वस्त्रान्वेषी : विनय नारकर

‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ ही घासून गुळगुळीत झालेली उक्ती असली तरी अशी एखादी गोष्ट समोर येते आणि याचे परत प्रत्यंतर येते. ‘महाभारता’तील कित्येक प्रसंग, कित्येक गोष्टींचे असंख्य कलाकार त्यांच्या प्रतिभेने, त्यांच्या माध्यमातून सादरीकरण करत आले आहेत. महाभारतातल्या निरनिराळय़ा प्रसंगांचे विविध पद्धतीने अर्थ लावले गेले आहेत आणि वर्णनंही केली गेली आहेत.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

‘द्रौपदी वस्त्रहरण’ हा एक अत्यंत नाटय़प्रू्ण प्रसंग. सर्व महापुरुषांच्या असाहाय्यतेमुळे आणि होत असलेल्या अन्यायामुळे मने उद्विग्न करणारा सर्वोच्च बिंदू .! द्रौपदीची कैफियत कित्येक कलाकारांनी नाटय़ातून, काव्यातून, नृत्यनाटय़ातून वगैरे मांडली आहे. प्रत्येकाने या प्रसंगांचे कॅथॅर्सिस, भावविरेचन आपापल्या पद्धतीने केले आहे. जुन्या मराठी काव्यामध्ये, लोकगीतांमध्ये बऱ्याच वेळा द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचे भावविरेचन अगदी अनपेक्षित प्रकारे, मनोरंजक वाटावे, अशा प्रकारे आले आहे.

मराठी कवींनी या गंभीर प्रसंगाचा वापर वस्त्र वैभवाचे वर्णन करण्यासाठी करून घेतला आहे. हे वस्त्र वैभव या काव्यांमधून ओसंडून वाहिले आहे. अतिशय अलंकारिकपणे, नजाकतीने निरनिराळय़ा साडय़ांची, त्यांच्या पेठांची नावे या काव्यांमधून सुरस पद्धतीने आपल्याला भेटतात. आपली वस्त्र संस्कृती आपल्या भावविश्वाचा भाग असल्याशिवाय हे शक्य झाले नसते.

बहिणीला साडी-चोळी घेणे ही आपल्या संस्कृतीत अगदी जिव्हाळय़ाची गोष्ट. बहीण-भावाच्या जिव्हाळय़ाचं एक प्रकारे प्रतीक होती साडी-चोळीची भेट. अनेक ओव्या लिहिल्या गेल्या आहेत यावर.. श्रीकृष्ण हा द्रौपदीचा भाऊ. मानलेला का असेना पण भाऊच. त्याने त्याच्या या बहिणीला, द्रौपदीला कठीण प्रसंगी दिलेली साडय़ांची भेट ही किती अपूर्व ! हाच धागा पकडून एका ओवीकर्तीने किती समर्पक ओवी रचली आहे. द्रौपदीबाईला सख्खा भाऊ कुठला तिच्या पातळाची दिंड मथुरा पेठेला दिंड म्हणजे साडय़ांचा किंवा वस्त्रांचा दुकानांमध्ये रचून ठेवलेला ढीग. द्रौपदीचा भाऊ हा कृष्ण आहे, हे सांगण्यासाठी इथे अशी अभिव्यक्ती आली आहे. द्रौपदी वस्त्रहरणाचे वर्णन करतानाही मराठी कवींची अशीच वस्त्रांकित अभिव्यक्ती बहरली आहे. या पद्धतीने काव्य रचण्याचा पहिला मान जातो कवी मुक्तेश्वराला. दत्तात्रय सीताराम पंगू यांनी त्यांच्या ‘कविपंचक’ (१९४४) या ग्रंथात म्हटले आहे की मुक्तेश्वराने तोपर्यंतच्या काव्यामधील चाकोरी मोडून रचना आणि काव्य विषय यात क्रांती घडवली. कवी मुक्तेश्वर मुद्गल हे संत एकनाथांचे नातू, मुलीचा मुलगा. त्यांचा काळ साधारण १५७३ ते १६४५ असा समजला जातो. ते आजोबांजवळच जास्त राहिले. त्यामुळे त्यांना पैठणचेच रहिवासी म्हणता येईल. त्यांची वस्त्रांची आवड व अभ्यास यांचा संबंध पैठणशी जोडता येईल.

कवी मुक्तेश्वरानी तोपर्यंतचे नेहमीचे गीता व भागवत हे ग्रंथ सोडून महाभारताला मराठीत आणण्याचा प्रथमच घाट घातला. अध्यात्म आणि भक्ती हीच अभिव्यक्ती असण्याच्या काळात विविध आख्यानांचे रसमाधूर्यपूर्ण वर्णन करून वाचकांना काव्यानंदाची गोडी लावण्याचे कार्य त्यांनी केले. मराठी काव्यात असणाऱ्या संत, पंत , तंत कवींपैकी पंत म्हणजे पंडितकाव्याचे जनक असा मुक्तेश्वराचा आपण उल्लेख करू शकतो. द्रौपदी वस्त्रहरणाच्या आख्यानाचे वर्णन करताना मुक्तेश्वराने वस्त्र वैभवाची मुक्त उधळण केली आहे.

रागे फेडिले ते अंशुक । तंव माझारी देखे क्षीरोदक ॥

तेंही आंसुडता वेगीं । देखे डाळींबी कुसुमरंगी ।

तया आतुनी झगमगी । शुद्धरजत पाटाऊ ॥

दु:शासनाने द्रौपदीच्या साडीला हात घातला, तिची साडी फेडली आणि पाहतो तो काय, आत क्षीरोदक, म्हणजे सफेद रेशमी साडी. तीही फेडली, तर आत डाळींबी कुसुमरंगी साडी, त्याही साडीच्या आतून शुद्ध श्वेत पाटाऊ, म्हणजे रेशमी साडी ती नेसली होती. अशाप्रकारे एका साडीच्या आत दुसरे असे साडय़ांचे वर्णन व नावे येत गेली आहेत. या काव्यात नुसती वस्त्रांची नावे गुंफली आहेत असे नाही तर, त्यात एक लयही साध्य केली आहे. यमक, अनुप्रास साधण्याइतके वस्त्रांचे प्रकार होते व ते मुक्तेश्वरांना माहिती होते !

मांजिष्ट भोजिष्ट धारिवटा गेटमजातीचे पट निधोट ।

गोदातटींचे शुद्धपट । चंद्रकिरणांसारखे ॥

अशा वस्त्र प्रकारांशिवाय त्यावरील नक्षी सांगणाऱ्या, ‘हंस मयूर रेखिले’, त्रिमली फुले सारखे उल्लेखही आहेत. रंगांच्या नावावरून ओळखली जाणारी वस्त्रे व रंगाची योजिलेली मोहक नावे, यांनी तर हे काव्य नखशिखान्त नटले आहे. जसे, डाळींबी, कुसुमरंगी, सेंदूर, गुंज, माणिकवर्ण, केतकी दलरंग, तमाल रसल वर्ण, शुक्लोत्पल, नीलोत्पल, धतूरवर्ण, हंसवर्ण आणि किती तरी. या वस्त्रांच्या पेठांची काही नावेही कवी महोदयांनी दिली आहेत.

तैलंग त्रिगुण मल्याणींची ।

सिंहल कौशल वैदर्भीची ॥

सप्तद्वीपभक्तीची वस्त्रे ।

छपन्नदेशीची विचित्रे ॥

इतकी वस्त्रे फेडतां फेडतां जेरीस आलेल्या दु:शासनाच्या फजितीचा आधार घेऊन या गंभीर प्रसंगाचे रसपूर्ण वर्णन मुक्तेश्वरांनी साध्य केले.

देव नेसवी अनंतहस्ती । दोंभुजांनी फेडीत किती?

मंदळी दु:शासनाची मती । वस्त्रसंपत्ती अनुमाने ॥

एवढी समृद्ध रचना करूनही कवी मुक्तेश्वरांचे समाधान झाले नाही. त्यांनी याच विषयावर आणखी एक रचना केली ! याची सुरुवातही तशी सारखीच आहे,

तेणे आसुडले चीर । तो आंत क्षीरोदक सुंदर

म्हणती अद्भुत स्त्री चरित्र । वस्त्रांत वस्त्र नेसली

तेही ओढीता दुर्जन । आंत देखी सुवर्णवर्ण

द्रौपदी झाकली संपूर्ण । चरणांगुष्ठही दिसेना

सभा जाहली तटस्थ । म्हणती वस्त्रभार असंख्यात

अमोलिक तेजाद्भुत । कोण पुरवी न कळे

हे या काव्यामध्ये यांतील काही वस्त्रांसोबत आणखी वस्त्रे व आणखी रंग कवींनी वर्णिले आहेत.

कुसुमवर्ण पदर । करवीरवर्ण कोविदार

रक्तोत्पलवर्ण सिंदूर । चंपकवर्ण साजिरी

केशरी हरिद्राकुंकुमवर्ण

दुर्वा रंग जंबू चंदन । सप्तरंगे रंगित पूर्ण

या काव्याबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आधीच्या काव्यात मुक्तेश्वरांनी ‘छपन्न देशीची वस्त्रे’ असा उल्लेख केला आहे. त्या छपन्न देशांची नावे देण्याची जबाबदारी कवींनी या काव्यात पूर्ण केली आहे.

काशी कांची अवंतीची । अयोध्या मथुरा मायापुरीची

वसने आणिली द्वारिकेची । भगिनीलागी श्रीधरें

भरत रमणक सप्तविधी वंश हिरण्य

किर्तीद्राक्ष हरित सुवर्ण

या नवखंडीचा वस्त्रे संपूर्ण या जगत्जीवने पुरविली

जंबू शाक प्लक्ष शाल्मली

क्रोंच केतुमाल श्वेतवल्ली

या सप्तद्वीपीची वस्त्रे वनमाली । पांचाळीतें पुरवीत

या सोळा देशांसहित छपन्न देशांची नावे मुक्तेश्वरांनी या काव्यात दिली आहेत. यात आणखी एक मजेशीर गोष्टही आली आहे. ती ओळ अशी आहे,

दुर्योधन म्हणे वस्त्रभार । भांडारी ठेवा हे समग्र

म्हणजे प्रसंग काय, चाललंय काय आणि दुर्योधन म्हणतोय ही वस्त्रे आपल्या भांडारात ठेवा ! मुक्तेश्वराच्या लेखी वस्त्रांचे महत्त्वच यातून दिसून येते. या दोन्ही काव्यात शेवटी श्रीकृष्णाने द्रौपदीला आपला पीतांबर नेसवला, असं आलं आहे. ‘भरजरी गं पीतांबर’ या गाण्यात आणि हे गाणं ज्या लोकगीतांवर बेतलं आहे त्या मध्येही द्रौपदी श्रीकृष्णास आपल्या त्रलोक्यमोलाच्या पीतांबराची चिंधी फाडून देते, असं म्हटलंय. हे बहीण-भावाच्या प्रेमाचं वर्तुळ कसं पूर्ण होतंय आणि तेही साडीच्याच संबंधाने, हे विलक्षण आहे. यानंतरच्या काळात अनेक कवींनी अशाच प्रकारे काव्य रचना केली. अशा द्रौपदी वस्त्रवर्णनांच्या काव्यांची एक छोटीशी परंपराच मुक्तेश्वरांमुळे निर्माण झाली. वेगवेगळय़ा कवींना त्या त्या काळातील वस्त्रांचे वर्णन करण्यासाठी हा प्रसंग उपयोगी पडला, व त्या योगे त्या वस्त्रांच्या नावांचे, रंगांचे दस्तऐवजीकरणही साध्य झाले. मराठी कवींचा हा अंदाजे बयां अलौकिक म्हणता येईल असाच आहे. महाराष्ट्राची वस्त्र संस्कृती इतकी समृद्ध असल्याशिवाय असे घडून आले नसते.

दिंड म्हणजे साडय़ांचा किंवा वस्त्रांचा दुकानांमध्ये रचून ठेवलेला ढीग. द्रौपदीचा भाऊ हा कृष्ण आहे, हे सांगण्यासाठी इथे अशी अभिव्यक्ती आली आहे. द्रौपदी वस्त्रहरणाचे वर्णन करतानाही मराठी कवींची अशीच वस्त्रांकित अभिव्यक्ती बहरली आहे. या पद्धतीने काव्य रचण्याचा पहिला मान जातो कवी मुक्तेश्वराला. दत्तात्रय सीताराम पंगू यांनी त्यांच्या ‘कविपंचक’ (१९४४) या ग्रंथात म्हटले आहे की मुक्तेश्वराने तोपर्यंतच्या काव्यामधील चाकोरी मोडून रचना आणि काव्य विषय यात क्रांती घडवली.

viva@expressindia.com