स्नेह एरंडे
आजचा शब्द आहे होपकोअर ( Hopecore ). कधी आपला दिवस खूप वाईट गेलेला असतो. एखादी गोष्ट मनासारखी झालेली नसते, भविष्यात काय होणार याची चिंता असते किंवा काहीच करण्याची इच्छा नसते. अशा वेळी आपण असं काहीतरी शोधतो ज्यामुळे आपल्याला थोडं बरं वाटतं. कुणी पुस्तक वाचतं, कुणी गाणी ऐकतं, कुणी मित्राशी बोलतं, तर कुणी एखादा मोटिव्हेशनल व्हिडीओ बघतं. पण, इंटरनेट कल्चरने याचं एक नवीनच रूप तयार केलं आहे, ते म्हणजे ‘होपकोअर’.
‘होपकोअर’
( Hopecore) म्हणजे असे व्हिडीओज, एडिट्स, फोटोज, कोट्स किंवा छोटे मोमेंट्स, जे बघितल्यावर आयुष्याकडे थोडं वेगळ्या नजरेने बघावंसं वाटतं. त्यात एखादा माणूस त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचताना दिसेल, आई-वडिलांसोबतचा एखादा साधा क्षण असेल, मित्र अनेक वर्षांनी भेटताना दिसतील, कुणी पुन्हा उभं राहताना दिसेल किंवा अगदी सूर्यास्त, लहान मुलांचं हसणं आणि रोजच्या आयुष्यातले छोटे सुंदर क्षण असतील. त्यावर एखादीच साधी ओळ असते. ‘‘ Things will get better.ll ÎIYUF, kk You still have so much life left to live.’’ कधी कधी त्या काही सेकंदांच्या व्हिडीओमुळे आपण खरोखर थोडं थांबतो. मला होपकोअरमधली आवडणारी गोष्ट म्हणजे ते आपल्याला प्रॉब्लेम्स नाहीतच, असं अजिबात सांगत नाही.
उलट, अनेक होपकोअर एडिट्स अशाच गोष्टींबद्दल असतात ज्या जवळजवळ सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतात. अपयश, एकटेपणा, करिअरबद्दलची चिंता, नाती तुटणं, स्वत:बद्दलच शंका वाटणं किंवा आपण मागे पडतोय असं वाटणं. फरक एवढाच की होपकोअर एडिट्स त्याच गोष्टीकडे दुसर्या बाजूने बघायला लावतात.
आज गोष्ट वाईट आहे म्हणजे कायम ती तशीच राहणार नाही. एका अपयशामुळे पूर्ण आयुष्य वाया जात नाही. आणि काही वेळा फक्त पुढचा दिवस पाहण्यासाठीसुद्धा आशेचा एक किरण पुरेसा असतो. यात सोशल मीडियाचासुद्धा एक इंटरेस्टिंग भाग आहे. आपले अल्गोरिदम्स आपण काय बघतो, कुठे थांबतो आणि कोणता कंटेंट पुन्हा पाहतो यावरून आपल्याला तसाच कंटेंट दाखवत राहतात. त्यामुळे जर आपल्याला होपकोअर आवडायला लागलं, तर आपल्या फीडमध्ये अशा पॉझिटिव्ह एडिट्स आणि मोमेंट्स जास्त दिसायला लागतात आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा कंटेंट अनेकदा कुठल्या मोठ्या कंपनीने किंवा स्टुडिओने तयार केलेला नसतो. तो आपल्यासारख्याच लोकांनी बनवलेला असतो. कदाचित व्हिडीओ बनवणारा माणूस स्वत: एखाद्या कठीण काळातून जात असेल.
कदाचित तो स्वत:ला आयुष्याकडे कसं बघायचं आहे, हेच त्या एडिटमधून व्यक्त करू पाहात असेल. म्हणून होपकोअरकडे फक्त मोटिव्हेशनल कंटेंट म्हणून पाहणं योग्य नाही, तर तो कधी कधी एका अनोळखी माणसाने दुसर्या अनोळखी माणसाला दिलेला छोटासा रिमाईंडर असतो. आयुष्य परफेक्ट नाही, पण पुढे काहीतरी चांगलं असू शकतं. आणि कदाचित म्हणूनच होपकोअर काम करतं. होपकोअरमुळे प्रॉब्लेम गायब होत नाहीत, फक्त मनात पुन्हा थोडी ‘होप’ निर्माण होते.
viva@expressindia.com
