वैष्णवी वैद्य
श्रावण आला की सणवारांची मांदियाळी सुरू होते. यातला तरुणाईच्या अगदी जवळचा सण म्हणजे राखी पौर्णिमा. गेल्या दोन वर्षांत सगळय़ा गोष्टी व्हच्र्युअली होत असताना सणांचे सेलिब्रेशनही अशाच पद्धतीने होत होते. अर्थात, ऑनलाइन सण साजरे करण्यातले नावीन्य तरुणाईने अनुभवले खरे. नव्या पध्दतीने साजरे केलेले हे सणवार त्या क्षणांपुरते का होईना सगळय़ांना आनंद देऊन जात होते, पण आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने त्याच जुन्या पारंपरिक पद्धतीने सण साजरे व्हायला लागले आहेत. एकमेकांना भेटून, खोडय़ा काढत, मस्ती करत या राखी पौर्णिमेचा आनंद अनुभवण्यासाठी तरुणाई प्रचंड उत्साहात आहे.

राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणजे भावंडांचं गेट टुगेदर करण्याचा हक्काचा सण. धावपळीच्या दिवसांतही आवर्जून वेळ काढून एखाद दोन दिवस तरी धमाल, मस्ती, लहानपणीच्या आठवणींचा उजाळा या गोष्टी हमखास कराव्यात असं तरुणाईला वाटतं. या वर्षी तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने चक्क दोन वर्षांनी प्रत्येक घरात असं गेट टुगेदर रंगताना दिसणार आहे. त्यात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही बदल झाले आहेत. कुणी परदेशात शिकायला गेलं आहे, कुणी नोकरीला लागलं आहे, कुणाची लग्नं झाली आहेत. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकत्र येत राखी गिफ्ट्ससोबत आणखी बऱ्याच पाटर्य़ा, गप्पा, मजा या वर्षी नक्की होतील, असं तरुणांचं म्हणणं आहे.

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
28 March Panchang Sankashti Chaturthi Mesh To Meen
आज संकष्टी चतुर्थीला मेष ते मीनपैकी कुणाच्या कुंडलीत मोदक पेढ्यांचा गोडवा? बाप्पा वर देणार की दंड, वाचा
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

मुंबईची सोनाली बर्वे सांगते, आम्ही सगळे दरवर्षी कोणा एका भावंडाच्या घरी दोन दिवसासाठी जमायचो, त्यावेळी मेजवानी, गप्पा, गाणी असा धमाल दंगा असायचा. यावेळी एका गॅपनंतर भेटणार आहोत तर कसं सेलिब्रेट करायचं याचे प्लॅन्स आम्ही खूप आधीच सुरू केले होते. अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ नावाचा सिनेमा ११ ऑगस्टलाच रिलीज होतो आहे. आम्ही सगळी भावंडं तो पाहायला जाणार आहोत. शिवाय, भावांना दोन वर्ष गिफ्ट्स देण्यापासून आराम मिळाला होता. यंदा मात्र त्यांच्याकडून भरघोस गिफ्ट्स घ्यायचं आम्ही बहिणींनी ठरवलं आहे.’’ व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून हे सगळं करताना मजा आलीच होती, परंतु आपलं माणूस समोर असताना जे समाधान आहे ते कशातच नाही, असंही ती सांगते. यानिमित्ताने भावंडांचं बंद झालेलं आऊटिंगही आता पुन्हा धडाक्यात सुरू होणार आहे. यावर्षी राखी पौर्णिमा व इतर सुट्टय़ा लागून आल्या असल्याने बरेच जण रिसॉर्ट वा तत्सम ठिकाणी जाऊनही रक्षा बंधन आनंदात साजरी करण्याचे बेत आखत आहेत.

हल्लीच्या पिढीला कस्टमाईझ्ड पद्धतीच्या भेटवस्तूंची आवड आहे. सोशल मीडियामुळे हे गिफ्ट्स मिळणे फार सोपे झाले आहे. आजकाल अशा भेट वस्तूंचे कॉम्बो पाहायला मिळतात. बहिणींना आपल्या भावांसाठी स्वत:च्या हाताने राख्या बनवायला देखील कित्येकांना आवडतं. पुण्याची गौरी गोखले सांगते, ‘‘ आमच्याकडे दरवर्षी राखी पौर्णिमेला अगदी धमाल असते. इतर वेळी आपआपल्या कामात बिझी असताना असे सणच एकत्र येण्याचं निमित्त असतात. आम्ही सगळी भावंडं मिळून स्वयंपाक करतो, स्वत:च्या हातांनी बनविलेल्या राख्या व भेट वस्तू एकमेकांना देतो. मुद्दामहून जुने आल्बम शोधून फोटो पाहतो. हे सगळं खरंच खूप आनंद देणारं असतं. सोशल मीडियाच्या जगात या भेटीगाठींची एकदा तरी गरज वाटतेच.’’

थोडक्यात काय तर तरुणांची राखी पौर्णिमेची तयारी अगदी जोरात सुरू आहे. भावंडांचं नातं हे निखळ मैत्री सारखंच असतं. एकाच घरातली भावंडं असली तरी एकमेकांबद्दलचं प्रेम, आदर, जिव्हाळा, कधी कधी अगदी तक्रारी, हे सगळं रोज व्यक्त होईलच असं नाही. परंतु वेळ आणि अंतर याचा नात्यावर परिणाम होत नाही हेही तितकंच खरं आहे. एखादी बहीण खोडकर, भांडखोर असेल, पण तिच्यासाठी न विसरता या दिवशी विशेष काहीतरी भावाकडे नक्की असते. एखादा भाऊ नेहमी टेर खेचणारा असेल, पण कधी कधी आई बाबांच्याही आधी एखादी गोष्ट शेअर करायला त्याचीच आठवण येते. राखी बांधून घेणारा हात नेहमी रक्ताच्या नात्यातला असतोच असं नाही. कधी कधी जवळचा मित्र, बहिणीचा नवरा किंवा एखाद्या बहिणीमध्येसुद्धा भाऊ सापडतो. राखी ही संरक्षण करण्याच्या विश्वासाने बांधली जाते, या भावनेला एकाच नात्यात अडकवून का ठेवायचे?, असा विचार करणारीही तरुण मंडळी आजूबाजूला आहेत.

आजच्या तरुणाईला सण समारंभ, कल्पकता, तंत्रज्ञान या सगळय़ाची जितकी आवड आहे तितकंच ते समाज भानही बाळगून असतात. अनाथाश्रम, दिव्यांग किंवा विशेष मुलांसाठी कार्यरत संस्था, महिला बचत गट व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांशी बरेच तरुण-तरुणी जोडले गेले आहेत. सण साजरे करताना त्यातही सामाजिक बांधिलकीचं भान जपणारी, नात्यांचा नवा अर्थ समजून घेणारी ही तरुणाई आपल्या पध्दतीने नवे बदल रुजवू पाहते आहे. त्यांची सण समारंभ साजरे करण्याची परिभाषा बदलली आहेच, पण परंपरांना धक्का न लावता एकमेकांना सांभाळून घेत सण साजरे करण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे.

कस्टमाईझ्ड राखी
सीड राखी या राख्या कागदाच्या लगद्यापासून हाताने बनवतात. त्याच्यात विविध रोपांचे बी रोवले जाते. ही राखी मातीत पेरली की रोपटे उगवते. रक्षाबंधनानंतर हे सीड्स मातीमध्ये पेरल्यावर राखीची आठवण भावासोबत राहते. सण साजरे करताना पर्यावरणपूरक कृतीही आपल्याकडून होते.
खण राखी या राख्या खणाच्या कापडापासून बनवल्या जातात. खणाच्या फॅशनमध्ये हीसुद्धा भर पडली आहे. खूपच सुंदर अशा खणाच्या वेगवेगळय़ा रंगांपासून, खण व जरी मिक्स कापडापासून, त्यावर बारीक डिझाईन करून कल्पकतेने या राख्या बनवल्या जातात.
किड्स राखी या राख्या लहान मुलांसाठी बनविलेल्या असतात. लोकप्रिय कार्टून कॅरॅक्टर्सचे आकार कागद, पुठ्ठा किंवा कापसाने बनवून राखी बनवली जाते.

क्रोशेट राखी सामान्यत: या राख्या लोकरीपासून बनवल्या जातात. लोकरीच्या फॅशनचा देखील ट्रेण्ड आला आहे. इतर राख्यांपेक्षा या राख्या जास्त टिकतात व दिसायला देखील सुंदर दिसतात.

सोने/चांदी/ प्लॅटिनम राखी सोने चांदी सोबत प्लॅटिनम ज्वेलरीचा ट्रेण्ड काही नवीन नाही. हाच ट्रेण्ड राख्यांमध्येही पाहायला मिळतो आहे. ज्वेलर्सकडे अशा राख्या कस्टमाईझ्ड करून मिळतात.
viva@expressindia.com