रोजच्या रुटीनमध्ये शरीर स्वास्थ्यासोबतच महत्त्वाचं असतं ते म्हणजे केसांची काळजी घेणं. हल्ली केसांची निगा ही केवळ तेल लावणं किंवा वेळोवेळी ट्रिमिंग करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती आता सजग जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. स्काल्प मायक्रोबायोमसारख्या वैज्ञानिक संकल्पनांपासून ते ‘क्लीन ब्युटी’ उत्पादनांपर्यंत, पारंपरिक-आयुर्वेदिक उपचारांपासून आधुनिक त्वचारोगतज्ज्ञांच्या उपाययोजनांपर्यंत केसांच्या उत्तम आरोग्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंड, इन्फ्लुएन्सर्सचे सल्ले आणि आक्रमक मार्केटिंग यांच्या गर्दीत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, यातलं खरोखरच केसांसाठी काय परिणामकारक आहे आणि कुठलं फक्त क्षणिक फॅड? या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न…
स्काल्प हेल्थ
पूर्वी केसगळती, कोंडा किंवा कोरडेपणा या समस्यांवर घरगुती उपाय किंवा पारंपरिक तेलोपचार यांनाच प्राधान्य दिले जात होते; मात्र आज ‘स्काल्प हेल्थ’ ही संकल्पना केंद्रस्थानी आली आहे. केसांच्या मुळांपासून आरोग्य सुधारण्यावर भर देणारी उपचारपद्धती, केमिकल-फ्री किंवा सल्फेट-फ्री उत्पादने, तसेच वैयक्तिक गरजांनुसार तयार होणारे कस्टमाइज्ड हेअरकेअर रेजिमेन यांची मागणी वाढताना दिसते. यासोबतच ‘हेअर सायकल’, ‘प्रोटीन बॅलन्स’, ‘हायड्रेशन लेव्हल’, ‘स्काल्प पीएच’ यांसारख्या संज्ञाही लोकप्रिय झाल्या आहेत.
ठाण्यातील ‘ह्युज सलून – हेअर अँड स्किन सोल्युशन’च्या हरप्रीत पाटील सांगतात, ‘कोंड्याची समस्या वगळता केसांबाबतीत, हेअर फॉल आणि हेअर ब्रेक असे दोन प्रकार असतात. केस गळती ही मुळांपासून होते आणि केस मधूनच तुटतात त्याची अनेक कारणे असतात. केस चुकीच्या पद्धतीने विंचरल्याने, केसांमधील कोरडेपणा वाढल्याने, केसांवर जास्त रंग किंवा रसायन वापरल्याने, हे होऊ शकते. वारंवार उद्भवणार्या केसांच्या या समस्यांनुसार उपाय करण्यापेक्षा पूर्ण स्काल्प हेल्थकडे लक्ष देणे गरजेचे असते.’
वैयक्तिक हेअरकेअरची गरज
सामान्यत: सर्वांसाठी एकच सोल्यूशन ही पद्धत मागे पडली आहे. २०२६ मध्ये एआय-आधारित डायग्नोस्टिक टूल्स, ऑनलाइन प्रश्नावली आणि पर्सनल रुटीन बिल्डर्स वापरून वैयक्तिक केसांच्या समस्या-प्रकारानुसार उपाय सुचवले जातात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट गरजांवर आवश्यक परिणामकारक उत्पादने मिळतात. आणखी एका बाबतीत वैयक्तिक काळजी घेण्याची गरज असल्याचे हरप्रीत सांगते. हल्ली बर्याच ठिकाणी बोअरिंगचे पाणी असते.
पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याकडे फिल्टर्स असतात, परंतु बोअरिंगचे पाणी सर्रास इतर वापरासाठी, अंघोळीसाठी घेतले जाते. या पाण्याचा केसांवर बराच परिणाम होतो. नळ आणि शॉवरसाठी हार्ड वॉटर फिल्टरचा वापर केला तर पाणी बर्यापैकी वापरण्यालायक होऊ शकते. बोअरिंग पाण्याचा वापर सर्वाधिक असलेल्या भागात राहणार्या ग्राहकांना मात्र त्यांचे केस धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्याचा सल्ला देत असल्याचे हरप्रीतने सांगितले.
साधे, कमी स्टेप्सचे रुटीन
हेअरकेअरमध्येही ‘मिनिमलिझम’ ही संकल्पना ठळकपणे पुढे आली आहे. अनेक मिनिमलिस्ट रुटीनमध्ये प्रामुख्याने सौम्य शॅम्पूने स्वच्छता, केसांच्या लांबीपुरते कंडिशनिंग, एक मल्टी-फंक्शनल लीव्ह-इन उत्पादन आणि आवश्यक असल्यास हीट प्रोटेक्शन यांचा समावेश असतो. प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे उपचार करण्याऐवजी, प्रत्यक्ष समस्येनुसारच विशेष उपचार केले जातात.
स्काल्पचा पीएच संतुलित ठेवणे, ओव्हरवॉशिंग टाळणे आणि रासायनिक ताण कमी करणे यामुळे केसांची नैसर्गिक संरचना टिकून राहते. विशेषत: भारतीय उष्ण आणि दमट हवामानात हलकी, आवश्यक तेवढीच उत्पादने वापरणे अधिक परिणामकारक ठरते. त्यामुळे मिनिमलिस्ट हेअरकेअर हा केवळ ट्रेंड नसून, जाणीवपूर्वक स्वीकारलेला संतुलित आणि दीर्घकालीन आरोग्यदायी दृष्टिकोन ठरतो आहे.
बॉन्ड-बिल्डिंग आणि स्ट्रक्चरल रिपेअर
बॉन्ड बिल्डिंग हा प्रकार ऐकायला जरी कठीण वाटत असला तरी साध्या भाषेत याचा अर्थ म्हणजे केसांच्या आतील प्रोटीन बंध तुटल्यामुळे होणारे नुकसान. ते दुरुस्त करण्यासाठी बॉन्ड-बिल्डिंग उपचारांचे महत्त्व वाढले आहे. रंगकाम, ब्लीचिंग, रिबॉन्डिंग किंवा वारंवार हीट स्टायलिंगमुळे केसांचे बंध तुटतात आणि त्यामुळे केस नाजूक, कोरडे होतात, तुटतात.
सामान्य कंडिशनर केवळ बाह्य थर गुळगुळीत करतात, परंतु बॉन्ड-बिल्डिंग उत्पादने विशिष्ट संयुगांच्या साहाय्याने केसांच्या आत प्रवेश करून तुटलेल्या प्रोटीन बंधांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करतात, प्रोटीन लॉस कमी करतात आणि केसांची लवचीकता वाढवतात. यामुळे केवळ तात्पुरती चमक मिळत नाही, तर मुळातून उपाय होतो, मात्र हे उपचार पूर्णपणे नवीन केस निर्मिती करू शकत नाहीत; केसांची योग्य निगा, नियंत्रित हीट वापर व संतुलित रुटीन ठेवणे आवश्यक असते, अन्यथा प्रोटीन ओव्हरलोडमुळे केस कडक व कोरडे होऊ शकतात.
सस्टेनेबल आणि क्लीन ब्युटी
२०२६ मध्ये ‘सस्टेनेबल’ आणि ‘क्लीन ब्युटी’ या संकल्पना केवळ मार्केटिंगचे शब्द राहिलेले नाहीत; त्या जेन झींच्या सजग निवडींचा आधार बनल्या आहेत. केश संवर्धनासाठीच्या उत्पादनांमध्ये पुनर्वापरायोग्य (१ीू८ू’ंु’ी) किंवा बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग, रिफिल पाउच सिस्टीम, तसेच कमी प्लास्टिक वापर यांना प्राधान्य दिले जाते आहे.
तर ‘क्लीन ब्युटी’ या संकल्पनेत पॅराबेन-फ्री, सल्फेट-फ्री, सिलिकॉन-फ्री किंवा फ्थॅलेट-फ्री फॉम्र्युला यांचा समावेश होतो; मात्र ‘फ्री-फ्रॉम’ लेबल लावणे पुरेसे मानले जात नाही. ग्राहक आता घटकांची (्रल्लॠ१ी्रिील्ल३२) यादी वाचतात, त्यांचे स्रोत तपासतात आणि त्या घटकांचा त्वचा व पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करतात. नैसर्गिक अर्क, वनस्पती-आधारित घटक यांना वाढती पसंती मिळते आहे.
भारतीय संदर्भातही आयुर्वेदिक आणि स्थानिक वनस्पती-आधारित घटकांकडे नव्याने पाहिले जाते आहे; मात्र त्यांची वैज्ञानिक चाचणी आणि सुरक्षितता यावर भर दिला जातो. टिकाऊपणा हा केवळ पर्यावरणपूरक पॅकेजिंगपुरता मर्यादित नसून, दीर्घकालीन वापरासाठी सुरक्षित आणि परिणामकारक उत्पादन तयार करण्याशीही संबंधित आहे.
तिशी-चाळिशीतला वयोगट थोडा वाढत्या जबाबदार्या, फास्ट लाइफ या सगळ्यात गुरफटलेला असल्याने त्यांच्या केसांच्या समस्या सध्या जास्त आहेत. ते हेअर केअर आणि स्टायलिंगपेक्षा मेन्टेनन्सला जास्त महत्त्व देतात. महाराष्ट्रासारख्या उष्ण आणि दमट हवामानात केसांच्या समस्या वेगळ्या स्वरूपात दिसून येतात. प्रदूषण, ताणतणाव, अनियमित आहार आणि हार्मोनल बदल यांचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे केवळ बाह्य उत्पादनांवर अवलंबून न राहता, अंतर्गत पोषण, योग्य निदान आणि तज्ज्ञांचा सल्ला यांना प्राधान्य देणे आवश्यक ठरते.
ट्रेंड्स आंधळेपणाने स्वीकारण्यापेक्षा, स्वत:च्या केसांची प्रकृती आणि जीवनशैली लक्षात घेऊन योग्य निवड करणे हीच खरी गुरुकिल्ली आहे. शेवटी, निरोगी केसांसाठी नवीन काय? यापेक्षा योग्य काय? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
viva@expressindia.com
