मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळाचा गोडवा, पतंगांची रंगीबेरंगी गर्दी आणि ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ हा प्रेमळ संदेश आठवतो, पण गेल्या काही वर्षांत या सणाला आणखी एक खास झळाळी मिळाली आहे. मकर संक्रांतीच्या या सणाशी हलव्याचे दागिने ही गोष्ट आता कायमची जोडली गेली आहे. हलव्याच्या बांगड्या, चोकर, हेअर ॲक्सेसरीज, हार, कुंदन-डिझाइनमधले कानातले आणि अगदी साडीवर उठून दिसणारे हलव्याच्या दागिन्यांचे सेट्स… परंपरेला आधुनिकतेचा हात धरून घडवण्यात येणाऱ्या या हलवा दागिन्यांनी मकर संक्रांतीचा लुकच बदलून टाकला आहे. एकेकाळी घराघरांत केवळ काळ्या दोऱ्यात तिळगूळ बांधून किंवा साध्या हलव्याच्या वड्या घालून संक्रांत साजरी केली जायची. आज मात्र हलवा दागिन्यांनी त्या परंपरेला नवा आकार दिला आहे. हे दागिने केवळ सणापुरते मर्यादित राहिले नसून स्त्रियांच्या संक्रांतीच्या पेहरावाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.
डिझाइनमध्ये नवनवीन प्रयोग
आजच्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात. काळानुसार आणि ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेत या दागिन्यांच्या डिझाइनमध्ये मोठे बदल झालेले दिसत आहेत. फुलांच्या पाकळ्यांसारखे मणी, कमळ, मोर, पानांच्या आकारातील हलवा पीसेस, कुंदन-प्रेरित हार, टेम्पल ज्वेलरीच्या धर्तीवर तयार केलेले सेट्स आणि मल्टी-लेयर नेकपीस हे सध्या या दागिन्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत. याशिवाय, हलवा आणि मणी एकत्र करून तयार केलेल्या बांगड्या, कड्या, मंगळसूत्र-पॅटर्न हार, कानातल्यांचे मॅचिंग कॉम्बो आणि साडी-ब्लाउजशी रंगसंगती जुळवून तयार केलेले कस्टमाइज्ड दागिन्यांचे सेट्स ग्राहकांची पहिली पसंती बनत आहेत. काही कारागीर हलवा दागिन्यांमध्ये सुताचा दोरा, रेशमी धागे, ज्यूट, मखमली पट्टे किंवा हलकी सोनसळी कागदी सजावट वापरून त्यांना अधिक उठावदार रूप देत आहेत. फ्लोरल आणि हलवा ज्वेलरीचे कॉम्बिनेशनसुद्धा दिसायला रेखीव आणि सुबक दिसते. बदलापूरच्या शर्व क्रिएशनच्या अपर्णा फडके सांगतात, ‘सध्या ग्राहकांची पसंती फ्युजन आणि थीम बेस्ड दोन्ही प्रकारच्या दागिन्यांना आहे. ट्रेंडी डिझाइन्सना खूप मागणी आहे. पारंपरिक सेटसोबतच आधुनिक किंवा फ्य
घरगुती कलेपासून ट्रेंडपर्यंत
हलव्याच्या दागिन्यांचा प्रवास हा पूर्णपणे घरगुती कलेतून सुरू झाला आहे. सुरुवातीला स्त्रियांनी घरच्या घरी हलवा तयार करून, मण्यांसारख्या आकारात दागिन्यांत गुंफायला सुरुवात केली. हळूहळू या कलेला बाजारपेठ मिळाली. आज अनेक गृहउद्योग, महिला बचतगट आणि लघुउद्योजक संक्रांतीपूर्वी हलव्याच्या दागिन्यांच्या ऑर्डर्समध्ये गुंतलेले दिसतात. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे हा ट्रेंड अधिक वेगाने पसरला. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप कॅटलॉग्स आणि ऑनलाइन प्रदर्शनांमधून विविध डिझाइन्स ग्राहकांपर्यंत पोहोचू लागली. परिणामी, हलवा दागिन्यांची मागणी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता इतर राज्यांपर्यंतही वाढली आहे. आता मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये काही देवस्थानांमध्येही हलव्याच्या दागिन्यांचा वापर होताना दिसतो. अपर्णा फडके यांनी २०२२ साली श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला चक्क संपूर्ण हलव्याचा साज चढवला होता. तरुणींबरोबरच लहान मुलांनाही या दिवसांत हलव्याचे दागिने घालून त्यांचं बोरन्हाण करतात. या साध्या परंपरेत आता कमालीचे नावीन्य दिसून येते. लहान मुलींसाठी हलव्याचे फ्रॉक, चप्पल, पर्स असे प्रकारसुद्धा प्रचलित झाले आहेत. अपर्णा यांनी कुरमुरे, शेवई आणि तिळाच्या हलव्यापासून काळी रेखीव साडी बनवली होती. तरुण मुलांसाठीसुद्धा कंठी, अंगठी, थोडी लांबसर माळ, ब्रेसलेट असे अनेक प्रकार बनवले जातात.या ट्रेंडला आणखी लोकप्रिय बनवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. संक्रांतीच्या दिवशी खास फोटोशूट्स, मित्रमैत्रिणींमध्ये ‘संक्रांत लुक’ स्पर्धा, इन्स्टाग्राम रील्स आणि स्टोरीजमधून हलवा दागिन्यांचे विविध डिझाइन्स झळकताना दिसतात. ‘फेस्टिव्ह पण ट्रेंडी’ असा हा लुक तरुण पिढीच्या सौंदर्यदृष्टीला अगदी साजेसा ठरतो आहे.
तरुणाईसाठी सणाचा लुक आणि स्टाइल स्टेटमेंट
आजची तरुण पिढी संक्रांतीकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता, कल्चर, फॅशन आणि सेलिब्रेशन यांचा संगम म्हणून पाहते. नऊवारी किंवा सहावारी साडी, नथ, चंद्रकोर, पारंपरिक दागिने, केसात मोगऱ्याचा गजरा किंवा वेणी आणि त्यासोबत हलव्याचे दागिने असा संक्रांतीचा लुक सध्या विशेष ट्रेंडमध्ये आहे.
कॉलेजमधील संक्रांती कार्यक्रम, ऑफिसमधील एथनिक डे, हळदीकुंकू समारंभ आणि घरगुती फोटोशूट्स यासाठी हलव्याच्या दागिन्यांची खास मागणी वाढली आहे. सोशल मीडियावर #HalwaJewellery, #SankrantLook, #TilGulVibes अशा हॅशटॅग्सखाली शेअर होणारे फोटो आणि रील्स या ट्रेंडला अधिक चालना देत आहेत. काही तरुणी हलव्याच्या दागिन्यांचा वापर फक्त एक दिवसापुरता न ठेवता फोटोशूट किंवा व्हिडीओसाठी वेगवेगळ्या थीम्समध्ये करताना दिसतात. तसेच, साड्यांचे विविध प्रकार, कुर्त्यांची स्टाइल्स, लेहेंगा चोळी असे वेगवेगळ्या पद्धतींचे काळ्या रंगातील पोशाख तयार ठेवत तरुणाई संक्रांतीची जय्यत तयारी करतात.
पर्यावरणपूरक विचारांची जोड
हलव्याचे दागिने लोकप्रिय होण्याचं अजून एक कारण म्हणजे सस्टेनेबल फॅशन. तरुणाईने गेल्या काही वर्षांत सस्टेनेबल फॅशनची संकल्पना बरीच उचलून धरली आहे. हलव्याचे दागिने ही केवळ सौंदर्याची बाब न राहता, पर्यावरणपूरक विचारांचीही खूण बनत आहेत. प्लास्टिक, थर्माकोल किंवा कृत्रिम साहित्यापासून तयार केलेल्या दागिन्यांच्या तुलनेत हे दागिने नैसर्गिक, जैवविघटनशील आणि खाण्यायोग्य आहेत. सण संपल्यानंतर हे दागिने काढून ठेवले जात नाहीत किंवा कचऱ्यात फेकले जात नाहीत, तर प्रसाद म्हणून वाटले जातात किंवा खाल्ले जातात.
आज सस्टेनेबल फॅशन आणि कॉन्शस कन्झम्पशन याबाबत जागरूकता वाढत असताना, हलव्याच्या दागिन्यांचा वापर ही एक अर्थपूर्ण आणि जबाबदार निवड ठरते आहे. परंपरा आणि आधुनिक मूल्ये यांना जोडणारा धागा म्हणून या दागिन्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे. मकर संक्रांतीचा खरा अर्थ गोडवा वाटण्यात आहे, तो तिळगुळात असो, नात्यांत असो किंवा अंगावर चढणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये असो. परंपरेला आधुनिकतेची किनार देत, हलव्याचे दागिने हा सण अधिक रंगतदार, अर्थपूर्ण आणि संस्मरणीय करत आहेत. गोडवा जपणारी ही परंपरा काळानुसार बदलते आहे, पण तिचा आत्मा मात्र तसाच आहे. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला… आणि गोड दिसा’.
