क्लिक पॉईंट : घराघरातली नायिका

‘ललित कला केंद्रा’तील शिक्षणाचा काळ हा तिच्यासाठी फार महत्त्वाचा ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

क्लिक पॉईंट : घराघरातली नायिका

वेदवती चिपळूणकर
‘ललित कला केंद्रा’तून नाटय़शास्त्राचं शिक्षण घेतलेली, सातत्याने प्रायोगिक रंगभूमीवर वावरलेली आणि दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून सगळय़ा प्रेक्षकांच्या मनावर साडेचार र्वष प्रभाव टाकणारी अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. आपल्याला नाटक आवडतं आणि म्हणून त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं पाहिजे, असा विचार करून ‘ललित कला केंद्रा’त तिने प्रवेश घेतला. आज आपल्या सहज अभिनयाने अनिता प्रेक्षकांना अगदी चटकन आपलंसं करून घेते.

‘सनई चौघडे’ या चित्रपटातील एका लहानशा भूमिकेतून झालेली तिची सुरुवात असो किंवा ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधली मुख्य भूमिका, अनिता स्वत:चं शंभर टक्के योगदान देऊन काम करते. करिअर म्हणून अभिनयाचंच क्षेत्र निवडण्यामागचं कारण स्पष्ट करताना ती म्हणते, ‘मी ॲक्टिंगच करायची आहे वगैरे काही ठरवलं नव्हतं, पण मला नाटकात काम करायला आवडत होतं. आणि मी स्टेजवर काम तेव्हा करतही होते. एकीकडे मी डान्सही शिकत होते. त्यामुळे मी असा विचार केला की आपल्याला जे आवडतंय त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं’. प्रोफेशन म्हणून पुढे अभिनयातच स्वत:ला काही करायचं आहे की नाही हे तिला त्यावेळी माहिती नव्हतं, असं तिने सांगितलं. भविष्यात या क्षेत्रात काही करेन की नाही माहिती नाही, पण ट्रेनिंग मिळणं गरजेचं आहे असं वाटलं. कदाचित त्यात मी पुढे रिसर्चही करू शकेन असाही विचार केला. म्हणून मी ‘ललित कला केंद्रा’त नाटय़शास्त्राला प्रवेश घेतला, असं तिने स्पष्ट केलं.

‘ललित कला केंद्रा’तील शिक्षणाचा काळ हा तिच्यासाठी फार महत्त्वाचा ठरला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘तिथे शिकायला लागल्यानंतर माझं पर्सेप्शन हळूहळू बदललं. मी जे करतेय ते सातत्याने करत राहिलं पाहिजे तर जमेल असं मला जाणवलं’, असं ती म्हणते. ‘ललित कला केंद्रा’तल्या शिक्षणानंतर अनिताने मुंबईला येऊन प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करायचं ठरवलं. त्यावेळी तिला भेटलेल्या अनेक कलाकारांमुळे तिचा या क्षेत्राकडे आणि कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगल्या अर्थाने बदलत गेला. ती म्हणते, ‘इथे अनेक टॅलेंटेड लोक मला भेटले. काही जण अनुभवाने शिकले होते, काही जण एनएसडी वगैरेसारख्या ठिकाणी शिकून आले होते तर काही जण परदेशातूनही वेगळय़ा प्रकारचं ट्रेनिंग घेऊन आलेले होते. या सगळय़ांमध्ये वावरताना मला सतत शिकायला मिळत होतं. मी माझ्या कामात सातत्य ठेवलं पाहिजे हेदेखील मला इथे काम करताना जाणवलं’, अशा शब्दांत अभिनय शिक्षणामुळे झालेल्या जडणघडणीचा अनुभव तिने सांगितला.

अनिताने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगमंचावर खूप काळ काम केलं आहे. मालिकेमध्ये येण्याआधी जवळपास आठ ते दहा र्वष ती स्टेजवर काम करत होती. ती सांगते, ‘मी चेतन दातार, मोहित टाकळकर यांच्यासोबत काम करायचे, मनस्विनी लता रवींद्र नाटक लिहायची. बहुतेक सगळी प्रायोगिक नाटकं होती. वेगवेगळय़ा फेस्टिवल्सना आम्ही जायचो. तो आठ-दहा वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप वेगळा आणि सुंदर काळ होता. तेव्हा आम्ही केवळ कलेसाठी कला म्हणून नाटक करत होतो. चांगल्या माणसांसोबत काम करत असल्याचं खूप मोठं समाधान माझ्यापाशी त्या काळात होतं.’ प्रायोगिक रंगभूमीवरच्या कामासाठी अनिता दाते हिला ‘विनोद दोशी फेलोशिप’ मिळालेली होती. ही फेलोशिप तिच्यासाठी तिच्या कामाची खूप मोठी शाबासकी होती, असं ती सांगते. अनिता म्हणते, ‘या फेलोशिपची माझ्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. मी त्या वेळेपर्यंत केलेल्या कामाचं केवळ कौतुक म्हणून ती फेलोशिप मला मिळाली होती. तुम्ही छान काम करताय किंवा केलंय एवढंच त्या फेलोशिपचं म्हणणं होतं. त्यामुळे ती माझ्या कामाची पावती होती. माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा त्यावेळी मिळालेली ती फेलोशिप खूप मोलाची आहे.’

खूप काळ रंगमंचावर वावरलेली अनिता २०१६ मध्ये ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तो अनुभव तिच्यासाठी आणि तिच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरला. ‘हे माध्यम माझ्यासाठी नवीन होतं. मी कधीही कॅमेऱ्याला सामोरी गेले नव्हते. मी किती कम्फर्टेबल असेन मला माहिती नव्हतं, पण गोष्टी जमून आल्या आणि मालिका चांगली चार-साडेचार र्वष चालली. त्या काळात मी चांगली कॅमेरा फ्रेंडली झाले असं मला वाटतं’, असं तिने सांगितलं. मात्र दैनंदिन मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाही अनिताने प्रायोगिक रंगभूमी सोडून दिली नाही. यश फार काळ कवटाळून बसायचं नाही, असं अनिताचं म्हणणं असतं.

‘आपल्या मनासारखं होत नाहीये असे प्रसंग खरंतर रोजच येतात’, असं ती म्हणते. ‘कधी आपल्याला हवा तसा सीन होत नाही, आपल्याला हवं तसं पात्र उतरत नाही, काहीतरी चूक होते. या गोष्टी रोज होत असतात. रोज आपले पेशन्स पणाला लागतात, रोज थोडीफार निराशा येत असते आणि रोज त्याला तोंड द्यायचंच असतं. पण वाईट होत असलं किंवा आपल्याकडून चूक झालेली असली तरीही पॉझिटिव्ह वगैरे राहणं मला जमत नाही, त्या सकारात्मकतेवर माझा विश्वास नाही. नाराज होणं चांगलं असतं असं मला वाटतं, असं ती म्हणते. तिचं म्हणणं आपल्याला काहीसं गोंधळात टाकणारं वाटतं, मात्र त्यामागची कारणमीमांसाही ती स्पष्ट करते.

‘आपण नाराज असलो तरच आपण ते बदलण्यासाठी मेहनत घेतो. आपण चुकलो आहोत हे मान्य केलं तर ती सुधारायचा किंवा पुढच्या वेळी चूक टाळायचा प्रयत्न आपल्याकडून केला जातो. जे वाईट चाललं आहे, त्याला वाईटच म्हटलं तरच आपण चांगल्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे आपली चूक स्वीकारणं हे सगळय़ात महत्त्वाचं आहे’, असं ती ठामपणे सांगते. राधिका म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री अनिता दाते लवकरच पुन्हा नव्या रूपात, नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डिजिटल स्वातंत्र्य दिन!
फोटो गॅलरी