वैष्णवी वैद्य, गायत्री हसबनीस

चौथीत इतिहासाच्या पाठय़पुस्तकात वाचलेले धडे, गुढी पाडव्याला शोभायात्रेत दिसणारा बाल शिवाजी, दिवाळी ते दिवाळी अंगणात बनणारा किल्ला एवढंच इतिहासमय जग आपल्याला माहिती होतं, पण आता तरुणाई यापलीकडे जाऊन इतिहासाचा वेध घताना दिसते आहे. सुरुवातीला ट्रेकिंगचं आकर्षण म्हणून गडकिल्ल्यांची भ्रमंती करणारी तरुणाई सध्या पॅशनेटली प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन इतिहासाच्या खुणा धुंडाळताना दिसते आहे..

world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
pashmina, Ladakh
लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?

 ‘‘साल – १६७४,  स्थळ – रायगडाचा भव्यदिव्य दरबार.. नजर जाईल तिथपर्यंत लोकसमूहाचा समुद्र, आकाशातल्या सगळय़ा चांदण्या जणू प्रकाशमय झाल्यात इतका झगमगाट!  सगळय़ांच्या डोळय़ात, मनात भावनांचा कल्लोळ, अभिमानाचे तेज स्पष्ट दिसत होते कारण आज मातीला सूर्य लाभणार होता, जनतेला जनक मिळणार होता, आज माझा राजा तख्त मराठीवर बसणार होता!! हे काय झालं..? मी रायगडावर होते!! ..इथे बेडरूममध्ये कशी आले? ..काल बहुधा गडकिल्ल्यांचे व्हिडीओ बघता बघता झोप लागली म्हणून स्वप्न पडलं असेल!’’,  असं गुणगुणत स्वत:च्या काल्पनिक जगामध्ये जगणारी तरुणाई इतिहासातील गडकिल्ल्यांमध्ये रमतेय हे समाधानाचे चित्र आहे. आजकाल आभासी माध्यमांवर गुंतून ब्लॉग किंवा माहितीपर व्हिडीओ पाहण्यापेक्षा जनसंपर्क वाढवत आणि माहिती घेत घेत तरुण मंडळी वेळ मिळेल तशी ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायला पुढाकार घेत आहेत. काही वर्षांपूर्वी पावसाळी ट्रेकिंगचे फॅड आले आणि ते तरुणाईतच विसावले, त्याचप्रमाणे गेल्या दहा-बारा वर्षांत आणि खासकरून वाढत्या इतिहासाचे महत्त्व पाहता चहुबाजूंनी तरुणाईत इतिहासाविषयी रस निर्माण झाला आहे. या उत्सुकतेमुळेच गड, किल्ले फिरण्याची हौस ही तरुणाईत अक्षरक्ष: क्रेझ बनली आहे. आता तरुणांचे अनेक ग्रुप्स फक्त गडकिल्ले यांची माहिती, संशोधन, संवर्धन करताना दिसतात. ट्रेकिंगचा मूळ उद्देशही बव्हंशी गडकिल्ल्यांची भ्रमंती हाच असतो.

भारतात तसेच भारताबाहेरदेखील ऐतिहासिक वास्तूंचा शोध घेत आपल्या जिज्ञासेला वाव देण्यासाठी अनेक तरुण-तरुणी एकटेच भटकंतीही करताना दिसतात. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात ते सिक्कीमपर्यंत अशा नाना ठिकाणी आपल्या पॉकेटमनीच्या बळावर, हातातील फिरस्ती पुस्तके वा माहितीच्या आधारे तसेच योग्य त्या कवचकुंडलासह ही उत्साही मंडळी ऐतिहासिक वास्तूंना सुट्टीच्या दिवशी हमखास भेट देतात. इतिहासाची प्रचंड आवड असणारा रत्नागिरीचा धीरज पाटकर सांगतो, ‘‘मला इतिहास हा विषय, त्यातील गोष्टी सांगायला आणि जाणून घ्यायला आवडतात. मला याची चांगलीच कल्पना होती की आपल्या कोकणात आणि महाराष्ट्रात खूप अशा ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या मला स्वत:ला पाहायला आवडतात. देशातील इतर ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू शोधून तिथली भटकंती करायला मला जास्त आवडते. अर्थातच तिथल्या जवळपास राहणाऱ्या स्थानिक लोकांशी संपर्क करून दुर्ग, किल्ले, गड, देवळं, लेणी येथे कसे जायचे, काय सोबत घ्यायला हवे आणि तिथे पाहण्यासारखे काय काय आहे याची मी माहिती करून घेतो, परंतु त्यातून जी माहिती मला आत्तापर्यंत मिळाली आहे त्यावरून नक्कीच आपल्या जिज्ञासेला अधिक खतपाणी मिळते हे स्पष्ट झाले आहे’’, असे तो सांगतो. एखाद्या ठिकाणाची संपूर्ण माहिती मिळाली की तुमची आवड अजून वाढत जाते. मला देवराईबद्दल अजून जाणून घ्यायचे होते तेव्हा मी त्याबद्दलची अधिक माहिती घ्यायची म्हणून तिथल्या स्थानिक लोकांशी खूप बोललो. अशा अनेक भागांमध्ये मी माहिती घेत घेत फिरलो तसेच तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करतही खूप ठिकाणी फिरलोय. मी महाराष्ट्रात १५० हून अधिक गड, किल्ले फिरलो आहे. याचबरोबरीने मी उत्तर आणि ईशान्य भारतातही फिरलो आहे, अशी आठवणही धीरज सांगतो. 

ठाण्याची मानसी जोशी म्हणते, ‘‘गड तसेच किल्ले ही महाराष्ट्राची ऐतिहासिक ठेव आहे. आपण याबद्दल जितकं जाणून घेऊ तितकं कमीच आहे असं वाटत राहतं. विहिरी, तोफ, रणगाडे, बुरूज, स्तंभ हे सगळं संपुष्टात आलं असलं तरीही त्यामागची विलक्षण कल्पकता मला अतिशय आकर्षित करते. रायगडावरचा दरबार पाहून आपोआपच डोळे पाणावतात आणि ऊर अभिमानाने भरून येतो, अशी एक विलक्षण भावना तिथे प्रत्यक्ष गेल्यावर दाटून येते. त्या काळाच्या या भव्यदिव्यतेचं कौतुकच सातत्याने वाटतं. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात किती अफलातून असतील हे या गडांवरचे अवशेष पाहिल्यावर जाणवतं. फक्त ट्रेकपुरते मर्यादित न राहता हे आपले वैभव सगळीकडे पोहोचले पाहिजे असं वाटतं राहतं. त्यामुळे या सगळय़ा भावभावनांना अजून समृद्ध करण्यासाठी मला ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला निश्चितच आवडते’’.  आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खजिना आपणच जगभर पोहोचवला पाहिजे अशीही हुरहुर केवळ तिथे भेट दिल्यावर जास्त वाटू लागते हे मी आवर्जून सांगेन, असेही ती सांगते. माझं तरुण मित्रमंडळींना हेच आव्हान आहे की योग्य माध्यमांचा योग्य वापर करून हा ठेवा जपावा आणि इतरांपर्यंत पोहोचवावा. हे गड, किल्ले सैनिकी पर्यटनस्थळे म्हणून विकसित केली तर त्यांचे संवर्धनही चांगल्या प्रकारे होऊ शकते याची खात्रीही वाटते, असे तिने आवर्जून सांगितले.

इतिहासाची आवड ही प्रत्येकालाच असते आणि हा वारसा जोपासण्याचीही प्रचंड तळमळ तरुणाईत आहे. आपली आवड अधिक समृद्ध करण्यासाठी ही मंडंळी आपापल्यापरीने शोध घेतात आणि सोबत अनेकांनाही त्या फिरस्तीत सहभागी करून घेतात. गड, किल्ले अन् ट्रेकिंगची भयंकर आवड असलेली डोंबिवलीची गायत्री धर्माधिकारी सांगते, ‘‘प्रत्यक्ष गड-किल्ल्यांना भेट देताना काही शे वर्षांपूर्वीच्या त्या स्थापत्यकलेची ओढ मला तिथपर्यंत खेचून नेते. याचसाठी मी आवर्जून ट्रेकिंगला जाते. किल्ले बघून खूप आश्चर्य वाटतं की त्या काळातसुद्धा वास्तुकलेचा किती बारकाईने अभ्यास होत होता. अनेक ट्रेकिंग ग्रुप्स गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतात पण ते वैयक्तिक पातळीवरही केले गेले पाहिजे’’, असं गायत्री नमूद करते. तर पुण्याचा पंकज वाडेकर सांगतो की, ‘‘माहितीच्या आधारे माझ्यातही इतिहासाची अधिक आवड निर्माण झाली असं मी म्हणेन. त्यातून तो शोध वाढत गेला आणि अक्षरक्ष: मी वेडय़ासारखा नाना ठिकाणी भटकंती करू लागलो. तिथे गेल्यावर अनेक नवीन गोष्टीही समजल्या त्यातून अजून जिज्ञासा निर्माण होत गेली आणि पुन्हा एकदा भेट द्यावीशी वाटत गेली.  पावनिखडची लढाई जिथे झाली त्या विशाळगडाला भेट दिल्यावर तो प्रत्यक्ष अनुभव माझ्यासाठी दांडगा होता, कारण हे मी माध्यमांतून किंवा पुस्तकातून वाचले तर नक्कीच मला माहिती मिळेल पण तो फील थोडासाही येणार नाही. या धडपडीखातर म्हणा मला विशेषत: गडकिल्ल्यावर फिरणं हे खूपच अलौकिक वाटतं’’. खरंतर डिजिटल माध्यमांचा भरमसाट वापर असतानादेखील तरुणाई त्यांच्या छंदापायी एक पाऊल घराबाहेर टाकून स्वत:च धुंडाळा करत ऐतिहासिक वास्तूंचा, शिल्पांचा प्रत्यक्षदर्शी अनुभव व्हावा म्हणून उत्सुक असते, ही बाबच अनेकांना प्रेरणा देणारी आहे. त्यातूनही फक्त आवड म्हणून नाही तर कुतूहल, विलक्षण आकर्षणापायी ही मंडळी नव्याने इतिहासाचा शोध घेतात हेच यावरूनच स्पष्ट होते.

लहाणपणी इतिहासाच्या पुस्तकात रमणारी बच्चेकंपनी मोठी झाल्यावर मात्र इतिहास या विषयाशी असलेले आपले नाते टिकवून आहे. आपल्या याच आवडीला वाव देण्यासाठी भटकंतीशिवाय पर्याय नाही हेच या तरुणाईला वाटते. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू, शिल्पे, गड, किल्ले, लेण्या यांना प्रत्यक्ष भेट देत तिथली खडान् खडा माहिती मिळण्यासाठी ही मंडळी आतूर असतात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठीही परत परत त्या स्थळांना भेट देतात. केवळ सेल्फी, टाइमपास किंवा मिरवण्यासाठी हा सगळा हट्टहास नसून ती जिज्ञासेची भूक आहे. विशेषत: त्या स्थळी जाऊन ऐतिहासिक घटनेची कल्पना करत आपणही इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठीची तरुणाईची ही तळमळ सुखावणारी आहे हे नक्की! viva@expressindia.com