– वेदवती चिपळूणकर परांजपे

काही पिढ्यांपूर्वी खरेदी म्हणजे गरज भागवण्याचं साधन मानलं जात असे. घर सजवणं म्हणजे सणासुदीला पडदे बदलणं, नवीन फर्निचर घेणं किंवा पाहुणे येणार असतील तेव्हाच विशेष लक्ष देणं. मात्र, जेन झी आणि मिलेनियल्स घराकडे एका वेगळ्याच नजरेने पाहतात. त्यांच्या दृष्टीने घर ही केवळ राहण्याची जागा नाही, तर मानसिक शांतता, आराम आणि स्वत:ची ओळख व्यक्त करण्याची जागा आहे. त्यामुळेच छोट्या-छोट्या सजावटीच्या वस्तू, घरातले लाइट्स, इनडोअर प्लांट्स, सुगंधी मेणबत्त्या, मऊ उशा, त्याची हटके डिझायनर कव्हर्स, पुस्तकं किंवा बुक शेल्फ, भिंतीवरच्या फ्रेम्स किंवा स्वत: तयार केलेल्या सजावटीच्या वस्तूंना आज विशेष महत्त्व आहे. ही केवळ सजावट नसून मनाला आराम देणारी, उत्साह देणारी जीवनशैली बनते आहे.

आजची तरुणाई दिवसाचा मोठा भाग घरात घालवते. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लासेस, स्वतंत्र राहण्याची वाढती प्रवृत्ती आणि डिजिटल जीवनशैली यामुळे स्वत:च्या खोलीचं किंवा घराचं वातावरण हे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतं. त्यामुळे अनेकजण आपल्या खोलीतला प्रकाश, रंग, मांडणी आणि स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. मोठे बदल करण्यापेक्षा एखादं रोप, लाकडी फ्रेम, वस्तू, छोटा दिवा, सुगंधी मेणबत्ती, आवडत्या पुस्तकांचा कोपरा किंवा आरामदायी खुर्ची अशा छोट्या गोष्टींनी घर अधिक उबदार आणि आपलंसं बनवतात. दिवसाची सुरुवात आणि शेवट ज्या जागेत होतो, ती जागा मनालाही शांत वाटावी, असा विचार या ट्रेण्डमागे असावा.

मानसशास्त्रात आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा मनावर होणार्‍या परिणामाला खूप महत्त्व आहे. अस्ताव्यस्त, गोंधळलेली किंवा सतत आवाजाने भरलेली जागा मनालाही अस्वस्थ करू शकते. त्याउलट स्वच्छ, नीटनेटक्या आणि शांत जागेत मन अधिक स्थिर राहण्यास मदत होते. म्हणूनच आजची तरुणाई ‘डिक्लटरिंग’ म्हणजेच अनावश्यक वस्तू कमी करण्याची सवय लावते आहे. कमी वस्तू, अधिक मोकळी जागा आणि साधेपणा यामुळे मनावरील भारही कमी झाल्याची भावना अनेकांना अनुभवायला मिळते. ही भावना केवळ सौंदर्याची नसून मानसिक कम्फर्टची असते. घर सजवण्यामध्येही आता एक वेगळीच प्रवृत्ती दिसते. पूर्वी महागड्या वस्तू म्हणजे चांगली सजावट, अशी धारणा होती. आता मात्र स्वत: किंवा इतर कोणी हाताने तयार केलेल्या अर्थात हँडमेड वस्तू, स्थानिक कारागिरांची कलाकुसर, मातीची भांडी, विणकाम, लहान फ्रेम, जुनं फर्निचर नव्याने वापरणं किंवा स्वत: केलेले आर्ट पीसेस यांना अधिक पसंती दिली जाते. कारण, या वस्तू घराला वेगळेपण देतात आणि त्यामागे काहीतरी एक भावनिक गोष्ट जोडलेली असते. स्वत:च्या आवडीने, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी जागा तयार करणं ही अनेकांसाठी स्वत:ला व्यक्त करण्याची पद्धत बनली आहे.

शॉपिंगकडे पाहण्याची दृष्टीही बदलते आहे. काही वर्षांपूर्वी स्ट्रेस शॉपिंग ही अनेकांची सवय बनली होती. आजही ती सवय पूर्णपणे गेली नाही, मात्र त्याचबरोबर विचारपूर्वक खरेदी करण्याची प्रवृत्तीही वाढते आहे. ‘मला ही वस्तू खरोखर उपयोगी आहे का?’, ‘तिचा माझ्या डेली आयुष्याशी काही संबंध आहे का?’, ‘ही वस्तू पाहून मला आनंद होईल का?’ असे प्रश्न अनेक तरुण स्वत:ला विचारताना दिसतात. त्यामुळे घरासाठी घेतलेली एखादी सुंदर वही, आवडता मग, मऊ चादर, वाचनासाठी दिवा किंवा छोटं रोप ही केवळ वस्तू राहत नाही, तर ती दैनंदिन आयुष्यात आनंद देणारी छोटी गुंतवणूक ठरते. अर्थात, याला दुसरी बाजूही आहे. लॉन्ग टर्मच्या दृष्टीने बघितलं तर स्वत:साठी आरामदायी जागा तयार करणं हा स्वत:ची काळजी घेण्याचाच एक भाग आहे. स्वच्छ, नीटनेटकं आणि आपलंसं वाटणारं घर दिवसभराचा ताण कमी करण्यास मदत करू शकतं. काम संपल्यानंतर घरी परतल्यावर मनाला शांत वाटणं, आवडत्या कोपर्‍यात बसून चहा पिणं, पुस्तक वाचणं किंवा शांत संगीत ऐकणं यामुळे भावनिक संतुलन टिकवणं अधिक सोपं जातं. म्हणूनच आजची तरुण पिढी होम डेकोरकडे केवळ सजावटीचा विषय म्हणून पाहत नाही. त्यांच्या दृष्टीने ते मानसिक आरोग्य, स्वत:वरचं प्रेम आणि आयुष्याला आपल्या क्षमतेइतकं सुंदर बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

viva@expressindia.com