वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com

जगात दर आठ तरुणांमागे एका तरुणाला हायपरटेन्शनचा त्रास होतो. १७ मे हा जगभर ‘वल्र्ड हायपरटेन्शन डे’ म्हणून ओळखला जातो. पूर्वी केवळ प्रौढ किंवा वयोवृद्ध लोकांमध्ये आढळणारा हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब आता तरुणाईमध्ये का आला, याचे परिणाम काय असू शकतील, हे कमी कसं करता येईल या सगळय़ाचा आढावा यानिमित्त घेऊ या.

light pollution effect on human health
अंधेरा कायम रहे!!
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Loksatta viva Lakme Fashion Week Fashion Week Dark Summer Fashion market
फॅशन वीकचा डार्क समर
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली

* का डोक्याला हात लावून बसलीयेस/ बसलायस?’ या एकाच प्रश्नाची ही अनेक उत्तरं:

* अगं तेच-तेच विषय चालू असतात घरात, पुढे शिक नाहीतर लग्न कर!’

* अरे मला लग्न करायचंय, पण ती तयार नाही म्हणते अजून, घरी काय सांगू?’

* परीक्षा होऊन चार महिने झालेत पण अजून डिग्री हातात नाही, त्यामुळे नोकरी नाही. स्वत:च्या पायावर उभी कधी राहणार मी अशाने? किती अनसर्टन आहे सगळं!’

* अब्रॉड जायचं म्हणून लोन काढलंय, पण परीक्षाच क्लिअर नाही झाली! आता काय करणार मी!’

एक ना दोन, अनेक कारणांनी तक्रारीचा सूर प्रत्येकच तरुण मुलामुलीचा लागतो. करिअरमधल्या अडचणी, घरातले प्रॉब्लेम्स, पर्सनल प्रॉब्लेम्स अशा अनेक गोष्टी जाणवायला लागतात आणि मग ही तरुणाई हायपर होते. भारतातल्या रिसर्चनुसार १० ते ३० टक्के तरुण प्रौढ अर्थात यंग अ‍ॅडल्ट्समध्ये हायपरटेन्शन आढळून आलं आहे. जगात दर आठ तरुणांमागे एका तरुणाला हायपरटेन्शनचा त्रास होतो. १७ मे हा जगभर ‘वल्र्ड हायपरटेन्शन डे’ म्हणून ओळखला जातो. पूर्वी केवळ प्रौढ किंवा वयोवृद्ध लोकांमध्ये आढळणारा हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब आता तरुणाईमध्ये का आला, याचे परिणाम काय असू शकतील, हे कमी कसं करता येईल हे जाणून घेणे सध्याच्या काळात फार महत्त्वाचे आहे. 

भारतातल्या सव्‍‌र्हेनुसार हायपरटेन्शनमागे ओबेसिटी, स्ट्रेस आणि स्मोकिंग ही कारणं प्रामुख्याने समोर आली आहेत. ओबेसिटी अर्थात आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेलं जास्तीचं वजन.. मग याला बॉडी शेिमग म्हणणार का? तर नाही! किती वयाला, किती उंचीला, किती वजन हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे याची काही जगन्मान्य परिमाणं आहेत. आरोग्याच्या कारणासाठी या फॅक्टरचा विचार सजगपणे व्हायलाच हवा. दुसरं कारण म्हणजे स्मोकिंग आणि ‘स्मोकिंग इज इन्ज्युरिअस टू हेल्थ’ हे तर त्याच्या पाकिटावरच लिहिलेलं असतं. तिसरं आणि सगळय़ात मुख्य कारण म्हणजे मेंटल स्ट्रेस म्हणजेच मानसिक तणाव. इतर कारणं बायोलॉजिकल आहेत, मात्र हे कारण मानसशास्त्रीय आहे आणि सगळय़ांच्या अत्यंत जिव्हाळय़ाचं आहे. फिजिकल कारणांबद्दल सगळेच बोलतात, सांगतात, चर्चा करतात, सल्ले देतात. मात्र आपल्या डोक्यात आणि मनात काय चाललंय हे प्रत्येकाला समजू शकत नाही. लहान वयात येणारा हा स्ट्रेस एवढा एक्स्ट्रीम असेल की ज्याचा परिणाम तब्येतीवर होईल, तर त्याबद्दल कोणीतरी बोललंच पाहिजे. त्यामुळे आपण त्यावर जास्त लक्ष केंद्रित करून बोलणार आहोत.

का येतो आपल्याला स्ट्रेस? या सगळय़ा आपल्याला आता दिसणाऱ्या समस्या पूर्वी कधी अस्तित्वातच नव्हत्या का? आपल्या आईवडिलांनी यांना तोंड दिलं नसेल का? मग याच पिढीत शारीरिक आरोग्यावर परिणाम का झाला? याचं कारण तसं बघितलं तर सोपं आहे. आपल्या आईबाबांनी अनेक प्रॉब्लेम्स आपल्यापर्यंत आणले नाहीत. त्यांना त्यांच्या लहानपणी करायला लागलेले कष्ट, भोगायला लागलेले त्रास, सहन केलेली परिस्थिती आपल्या वाटय़ाला येऊ नये यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न करून आपल्याला शक्यतोवर सगळय़ापासून दूर ठेवलं. त्यामुळे जेव्हा अचानक आपल्याला आपलं करिअर, स्वावलंबन, स्वातंत्र्य, कुटुंब, जबाबदारी, सामाजिक भान अशा गोष्टी एकत्र सांभाळायची वेळ आली तेव्हा आपण साहजिकच गांगरून गेलो. शाळेत होतो तेव्हाही इतरांशी स्पर्धा होती, अनेक बाबतीत होती, अभ्यास अवघड जायचा, पण या सगळय़ापेक्षा खूप मोठय़ा अडचणी बाहेरच्या जगात आहेत याची आपल्याला पुरेशी कल्पना नव्हती. टप्प्याटप्प्याने मॅच्युरिटी येणं ही प्रक्रिया न होता आपल्यावर अचानक अनेक जबाबदाऱ्या येऊन पडल्या आणि आपल्याला त्याचा स्ट्रेस आला. हा स्ट्रेस एकदाच नाही आला, तर तो आता परत परत येत राहतो.

या सगळय़ाचा परिणाम काय झाला? तरुणाईची हेल्थ बिघडली. ज्या तरुणाईच्या जीवावर देश भविष्याची स्वप्नं बघतोय ती तरुणाई आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यात गुंतली आहे. मानसिक ताणाचा सगळय़ात पहिला परिणाम म्हणून हायपरटेन्शन तरुणाईच्या मागे लागलेलं आहे. आधी येणारा मानसिक ताण, त्याचा झोप व भुकेवर होणारा परिणाम आणि सरतेशेवटी संपूर्ण तब्येतीवर त्याचा पडणारा प्रभाव, या चक्रात तरुणाई अडकून गेलेली आहे. हे चक्र जर भेदायचं असेल तर मूळ कारण, म्हणजेच स्ट्रेस, यावर काम करायला हवं. करिअरचा स्ट्रेस, फॅमिली प्रॉब्लेम्सचा स्ट्रेस, लग्नाची चिंता (करायचं असल्याची आणि नसल्याचीही), स्वतंत्र होण्याची धडपड, या सगळय़ाच्या मागे धावताना मागे पडणारी मैत्री, नाती याचा एकत्रित परिणाम म्हणजे हे हायपरटेन्शन! स्ट्रेस न येण्यासाठी किंवा आलेल्या स्ट्रेसचा निचरा करण्यासाठी प्रत्येकाची वेगळी युक्ती असेल. पण काही अगदी साध्यासोप्या गोष्टी पाळल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीचा, अडचणीचा, भांडणाचा, अतिविचार करणं सगळय़ात आधी बंद करायला हवं. प्रत्येक निर्णयाच्या आधी स्वत:च स्वत:ला चार उलटसुलट प्रश्न विचारून पाहावे. प्राधान्याने कोणता प्रॉब्लेम सोडवायचा आहे ते ठरवून एकावेळी एकाच प्रॉब्लेमचा विचार करावा. निर्णय अवघड असेल तर ज्यांच्यावर आपला विश्वास आहे, ज्या व्यक्ती आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाहीत अशी खात्री आहे, अशा व्यक्तींशी चर्चा करावी. रोज रात्री झोपायच्या आधी त्या दिवसाची सगळी भांडणं मिटवून किंवा सोडवून झोपावं. या सगळय़ानंतरही आलेल्या स्ट्रेसचा मात्र कुठेतरी निचरा व्हायलाच हवा. लिहून, बोलून, नाचून, ओरडून, गाणी ऐकून, झोप काढून, फिरायला जाऊन, इत्यादी इत्यादी अनेक पद्धतींपैकी कोणत्याही मार्गाने आपल्याला ताणाला वाट मोकळी करून द्यावी. सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणे. आपल्यावर ताण आहेत हे मान्य करून त्यावर मानसोपचारतज्ज्ञांशीही संवाद साधून मार्ग काढता येईल. त्यामुळे मुळात मानसिक आणि शारीरिक तब्येतीकडे लक्ष द्यायलाच हवे ही यासाठीची पहिली पायरी ठरणार आहे.