– स्नेह एरंडे
“काय रे, आज एकदम nonchalant वागतो आहेस, काही झालंय का?”नॉनशलान्ट (nonchalant) हा फ्रेंच भाषेतून इंग्रजी भाषेत आलेला शब्द आहे. याचा अर्थ शांत, बेफिकीर, फारसा परिणाम न झाल्यासारखं वागणारा असा होतो. अशा व्यक्तीला अनेकदा इन्ट्रोव्हर्टसुद्धा म्हटलं जातं. जेन झीपैकी बऱ्याच मुलांना नॉनशलान्ट व्हायचं असतं, त्याचं कारण नॉनशलान्ट असणं म्हणजेच कूल. आपल्याला काही फरक पडत नाही, अशा पद्धतीने वागलं म्हणजेच ते ‘कूल’ समजले जातात. त्यांच्याकडून क्वचितच काही एम्बॅरेसिंग घडतं. ते फार गडबड करत नाहीत, कोणत्याही फंदात सहज अडकत नाहीत. मात्र, त्यांच्या याच नॉनशलान्ट स्वभावामुळे ते स्वतःला पूर्णपणे व्यक्तही करत नाहीत. त्यामुळे काही वेळेला ते एकटेही पडतात, कारण मुळात त्यांना मनातल्या गोष्टी कुणाशीही बोलायची सवय नसते.
इथूनच खरंतर शलान्ट (chalant) होण्याची इच्छा सुरू होते. ‘chalant’ हा खरा, शब्दकोशात नसलेला आणि त्या अर्थाने मान्यता असलेला इंग्रजी शब्द नाही. इंग्रजीत याला back-formation म्हणतात, म्हणजे आधीच्या शब्दातून काही भाग काढून टाकून नवीन शब्द तयार करणं. नॉनशलान्टच्या विरुद्ध अर्थाने आता शलान्ट हा शब्द वापरला जातो. शलान्ट असणं म्हणजे मनमोकळेपणाने बोलणं आणि भावना लपवून न ठेवणं, कधी कधी एम्बेरेसिंग गोष्टी करणं, चुकून काहीतरी बोलून जाणं आणि त्यावर जास्त ओव्हरथिंक न करता पुढे जाणं.
शलान्ट आणि नॉनशलान्ट याचं एक खूप सोपं उदाहरण प्राणीविश्वाचं देता येईल. साधारणपणे मांजर नॉनशलान्ट असते. कसलीच फिकीर नाही, तिचे एक्स्प्रेशन्सही कमी असतात, स्वतःच्या मर्जीनुसार वागणारी आणि सगळीकडे शांतपणे लक्ष ठेवणारी मांजर असते. याउलट कुत्र्याचं उदाहरण आहे. कुत्रा अगदी शलान्ट असतो, कोणी आलं की लगेच पुढे येणारा, आनंद उघडपणे दाखवणारा, कोणी थोडं लक्ष दिलं आपल्याकडे तरीही उत्साहाने प्रतिक्रिया देणारा ही कुत्र्याची वैशिष्ट्ये आहेत. माणसांमध्येही या वृत्ती पाहायला मिळतात. स्पेशली जेन झीच्या दृष्टीने बोलायचं झालं तर शलान्ट लोकही आहेत आणि नॉनशलान्टही आहेत. तसं बाकीच्या जनरेशन्समध्येही या दोन्ही वृत्तीचे लोक पाहायला मिळतात. आता यात शलान्ट असणं चांगलं की नॉनशलान्ट हे मला माहिती नाही, पण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो आणि त्याचं निरीक्षण करायला मला खूप आवडतं. तरुण पिढीच कशाला? अगदी आजोबांच्या वयातील काही व्यक्तीही शलान्ट असलेल्या आणि अगदी नॉनशलान्ट असलेल्याही मी पाहिल्या आहेत. त्यांच्यापैकी काहीजण देवाचं शांत नामस्मरण करत बसतात, तर काहीजण संपूर्ण सोसायटीला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकवत बसतात. त्यामुळे या शब्दाला वयाचं काही बंधन नाही हेही तेवढंच खरं.
थोडक्यात सांगायचं तर, सगळ्या जनरेशन्समध्ये शलान्ट आणि नॉनशलान्ट लोक आहेत, फक्त त्यांच्या स्वभावाला वेगवेगळी नावं दिली जातात. त्यात आमच्या जनरेशनने अजून एक नाव जोडून दिलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही chalant आहात की nonchalant?
