आजच्या ग्लॅमरकेंद्रित मनोरंजनविश्वात फॅशन ही केवळ दिखाव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि सामाजिक भान व्यक्त करण्याचे ते प्रभावी माध्यम बनले आहे. एकेकाळी केवळ लक्झरी ब्रँड्सच्या लोगोभोवती फिरणारा ‘स्टाईल’चा अर्थ आता हळूहळू बदलताना दिसतो आहे. विशेषत: हस्तनिर्मित बॅग्जचा वाढता ट्रेंड हा या बदलाचा महत्त्वाचा भाग ठरतो आहे. बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आता मशीनमेड ऐवजी हाताने तयार केलेल्या, कलात्मक आणि वेगळी ओळख असलेल्या बॅग्जना पसंती देताना दिसत आहेत. या बॅग्ज केवळ फॅशन स्टेटमेंट नसून त्यामागे स्थानिक कारागिरांचे कौशल्य, शाश्वत फॅशनची जाणीव आणि ‘एक्सक्लुझिव्हिटी’ची नवी व्याख्या दडलेली आहे. त्यामुळेच हस्तनिर्मित बॅग्जचा हा ट्रेंड आज मनोरंजनविश्वात केवळ स्टाईलचा भाग नसून, एका सांस्कृतिक बदलाची नांदी ठरतो आहे.

नक्षीदार खडे, सोन्याची जर ते विंटेज-प्रेरित क्लचेसपर्यंत… बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच्या ॲक्सेसरीजऐवजी टेक्श्चर, विविधांगी तपशील असलेल्या लक्षवेधी वस्तूंना पसंती देत आहेत. रेड कार्पेट, एअरपोर्ट लुक्स, कॅज्युअल स्ट्रीट स्टाईल आणि समर फॅशनमध्ये या बॅग्ज मोठ्या प्रमाणावर झळकत आहेत. फॅशन जगतातील ‘क्वाएट लक्झरी’ आणि ‘स्लो फॅशन’ या संकल्पनांमुळे हाताने विणलेल्या, क्रोशे, बीडेड आणि राफिया बॅग्जना नव्याने प्रतिष्ठा मिळते आहे.

अलीकडेच बेला हदीद हिने कोच ब्रॅण्डची ओव्हरसाईज्ड हँडक्राफ्ट बॅग कॅरी केली होती. बोहो-लक्झरी या नव्याने आलेल्या ट्रेंडला साजेसा असा तिचा लुक होता. तसंच, सेलेना गोमेझने राफिया पोत असलेली शोल्डर बॅग वापरली. जेनिफर गार्नर हिने क्रोशे राफिया टोट बॅग सोबतचा तिचा ट्रॅव्हल लुक पोस्ट केला होता, जो खूप चर्चेत होता. जागतिक फॅशन मॅगझिन्सनुसार २०२६ मध्ये टोट बॅग्ज बीड्स कोरलेले छोटे छोटे क्लच, बास्केट बॅग्ज, आणि नेट हॅन्डबॅग्ज या सर्वाधिक चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, या बॅग्ज केवळ ‘फॅशन ॲक्सेसरी’ म्हणून लोकप्रिय होत नाहीत, तर त्या एक लाइफस्टाइल स्टेटमेंट बनत आहेत. क्रोशे टोट, बांबू-राफिया बॅग्ज, पर्ल पोटली, पॅचवर्क डिझाईन, नाविन्यपूर्ण आकाराचे क्लच यांना तरुण कलाकार, इन्फ्लुएन्सर्स आणि स्टायलिस्ट्स यांच्यात विशेष मागणी आहे. ‘परफेक्टली इम्परफेक्ट ’ दिसणारी हँडक्राफ्टेड ॲस्थेटिक्स हीच आज स्टाईल आणि लक्झरीची नवी व्याख्या बनली आहे. मशीनने तयार झालेल्या एकसारख्या उत्पादनांपेक्षा हाताने विणलेल्या नवनवीन पोत असलेल्या, बीड्स, पर्ल, खड्यांचे नक्षीकाम असलेल्या, कारागिरांचा खास परिसस्पर्श लाभलेल्या असंख्य बॅग्ज सध्या फॅशन विश्वात दिसत आहेत. यामुळे प्रत्येक बॅग वेगळी वाटते आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये ‘मास लक्झरी’पेक्षा ‘पर्सनल क्राफ्टमनशिप’ला अधिक महत्त्व मिळताना दिसते आहे.

हँडक्राफ्टेड आणि आर्टिजनल बॅग्जचा प्रभाव जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मानल्या जाणार्या मेट गालापर्यंतही पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांत मेट गालाच्या रेड कार्पेटवर मोठमोठ्या लक्झरी क्लचेसऐवजी कलात्मक, हाताने तयार केलेल्या आणि ‘स्टेटमेंट पीस’ ठरणार्या बॅग्जकडे सेलिब्रिटींचा कल वाढला आहे. विशेषत: २०२५ आणि २०२६ च्या फॅशन सीझनमध्ये ‘क्राफ्टेड लक्झरी’ हा मोठा ट्रेंड ठरला. झेंडाया हिने आपल्या रेड कार्पेट लूकसोबत टेक्श्चर्ड, हाताने डिटेलिंग केलेली मिनी बॅग कॅरी करून ‘आर्ट मीट्स फॅशन’ ही संकल्पना अधोरेखित केली. जेनिफर लोपेझ हिच्या एम्ब्रॉयडर्ड आणि बीडेड क्लचने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा निर्माण केली. अनेक फॅशन समीक्षकांच्या मते, या बॅग्ज केवळ ॲक्सेसरी नव्हत्या; त्या संपूर्ण लूकचा ‘कन्व्हर्सेशन पीस’ बनल्या होत्या.

ईशा अंबानी हिच्या मेट गाला २०२६ लूकमधील सर्वात चर्चेचा भाग तिचा सोन्याचा साडीप्रेरित गाऊन किंवा हिर्यांचे दागिने नव्हते, तर तिच्या हातातील ‘मँगो बॅग’ होती. पहिल्या नजरेत ती एक साधी, स्टायलिश फॅशन ॲक्सेसरी वाटत होती; पण जवळून पाहिल्यावर लक्षात आले की ती प्रत्यक्षात भारतीय कलाकार सुबोध गुप्ता यांच्या ‘आम आदमी’ सिरीजमधील हायपर-रिॲलिस्टिक मँगो स्कल्प्चर होते. हे स्कल्प्चर एका शीअर क्रोशे बॅगमध्ये ठेवण्यात आले होते, ज्यामुळे ते आणखी वास्तववादी दिसत होते. सोशल मीडियावर तर अनेकांनी सुरुवातीला ‘ईशा आंबानी खरंच मेट गालाला आंबा घेऊन आली का?’ अशी चर्चा सुरू केली होती.

बॉलिवूड, हॉलिवूड, मेट गाला आणि कान सारख्या प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटी ज्या प्रकारच्या बॅग्ज कॅरी करताना दिसत आहेत, त्या बॅग्जमध्ये सोने, चांदी, हिरे, क्रिस्टल्स यांचा अतिशय कलात्मक वापर केलेला दिसून येतो. सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या हॅन्डबॅग स्टाईल्स कोणत्या हे समजून घेऊयात…

बीडेड मिनी बॅग्ज

हाताने मोत्यांचे, क्रिस्टल्सचे किंवा रंगीबेरंगी बीड्सचे काम केलेल्या मिनी बॅग्ज सध्या रेड कार्पेट फेव्हरेट ठरत आहेत. या बॅग्जमध्ये सूक्ष्म एम्ब्रॉयडरीमुळे प्रत्येक पीस युनिक दिसतो. काही लक्झरी ब्रॅण्ड्स तर स्वरोवस्की पर्ल्स, क्रिस्टल्स, सिल्व्हर मेष. गोल्ड प्लेटेड हुक्स वापरून या बॅग्जना ज्वेलरीसारखी फिनिशिंग देतात. विशेषत: पार्टीज आणि डेस्टिनेशन वेडिंग्जमध्ये या बॅग्ज मोठ्या प्रमाणावर दिसतात.

गोल्ड-सिल्व्हर क्लच

२०२६मध्ये मेटॅलिक हॅन्डबॅग्ज पुन्हा ट्रेंड मध्ये आल्या आहेत; पण यावेळी स्कल्प्चर प्रकार लोकप्रिय होतो आहे. याचा अर्थ थोडा ऑफ-बिट आकार, हार्ड बॉडी आणि हातात आरामात कॅरी करता येईल, ओझं वाटणार नाही असे डिझाइन्स. गोल्ड आणि सिल्व्हर सोबतच मिरर फिनिश, डायमंड फिनिश मेटल बॅग्ज हे हल्ली प्रत्येक फॅशन रनवेचे हायलाईट आहेत. जुडिथ लेबर सारखे ब्रॅण्ड्स हेरिटेज लक्झरीसाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या हँडबॅग्जच्या डिझाईन्समध्ये हिरे, पाचू, रत्नं आणि अनेक मौल्यवान रत्नांचा वापर होतो. अशा बॅग्जना कलेक्टेबल फॅशन बॅग्ज म्हणतात.

क्रिस्टल आणि डायमंड बॅग्ज

सध्या बॅग ज्वेलरी हा स्वतंत्र ट्रेंड झाला आहे. हॅन्डबॅग्जवर हिर्याचे चार्म्स, रत्नजडित आद्याक्षरे, क्रिस्टलचे झुमके जोडण्याची किंवा लावून घेण्याची फॅशन प्रचंड वाढली आहे. विशेषत: कस्टमाइज्ड लक्झरी बॅग चार्म्स आज उच्च श्रीमंत फॅशन विश्वात स्टेटस सिम्बॉल ठरल्या आहेत. बर्याच भारतीय डिझायनर कंपन्या ब्रँडेड बॅग्जसाठी हल्ली अशा मौल्यवान ॲक्सेसरीज तयार करत आहेत.

कलात्मक आकर्षक बॅग्ज

ईशा अंबानींच्या मँगो हॅन्डबॅगनंतर शिल्पाकृती असलेल्या संकल्पनात्मक हँडबॅग्जचा ट्रेंड खूप वाढला. फळांचे आकार, धातूची फुलं, शिंपल्यांपासून प्रेरित क्लचेस आणि हँड पेंटेड बॅग्ज या फॅशनचा भाग बनल्या आहेत. या बॅग्जमध्ये सुद्धा १८ कॅरेट सोन्याचा मुलामा, हिरे यांचा वापर केला जातो.

विणलेल्या लेदर बॅग्ज

‘बोटेगा व्हेनेटा’च्या ब्रँडेड विणण्याच्या स्टाईलनंतर लेदर बॅग्ज हा लक्झरी चेहरा बनला आहे. या बॅग्ज पूर्णपणे हाताने बनवलेल्या असतात, लेदर पट्ट्यांपासून त्या तयार केल्या जातात. आता या पद्धतीत धातूसारखे दिसणारे चामड्याचे धागे, चांदीचा मुलामा दिलेल्या कडा आणि मॅट गोल्ड हार्डवेअर वापरले जाते आहे. त्यामुळे या बॅग्ज मिनिमलिस्ट असूनही सुरेख दिसतात.

एकंदरीतच २०२६ मधील हँडबॅग ट्रेंड्स हे फक्त फॅशनमधील बदल नाहीत, तर लक्झरीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील मोठे परिवर्तन आहे. आजच्या ग्लोबल फॅशन जगतात फक्त महाग दिसणे पुरेसे राहिलेले नाही; त्यामागे बारीक कलाकुसर, अनन्यसाधारण असणे अधिक महत्त्वाचे ठरते आहे. त्यामुळेच हँडबॅग्जचे हे प्रकार फॅशन स्टेटमेंट बनले आहेत. प्राडाने अलीकडील कलेक्शन्समध्ये हे सगळे प्रकार आणले आहेत. तर गुच्ची हा ब्रँड पारंपरिक कारागिरी, बांबूचे हँडल असलेल्या बॅग्ज आणि हाताने केलेले कोरीवकाम या गोष्टींसाठी प्रचलित होत आहे.

लुई व्हिटॉनचे कलाकारांसोबतच्या ब्रँड डील्स, हँड पेंटेड ट्रंक्स, बास्केट बॅग्ज आणि दागिन्यांसारखी फिनिशिंग असलेल्या बॅग्जकडे वळताना दिसत आहेत, तर डियोरच्या लेडी डियोरआणि डियोर बुक टोट सारख्या आयकॉनिक बॅग्ज आता नाजूक मण्यांचे काम, हाताने केलेले भरतकाम यामुळे नव्या पिढीत अधिक लोकप्रिय होत आहेत. मशीनमेड परफेक्शनपेक्षा हाताने केलेल्या कामातली नवलाई, त्या वस्तूच्या निर्मितीमागची कथा, भावना लोकांना अधिक भावू लागली आहे. आणि कदाचित म्हणूनच बॉलिवूडपासून मेट गालापर्यंत अशा हँडक्राफ्टेड लक्झरी पीसेसचा तोरा अधिक मिरवला जातो आहे.

viva@expressindia.com