्सव अधिक जिवंत वाटतो’.

गुढीपाडवा आणि शोभायात्रांमधील तरुणांचा उत्साही सहभाग पाहिला की एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, सणांच्या माध्यमातून केवळ परंपरा जपली जात नाही, तर त्यातून प्रत्येक पिढी नव्या अर्थाने घडवली जाते. ढोल-ताशांच्या तालात, पारंपरिक वेशभूषेत आणि सांस्कृतिक सादरीकरणांतून आजची तरुणाई आपल्या वारशाला नवी ऊर्जा देत आहे. त्यामुळेच गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा आरंभ नसून संस्कृती आणि अभिमानाचा नव्याने उलगडणारा उत्सव ठरला आहे.